हुकमी एक्के

विनोदी चित्रपटांमध्ये प्रत्येक दिग्दर्शकाचा एक हुकमी एक्का असतो. एखाद-दुसरा विनोदी चित्रपट हिट झाला, तर हुकमी एक्के तयार होत नसतात.
Laxmikant Berde and Ashok Saraf
Laxmikant Berde and Ashok SarafSakal
Updated on

विनोदी चित्रपटांमध्ये प्रत्येक दिग्दर्शकाचा एक हुकमी एक्का असतो. एखाद-दुसरा विनोदी चित्रपट हिट झाला, तर हुकमी एक्के तयार होत नसतात. मात्र, विनोदी चित्रपटांची फटाक्यांची माळ लावायची असेल, तर मात्र हुकमाचा एक्का पाहिजेच. आणि तो असतोच!! तुम्ही बघितलं असेल, तर ज्यांनी विनोदी चित्रपट सातत्यानं दिले आहेत त्यांनी बहुतांश वेळा हा एक्का वापरला आहे. ही दोघांसाठीही विन-विन सिच्युएशन असते. अनेक चित्रपटांत बरोबर काम केल्यामुळे दोघांमध्येही ‘कंफर्ट झोन’ असतो, दोघांना एकमेकांच्या टायमिंगचा, ताकदीचा अंदाज आलेला असतो, काय ‘डिलिव्हर’ करायचं आहे याची बरोब्बर कल्पना असते आणि मुख्य म्हणजे किती तरी ‘अतार्किक’ कल्पनांची आधी देवाणघेवाण करून त्या ‘विनोदाच्या तर्कावर’ तपासून बघितलेल्या असतात.

मराठी, हिंदी चित्रपट बघितलेत तर खूप हुकमाचे एक्के दिसतील असे. सचिन पिळगावकर यांच्या प्रत्येक चित्रपटात अशोक सराफ हा हुकमाचा एक्का असतो, तर महेश कोठारे यांच्यासाठी लक्ष्मीकांत बेर्डे यांनी ते स्थान मिळवलं होतं. या दोन्ही जोड्यांनी मराठी चित्रपटांचा एक काळच गाजवला आहे. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांनी सचिन आणि महेश कोठारे यांच्या चित्रपटांतल्या व्यक्तिरेखांचं सोनं केलं आहे ही गोष्ट जितकी खरी, तितकीच या कलाकारांचं विनोदांतलं सर्वोत्तम कामही याच दिग्दर्शकांच्या चित्रपटांत असल्याचं दिसतं. ती ‘केमिस्ट्री’ जाणवतेच. दादा कोंडके यांच्यासाठी उषा चव्हाण, रत्नमाला हे हुकमाचे एक्के होते.

हिंदीतही तसंच आहे. बासू चटर्जी यांच्यासाठी अमोल पालेकर नावाचा एक खास हुकमी एक्का होता आणि अमोल पालेकर यांनी त्यांच्या प्रत्येक चित्रपटांत फार उत्तम काम केलंय ही ‘छोटीसी बात’ आपल्याला माहीत आहेच. प्रियदर्शनसाठी परेश रावल हा हुकमाचा एक्का आहे. तुम्ही बघा, प्रियदर्शन यांच्या बहुतेक चित्रपटांत परेश रावल कोणत्या ना कोणत्या भूमिकेत डोकावून जात असतात आणि अर्थातच धुमाकूळ घालत असतात. प्रियदर्शन-परेश रावल ही खास केमिस्ट्री नसती, तर बाबुराव ही व्यक्तिरेखा तितक्या सुंदर पद्धतीनं आली असती का? नाहीच! विनोदी चित्रपटांचा फॉर्म्युला पुरेपूर माहीत झालेल्या रोहित शेट्टी याच्यासाठी अजय देवगण हा हुकमाचा एक्का आहे. ‘ऑल द बेस्ट’, ‘गोलमाल’ सिरीज, ‘बोलबच्चन’ अशा त्याच्या प्रत्येक चित्रपटात अजय देवगण आहेच. त्यात पुन्हा रोहित शेट्टी आणि अजय देवगण यांच्या आधीच्या पिढीची म्हणजे एम. बी. शेट्टी आणि विरू देवगण यांची ‘केमिस्ट्री’ही तितकीच महत्त्वाची.

