Hera Pheri
Hera PheriSakal

परेश का ‘स्टाइल’ है रे बाबा!

‘हेराफेरी’ आणि ‘फिर हेराफेरी’ सुपरडुपर हिट झाल्यानंतर ‘हेराफेरी ३’ची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता असली, तरी त्याची गाडी अजूनही डळमळीत आहे.
Published on

‘हेराफेरी’ आणि ‘फिर हेराफेरी’ सुपरडुपर हिट झाल्यानंतर ‘हेराफेरी ३’ची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता असली, तरी त्याची गाडी अजूनही डळमळीत आहे. कधी दिग्दर्शकांची नावं बदलत आहेत, कधी मुख्य अभिनेते बदलणार आहेत, तर कधी त्याची कथाही बदलली जात असल्याची चर्चा आहे. मात्र, इतर अनेक गोष्टी बदलण्याच्या चर्चा असल्या तरी या चित्रपटात एक व्यक्तिरेखा नक्की कायम राहणार आहे. ती व्यक्तिरेखा आहे बाबुरावची. येस!! जाड भिंगांचा चष्मा असलेला, धोतर नेसणारा आणि अतिशय भाबडा बाबुराव या चित्रपटात नक्की असणार आहे आणि ‘‘ये बाबुराव का स्टाइल है रे बाबा,’’ म्हणत हसवणार आहे. परेश रावल नावाचा चतुरस्त्र अभिनेताच ती साकारेल. एखाद्या चित्रपटात मुख्य अभिनेत्यांपेक्षा सहायक अभिनेत्याची लोकप्रियता जास्त असू शकते त्याचं हे एक उदाहरण. परेश रावल यांनी ज्या प्रकारे धमाल केली आहे त्यालाच ही दाद आहे हे खरंच.

आणि फक्त बाबुरावच कशाला, ‘आवारा पागल दिवाना’मधला बायकोला प्रचंड घाबरणारा मणिलाल, ‘हंगामा’मधला ‘अरे झूठ बोल रहा है ये’ म्हणणारा राधेश्याम तिवारी, ‘गरम मसाला’मधला ‘मै घर छोडके चला’ म्हणणारा मँबो अशा किती व्यक्तिरेखा सांगाव्यात- ज्यांच्यावर परेश रावल यांनी जबरदस्त छाप पाडली आहे. भारतीय चित्रपटांच्या इतिहासात ज्या विनोदी व्यक्तिरेखा प्रचंड लोकप्रिय आहेत त्यांच्यापैकी अनेक परेशभाईंनी साकारल्या आहेत हे जितकं विशेष आहे, तितकंच खलनायक ते विनोदी अभिनेता असा प्रवास अतिशय हुकमतीनं करणारे कलाकार म्हणूनही परेश रावल यांचं नाव महत्त्वाचं आहे.

गंमत म्हणजे परेशभाईंच्या पत्नी स्वरूप संपत जेव्हा टीव्हीवर ‘ये जो है जिंदगी’, ‘ऑल द बेस्ट’ अशा मालिकांमध्ये धमाल विनोदी व्यक्तिरेखा साकारत होत्या, तेव्हाही विनोदाचं जग परेश रावल यांना खुणावत नव्हतं. ते खलनायकी अंदाज दाखवण्यात समाधानी होते. अगदी ‘अंदाज अपना अपना’सारख्या विनोदी चित्रपटातही ते खलनायकच होते. ‘जुदाई’सारख्या चित्रपटांमध्ये सतत प्रश्न विचारणाऱ्या शंकासुराची एखादीदुसरी भूमिका केली असेल तेवढीच. ‘चाची ४२०’मध्ये हरीलालच्या भूमिकेत त्यांनी धमाल आणली. त्यातूनच प्रियदर्शन यांनी ‘हेराफेरी’मध्ये त्यांना घेतलं आणि ‘बाबुराव’च्या भूमिकेनं त्यांच्या करिअरची दिशाच बदलून टाकली.

