एक अक्षर संत...

harekala hajabba
harekala hajabbasakal media
Updated on

प्रत्येक माणसाचा प्रवास एका विचाराने सुरू होतो आणि विचाराचे परिवर्तन कृतीत झाले की, त्याला यश मिळाल्याशिवाय राहत नाही. शिक्षणामुळेच आपल्या जगण्यात आमूलाग्र बदल होऊ शकतो. अशीच काहीशी एक गोष्ट कर्नाटकात घडली आहे. व्यक्तीचे नाव आहे हरेकला हजब्बा. वय वर्षे 64. मूळचे कर्नाटकातील हरेकला हजब्बा हे 'अक्षर संत' म्हणून ओळखले जातात. हरेकला हजब्बा हे न्यूपाडापू गावाचे. गावात प्राथमिक शाळा नाही. शाळेचा कुठलाही गंध नाही. त्यामुळेच त्यांना प्राथमिक शिक्षणही कधीच घेता आले नाही.

कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी ते संत्र्याचे दुकान चालवतात. प्राथमिक शिक्षण नसल्यामुळे ते फक्त पैशाची बेरीज-वजाबाकी करायला शिकले. पण त्यांना वाचताही येत नाही. फळे विकून दिवसाला फक्त 150 रुपये ते कमवत असत. फळे विकून दिवसाला 150 रुपये कमावणारे हरेकला हजब्बा रोजच्या प्रमाणे एके दिवशी दुकानात संत्री विकत होते. यादरम्यान काही परदेशी पर्यटक त्यांच्याकडे आले आणि त्यांना इंग्रजीत संत्र्याची किंमत विचारू लागले. मात्र शिक्षण नसल्यामुळे त्याची किंमत सांगता त्यांना आली नाही.

या घटनेमुळे त्यांना स्वतःची खूप लाज वाटली. मी वर्षानुवर्षे विकत असलेल्या फळाची किंमतही सांगू शकत नाही, असा विचार बरेच दिवस त्यांच्या मनात येत राहिला. इथूनच त्यांच्या मनात शाळा सुरू करण्याचा विचार आला. त्यांच्या न्यूपाडापू गावात शाळा नसल्याने गावातील सर्व मुले शालेय शिक्षणापासून वंचित होती. आपण जे भोगले तेच पुढच्या पिढ्यांनीही भोगावे असे हजब्बाला नको होते. यानंतर त्यांनी सन 2000 मध्ये आपल्या आयुष्यातील सर्व बचत शिक्षण क्षेत्रात गुंतवली. संत्री विकून जमवलेल्या बचतीने गावाचा चेहरामोहरा बदलला आणि मुलांना शालेय शिक्षण मिळावे यासाठी एक एकरात शाळा बांधली.

एक अशिक्षित फळ विक्रेता ज्याने आपले संपूर्ण आयुष्य आणि कमाई इतरांना शिक्षित करण्यासाठी समर्पित केली. गावात गरीब, वंचित मुलांसाठी 'प्राथमिक शाळा'ही बांधली. हरेकला हजब्बा यांना शाळा उघडल्याबद्दल, शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल देशाचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'पद्मश्री' जाहीर झाला. सोमवारी राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हरेकला हजब्बा यांचे आता स्वप्न आहे की, गावात प्री-विद्यापीठ महाविद्यालय सुरू करण्याचे. सध्या त्यांच्या गावात न्यूपाडापू येथे शाळेत प्राथमिक स्तरावरच शिक्षण दिले जाते. गावात लवकरात लवकर प्री-विद्यापीठ महाविद्यालय सुरू व्हावे, यासाठी ते सातत्याने काम करत आहेत.

कर्नाटकातील फळ विक्रेत्याला पद्मश्री मिळणे म्हणजे भारताच्या आत्म्याचा सन्मान करण्यासारखे आहे. आपल्या देशात “गरिबी हा अनेक आर्थिक परिस्थितींचा परिणाम आहे. "त्यामुळे गरिबीची समस्या सोडवण्यासाठी गरिबीच्या संकल्पनेच्या पलीकडे जावून आपल्याला विचार करावा लागेल. भारतात हा प्रश्न विचारणे योग्य नाही राहणार की, किती लोक गरीब आहेत त्याहीपेक्षा मोठा प्रश्न म्हणजे गरीब लोक किती गरीब आहेत? भारतातील गरिबी कायम राहणे हे मोठे आव्हान आहे. मनुष्याच्या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य यांच्यातील रोजगाराच्या सुविधा निर्माण करण्याची गरज आहे. देशात शिक्षणाचा समान हक्क आहे. असे असले तरीही अनेकजणांना शिक्षणापासून राहावे लागते. दुर्गम भागात शिक्षण पोहोचले नाही.

