इतिहास नसतो डावा-उजवा, भगवा-हिरवा... 

Representational Image
Representational Image
Updated on

''भूतकाळातून जे धडा शिकत नाहीत, त्यांच्याकडून ऐतिहासिक चुकांची पुनरावृत्ती होणे क्रमप्राप्त असते'', असे एक सुभाषित आहे... दुसऱ्या बाजूला ''इतिहासात नको तितके रममाण होणाऱ्या समाजात वर्तमानाचे आणि भविष्याचेही नुकसान करणारी अकर्मण्यता जन्माला येते'', असे म्हणणारे विद्वज्जनही आहेत. भारतीय समाज सध्या कुठल्या बाजूने आहे?...तो इतिहासातून काहीच शिकलेला नसल्याने सारखा चुका करतोय, की इतिहासात फार रममाण होत असल्यामुळे विचित्रशी स्थितिशीलता आलीय या समाजात?...आपल्या कर्तृत्वाचे दाखले इतिहासातच का शोधतो हा समाज?...प्रश्‍न अनेक आहेत आणि गहनही. एकीकडे कमालीची स्थितिशीलता आणि नको त्या आघाड्यांवर कमालीची सक्रियता अशा विचित्र स्थितीत सापडलाय भारतीय समाज. या स्थितीचे सर्वांत महत्त्वाचे कारण आहे इतिहासाला नको तितके महत्त्व येण्याचे...आपल्या वर्तमानाहून आणि भविष्याहून इतिहासाचे माहात्म्य वाढण्याचे..! गांधी चुकले, नेहरू चुकले, आंबेडकर चुकले, सावरकर चुकले असे सांगत राजकीय पालख्यांचे भोई झालेल्या विद्वानांमुळे भ्रमाचे वातावरण पसरतेय. कालपर्यंत या समाजाला इतिहासातल्या ज्या गोष्टींचा अभिमान वाटायचा, त्याबद्दलच्या त्याच्या पारंपरिक समजुतींना प्रचारकी मुद्द्यांमुळे तडा गेलाय आणि नवे जे काही दडपून सांगितले जाते, ते त्याला विश्‍वसनीय वाटत नाही. त्यामुळे तो गोंधळात आहे. ज्या थोर-महात्म्यांना आपण दशकानुदशके मनातल्या मनात पुजले, त्यांचे तरुणींच्या घोळक्‍यातले फोटो पाहून कसेनुसेच होते सामान्य माणसाला. ते फोटो खरे की खोटे, असा प्रश्‍न त्याला पडत नाही आणि ते फोटो खरे असतील तर 'तीसुद्धा माणसेच होती' या औदार्याप्रत येणे त्याला शक्‍य होत नाही. तसे विश्‍लेषण करण्यासारखे, प्रश्‍न विचारण्यासारखे वातावरणच नाही. प्रश्‍न विचारणाऱ्यांना, चिकित्सा करणाऱ्यांना थेट आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यासाठी बाह्या खोचून तयार असलेली फौजच आहे सर्वत्र...किती श्रद्धेने नवा निर्बुद्ध 'श्रद्धावंत' समाज घडवतोय आपण..! 

'निंदकाचे घर असावे शेजारी' ही आपली सामाजिक व सांस्कृतिक शिकवण. पण, हाच निंदक एखाद्याने स्वतःमध्ये उभा केला आणि ('इतिहासाचे सोडा हो' म्हणत) वर्तमानाच्या संदर्भात प्रश्‍न विचारणे सुरू केले, की त्याला राष्ट्रद्रोही ठरवणारी फौज तयार आहे. ती रस्त्यावर आहे, तशी सोशल मीडियावरही आहे. जे लोक इतिहासात जास्त रमतात, त्यांना काहीच करायचे नसते. गरजच नसते त्यांना काही करण्याची!... त्यांच्या इतिहासपुरुषांनी एवढे थोर काम करून ठेवले असते, की त्यांचा जयजयकार करण्यात अशा माणसांचा जन्म निघून जातो तरी त्यांना कळत नाही. आपल्या महात्म्यांच्या कर्तृत्वाचेच ढोल बडवायचे म्हटल्यावर स्वतः कोण कशाला कष्ट घेईल?...

