फुकाचा हंबरडा!

अलीकडे मराठीत अनेक विनोदी कार्यक्रम आले. जोपर्यंत त्यांच्या आशयात ताकद होती तोपर्यंत प्रेक्षक तो कार्यक्रम पसंत करत. मात्र, हळूहळू त्यांचा दर्जा घसरायला लागला. विनोदाला अश्लाघ्य लकेर यायला लागली की प्रेक्षक त्याकडे पाठ फिरवतात.
 फुकाचा हंबरडा!
फुकाचा हंबरडा!sakal
Updated on

अवतरणार्थ

राहुल गडपाले

rahulgadpale@gmail.com

अलीकडे मराठीत अनेक विनोदी कार्यक्रम आले. जोपर्यंत त्यांच्या आशयात ताकद होती तोपर्यंत प्रेक्षक तो कार्यक्रम पसंत करत. मात्र, हळूहळू त्यांचा दर्जा घसरायला लागला. विनोदाला अश्लाघ्य लकेर यायला लागली की प्रेक्षक त्याकडे पाठ फिरवतात. राज ठाकरे यांच्या भाषणाचेही आता तेच झालेले दिसते. त्यांच्या शरीराच्या कुठल्या अंगाने हंबरडा फोडला हे त्यांना भाषणात सांगावे लागते म्हणजे त्यांच्याकडे आता सांगण्यासारखे काहीही राहिलेले नाही. ते आता सभा नेते झालेत. ते सभा गाजवू शकतात; पण पक्ष चालवू शकतात का, याचे त्यांनीच आत्मपरीक्षण करावे...

माणूस म्हणजे तरी नेमके काय हो... आजचा माणूस म्हणजे उद्याची मातीच ती. तो कुठल्याही जातीचा असो किंवा धर्माचा, कुणी महापुरुष असो नाहीतर महात्मा, कोणी मोठा साधू-सत्पुरुष असो अथवा कोणी राजकारणी; कधी तरी त्याची माती होणारच. नुसता माणूसच काय अगदी जंगलचा राजा जरी असला तरी तो कधी ना कधी मातीत जाणारच. कधी ना कधी आपली माती होणारच असते. ती कधी होणार, हे प्रश्नचिन्ह आपल्या माथ्यावर मिरवतच तर आपण आयुष्य जगत असतो. या जगात कुणीच अमरत्व घेऊन जन्माला येत नाही. आलेल्या प्रत्येकाची कधी तरी माती होणार, यात काही शंका नाही; पण आपल्यात जाणीव असते तोवर आपण आपल्या कर्मसिद्धांतावर जगत असतो. त्यातून आपण समाजासाठी काय करतो? त्याने कुठल्या प्रकारची ऐहिक उन्नती साधली जाते, त्यावर आपली आठवण लोक का काढतील, हे ठरते; पण उद्या कधीतरी आपली माती होणारच आहे म्हणून रोज जगण्याची माती करत जगण्यात काय हशील आहे? विशेषतः सामाजिक आयुष्यात असलेल्या माणसाला तर तसे मुळीच करून चालत नाही. काहीही झाले तरी आपले जीवन हे समाजासाठी समर्पित आहे, असा भाव जर तुमच्यात असेल तर त्यासाठी तुम्हाला जगताना काही नैतिक आचारसंहिता या पाळाव्याच लागतात. फक्त त्यासाठी तुमचे चित्त शुद्ध असावे लागते; अन्यथा चित्तशुद्धीचा सार्वजनिक कार्यक्रम होतोच होतो.

