गुंतता हृदय हे (मंदार कुलकर्णी)

mandar kulkarni write article in saptarang
mandar kulkarni write article in saptarang
Updated on

"ऑक्‍टोबर' हा चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. कोमात गेलेली एक मुलगी आणि तिच्यात गुंतलेला, तिची काळजी घेणारा एक तरुण एवढंच कथाबीज असलेला हा चित्रपट. गुंतलेपण म्हणजे काय याची वेगळीच व्याख्या हा चित्रपट मांडतो आणि प्रेक्षकांच्या मनात तो रेंगाळत राहतो. असं काय आहे या चित्रपटात? काय आहे त्याचं वेगळेपण? कोणती जादू तो करतो? कशामुळं पिळवटून टाकतो?

कोमात गेलेली एक मुलगी आणि तिच्यात गुंतलेला, तिची काळजी घेणारा एक तरुण. तिचं नाव शिउली, त्याचं नाव डॅन. दोघं एकाच हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमाचा भाग म्हणून एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये काम करणारे. प्रेम वगैरे काही नाही-डॅन मुळात उनाड आहे, थोडा टिनपाट डोक्‍याचा आहे आणि त्याचं आपलं वेगळंच काही तरी चाललेलं असतं. ती त्याला रोज बघते खरी; पण तिच्याही मनात त्याच्याविषयी प्रेम वगैरे भावना नाहीत. एके दिवशी डॅन हॉटेलमध्ये नसताना चौथ्या मजल्यावर चाललेल्या पार्टीत शिउलीचा कठड्यावरून तोल जातो, ती पडते आणि कोमात जाते. सगळेच हादरून जातात तसा डॅनही. मग हळूहळू सगळे मूळपदावर येत असताना शिउलीनं पडण्यापूर्वी "व्हेअर इज डॅन' असा प्रश्‍न विचारल्याचं डॅनला समजतं आणि त्याचं आयुष्यच बदलून जातं. त्यानंतर सुरू होतो तो शिउलीची, तिच्या कुटुंबाची काळजी घेण्याचा आणि खरं तर त्याच्या स्वतःच्या शोधाचा प्रवास.

... "ऑक्‍टोबर' या सध्या प्रचंड चर्चेत असलेल्या चित्रपटाची कहाणी एवढीशीच. एखाद्या प्राजक्ताच्या फुलासारखीच. चित्रपटाचा जीव फार मोठा नाही, त्यात हृदय पिळवटून टाकणारे प्रसंग नाहीत, संवादांचा भडीमार नाही, मोठे स्टार्स नाहीत... तरीही हा चित्रपट प्रत्येकाची मनं जिंकतोय. डोळे भरून येणं म्हणजे काय याचा अर्थ खऱ्या अर्थानं उलगडतोय. चित्रपटगृहातून बाहेर पडल्यानंतरही लोक "ट्रान्स'मधून बाहेर पडत नाहीत, शिउली-डॅनच्या आगळ्यावेगळ्या कहाणीच्या निमित्तानं अनेकांना परिचित-अपरिचित चेहरे दिसतायत, काळजी घेणं म्हणजे काय याचा एक नवा अर्थ उलगडतोय आणि खरं तर माणूस म्हणून प्रगल्भ होण्याचाही एक प्रवास घडताना दिसतोय.

असं काय आहे या चित्रपटात? काय आहे त्याचं वेगळेपण? कोणती जादू तो करतो? कशामुळं पिळवटून टाकतो?.... या प्रश्‍नांची खरं तर अनेक उत्तरं आहेत. एक अगदी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या चित्रपटानं सगळ्याच पठडी मोडल्या आहेत. "कास्टिंग'पासून "ट्रीटमेंट'पर्यंत. तो फक्त पठडीच मोडत नाही, तर थेट काळजाला हात घालतो. त्यासाठी प्रत्येकानं अनेक पातळ्यांवर जीव ओतला आहे. हा चित्रपट रुढार्थानं प्रेमकहाणी नाही. दिग्दर्शक शूजित सरकार यांनीही तेच म्हटलंय. ही आहे मुळात गुंतलेपणाची गोष्ट, स्वतःच्या शोधाची गोष्ट. खरं तर "स्व' हरवलेल्या डॅनला शिउलीची काळजी घेण्याच्या निमित्तानं सापडत चाललेल्या "स्व'ची ही गोष्ट आहे असं म्हणायला हरकत नाही. अनेकांना हा चित्रपट बघून "सदमा'ची आठवण येतेय. काही साम्यस्थळं आहेत; पण "ऑक्‍टोबर'मध्ये वैद्यकीय उपचारांपासून वेगवेगळ्या नात्यांमधल्या संवेदनशील गोष्टींपर्यंत अनेक गोष्टींचं केलेलं "डिटेलिंग' जास्त महत्त्वाचं आहे. हा संपूर्ण चित्रपट म्हणजे एक काव्य असावं असं सरकार यांना वाटत होतं आणि तो एखाद्या काव्यासारखाच तरलपणे उलगडतो. अनेक काव्यांचे वेगवेगळे अर्थ काढता येऊ शकतात. एकाला अभिप्रेत असलेला अर्थ दुसऱ्याला तसाच वाटेल असं नाही. "ऑक्‍टोबर'मध्ये नेमकं हेच आहे आणि तेच त्याचं वेगळेपण आहे.

