‘पानी दा रंग’

कोणतीही सामाजिक समस्या घ्या, तिचं गांभीर्य कायम ठेवत एका अतरंगी विनोदी ट्रॅकमधून ती अधोरेखित करा, प्रेक्षकांना सुरवातीला धमाल हसवत हळूहळू त्या समस्येबाबत विचार करायला प्रवृत्त करा...
Annu Kapur and Aayushman Khurana
Annu Kapur and Aayushman KhuranaSakal
Updated on

कोणतीही सामाजिक समस्या घ्या, तिचं गांभीर्य कायम ठेवत एका अतरंगी विनोदी ट्रॅकमधून ती अधोरेखित करा, प्रेक्षकांना सुरवातीला धमाल हसवत हळूहळू त्या समस्येबाबत विचार करायला प्रवृत्त करा... आणि हो, समस्या कोणतीही असली, तरी तिला विनोदाच्या माध्यमातून सांगायचं असेल तर आयुष्मान खुराना नावाचा अष्टपैलू विनोदवीर घ्या. हा एकखांबी तंबू असला, म्हणजे चित्रपटाची मांडणी सोपी होण्यापासून चित्रपटाच्या ब्रँडिंगपर्यंत सगळ्या गोष्टी आपसूकच होतील.

येस. बॉलिवूडमध्ये भलताच लोकप्रिय झालेला हा फंडा आहे. सध्या कोरोनामुळं त्याला ब्रेक लागला असला, तरी सगळं सुरू झालं, की अर्थातच हा फंडा पुन्हा अंमलात येईलच. कारण, आयुष्मान खुराना हे चलनी नाणं आहे. त्याचा खणखणाट होणारच. विवेक ओबेरायसारख्यांनी नाकारलेल्या ‘व्हिकी डोनर’ या चित्रपटाची संधी आयुष्मान साधतो काय, त्यातलं आव्हान लक्षात घेऊन स्वतः इतर तीन-चार चांगल्या चित्रपटांची संधी सोडतो काय, हा चित्रपट सुपरहिट होतो काय आणि फक्त एवढंच नाही, तर ‘टॅबू असलेल्या विषयांवर विनोदाच्या माध्यमातून भाष्य करणारे चित्रपट’ असा नवीन जॉनर तयार होतो काय आणि आयुष्मान अशा चित्रपटांचा अविभाज्य भाग बनतो काय, सगळंच आश्चर्यकारक!! बॉलिवूडमध्ये बाहेरून येऊन स्वतःचं स्थान निर्माण करण्याबरोबर स्वतःची ‘युनिक’ ओळख तयार करणारे जे काही मोजके लोक आहेत त्यात आयुष्मानचं नाव अग्रभागी आहे. त्यातही एक गंमत आहे. आयुष्मान मुळातला गायक आणि तो लोकप्रिय होता ‘व्हिडिओ जॉकी’ म्हणून. ‘मान न मान-मै तेरा आयुष्मान’सारखे रेडिओ शो ते ‘रोडीज’पर्यंत बरंच काही तो करत होता; पण तो बनला अभिनेता-एवढंच नव्हे, तर त्यानं पहिल्याच चित्रपटात अशी काही छाप पाडली, की ‘मध्यमवर्गीयांचे विषय पडद्यावर साकारणारा नवा अमोल पालेकर’ अशीही त्याची ओळख बनली.

‘व्हिकी डोनर’ची निर्मिती जॉन अब्राहमनं केली आहे; पण जॉननं सुदैवानं ही भूमिका करण्याचा आग्रह धरला नाही. कदाचित त्यानं ती चूक केली असती, तर हा नवीन जॉनर तयारच झाला नसता. कारण आयुष्माननं ज्या सहजपणे आणि कुठंही पातळी न सोडता ‘स्पर्म डोनेशन’ हा अवघड विषय नैसर्गिक अभिनयाच्या माध्यमातून मांडलाय, तो जॉनला मांडता आला नसता. त्यामुळे तो चित्रपट तेव्हाच फ्लॉप झाला असता आणि मग पुढं ‘शुभमंगल सावधान’, ‘बधाई हो बधाई’ असे चित्रपट आलेच नसते.