राजकारण हादेखील समाजजीवनाचाच एक भाग आहे. नव्हे, ते समाजजीवनाचे आत्यंतिक महत्त्वाचे अंग आहे. राजकीय क्षेत्रात काम करणारी मंडळी मात्र हल्ली अशा कुठल्याही आचारसंहितेचे पालन करताना दिसत नाहीत. शिवाजी जन्मावा; पण तो दुसऱ्याच्या घरात, ही म्हण जणू या राजकारण्यांनी फारच गांभीर्याने घेतलेली दिसते. ते एकमेकांना चांगुलपणाचे सल्ले देतात. प्रत्यक्षात त्याचे पालन मात्र ते करताना दिसत नाहीत. त्यामुळे रोज कुणीतरी नेता उठतो आणि आपले तत्त्वज्ञान पाजळत बसतो. आपल्या बोलण्यातून एक तर सामाजिक सलोख्याला तरी धक्का लागेल किंवा काही साध्य झाले नाहीच, तर निदान लोकांचे मनोरंजन तरी होईल, असा कदाचित त्यांचा हेतू असावा; पण तुमच्या या टीनपाट बोलभांडपटांची सर्वसामान्य माणसाला खरेच गरज आहे का, याचा साधा विचारही त्यांच्या डोक्यात येत नसावा का, असा प्रश्न पडतो.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे हेदेखील ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण’च वाटतात, वागतात आणि भासतातसुद्धा. तसे पाहिले तर राज यांनी आजवर अनेकदा महाराष्ट्राविषयी फार तळमळीने आपल्या भूमिका जाहीर केल्या. बहुतांश वेळा तर भूमिका जाहीर केल्यानंतर घरी पोहोचायच्या आतच त्यांनी त्या बदलेल्याही असतात. ‘लाव रे तो व्हिडीओ...’ हे राज यांचे प्रचलित वाक्य तुम्हाला आठवत असेलच. पण, याच राज यांना ईडीची नोटीस मिळताच त्यांची बोलती बंद झाली होती. लोकसभेच्या आधी भाजपसमोर घेतलेले सपशेल लोटांगण तर अलीकडचीच घटना आहे. त्यानंतर आता त्यांनी पुन्हा स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे. आता त्यांच्या या निर्णयाचे स्वागत करायचे की त्यांच्या हंबरड्याचे कौतुक, हे ज्याचे त्याने ठरवावे.

शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर ज्या पद्धतीने राज यांनी महाराष्ट्राच्या विकास आराखड्यावर काम करायला सुरुवात केली होती, ते पाहून राज्यातील जनतेने त्यांच्या पारड्यात बरेच प्रेम ओतले. कुणीतरी मराठी माणसांबद्दल बोलताना किंवा विचार करताना दिसतेय म्हटल्यावर मराठी माणूस त्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहत होता; परंतु त्यांनी महाराष्ट्राचा आणि इथल्या तमाम मराठी बांधवांचा अपेक्षाभंगच केला. त्यांची विकासाची ब्ल्यू प्रिंट असो, टोलनाक्याचे आंदोलन असो किंवा मराठी पाट्यांचे खळ्ळखट्याक्; यातले काहीही फार काळ टिकू शकले नाही. कधी कधी तर त्यांचा संपूर्ण पक्षच कोमात जातो. मग अचानकपणे त्यांना मुंबई-गोवा महामार्गावरचे खड्डे दचके देतात आणि राज ठाकरे दचकून जागे होतात. त्यासाठी यात्रा आयोजित केली जाते. सारे काही अगदी मोठे नियोजन असते. त्यात दोन-चार दिवस महाराष्ट्रात मोठे आंदोलन होईल, अशी घोषणाही केली जाते; पण काही तासांत ती यात्रा आटोपून ते सहकुटुंब माघारी फिरतात. मराठी माणसांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळावे, याकरितादेखील त्यांच्या पक्षाने बरीच मेहनत घेतलेली दिसते; पण त्याही भूमिकेचा त्यांना आता विसर पडलेला दिसतो. महाराष्ट्रातील उद्योग हल्ली गुजरातकडे वळवलेले दिसतात, त्याबद्दल मात्र ते ‘ब्र’देखील उच्चारत नाहीत.

जगातील प्रत्येक गोष्टीवर राज यांना मते मांडायची असतात. जसे की लोक त्यांचे ऐकण्याची वाटच पाहत असतात! एकंदरीतच काय; तर फक्त सोईच्या विषयांवर बोलायचे आणि फक्त बोलायचेच, असा दिखाऊ कार्यक्रम त्यांनी सुरू केलेला दिसतो. त्यामुळेच त्यांच्या सभांना ऐकण्यासाठी प्रेक्षक गर्दी करतात; पण त्यांना मते देतील असे दर्दी मात्र ते आजही मिळवू शकले नाहीत.

राज्यातील २८८ पैकी केवळ एक आमदार त्यांच्या पक्षाचा आहे. त्यात त्यांचा किंवा पक्षाचा वाटा किती, हे नेमकेपणाने तेच सांगू शकतील. एकंदरीतच काय; तर राज हे आता सभा नेते झालेत. ते सभा गाजवू शकतात; पण पक्ष चालवू शकतात का, याचे त्यांनीच आत्मपरीक्षण करावे. पक्षाच्या पातळीवर चैतन्य निर्माण करण्याकरिता प्रत्येक जिल्ह्यात त्यांचे नेते, कार्यकर्ते आहेत; पण ते नेमके कुठले ‘चैतन्य’ गोळा करतात, हे आता महाराष्ट्र पुरताच जाणतो. त्यांच्याकडे बोलण्यासाठी लागणारे बुद्धिचातुर्य आहे, हेदेखील महाराष्ट्राला माहीत आहे आणि त्यामुळेच लोक त्यांना ऐकायला गर्दी करत असावेत; पण त्यांच्या या गुणालादेखील आता ‘चला हवा येऊ द्या’ म्हणायची वेळ झाली आहे.