सशक्त, ठाम व्यक्तिरेखा
अतिशय सशक्त व्यक्तिरेखा हे या चित्रपटाचं वेगळेपण. वरुण धवननं साकारलेला डॅन, वनिता संधूनं साकारलेली शिउली, गीतांजली रावनं साकारलेली शिउलीची आई, साहिल वेदोलियानं साकारलेला मंजीत, आशिष घोष यांनी साकारलेले डॉ. घोष अशा सशक्त व्यक्तिरेखांची वीणच "ऑक्‍टोबर'मध्ये गुंफण्यात आली आहे. लेखिका जुही चतुर्वेदी आणि शूजित अगदी बारीकसारीक गोष्टींतून या व्यक्तिरेखा समर्थपपणे उभ्या करतात. "व्हेअर इज डॅन' असा प्रश्‍न शिउलीनं विचारला होता, हे कळल्यानंतर धडपड करत तिच्या बेडपर्यंत येत "मै वहां था नही' म्हणणारा, शिउलीची लाइफ सपोर्ट सिस्टिम काढण्याचा सल्ला देणाऱ्या काकांना व्हेंटिलेटरच्या स्विचपासून लांब ठेवण्याची सूचना नर्सला देणारा, दिशा हरवलेला किंवा खरं तर सापडलेला डॅन हे या चित्रपटाचं बलस्थान आहे. डॅन बुद्धिमान, चंट नाही. त्याचा भोळसटपणा, खोडकरपणा, अर्धवटपणा याही गोष्टी दिग्दर्शक पुरेशा ठसवतो आणि डॅन असं का वागतो, याचं तर्कशुद्ध कारणही देतो. अर्थात हीच व्यक्तिरेखा नाही, तर इतर प्रत्येक व्यक्तिरेखा पुरेशा ठामपणानं उभी राहते. शिउलीचंच बघा. ती कोमात गेल्यानंतर हालचालच करत नाही; पण तरीही त्याच्या आधी तिचं व्यक्तिमत्त्व पुरेसं उभं राहील याची काळजी जुही-शूजित यांनी घेतली आहे. शिउली दोन-तीन वेळा चोरून डॅनकडं बघते, त्याच्या खोड्यांकडं दुर्लक्ष करते त्यातून तिच्या भावनांची जाणीव आपल्याला होते. नंतर ती कोमामध्ये गेली असली, तरी तिच्या डोळ्यांच्या हालचालींतून, तिच्या आईनं दिलेल्या संदर्भांतूनही तिचं व्यक्तिमत्त्व पुरेपूर उभं राहतं. अशीच गोष्ट मंजीतची. डॅनचा तो रूम पार्टनर, अगदी जवळचा मित्र; पण त्याच्या प्रेमापासून त्याच्या तर्कापर्यंत प्रत्येक गोष्टी आपल्यापर्यंत पोचतात. शिउलीच्या अपघातानंतर सुरवातीला धक्का बसलेले मित्र-मैत्रिणी नंतर त्यांच्या रूटिनला लागतात हेही आपण समजू शकतो.

