विनोदाचा ‘धडाकेबाज’ कारखाना

‘रूप तेरा मस्ताना, प्यार मेरा दिवाना’ या हिंदी चित्रपटसृष्टीतल्या अतिशय ‘सेन्शुअस’ गाण्याचं विडंबन होऊ शकेल, असं खरं तर कुणालाही वाटलं नव्हतं.
Mahesh Kothare
Mahesh KothareSakal
Updated on

‘रूप तेरा मस्ताना, प्यार मेरा दिवाना’ या हिंदी चित्रपटसृष्टीतल्या अतिशय ‘सेन्शुअस’ गाण्याचं विडंबन होऊ शकेल, असं खरं तर कुणालाही वाटलं नव्हतं. मात्र, ‘धूमधडाका’ चित्रपटात ‘पॅरडी’ नावाच्या एका वैचित्र्यपूर्ण प्रकारात ते आलं तेव्हा लोकांच्या हसूनहसून मुरकुंड्या वळाल्या आणि आजही वळतात. ते विडंबन होतं- ‘रूप तुला नसताना, अॅक्टिंग बोंब असताना, कोण हिरॉईन तुजला करील गं, अक्का.’ गायक होते शब्बीरकुमार. गाण्यावर धमाल अॅक्टिंग करायला होते लक्ष्मीकांत बेर्डे नावाचे आयकॉनिक विनोदमूर्ती आणि समोर होत्या प्रेमा किरण. या धमाल चित्रपटानं मग दणादण विक्रमही केले नसते तरच नवल होतं.

मराठीत विनोदपटांची लाट आणण्यासाठी कारणीभूत असलेल्या दिग्दर्शकांपैकी एक असलेले महेश कोठारे यांचा हा चित्रपट. कोठारे यांनी विनोदात केलेले प्रयोग म्हणजे ‘खतरनाक.’ ग्रामीण आणि शहरी वातावरण यांचं बेमालूम मिश्रण असलेला, नवनव्या गोष्टींचा समावेश असलेला, काळाबरोबर बदलत जाणारा विनोद कोठारे यांनी आणला आणि त्यात खूप वैविध्यही आणलं.

कोठारे यांच्या पहिल्याच चित्रपटानं ‘धूमधडाका’ केला आणि त्यांच्या विनोदी चित्रपटांचे फटाके नंतर किती तरी वर्षं वाजतच राहिले. खरं तर ‘धूमधडाका’ हा ‘प्यार किये जा’ या चित्रपटावर आधारित; पण कोठारे यांनी या चित्रपटाला मराठमोठं रूप दिलंच; पण त्यात असा काही मसाला घातला, की हा चित्रपट मराठीतल्या क्लासिक चित्रपटांच्या रांगेत जाऊन बसला. ‘नवरी मिळे नवऱ्याला’ आणि ‘धूमधडाका’ पुढे-मागेच पडद्यावर आले. या दोन चित्रपटांनी मराठी चित्रपटांचं सगळं परिमाणच बदलून टाकलं. तोपर्यंत मराठीत एकीकडे सौम्य विनोद, नाही तर दादा कोंडके यांचा टिपिकल विनोद असे दोनच कप्पे होते. मात्र, सचिन, महेश कोठारे यांनी विनोदाचा एक नवा प्रकार दिला. हा विनोद सहकुटुंब बघता येईल असा होता आणि त्याच वेळी तो धारदारही होता. कोठारे यांच्या ‘धूमधडाका’नं प्रेक्षक अक्षरशः हसून लोटपोट व्हायचे. एकीकडे अशोक सराफ यांच्या ‘व्याख्याविखीवुखू’ अॅडिशन होती, लक्ष्मीकांत बेर्डे नावाच्या अवलियाची धमाल व्यक्तिरेखा होती आणि त्यांची आणि शरद तळवलकर यांची केमिस्ट्री तर कमाल होती. ‘धूमधडाका’ ट्रेंडसेटर ठरला आणि त्यानं विनोदाचं एक वेगळंच दालन खुलं केलं म्हणून कोठारे यांचं योगदान मोलाचं.

कोठारे यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या विनोदपटांत तोचतोचपणा नाही. त्यांनी ‘थरथराट’मध्ये विनोदाला थ्रिलरची जोड दिली, ‘पछाडलेला’मध्ये विनोदाला भयाची जोड दिली, ‘झपाटलेला’मध्ये विनोदाला नाट्याची जोड दिली, तर ‘खतरनाक’मध्ये विनोदाला रहस्याची जोड दिली. विनोदातले इतके प्रयोग मराठीत क्वचितच कुणी केले असतील.

महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जोडीनं जवळजवळ दोनेक दशकं धुमाकूळ घातला. खरं तर महेश कोठारे आणि त्याच वेळी सचिन यांच्याही विनोदपटांचा प्रभाव मराठीत दिग्दर्शकांच्या एका पिढीवर इतका पडला, की मग कोणताही विनोद चालतो असं वाटायला लागलं आणि विनोद मचूळ झाला आणि पडदाही आजारी झाला. मात्र, या दोघाही दिग्दर्शकांचा विनोद खालच्या पायरीवर गेला नाही. महेश कोठारे तर काळाबरोबर विलक्षण पद्धतीनं बदलत गेले आणि अजूनही ते विनोदपटांमधलं चलनी नाणं आहेतच.

गंमत म्हणजे अनेक विनोदी चित्रपट तयार केले असले आणि बहुतेक चित्रपटांत नायकाच्या भूमिकेत असले, तरी कोठारे स्वतः मात्र विनोदी अभिनयासाठी प्रसिद्ध नाहीत. ते प्रसिद्ध आहेत ते महेश जाधव नावाच्या व्यक्तिरेखेसाठी, ‘डॅम इट’ या खास डायलॉगसाठी आणि ‘महेश, महेश’ अशी लक्ष्यानं साद घातल्यावर ‘हेरॉईक अॅक्ट’ करणाऱ्या देखण्या, चॉकलेटी नायकासाठी. किंबहुना विनोदात इतके प्रयोग करणाऱ्या कोठारेंनी स्वतः साचेबद्ध भूमिका का घेतल्या आणि तिथं प्रयोग का केले नसावेत असाही प्रश्न पडतो.

कोठारे यांचं हास्यनगरीतलं स्थान लखलखतं आहे याचं कारण केवळ विनोदपट एवढंही नाही. त्यांनी ‘धडाकेबाज’मध्ये ‘डॉल्बी डिजिटल’सारखं तंत्र आणलं, ‘झपाटलेला’मध्ये बाहुल्याची व्यक्तिरेखा वापरण्याचा प्रयोग गेला. ‘झपाटलेला २’मध्ये तर त्यांनी थ्री-डीसारखं तंत्रही आणलं. एखादा माणूस बाटलीत असल्यासारखा दिसण्याचा इफेक्ट आज अक्षरशः कुणीही मोबाईलवर तयार करू शकत असताना, अनेक वर्षांपूर्वी ‘धडाकेबाज’मध्ये त्यांनी आणला. आणि हो, लोकप्रिय गीतांच्या विडंबनाची माळ असलेल्या त्यांच्या खास ‘पॅरडी सॉंग’ला तर तोडच नाही.

कोठारे यांचा उल्लेख करायला पाहिजे तो आणखी एका कारणासाठी. त्यांनी प्रत्येक चित्रपटात अशा काही व्यक्तिरेखा दिल्या-ज्या आयकॉनिक ठरल्या. ‘थरथराट’मधला टकलू हैवान, ‘झपाटलेला’मधला तात्या विंचू, ‘धडाकेबाज’मधला कवठ्या महांकाळ, ‘पछाडलेला’मधली दुर्गा मावशी अशा व्यक्तिरेखा अतिशय ठाशीव आहेत. इतर किती मराठी चित्रपटांमधल्या अशा व्यक्तिरेखा तुमच्या लक्षात राहिल्या असतील? स्मार्ट दिग्दर्शक असलेले कोठारे यांनी त्यांच्या चित्रपटातल्या विनोदाला बळ देण्यासाठी खास व्यक्तिरेखांबरोबर खास संवादही तयार केले, त्याचा ‘माऊथ पब्लिसिटी’साठी उपयोग झालाच. ‘बाबा लगीन,’ ‘अतिसामान्य’ हे त्यांच्या संवादांतले शब्द आजही ट्रेंडिंगमध्ये असतात.

एकूणच कल्पक विनोदपटांचा आदर्श असलेले महेश कोठारे यांचा विनोदाचा कारखाना जबरदस्त आहे यात शंकाच नाही. त्यांच्या या कारखान्यातला कोणताच चित्रपट आवडला नाही असं कुणी सापडणारच नाही. समजा, असा कुणी ‘अतिसामान्य’ सापडलाच, तर ते एवढंच म्हणतील... ‘डॅम इट!’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.