अशा लोकांना स्वतः काहीच करण्याची आवश्‍यकता वाटत नाही. त्याहून खतरनाक असतात काही लोक. ते इतिहासपुरुषांच्या चुका काढण्यात धन्यता मानतात. ते त्या महापुरुषांच्या 'कथित' चुकांचा वापर भ्रम निर्माण करण्यासाठी करतात. ही राजकारणासाठी निर्माण केली गेलेली प्रचारकी पिलावळ असते. त्यांच्या नजरा सदोष असतात. त्यांच्या निष्ठा माणुसकीच्या तत्त्वांहून मोठ्या असतात. सतत या ना त्या मुद्द्यावर भ्रम निर्माण करणे आणि समकालीन प्रश्‍नांच्या संदर्भात सजगता निर्माण होणारच नाही, असे भारलेले किंवा उन्मादी किंवा विसंवादी वातावरण सतत राहील याची काळजी घेणे हेच अशांचे काम असते. सध्या या प्रकारचे काम करणारी फौज प्रचंड प्रमाणात पसरली आहे. मोसम पाहून महापुरुषांच्या चारित्र्यावर प्रश्‍नचिन्ह निर्माण करणारा ऐतिहासिक मजकूर किंवा छायाचित्रे 'व्हायरल' करणे आणि त्या व्यक्तीबद्दल नकारात्मक वातावरण निर्माण करणे हे त्यांचे पहिले काम. दुसरे म्हणजे त्यांच्या विचारांशी नाते सांगणाऱ्या कुणाबद्दलही प्रश्‍न निर्माण केले गेले तर असे लोक त्यांचे 'अनपेड' वकील म्हणून काम करतात. संबंधित व्यक्ती स्वतःबद्दलच्या प्रश्‍नांची उत्तरे देत नाही. त्याची त्या व्यक्तीला गरज वाटत नाही. पण, त्या व्यक्तीशी वैचारिक नाते असणारे लोक त्याच्या साऱ्या कृतींचे समर्थन व त्याच्या बाजूने खुलासेही करीत असतात. त्यांना वकीलपत्र दिले कुणी?...आपल्या वतीने गोंगाट करण्यासाठी असले 'लाउड्‌स्पीकर' त्या थोर माणसांनी नियुक्त केले आहेत काय?...काहीही माहिती नाही. फक्त इतिहासात रमायचे आणि रमवायचे. मोगलांशी लढणाऱ्या शूरवीरांची नावे घ्यायची, स्वातंत्र्यलढ्यातील थोर भारतीयांच्या नावाने गळे काढायचे, फासावर गेलेल्या देशभक्तांची नावे घेऊन त्वेषपूर्ण गाणी म्हणायची आणि लोकांना इतिहासाच्या नावाने भुलवत ठेवायचे, हा त्यांचा धंदा. त्यांना आवरायला जावे तर देशद्रोही ठरणार. सरकार त्यांना फक्त इशारे देणार. इतिहासाबद्दलच्या अत्यंत अपरिपक्व जाणिवांचा हा परिपाक आहे. इतिहासात आकंठ बुडालेल्यांकडून समाजाचे भले होत नाही, हा 'इतिहास' आहे तरीही हे असे आहे. वास्तवात इतिहास हा काही शास्त्रीय विषय नाही. तो सबळ पुराव्यानिशी मांडला गेला तरच विश्‍वसनीय मानला जात असला तरी त्या पुराव्यांचे विश्‍लेषण करणारी माणसंच असतात. त्यांना त्यांच्या आवडी-निवडीही असतात. त्या-त्या काळच्या सत्ताधीशांच्या दृष्टिकोनाचा परिणामही असतो. 
भौतिकशास्त्र, गणितासारखा नेमकेपणा इतिहासात असणे अपेक्षित नसते. याशिवाय, इतिहासाच्या संदर्भात ज्या महापुरुषांच्या कार्याचे विश्‍लेषण केले जाते, ते महापुरुष तत्कालीन परिस्थितीनुसार घडले-घडविले गेलेले असतात. तीही माणसेच असतात. ती चुकलेली असू शकतात. काही वेळा परिस्थितीनुसार त्यांनी काही निर्णय घेतलेले असू शकतात. त्यांचेही स्खलन झालेले असू शकते. पण, त्यांच्या मानवी मर्यादांच्या संदर्भात काही हाती लागले किंवा थोडेफार उकरून काढता आले, की प्रचारकी पिलावळीला चेव येतो. तेवढ्याशा मुद्द्यावर त्या थोरांचे सारे कर्तृत्व प्रश्‍नांकित करायला ते धजावतात. इतिहास लिहिला जातो वर्तमानाची समज स्पष्ट करण्यासाठी आणि भविष्याचा वेध घेण्यासाठी. इतिहास वाचला जातो तो 'ऐतिहासिक' चुका टाळण्यासाठी आणि आपल्या महापुरुषांच्या कर्तृत्वातून आदर्श घेण्यासाठी.