खरीखुरी "मॉम'
या चित्रपटातली सर्वांत सशक्त व्यक्तिरेखा आहे ती शिउलीच्या आईची. प्रा. विद्या अय्यर यांची. एकीकडं थोरली मुलगी कोमात गेली असताना तिच्या वेदना ती आई म्हणून बघते-भोगते आणि त्याच वेळी आयआयटीमध्ये प्राध्यापक म्हणून तितक्‍याच शांतपणे काम करते. एकीकडं ती मनातून तुटून गेल्यावरही आयसीयूमध्ये ठामपणा दाखवते आणि त्याच वेळी नंतर कधी तरी शिउलीच्या तोंडून "अम्मा' असा शब्द ऐकल्यावर तुटून जाते. एक छान प्रसंग. हॉस्पिटलमध्ये ती आपला धाकटा मुलगा आणि मधली मुलगी यांच्याबरोबर बसलेली असते. तेव्हा ""मी ट्युशनला जाऊ का,'' असं मुलगा तिला विचारतो, तेव्हा विद्या तितक्‍याच ठामपणे म्हणते ः ""ऑफ कोर्स यू शूड गो.'' नंतरही हॉस्पिटलमध्ये ती बहीण-भावांची जोडी एकटी थांबली असताना ती त्यांना जाताना सांगते, की ""एक शांत कोपरा बघून तिथं अभ्यास करत बसा.'' डॅनची आई भेटल्यावर ती काहीएक निर्णय घेते, तेव्हा ती असाच ठामपणा दाखवते आणि शिउलीशी संबंधित बारीकसारीक गोष्टींकडं तितक्‍याच संवेदनशीलपणानंही बघते. या अशा बारीकसारीक गोष्टींतून व्यक्तिमत्त्वं उभी राहत जातात आणि त्याचमुळं चित्रपट थेट आपल्याला भिडतो.

जुही चतुर्वेदीनं एकेक धागे उलटसुलट करत चित्रपटाची वीण घट्ट तयार केली आहे. इतकी बांधीव, ठाम पटकथा बॉलिवूडच्या पडद्यावर खूप दिवसांनी बघायला मिळाली आहे. त्याचमुळं हा चित्रपट उंचीवर जातो. या चित्रपटाची मूळ कल्पना शूजित यांच्या मनात 2004पासून होती. ती त्यांनी जुहीला सांगितली आणि जुहीनं एखाद्या कवितेसारखी संहिता तयार केली. कोणत्याही घडामोडी न घडताही प्रेक्षकांच्या मनात अनेक उलथापालथी करणारी जुहीची संहिता हे या चित्रपटाचं बलस्थान आहे. शूजित यांनी ती संहिता तितक्‍याच काव्यात्म पद्धतीनं मांडली आहे. "मोंटाजेस' म्हणजे छोट्या प्रसंगांच्या लडी त्यांनी चित्रपटभर तयार केल्या आहेत. अनेक प्रसंगांत काही शब्द नाहीत. काही वेळा "मोंटाजेस'मधला एखादा धागा वेगळाच आहे. मध्येच एखादं फूल दिसतं. पाऊस दिसतो. मेट्रो दिसते. त्याचे संदर्भ आपल्याला हळूहळू कळत जातात.

प्रतीकांचा वापर, बारकावे
शूजित सरकार यांनी अनेक प्रतीकांचा या चित्रपटात वापर केला आहे. डॅनचं पंचतारांकित हॉटेलमध्ये काम करणं हेसुद्धा एक प्रतीकच. अशा हॉटेलमध्ये बाह्य गोष्टींना महत्त्व असतं. बाहेर चकचकीत, आत कदाचित चवहीन. इकडं मात्र उलटा प्रकार आहे. शिउली बाह्यपणे बघायला गेलं, तर हॉस्पिटलमध्ये मांसाचा गोळा होऊन गेली आहे; पण आतून जागी आहे. डॅनही बाहेरून बघितलं, तर विस्कटलेला वाटतो; पण आतून त्याचा स्वतःशीच संघर्ष सुरू आहे. हा विरोधाभासांचा खेळ चित्रपटात खूप कमालीचा गुंतवून टाकतो. वैद्यकीय बारकाव्यांपासून व्यक्तिरेखांच्या प्रतिक्रियांपर्यंतचे त्यांनी टिपलेले बारकावे हे या चित्रपटाचं आणखी एक वेगळेपण. इतकं "डिटेलिंग' खूप दिवसांनी रूपेरी पडद्यावर बघायला मिळालं आहे. सरकार यांनी चित्रपट कुठंही लाऊड केलेला नाही, किंबहुना जिथंजिथं लाऊड होण्याची शक्‍यता आहे ती सगळी ठिकाणं त्यांनी जाणीवपूर्वक घासली आहेत. अगदी शिवली पडण्याचा प्रसंगच घ्या. एरवी असे प्रसंग चित्रपटांत कशा पद्धतीनं मांडले जातात आणि या चित्रपटात ते कसे मांडले आहेत तेही अगदी अभ्यासण्यासारखं.