आपल्याकडे गेल्या काही वर्षांमध्ये मराठीत अनेक मनोरंजनात्मक विनोदी कार्यक्रम आले. त्यातील काही कार्यक्रमांनी तर अनेक वर्षे मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. जोपर्यंत त्यांच्या आशयात ताकद होती तोपर्यंत प्रेक्षक तो कार्यक्रम पसंत करत. त्यावर हास्याचे कारंजे उडत. दूरचित्रवाणीपासून समाजमाध्यमांपर्यंत सर्वत्र याच कार्यक्रमांची चर्चा असे. मात्र हळूहळू त्यांचा दर्जा घसरायला लागला. विनोदाला अश्लाघ्य लकेर यायला लागली, तसे प्रेक्षकही त्याकडे पाठ फिरवायला लागले. विनोदाचा स्तर दिवसेंदिवस खाली घरंगळत होता. त्यामुळे प्रेक्षकांना ते आता पचनी पडत नव्हते. राज ठाकरे यांच्या भाषणाचेही आता तेच झालेले दिसते. त्यांच्या शरीराच्या कुठल्या अंगाने हंबरडा फोडला हे त्यांना भाषणात सांगावे लागले म्हणजे त्यांच्याकडे आता सांगण्यासारखे काहीही राहिलेले नाही.

विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी राज ठाकरेंनी त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक आयोजित केली. या बैठकीत राज हे आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती जाहीर करतील, असे सर्वांना वाटत होते. तशी ती त्यांनी जाहीर केलीही; पण केवळ एका वाक्यात. ते दोनशेपेक्षा अधिक जागा लढणार असल्याचे त्यांनी सांगितले; पण अर्ध्या भाषणात ते केवळ आपल्या परदेश दौऱ्यात रमले होते. नुसते रमलेच नव्हते; तर एखाद्या टुकार अभिनेत्याने पडत चाललेल्या प्रयोगाला सावरण्यासाठी लाफ्टर काढण्याकरिता करावा एवढा केविलवाणा विनोद त्यांना करावा लागला, यातच महाराष्ट्राला त्यांच्या क्षुद्र जीवनादर्शाचा परिचय झाला असावा. महाराष्ट्रातून परदेशात जाणारे राज ठाकरे हे काही पहिले नव्हेत. बाहेर जाऊन शिक्षण घेण्यात महाराष्ट्र कधीच मागे नव्हता, नाही. राज हेसुद्धा काही पहिल्यांदा परदेशी गेले नव्हते. त्यातही त्यांना परदेशातील काही महत्त्वाच्या घडामोडी आपल्या कार्यकर्त्यांना सांगाव्याशा वाटूच शकतात; पण ते काय असावे तर शौचाला गेल्यावर पाणी नसल्यामुळे त्यांची झालेली फजिती आणि जेट स्प्रे पाहिल्यावर त्यांच्या पार्श्वभागाने फोडलेला हंबरडा. राज यांचा हा हंबरडा निमिषार्धात महाराष्ट्रभर पोचला. त्याच्या रील्स झाल्या. अवघ्या महाराष्ट्राने त्या हंबरड्याचा आवाज ऐकला; कारण तो आवाज कदाचित ओरडून महाराष्ट्राला सांगत असावा, की राज तुमच्याकडे आता महाराष्ट्राला सांगण्यासाठी काहीच राहिले नसावे. हल्ली कट्ट्यावर बसून चहा पिणारी तरुण पोरंही असले टुकार विनोद करत नाहीत.