भारतात ग्रामीण - शहरी, श्रीमंत - गरीब, उच्च - निच अशा सर्व भेदाभेदीला सामोरे जावे लागते. भारताला स्वातंत्र मिळाले त्याकाळी देशाने 6 ते 14 वर्षे या वयोगटातील सर्व मुला-मुलींना मोफत व सक्तीचे शिक्षण असावे, अशी संविधानात तरतूद केली. शिक्षण हा बालकांचा मूलभूत हक्क आहे, असा घटनेत बदल करून शाळा ही एक किलोमीटर अंतराच्या आत असली पाहिजे, अशी योजना केली. शिक्षणापासून कुणीही वंचित राहिले नाही पाहिजे असा त्या योजनेचा निकष आहे. शिक्षणापासून कुणीही वंचित राहू नये म्हणून दरवर्षी नवीन योजना येतात. परंतु, त्या गरीब लोकांपर्यंत कुठवर पोहोचतात? हा मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. आपण इतिहासात पाहिले आहे, की शिक्षण घेतल्याने कित्येक लोकांनी आपल्या समाजात परिवर्तन घडवून आणले आहे. शिक्षणामुळे माणसाच्या विचारात परिवर्तन होते.

विचारातून कृती घडायला लागते आणि कृतीतून परिणाम दिसायला लागतात. शिक्षण घेतल्याने माणसाला माणसाच्या हक्काची जाणिव व्हायला लागते. तंत्रज्ञानाच्या विकासात समाज इतका पुढे गेला आहे, की त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. मनुष्याने चंद्रावर पाऊल ठेवले आहे. मंगळावर वस्ती बसविण्याचे तो स्वप्नं पाहतो आहे. भौतिक सुविधांनी गजबजलेले हे जग खूप पुढे गेले आहे. परंतु, हे पुढे जाण्याला तेंव्हाच अर्थ प्राप्त होईल जेंव्हा समाजातील प्रत्येक घटक याचा भाग होईल. जगाला दाखविण्यासाठी आपण चंद्रावर पाय ठेऊ आणि एकीकडे माझ्या देशातील स्त्री सकाळी उठून कितीतरी किलोमीटरवर असलेल्या विहिरीचे पाणी आणते. हा विरोधाभास कुठेतरी आता नष्ट झाला पाहिजे. त्यासाठीच, एकमेव मार्ग म्हणजे समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत शिक्षण पोहोचले पाहिजे.

शिक्षणाअभावी मनुष्याचे काय होऊ शकते, हे आता वेगळे सांगण्याची गरज नाही. परंतु, इथेही एक प्रश्न निर्माण होतो, ज्यानी शिक्षण घेऊन अनेक उच्च पदे गाठली आहेत त्यांनी समाजसेवा म्हणून कितीजणांना शिक्षण घेतले पाहिजे म्हणून प्रोत्साहित केले आहे? बोटांवर मोजण्याइतके उदाहरणे सोडली तर आपल्याला आजुबाजूला इतका परिवर्तनवादी विचार करणारे कुणीही सापडणार नाही. पैसा किती कमवला याच्यापेक्षा तो पैसा आपण कसा गुंतवला हे जास्त महत्वाचे आहे. पैसे सर्वचजण कमवतात, पण तो समाजाच्या किती उपयोगाला आला आहे हेही महत्वाचे आहे. पैशांचा गैरवापर करून घेणारे आजकाल चोवीस तास टीव्हीवर दाखवत आहेत. शाळा नाही काढू आपण पण, अशिक्षित असणार्‍या लोकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्याइतकी तरी समाजसेवा आपण नक्किच करू शकतो.

अशिक्षित असूनही हरेकला हजब्बा व्यक्तीने समाजपरिवर्तनाचे किती मोठे काम केले आहे हे आपल्याला त्यांच्या कार्यावरून दिसले. एक साधा, अशिक्षित, पायात चप्पलही न घालणारा फळ विक्रेता समाजासाठी इतका परिवर्तनवादी विचार करू शकतो, तर शिक्षित लोकांनी किती विचार करायला पाहिजे? हरेकला हजब्बा हे दरिद्री, दीन, दुःखी, दलित, वंचित आणि दुर्लक्षित रयतेपर्यंत शिक्षण पोहोचविण्यासाठी अहोरात्र झटणारे आजचे आधुनिक विचाराचे कर्मवीर भाऊराव पाटील आहेतच. कारण, त्यांनी एका प्रसंगावरून शिक्षणाचे महत्व जाणले. शिक्षणामुळेच आपल्या जगण्यात आणि विचारात दोन्हीं बाबींमध्ये आमूलाग्र बदल होऊ शकतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ‘शिक्षण हे वाघिणींचं दूध आहे, जो ते प्राशिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही’ हे वाक्य त्रिकालबाधित सत्य आहे.

✍️संदीप काळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.