उत्तम कास्टिंग
या चित्रपटाचं कास्टिंग उत्तम झालं आहे. वरुण धवनची निवड अपघातानं झाली. या चित्रपटाची संहिता जुही-शूजित तयार करत होते, तेव्हा त्यांच्या मनात कोणतंही नाव नव्हतं. वरुणची प्रतिमा वेगळी असल्यामुळं ते अर्थातच नव्हतं. एके दिवशी वरुणनं शूजित यांना "आपण भेटू शकतो का,' असं विचारलं. शूजित यांनी त्याला लगेच भेटायला बोलवलं. वरुण तेव्हा झोपेतून नुकताच उठला होता आणि त्यानं आवरलंही नव्हतं. शूजित यांनी त्याला मुद्दाम आहे त्या अवतारात यायला सांगितलं. इस्त्री न केलेले कपडे, विस्कटलेला भांग अशा अवतारात वरुण आला, तेव्हा त्याच्यात शूजित यांना बरोबर डॅन दिसला. तीच गोष्ट गीतांजली रावची. गीतांजली मुळात ऍनिमेटर, दिग्दर्शक. "प्रिंटेड रेनबो' नावाचा अतिशय सुरेख ऍनिमेटेड लघुपट तिनं तयार केला आहे. त्यातली संवेदनशीलता कदाचित शूजित यांना भावली असावी. त्यामुळं त्यांनी थेट तिला या भूमिकेबद्दल विचारलं. गीतांजलीकडं वेळ नव्हता. मात्र, शूजित पाठपुरावा घेत राहिले आणि गीतांजलीनं शिउलीच्या आईचं भावविश्‍व थेट पडद्यावर चितारलं.

वरुणपेक्षा जास्त अवघड व्यक्तिरेखा आहे शिउलीची. वनिता संधूनं ती जबरदस्त पद्धतीनं साकारली आहे. शूजित यांनी तिच्याबरोबर एका जाहिरातीसाठी काम केलं होतं. त्यांना आणि जुहीला तिचे बोलके डोळे भावले आणि त्यांनी शिउलीची भूमिका तिला दिली. वनिता खूप वेळ कोमात आहे त्यामुळं तिचं शरीर निश्‍चल आहे; पण आतून जिवंत असलेलं तिचं मनसुद्धा आपल्याला जाणवतं इतक्‍या परिणामकारकपणे तिनं या भूमिकेत जीव ओतला आहे. इतरही बहुतेक सगळे कलाकार हे चित्रपटात पहिल्यांदाच काम करत आहेत आणि ते रंगभूमीवर काम करणारे आहेत. रंगभूमीवर काम करण्यासाठी लागणारी निष्ठा अर्थातच इथं निश्‍चितपणे उपयोगी पडते.
तर अशी ही "ऑक्‍टोबर'ची कहाणी. नात्यांचा कोणताही बंदिस्तपणा नाही, पठडीबाज संवाद नाहीत, साचेबद्ध मांडणी नाही. वरुणचा अपवाद सोडला, तर नेहमीचे कलाकार नाहीत, की बॉलिवूड चित्रपटांतलं नेहमीचं तर्कशास्त्रही नाही. तरीही तो काळजाला भिडतो, मनात रेंगाळत राहतो. हा चित्रपट बघताना सगळी धावपळ, गडबड बाजूला ठेवायची. स्वतःच्या विचारांचाही वेग थोडा कमी करायचा. शांत व्हायचं आणि त्यातल्या व्यक्तिरेखांमध्ये गुंतून जात त्यांचा प्रवास अनुभवायचा. हे गुंतलेपण आपल्यातही आलं, की अनेक गोष्टींकडं बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो, काही न उलगडलेली कोडी उलगडतात, स्वतःचेही हळवे कोपरे धुंडाळता येतात. प्रत्येकात एक डॅन असतोच. तो कुठं तरी हरवून गेलेला असतो. तो किमान काही तासांसाठी पुन्हा शोधण्याची संधी "ऑक्‍टोबर' देतो इतकंच!