राज यांनी मात्र यातून लोकांना आपल्या विनोदबुद्धीची कीव करायला लावली, असे वाटते. त्यांच्याकडे लोक एक द्रष्टा नेता म्हणून पाहत होते; मात्र त्यांचे द्रष्टेपण जाणवावे, असे त्यांनी महाराष्ट्राला काही दिले असेल, असे वाटत नाही. उलट त्यांच्या पक्षातील कार्यकर्ते ज्या पद्धतीने गल्लोगल्ली वावरतात त्याचा लोकांना होणारा त्रासच अधिक आहे. कुणी त्याबद्दल बोलले तर लगेच त्यांची अरेरावी सुरू होते. ते लोकांवर चालून जायला कमी करत नाहीत. राज स्वतः भाषण करताना कुणावरही कुठल्याही पातळीवर टीका करतात; मात्र त्यांना आणि त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांच्यावर केलेली टीका चालत नाही. भाषणाच्या दरम्यान उगाच लाईटवाल्यावर उखडायचे. मुलाखतीत निवेदकाच्या अंगावर जाऊन खेकसायचे आणि त्यांना कमीपणा दाखवायचा, असल्या गोष्टींनी राज यांना काय साध्य करायचे आहे, त्यांनाच ठावूक; पण याने निवडणुका जिंकता येत नाहीत. नगण्य हर्षविषादाच्या नादात ते आपली उरलीसुरली जागाही गमावण्याची शक्यता अधिक आहे.

महाराष्ट्रात राज हे काही एकमेव मराठी नेते नाहीत. सध्याची राजकीय परिस्थिती पाहिली तर राजकारण सोपे राहिलेले नाही. एकनाथ शिंदे असोत, देवेंद्र फडणवीस असोत किंवा शरद पवार असोत, या प्रत्येकावर महाराष्ट्रात रोज कुणीतरी उठतो आणि कसला तरी आरोप लावतो; मात्र यातले कुणीच कुणाच्या अंगावर धावून जात नाही. कारण राजकारणात हे अपेक्षित असते. राज ठाकरेंना मात्र राजकारणाचा हा पोतच फारसा मानवत नसावा, त्यामुळे त्यांना विरोधही पचत नाही. त्यातच स्वतःच्या पार्श्वभागाचा हंबरडा लोकांसमोर प्रदर्शित करून त्यांनी आपल्या इभ्रतीची पुरती टिंगल करून घेतली आहे. त्यांनी त्यातून एकवेळ लाफ्टर घेतला असेल; पण मनसे हा काही त्यांनी केवळ लाफ्टर घेण्यासाठी काढलेला पक्ष नसावा. ज्यासाठी त्यांनी या पक्षाचा आटापिटा केलाय त्याकडे त्यांनी लक्ष दिले तर ते त्यांच्याच फायद्याचे आहे. राज यांच्या पक्षातील कारभार लोकशाही मार्गाने चालवायचा की हुकूमशाही मार्गाने, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. प्रसंगी आपल्या मर्जीने वागत नसणाऱ्या स्वतःच्याच कार्यकर्त्याला मारहाण करायलाही त्यांचे चेले मागे-पुढे पाहत नाहीत. हे कुणाच्या आदेशावरून होते हे न समजण्याइतपत महाराष्ट्रातील जनता खुळी नाही. अमित ठाकरे यांच्या मनसे प्रवेशाने त्यांच्याकडे काही चांगले बदल अपेक्षित होते; मात्र ते आल्यापासून त्यांचे अनेक कार्यकर्ते पक्ष सोडून जाताना दिसतात. मनसेचे पूर्वाश्रमीचे पुण्यातले नेते वसंत मोरे यांनी राजपुत्राने आपल्याला चुकीच्या शब्दात सुनावल्याचे जाहीररीत्या सांगितले होते. मनसेचे कामगार नेते महेश जाधव यांनी त्यांना अमित ठाकरे यांनी मारहाण केल्याचा आरोप केला होता. तेही महाराष्ट्राने जवळून पाहिले. आता विधानसभेच्या तयारीसाठी महाराष्ट्रभर दौरा करणार असल्याचे राज यांनी सांगितले. यंदा पाऊस मुबलक आहे. काही दुष्काळी भाग सोडले, तर राज्यात पाण्याची तशी फारशी कमतरता भासणार नाही. त्यामुळे महाराष्ट्राचा दौरा करताना त्यांना पुन्हा हंबरडा फोडावा लागणार नाही. महाराष्ट्र दौऱ्यातून त्यांच्या हंबरड्याच्या चित्तशुद्धीचा सार्वजनिक कार्यक्रम तुम्ही पाहालच. तेव्हा पाण्यावाचून हैराण असलेला सर्वसामान्य माणूस, लहरी वातावरणाला धास्तावलेला शेतकरी, कराच्या ओझ्याखाली दबलेला मध्यमवर्गीय, शिक्षण क्षेत्रातील त्राहीने त्रस्त असलेला विद्यार्थी त्यांना सहज दिसेल. त्यासाठी त्यांना वाकावे लागू नये, याच सदिच्छा आणि शुभेच्छांसह... जय महाराष्ट्र!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.