‘हेराफेरी’नंतर त्यानंतर प्रियदर्शन यांचं दिग्दर्शन, भरपूर ट्विस्ट असलेली विनोदी कथा आणि परेश रावल यांची वेगळी भूमिका असं समीकरणच बनून गेलं. नंतर परेशभाई विनोदी व्यक्तिरेखांमध्येच प्रामुख्यानं लोकप्रिय झाले. त्यांनी साकारलेली बाबुराव ही भूमिका इतकी लोकप्रिय का झाली असावी, याची अनेक कारणं आहेत.

एक तर या व्यक्तिरेखेमधली निरागसता आहेच; पण अनेक उद्योग करूनही नेमका काय उद्योग केलाय हे न कळणारी अनेक माणसंही आपल्या अवतीभोवती असतातच. त्यामुळे या व्यक्तिरेखेशी प्रेक्षक लगेच रिलेट करू शकले. परेशभाईंनी व्यक्तिरेखेतला भाबडेपणा संपूर्ण देहबोलीतूनसुद्धा कसा आणलाय ते नीट बघा. हा चित्रपट ज्या चित्रपटावरून घेतलाय त्यात या व्यक्तिरेखेचं नावच मुळी ‘इनोसंट’ होतं ही एक गंमत आहे. ती साकारणारे वरीद थेक्केथाला यांचं नावच ‘इनोसंट वरीद थेक्केथाला’ असं पडलं. पण परेशभाईंनी त्याच्याही पुढची पायरी गाठली. बाबुरावच्या व्यक्तिरेखेसाठी जाड भिंगांचा चष्मा ही परेश रावल यांची कल्पना आहे आणि ती अतिशय योग्य ठरलीय.

परेश रावल यांच्या विनोदी भूमिका प्रसिद्ध असल्या, तरी ते प्रत्यक्षात अतिशय गंभीर प्रकृतीचे आहेत. ते विनोद ओढूनताणून अजिबात आणू इच्छित नाहीत आणि कदाचित त्यांना ते जमणारही नाही. ते त्या त्या व्यक्तिरेखेत घुसतात आणि मग विनोद आपसूक येतो. चतुरस्त्र अभिनेते असल्यानं त्यांना अनेकदा कॉमेडीचा कंटाळाही आला आहे. त्यामुळे मधूनच त्यांची गाडी चरित्र भूमिका, खलनायक अशा ट्रॅकवर जाते; पण पुनःपुन्हा ती कॉमेडीवर येते.

परेशभाईंच्या विनोदी भूमिका महत्त्वाच्या याचसाठी, की ते स्वतः अजिबात तसे नसताना ती व्यक्तिरेखा साकारत असतात. त्यांनी विनोदी भूमिकांमध्ये दाखवलेलं वैविध्यही कमाल आहे. अनेकदा त्यांच्या व्यक्तिरेखेबरोबर तीन-चार इतर पात्रं असतात. त्यांच्याबरोबरची त्यांची ‘केमिस्ट्री’ही विशेष असते. परेश रावल यांच्या मूळ व्यक्तिमत्त्वात एक अहंभाव आहे हे तेही मान्य करतात. मात्र, विशेषतः विनोदी भूमिका करताना तो बाजूला करणं ही गोष्ट फार महत्त्वाची असते असं ते सांगतात आणि विनोदातलं हे गम्य त्यांना पुरेपूर कळल्याचं तिथं दिसतं. ‘हेराफेरी ३’ कधी येईल माहीत नाही; पण त्यातला बाबुरावचा भाबडेपणा प्रेक्षकांना बघायला नक्कीच आवडणार आहे. एक असंही आहे, की जसजसं आपण प्रगत, तंत्रसज्ज होत आहोत, तसा आपलाही भाबडेपणा कमीच होत चाललाय की! किमान पडद्यावर तरी ‘बाबुराव’च्या रूपानं तो जगून बघावं असाही प्रेक्षकांचा विचार असेल का?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()