भारतीय इतिहासाच्या लेखनाच्या बाबतीत गतकाळात काही चुका जरूर झालेल्या दिसतात. इंग्रजांच्या वसाहतवादी मानसिकतेचे प्रतिबिंब असलेला इतिहास मोठ्या प्रमाणात बदलून टाकण्याची आवश्‍यकता होती. स्वातंत्र्योत्तर काळात ते काम पुरेशा ताकदीने झाले नाही. त्याबाबत त्याही वेळी प्रश्‍न विचारले गेले. त्यावेळी लिहिला गेलेला इतिहास 'दिल्लीकेंद्रित' असल्याचा आक्षेप आजही घेतला जातो. तो बऱ्याच प्रमाणात खराही वाटतो. इतिहासाचे पुनर्लेखन करण्याची आवश्‍यकता आहे, यात वाद नाही. फक्त त्यामागील हेतू चांगला हवा आणि त्या प्रक्रियेत पारदर्शकता हवी. इतिहासातले चांगले-वाईट सारेच लक्षात ठेवण्याची आवश्‍यकता आहे. मोगल आले होते हे फक्त इतिहासाचे पुस्तक सांगत नाही. तुमच्या भाषेतले शब्द, तुमच्या कारभारातले संदर्भ, तुमच्या खानपानातले पदार्थही ते सांगत असतात. मग मोगलांना विसरून कसे चालेल? त्यांना इतिहासातून हटवणे ही ऐतिहासिक चूक ठरेल. इतिहासातले सारेच आपल्या मनासारखे नसते. ते दुरुस्तही होण्यासारखे नसते. पाठ्यपुस्तकांमध्ये, ग्रंथांमध्ये दुरुस्त्या केल्या किंवा महापुरुषांच्या नावे चांगल्या-वाइटाचा गजर करीत राहिलात तरी त्याचा फारसा उपयोग होत नाही. त्याने इतिहास बदलत नाही. वर्तमान तर नाहीच नाही. इतिहासाशी खेळ करण्याचे पातक मात्र घडते.

इतिहास हा पुस्तकांच्या बाहेर येऊन आपल्या मदतीचा ठरायचा असेल तर त्यात सारे काही सम्यक-संतुलित पद्धतीने आले पाहिजे. इतिहासाला रंग देण्याचा अधिकार कुणालाही नाही. नसावाच. इतिहास कोणत्याच पक्षाचा नसतो. तो विचारांचाही नसतो. तो डावा, उजवा किंवा हिरवा-भगवा नसतो. इतिहास आणि धर्मशास्त्रात हाच फरक आहे. इतिहास संतुलित नसेल तर त्याला प्रचारकी साहित्याहून अधिकचे मोल येण्याचे कारण नाही. तसे प्रचार साहित्य आधीच्या लोकांनी आपल्या बाजूचे करून वापरले म्हणून आता आम्हीही वापरू, असे कुणी म्हणत असेल तर ते मान्य करता येण्याजोगे नाही. इतिहास दुरुस्त व्हायचा असेल, त्याची गरज असेल तर तो वर्तमानाच्या गरजा आणि भविष्याच्या दिशेच्या संदर्भात दुरुस्त झाला पाहिजे. दुरुस्तीमुळे समाजात दुरावा निर्माण होणार असेल, तेढ निर्माण होणार नसेल तर अशा दुरुस्त्यांची गरज नाही. राजकीय अजेंडा डोळ्यासमोर ठेवून इतिहासाशी खेळ मांडला गेला तर लोक त्यातच गुंतून पडतील, त्यातून संघर्ष, अस्थिरता निर्माण होईल आणि या समाजाची कर्तृत्वशीलता बाजूला पडण्याचा धोका आहे. इतिहासाची डागडुजी व्हायची असेल तर ती समाजाच्या भल्यासाठी, त्याला प्रेरणा मिळण्यासाठी व्हावी. कुणाला मोठे करण्यासाठी किंवा कुणाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभी करण्यासाठी ती होणार असेल तर ते कुणाच्याच भल्याचे नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.