‘नो एंट्री’ नावाचा तुफान चित्रपट काढणारे अनीस बझ्मी यांच्यासाठी अनिल कपूर एक्का आहे. त्याच्याशिवाय बझ्मी यांचे बहुतेक चित्रपट पूर्णच होऊ शकत नाही ही गोष्ट जितकी खरी, तितकाच अनिल कपूर यांचा अभिनय त्यांच्या चित्रपटांत एका विशिष्ट स्केलच्या वर गेला आहे हेही खरं. डेव्हिड धवन यांच्यासाठी गोविंदा, इंद्रकुमार यांच्यासाठी रितेश देशमुख अशी किती तरी उदाहरणं सांगता येतील. फार कशाला, मराठीतल्या विनोदी नाटकांमध्येही त्या त्या दिग्दर्शकाचे असे हुकमी एक्के असतात. केदार शिंदे यांच्यासाठी भरत जाधव म्हणजे ‘सही रे सही.’ हुकमी एक्का म्हणजे दिग्दर्शक-अभिनेते अशाच जोड्या पाहिजेत असं काही नाही. लेखक, संगीतकार किंवा इतर कुठलाही घटक त्या त्या दिग्दर्शकासाठी कसा हुकमी होईल सांगता येत नाही. साधंच उदाहरण सांगायचं, तर दादा कोंडके यांच्यासाठी संगीतकार राम-लक्ष्मण हा हुकमी एक्का होता. दादांच्या विनोदी चित्रपटांना राम-लक्ष्मण यांच्या सुमधुर गीतांची जोड मिळाली आणि हे चित्रपट एकसे एक कामगिरी करत गेले. गाण्यांमुळे दादांच्या चित्रपटांची ‘पब्लिसिटी’ आपोआप व्हायची, तर दुसरीकडे चित्रपट धो-धो चालल्यामुळे राम-लक्ष्मण यांच्या करिअरला बळ मिळायचं असा दोघांसाठीही दुहेरी लाभ होता.

अनेकदा असंही होतं, की हुकमी एक्क्याबरोबरचं नातं संपलं, की त्या दिग्दर्शकाच्या करिअरची गतीही थांबते. डेव्हिड धवन आणि गोविंदा ही केमिस्ट्री संपली, तसा डेव्हिड धवन यांचाही करिश्मा संपला. आता त्यांच्याकडे वरुणच्या रूपानं घरातलाच माणूस आहेच की. पण तरीही वरुण हा काही डेव्हिड यांचा हुकमी एक्का नाही. गोविंदाबरोबरच्या चित्रपटांतली मजा संपली ती संपलीच.

विशिष्ट व्यक्ती दिग्दर्शक ‘रिपीट’ करतो, तेव्हा त्या व्यक्तीला त्या दिग्दर्शकाच्या कामाची पद्धत माहिती असते, अनेक गोष्टी न सांगताही कळत असतात आणि मुख्य म्हणजे स्वतःची सर्जनशीलता त्या दिग्दर्शकाच्या सर्जनशीलतेत कशी मिसळायची याचं अचूक भान असतं. त्यामुळेच तुम्ही बघा, परेश रावल यांनी प्रियदर्शन यांच्या चित्रपटांत चतुरस्त्र कामगिरी केली आहेच; पण त्या चित्रपटांतल्या परेश यांच्या अभिनयात एक विलक्षण असा मोकळेपणा आहे. तोच मोकळेपणा तुम्हाला सचिन यांच्या चित्रपटांत अशोक सराफ यांच्या अभिनयात दिसेल, तोच मोकळेपणा राम-लक्ष्मण यांच्या दादा कोंडके यांच्या चित्रपटांसाठीच्या गीतांत दिसेल, तोच मोकळेपणा रितेश देशमुखच्या इंद्रकुमार यांच्या चित्रपटांतल्या अभिनयात दिसेल. हा मोकळेपणा विलक्षण लव्हेबल असतो. तो त्या त्या चाहत्यांना बरोब्बर कळतो. त्यामुळेच ते त्या दिग्दर्शकाच्या पुढच्या चित्रपटात तीच केमिस्ट्री बघण्याची अपेक्षा ठेवतात. त्या अपेक्षेला तडा जातो, तेव्हा मात्र डाव मोडतो... हुकमाचा एक्का असला, तरी बाकीची पानंही बरोबर असायला पाहिजेत ना. शेवटी चित्रपटाच्या यशाची ‘वख्खई’ कशी मिळवायची याचं गणित भल्याभल्यांना मांडता आलेलं नाही हेही तितकंच खरं!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()