रोज उशिरा उठण्याची सवय असूनही आज त्याला सकाळीच जाग आली. घरात सकाळी मुलांचा चिवचिवाट. किलबिलाट, घरात तिचा उगाच दबदबा...उशी, बेडशिट पांघरून ठिक करा...पेपर व्यवस्थित ठेवा...वेळेवर ब्रश...अंघोळ हवीच...पण आज घर एवढे सुनसान होते की सुई पडली तरी आवाज होईल..दुपारचे बारा वाजले तरी तो हॉल मधल्या बेड वर तो तसाच पडून होता. चहा बनविला पण तो ही आवडेना..काही खायला घेतले पण मन कशातच लागेना. कालपासूनचे कॉफी, चहाचे कप तसेच टेबलवर पडून होते. न्यूज पेपर पंख्याच्या हवेने पूर्ण अस्ताव्यस्त घरभर पसरले. सोफ्यावरचे कव्हर खाली लोंबत होतं...
दुधाचे पॅकेट्स अजूनही टेबलावर. कचरा जिथे तिथे पडलेला. किती भयाण घर वाटत होते. ती असली की सकाळीच पेपर वाचतांना चहा नाश्ता मिळायचा, मुलांना खाऊ घालून झाले की मग कुठे स्वतः खायची ती. आज पेपर, टीव्ही, ना मोबाईल मधे मन लागत नव्हते. विचार करीतच त्याचा डोळा लागला. जाग आली तेव्हा दुपारचे तीन चार वाजले होते. बघते तर काय टीव्ही तशीच सुरु. बातमी देणारा एकटाच दिवसभर बडबड करीत होता. न्यूज पेपर हवेमुळे फडफडत होते. आज ना चहा नाश्ता, जेवण, अंघोळ. एवढा उदास दिवस त्याने आज पहिल्यांदाच अनुभवला. पुन्हा तो तसाच पडून होता कित्येक वेळ. अशातच दारावरची बेल वाजली. दुपारचे चार वाजले असतील. तो दचकलाच. कोण असेल? ती असेल काय...छे ती तर रागात गेली माहेरी. उगाच पसारा पटकन बाजूला करित हळूच दार उघडला.
बघतो तर काय चक्क दारात ती. होय तीच. तो स्मित हसलाच. ती ही गालातच हसली व लगेच हावभाव बदलविले चेह-यावरचे. दोन्ही चिमुकल्यांनी पप्पा म्हणून जी हाक मारीत मिठीत घुसले...पूर्ण दिवसभरातील आळस क्षणात दूर झाला...ती घरात येताच घराची अवस्था बघून गोलगोल फिरतच राहीली. बडबड करू लागली. रागात त्याच्याकडे बघत पसारा उचलू लागली. किचन मधील खाली भांडे बघून हळूच जेवण नाही केलं उगाच प्रश्न तिचा. तो काहीही न बोलता सरळ बाथरूम मधे अंघोळीला गेला. तोपर्यंत तिने पूर्ण घर व्यवस्थित केले. माहेरवरुन आणलेला टिफिन मुलांना खाऊ घातला. त्याच्यासाठी ताट वाढून ठेवला. त्यालाही चांगलीच भूक लागली होती. तो समाधानाने जेवला.
मुले खेळता खेळता झोपून गेली. ती बोलत जरी नसली तरी तिच्या सहवासाने त्याला खूप बरे वाटत होते. तो उगाच नुसताच तिच्या अवतीभोवती फिरू लागला. पण ती रागातच बघत होती. बडबड करीत होती. खरच मी चुकलोच, का उगाच मी तीला रागावलो दुखावलो. तो मनातच पुटपुटला.
काही वेळाने ती ही फ्रेश झाली. आरशासमोर आपले लांब केप मोकळे करताना त्याने बर्थडे गिफ्ट दिलेल्या पिवळ्या साडीत आज ती खूप सुंदर दिसत होती. तो पुन्हा तिच्या जवळ गेला. दोघांनीही एकमेकांकडे बघितले व हळूच हसले. त्याने माफी मागत हळूच तिला जवळ घेतले. कानाशी उगीच लाडिक कुजबूज...तीचा उगाच सोडविण्याचा प्रयत्न...संध्याकाळची रम्य गार हवा...त्यात मोग-याचा सुगंध चहूकडे पसरला होता. एकीकडे टी.व्ही.वर मस्त सुमधुर गीत सुरु होते जीव दंगला, गुंतला, रंगला असा...पिरमाची आस तू...जीव लागला..लाभला...
आज सुट्टीचा दिवस असूनही पहाटे सहालाच त्याला जाग आली..खिडकीतून थंडगार वा-याची एक झुळूक आली नी तो दचकून उठला.उगाच तिला आवाज दिला.लगेच ती व मुले घरी नाहीत म्हणून तो भानावर आला. ती जवळ नव्हतीच. कालच रागात चिमुकल्यांना घेवुन गेली माहेरी. खूप प्रयत्न करूनही त्याला काही झोप येईना.
-ज्योत्स्ना बोरकर , नागपूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.