समृद्ध करणारी विद्या

स्त्रियांच्या प्रश्‍नांना नव्या दृष्टिकोनातून भिडणारं बंडखोर, पण तितकंच आशयघन असं ‘चारचौघी’ हे नाटक नव्वदच्या दशकात रंगभूमीवर आलं होतं. त्या काळी या नाटकानं इतिहास घडवला होता. दोन वर्षांपूर्वी पुन्हा हे नाटक नव्या संचात रंगभूमीवर आलं.
समृद्ध करणारी विद्या
समृद्ध करणारी विद्याsakal
Updated on

- मुक्‍ता बर्वे

स्त्रियांच्या प्रश्‍नांना नव्या दृष्टिकोनातून भिडणारं बंडखोर, पण तितकंच आशयघन असं ‘चारचौघी’ हे नाटक नव्वदच्या दशकात रंगभूमीवर आलं होतं. त्या काळी या नाटकानं इतिहास घडवला होता. दोन वर्षांपूर्वी पुन्हा हे नाटक नव्या संचात रंगभूमीवर आलं. ३१ वर्षांनंतरही नाटकाला तेवढीच लोकप्रियता मिळाली. आता मात्र या नाटकाच्या प्रयोगांना विराम देण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. रविवारी (ता. २९) याचा अखेरचा प्रयोग सादर होईल. यानिमित्तानं नाटकाविषयी व्यक्त होत आहेत, या नाटकात ‘विद्या’ हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री मुक्ता बर्वे.

‘चा रचौघी’ नाटक मी पहिल्यांदा नऊ-दहा वर्षांची असताना पाहिलं होतं. दहा वर्षांच्या मुलीला ते नाटक कितपत कळलं असेल, याविषयी आता उत्सुकता वाटते. पण त्या नाटकाची काही वैशिष्ट्यं डोक्यात पक्की झाली होती. पुढं मोठी होत गेले, नाट्य क्षेत्राचं शिक्षण घेतलं, याच क्षेत्रात काम करायला लागले, तसं या नाटकाची अधिक ओळख होत गेली. त्या नाटकाचं महत्त्व जाणवत गेलं. या क्षेत्रात काम करत असताना प्रशांत दळवी आणि चंद्रकांत कुलकर्णी यांच्यासह काम करण्याची खूप इच्छा होती, पण योग जुळून येत नव्हता. तो जुळून आला, ‘चारचौघी’च्या निमित्ताने.

एके दिवशी चंदू (चंद्रकांत कुलकर्णी) सरांचा फोन आला, ‘चारचौघी’ परत करण्याची इच्छा आहे, तू करशील का?’ ज्यांच्यासह काम करण्याची इच्छा होती, त्यांनी विचारल्यावर नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता.

पण मुद्दा होता, जुनं नाटक परत करण्याचा, कोणीतरी आधी साकारलेली भूमिका पुन्हा साकारण्याचा. सगळे एकत्र जमल्यावर चंदू सरांनी वाचन केलं आणि मी अवाक झाले. नाटक आजचं... आत्ताचं वाटत होतं. एकीकडे लेखकाच्या लेखणीच्या ताकदीचं कौतुक वाटत होतं आणि दुसरीकडे समाज म्हणून आपल्या होत चाललेल्या अधःपतनाची लाजही.

‘मुक्ता ते विद्या’ या प्रवासात चंदू सरांनी खूप छान दिशा दाखवली. विद्या साकारत असताना एका अभिनेत्रीला आव्हान देणारा असा प्रवेश होता, तो म्हणजे २२ मिनिटांचा एकतर्फी फोनचा सीन. हा प्रवेश सरांनी वेगळ्याच पद्धतीनं बसवला. त्यांनी हा प्रवेश सुरू असताना समोर प्रेक्षकांच्या मनात काय उमटायला हवं, हे लिहून आणलं होतं. त्या वर्णनाच्या आधारे हा प्रवेश ते बांधत गेले. हा प्रवेश नटासाठी एक चमत्कृतीपूर्ण भाग जरी असला, तरी त्याचा भावनिक प्रवास खूप मोठा आहे.

त्याअर्थी हे प्रचंड थकवणारं पात्र आहे. पण म्हणून मी रोज नव्याने विचार करून प्रयोग नाही करत. तालमी दरम्यान जो विचार केला आहे, तो मी पुरवून पुरवून अख्ख्या नाटकभर वापरला. रोज विचार करून काम केलं, तर नटाचा विचार दिसू लागतो, भावना नाहीशी होते. त्यामुळे भावना टिकवायची असेल, तर विचाराला मागे ठेवावं लागतं आणि भावनिकदृष्ट्या शरण जावं लागतं.

हे नाटक लिहिलं, त्या वेळी घटस्फोट ही दुर्मीळ गोष्ट होती. अलीकडे ती गोष्ट सवयीची झाली असली, तरी त्याविषयीच्या प्रतिक्रियेत फारसा बदल झाला आहे, असं मला वाटत नाही. ज्या घरात घटस्फोट होतो, तेथे त्याची वेदना तितक्याच प्रमाणात जाणवते.