"ऑक्‍टोबर थीम' वर्षापूर्वीच तयार
"ऑक्‍टोबर'चं थीम सॉंग हे या चित्रपटाचं बलस्थान आहे. शंतनू मोईत्रा या गुणी संगीतकारानं ते तयार केलंय. बहुतेक वेळा चित्रपट तयार झाल्यानंतर पार्श्‍वसंगीत बनतं. मात्र, "ऑक्‍टोबर थीम' तयार झाली होती चक्क वर्षापूर्वी. प्रत्यक्ष चित्रीकरण सुरू करण्यापूर्वी. ही थीम चित्रीकरणादरम्यान शूजित यांच्या डोक्‍यात राहावी, असं शंतनूला वाटत होतं. त्यामुळं त्यानं ती आधीच तयार केली. शूजित यांनी कथा ऐकवली आणि त्यातून शंतनू यांचं संगीतबीज तयार झालं. या "थीम'मधलं व्हायोलिन वाजवलं आहे रोहन रॉय यांनी. शंतनूनं ते कोलकत्यात आधी रेकॉर्ड केलं. त्यानंतर रशियातल्या एका मोठ्या नावाजलेल्या स्टुडिओत बाकीच्या वाद्यांचं रेकॉर्डिंग झालं. मारिया टेन, पोलिना रोमानोव्हा यांनी वाजवलेलं व्हायोलिन, इया टेन यांचं सेलो, सोफिया किप्रस्काया, जॉर्ज जोसेफ यांचं पियानो आणि पावेल झुको यांचं व्हायोला यांनी ही थीम जिवंत केली आहे. वादक व्यग्र असल्यामुळं तीन दिवसांत ते रेकॉर्डिंग झालं. "तुम्ही तुमचं हृदय ओता,' असं शंतनूनं त्या वादकांना सांगितलं होतं. ती सूचना "क्‍लिक' झाली.

वरुण धवनची मेहनत
वरुणला डॅनच्या व्यक्तिरेखेपर्यंत पोचवण्यासाठी शूजित यांनी खूप कसरती केल्या. एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये वरुणला एक महिना काम करायला लागलं. पदार्थ बनवण्यापासून सर्व्ह करण्यापर्यंत सगळी कामं त्यानं केली. एवढंच नाही, तर त्याच्या रोजच्या आयुष्यात बदल करावे लागले. रोज सकाळी उठल्यावर मोबाईल बघण्याआधी फुलांचं दहा मिनिटं निरीक्षण करण्याची अट त्याला घालण्यात आली होती. सेटवर मोबाईलचा वापर अर्थातच निषिद्ध होताच. टोन्ड शरीराऐवजी सर्वसामान्य मुलगा वाटेल अशा पद्धतीचं फिजिक तयार करायला त्याला सांगण्यात आलं. वरुणचं बोलणं नेहमी वरच्या सुरांत असतं. तो टोन शूजित यांनी खूप जाणीवपूर्वक खाली आणायला लावला. त्याचे रिफ्लेक्‍सेस खूप "सॉफ्ट' करायला लावले. या सगळ्या गोष्टींमुळं वरुण आपोआप त्या व्यक्तिरेखेत गेला. "वरुणचा हा पहिलाच चित्रपट आहे,' असं शूजित गंमतीनं म्हणतात आणि ते काही अर्थानं खरंही वाटतं. अशा प्रकारचा वरुण आपण पडद्यावर पहिल्यांदाच बघितला आहे.

क्रमवार चित्रीकरण
कोणत्याही चित्रपटाचं चित्रीकरण करताना अनेकदा त्यांचा क्रम प्रेक्षकांच्या बुद्धीपलीकडचा असतो. मात्र, शूजित यांनी "ऑक्‍टोबर'चं चित्रीकरण करताना मुद्दाम क्रमवार चित्रीकरण केलंय. म्हणजे चित्रपट जिथून सुरू होतो तिथूनच चित्रीकरणही सुरू होतं आणि चित्रपट संपतो तिथंच चित्रीकरणही संपतं. तांत्रिक गोष्टींसाठी काही गोष्टी पुढंमागं असतील; पण बहुतांश चित्रीकरण क्रमवार झाल्यामुळं बहुतेक सगळ्या कलाकारांना खूप उपयोग झाला आणि व्यक्तिरेखांचा प्रवासही ते अनुभवू शकले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()