माझिया माहेरा : संस्कारांचं मंदिर

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या पूर्वेला पूर हे वेळ नदीच्या काठावर वसलेलं गाव हे माझं माहेर.
Pur Village
Pur VillageSakal
Updated on
Summary

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या पूर्वेला पूर हे वेळ नदीच्या काठावर वसलेलं गाव हे माझं माहेर.

- मंगल आहेर, भोसरी, पुणे

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या पूर्वेला पूर हे वेळ नदीच्या काठावर वसलेलं गाव हे माझं माहेर. ओढ्याच्या कडेला तीन खणी कौलारू घर होतं आमचं. काही अंतरावर असलेलं किसनअप्पांचं घर आणि बाळ पाटील याचं घर यांचाच शेजार होता. किसनअप्पा आमची शेतीची औत हाकण्याची कामं करून द्यायचे. कारण वडील शिक्षक होते. किसनअप्पांच्या आणि आजोबांच्या विनोदी गप्पा ऐकून पोट भरून हसायचो.

आमचं चारही भावंडाचं बालपण त्या ओढ्याकाठच्या घरीच गेलं. आमच्याकडे आतेभाऊ, मामेभाऊ, आतेबहिणी शिकायला होते. किसनअप्पांचा मुलगा ‘दादू’ याच्या डोक्यावरील आईचं छत्र लवकर हरवल्यानं तोदेखील आमच्यासोबतच असायचा. आजी-आजोबांनी जशी त्यांच्या भावांची विनाआईची आठ लेकरं मोठी केली, तसंच माझ्या आईनंसुद्धा भाचे कंपनीला स्वतःच्या मुलांप्रमाणे सांभाळलं, शिकवलं.

आम्ही सगळी सहा-सात भावंडं एकत्र अभ्यास करायचो. एकत्र सगळे मिळून घर, अंगण सारवायचो, विहिरीवरून पाणी शेंदून आणायचो. खूप मजा यायची. घराच्या बाहेर अंगण होतं. अंगणातच पडवीच्या कोपऱ्यावर एक रांजण होता. त्यावर तुळस होती. भोवती ओटा होता. त्या ओट्यावर आमची आजी आम्हा सर्व नातवंडांची व वडिलांची शाळेतून घरी परत येईपर्यंत वाट पाहत बसायची. मुलं हीच बागायती शेती समजून वडिलांनी फक्त जिरायती शेती केली; पण आम्हा चारही भावंडांना शिकवून उच्चशिक्षित केलं.

लहानपणी जून महिन्यात खताच्या बैलगाड्या भरण्याचं काम असायचं. खतानं गाडी भरली, की किसनअप्पाच्या गाडीमागे ढेकळातून, ओढ्यातून दगडातून अनवानीचं धावत सुटायचो. अपेक्षा फक्त एकच असायची, की तिकडून मोकळ्या गाडीत बसून यायला मिळेल. दिवसभर हा उद्योग चालायचा; पण कधी दमलो नाही. शेंगा फोडणीत सगळे गोलाकार बसून आठवा-आठवा शेंगदाणे करायचो. ही कामं आठवली की आता आपण काहीच काम करीत नाही, असं वाटतं. होळीच्या वेळेस शेतात खळं तयार व्हायचं. ते खळं सारवायचो, त्यात बैलांच्या सहाय्यानं मळणी व्हायची. मग वावडी लावून धान्य उफणायचं, खाली हातणी धरायची, ही सगळी कामं करताना आमची भावंडांची लूडबूड असायची. सुट्टीच्या दिवशी गाय, शेळी चरायला न्यायची. त्यांची पोटं भरलेली दिसली, की आजी-आजोबा खूप कौतुक करायचे. त्यातूनच प्राण्यांबद्दल प्रेम निर्माण झालं.

वडिलांनी खरेदी केलेल्या नवीन शेतात एक ‘क्षीरसागराचा आंबा’ होता. त्या आंब्याचे १००० आंबे वाट्याला यायचे. माळ्यावर आंब्याची ‘अढी’ लावली जायची. त्या अढीवर बसून मनसोक्त आंबे खायचो. संध्याकाळी अंगणातच पंगत टाकून रस-चपातीचा बेत असायचा. अंगणातच भांडी घासायची. अंगणाच्या पुढील वावरातच लांबलचक गोधड्यांची अंथरुणं पडायची. प्रत्येकाच्या उशाला ‘उशी’ म्हणून मातीचा ढीग असायचा. चांदणं बघत, हसत-खिदळत जवळच्या मांडवात बसलेल्या बैलांचं ‘रवंथ’ बघत कधी झोपायचो ते कळायचंदेखील नाही.

माझ्या माहेरचा तो ओढा, मोटेनं पाणी भरणं, माझ्या माहेराची माणसं, माझे आजी-आजोबा, ‘जोडवाटणीतील’ ते खळं, तो जनावरांचा मांडव, आजही मला समोर दिसतो. जुन्या आठवणी देत उभं असलेलं घर आम्ही आजही जाऊन पाहतो आणि आठवणी जागवतो. त्या घरातील प्रत्येक घटकानं आम्हाला शिकवलं, घडवलं, सुसंस्कारित केलं. दिवाळसणाला आम्ही भावंडं एकत्र येतो, तेव्हा या आठवणी जागवतो. आज आम्ही जे आहोत ते आजी-आजोबा आणि आई-वडिलांच्या पुण्याईमुळेच. आजी-आजोबांच्या प्रेमाची आठवण आजही डोळ्यात पाणी आणते.

(समाप्त)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.