त्यामुळे प्रेक्षक आजही ‘विद्या’च्या वेदनेशी समरस होऊ शकत होते. एक बोलकी प्रतिक्रिया मला ऐकायला मिळाली. माझ्यापेक्षा काही वर्षांनी लहान असलेली मुलगी म्हणाली, ‘आई-वडिलांचा घटस्फोट झाल्याने मी माझ्या वडिलांकडे वाढले. आई फारशी माझ्या वाट्याला आलीच नाही. त्यामुळे आईविषयी कायम माझ्या मनात राग होता. हे नाटक पाहिल्यावर मला लक्षात आलं की आईचं तिकडे काय होत असेल.’’ अशा प्रतिक्रियांमुळेच ‘विद्या’ अधिक जिवंत होत गेली.

लोक इतकं ‘रिलेट’ करू शकतात, हे या नाटकाचं, लेखकाचं यश आहे आणि असं पात्र साकारायला मिळणं, ही नटासाठी पर्वणी आहे. हे पात्र साकारत असताना डोक्यात अनेक शंका-कुशंका, मानसिक आंदोलनं असतात. त्यामुळे रोज एक प्रयोग झाल्यावर थकवा येतो. असं असताना या पात्रासारखं आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींचं प्रत्यक्ष आयुष्यात काय होत असेल, हा विचार करतानाही कधीतरी भीती वाटते.

‘विद्या’चा प्रवास केवळ नवऱ्याशी होणाऱ्या घटस्फोटापुरता नाही. त्या पात्राची नवी छटा उलगडते, ती तिच्या मुलीबाबत; ‘मीनू’बाबत घेतलेल्या निर्णयाने. मिनूला सांभाळण्याची अर्धी जबाबदारी नवऱ्याने घ्यावी, असा आग्रह विद्या न्यायालयात धरते. खरंतर मी दळवी सरांशी याबाबत अनेक दिवस चर्चा करत होते.

कारण ‘विद्या’ आपल्या मुलीला नवऱ्याकडे सांभाळायला देईल, असं मला स्वतःला वाटत नव्हतं. पण त्यांच्या मते ‘विद्या’चा तो निर्णय तसाच असणं, अपेक्षित होतं. लेखक म्हणून ती अफलातून कल्पना असली, तरी मला मात्र ते पटत नव्हतं. जवळपास ५५ प्रयोग होईपर्यंत मी यावर चर्चा करत होते. पण दळवी सर मात्र ठाम होते. त्यामुळे मग मी माझ्या मनाशी एक दुसरं कारण शोधून स्वतःला त्यासाठी तयार केलं.

हे नाटक जुन्या संचात पाहिलेल्या अनेकांनी हा नव्या संचातील प्रयोगही पाहिला. पण नाटक पूर्वी सादर झालं, त्यापेक्षा आज काळ बदलला आहे. लोकांना नाटकाविषयी जे वाटायचं, ते बदललं. मधल्या काळात नाटकाच्या सादरीकरणाची, अभिनयाची पद्धत बदलली. त्यामुळे परत नाटक पाहणाऱ्या प्रेक्षकांनाही पूर्णतः नवा अनुभव मिळाला असेल, असं मला वाटतं. त्यामुळे त्यांनीही दोन्ही संचाची तुलना केली नाही. निदान आम्हाला येणाऱ्या प्रतिक्रिया तरी ‘तेव्हाही आम्हाला आवडलं होतं आणि आत्ताही तितकंच आवडलं,’ अशाच होत्या. दोन-तीन पिढ्यांनी एकत्र येत हे नाटक पाहिलं.

मराठीला आशयघन नाटकांची परंपरा आहेच. पण आज आपला ‘अटेन्शन स्पॅन’ १५ सेकंदाच्या रील्स पाहण्यापर्यंत आला असताना अशा प्रकारचं तीन अंकी, साडेतीन तासांचं नाटक रुचेल का, अशी शंका सगळ्यांच्याच मनात होती. पण अशा प्रकारच्या आशयप्रधान आणि वैचारिक नाटकाला प्रचंड प्रतिसाद मिळतो, ‘बाल्कनी’देखील भरते, याचा खूप आनंद वाटतो.

कोरोना महासाथीनंतरच्या काळात अशा पद्धतीनं नाटक चालणं, ही महत्त्वाची घटना आहे. ज्या नाटकातील संवादांना टाळी येते, ज्यातील प्रवेश अनेक एकपात्री स्पर्धांमधून वर्षानुवर्षे सादर होत राहतो, अशा एका जुन्या परंपरेतील, बांधीव नाटकाचा भाग होता आल्याचा मला मनस्वी आनंद आहे. नाटकाच्या या प्रवासानं आणि ‘विद्या’च्या या व्यक्तिरेखेने मला समृद्ध, संपृक्त केलं. ही भूमिका माझ्या कारकीर्दीतील एक महत्त्वाची, ‘माइलस्टोन’ भूमिका असेल, असं मला नक्की वाटतं.

(शब्दांकन : महिमा ठोंबरे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.