आयुष्माननं केलेल्या एका भूमिकेनं आणि ‘व्हिकी डोनर’च्या विषयानं अनेक गोष्टी केल्या. एक तर लैंगिक समस्या, डोक्यावर केस नसणं, उतारवयात गर्भवती होणं असे किती तरी विषय हिंदी चित्रपटांच्या परिघातसुद्धा येऊ शकत नव्हते ते आले, विनोदाचा डोस देत असे विषय मांडता येऊ शकतात याची जाणीव अनेक लेखक-दिग्दर्शकांना झाली आणि नायकत्वाच्या व्याख्याही बदलल्या. यात मुळात दिग्दर्शक शूजित सरकार यांचा विश्वास, लेखिका जुही चतुर्वेदी हिचं सामर्थ्य आणि अर्थातच जॉन अब्राहमनं निर्माता म्हणून दाखवलेलं धाडस या गोष्टी जितक्या कारणीभूत होत्या, तितकीच आयुष्मानच्या अभिनयातली ताकदही होती.

आयुष्मान रुढार्थानं विनोदी अभिनेता नाही- म्हणजे ओढूनताणून विनोदनिर्मिती करणारा अभिनेता नाही. मात्र, त्याच्याकडे त्या त्या व्यक्तिरेखांच्या अंतरंगात जाण्याचं विलक्षण कौशल्य आहे. त्यामुळेच अशा व्यक्तिरेखांबाबत घडणारे प्रासंगिक विनोद तो त्यांच्या अंतरंगात जाऊन साकारू शकतो. त्यामुळे हे प्रसंग सच्चे वाटतात. दुसरं म्हणजे आयुष्मान त्या व्यक्तिरेखेची थट्टा उडवत नाही. किंबहुना त्याच्या मनात त्या वेळी त्या व्यक्तिरेखेबाबत करुणाच असते-त्यामुळे त्याचा अभिनय प्रेक्षक रिलेट करू शकतात. प्रेक्षक हसत असतात; पण त्याच वेळी त्यांना त्या समस्येचं गांभीर्यही तितकंच कळत असतं. आयुष्यमानच्या या कौशल्यामुळेच त्याची गाडी ‘व्हिकी डोनर’वर थांबली नाही. ‘शुभमंगल सावधान’, ‘बधाई हो बधाई’, ‘बाला’ अशा प्रत्येक चित्रपटात तो प्रेक्षकांना हसवतहसवत खूप काही सांगत गेला.

आयुष्मानच्या अभिनयाचं एकच उदाहरण सांगायचं, तर ‘अंधाधुन’ हा चित्रपट पुन्हा एकदा बघा. यात एका प्रसंगात जेव्हा आयुष्मान तब्बूनं साकारलेल्या व्यक्तिरेखेच्या घरी जातो, तेव्हा तो साकारत असलेली व्यक्तिरेखा दिसत नसल्याचं नाटक करतेय. समोर चक्क एक खून झालाय. त्याला प्रचंड धक्का बसला आहे; पण त्याच्या नाटकामुळं त्याला ते दाखवता येत नाहीये. खून करणाऱ्यांनाही हा खराच अंध आहे की नाही याची खात्री नसल्यामुळे तेही त्याच्याकडं घाबरून आणि संशयानंही बघताहेत. हा संपूर्ण प्रसंग बघताना हसूनहसून पुरेवाट होते; पण त्यामागे त्या सगळ्या कलाकारांनी दाखवलेलं अभिनयकौशल्य आहे. आयुष्मानच्या या भूमिकेवर राष्ट्रीय पुरस्काराचं शिक्कामोर्तब झालंच.

‘जे करायचं ते युनिकच करायचं,’ एवढं एक उद्दिष्ट ठेवून आयुष्मान काम करतोय. तो एक परिपूर्ण अभिनेता आहे आणि त्याच वेळी अनेकांच्या समस्या समजू शकणारा प्रगल्भ माणूस. सातत्यपूर्ण विनोदनिर्मितीसाठी लागणारे हे दोन्ही गुण त्याच्यात आहेत. त्याचे चित्रपट लोकांना हसवतात; पण काही तरी सांगतात. उद्या तो नवीन कुठली समस्या घेऊन येईल, तुम्हाला हसवेल; पण समस्येचं गांभीर्यही नेमकेपणानं पोचवेल. ‘पानी दा रंग वेखके’ हे त्याचं गाणं लोकप्रिय आहे. आयुष्मानचा अभिनयही म्हणजे खरं तर पाणीच की. कोणत्याही व्यक्तिरेखेचा रंग घेणारं. नाही का?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()