मराठीच्या नगरीचा विस्तार (सदानंद मोरे)

मराठीच्या नगरीचा विस्तार (सदानंद मोरे)
Updated on

मराठीच्या नगरीत प्रवेश करून एक वर्ष होत आलं आणि आता त्या नगरीतून बाहेर पडायची वेळ आली आहे. ‘मराठीची नगरी’ हा शब्दप्रयोग ज्ञानेश्वरीच्या आधारे केला आहे. मराठीची नगरी म्हणजे मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांची नगरी. भौगोलिक विचार केला तर या नगरीलाच महाराष्ट्र असं म्हटलं जातं व तिथल्या लोकांना ‘मराठे’, ‘मराठी माणूस’ असं ओळखलं जातं. संत ज्ञानेश्वरमहाराजांचा भर या लोकांच्या भाषेवर, धर्मावर व तत्त्वज्ञानावर होता. साहजिकच त्यांनी साहित्य व तत्त्वज्ञान यांना महत्त्व दिलं.

असा भर देताना ज्ञानेश्वरांनी आपली वैश्विक दृष्टी ढळू दिली नाही. ‘देखे आवडे तो खाणी। ब्रह्मविद्येची।।’ असं ते म्हणतात. त्याची व्याप्ती मराठी भाषा बोलणाऱ्यांपुरती मर्यादित ठेवायचं कारण नाही. ती तशी मर्यादित असली तर ज्ञानेश्वरांनी पसायदानही एवढ्याच लोकांसाठी मागितलं असतं; पण पसायदान तर सगळ्यांसाठीच आहे.

ईप्सित असलेली वस्तू प्राप्त करण्याचा एक मार्ग म्हणजे ईश्‍वराची प्रार्थना करून त्याची कृपा संपादन करायची हा आहे. त्यामुळं जगातल्या ईश्‍वरवादी धर्मांमध्ये अशा प्रार्थनांची व मागण्यांची प्रथा आहे; पण अनेकदा अशा प्रार्थना त्या त्या धर्मांच्या अनुयायांपुरत्या मर्यादित असतात व त्यांची फळं आपल्यालाही मिळावीत अशी कुणाची इच्छा असल्यास त्या संबंधिताला त्या धर्माचा स्वीकार करावा लागतो. ज्ञानेश्‍वरांचं तसं नव्हतं. एका रचनेत त्यांनी ‘विश्वाचे आर्त माझे हृदयी प्रगटले’ अशी ग्वाही दिली आहे. त्यामुळं त्यांचा ग्रंथ हा विश्वातल्या ‘आर्ताचेनि वोरसे । गीतार्थ ग्रंथनमिसे’ झालेली शांतरसाची वृष्टीच आहे. ज्ञानेश्वरांची परंपरा कळसाला नेणारे संत तुकाराममहाराजसुद्धा ‘झाली माझी वैखरी। विश्वभरी व्यापक।।’ असं म्हणतात, तेव्हा तेही असेच वैश्विक होऊन जातात.

या परंपरेतला ईश्‍वरसुद्धा असाच आहे. ज्ञानेश्वर त्याला ‘विश्वात्मक देव’ असं म्हणतात. कधी त्याला ‘सर्वात्मक’ असंही म्हटलं जातं. शिवाय, ‘सर्वेश्‍वर’ ही संज्ञाही ही परंपरा उपलब्ध करून देते. ‘कोण्याही जीवाचा न घडो मत्सर। वर्म सर्वेश्‍वरपूजनाचे।।’ असं त्याच्या पूजेचं वर्म तुकोबांनी नकारात्मक भाषेत सांगितलं आहे, त्याचा सकारात्मक भाग ज्ञानेश्‍वरांनी प्रकट करून ठेवला आहे ः ‘तया सर्वात्मक ईश्‍वरा। स्वकर्मकुसुमांची वीरा। पूजा केली होय अपारा । तोषालागी।।’

स्वकर्म करणं हीच त्याची पूजा होय. स्वकर्मालाच स्वधर्म असंही म्हटलं जातं. वर्ण-जातिव्यवस्था ही स्वधर्म वा स्वकर्म निश्‍चित करायची एक ऐतिहासिक पद्धती होती. ती सार्वत्रिक व सार्वकालिक असण्याची गरज नाही, तसंच तिच्यात उच्च-नीचभाव असलाच पाहिजे, या आग्रहाचीही आवश्‍यकता नाही.

याच संदर्भात गेल्या शतकात गाजलेली महाराष्ट्रधर्माची चर्चा अर्थपूर्ण ठरते. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी वर्णाश्रमधर्म हा महाराष्ट्रधर्माचा अविभाज्य घटक मानला. वस्तुतः वर्णाश्रमधर्म हा एकूणच वैदिक धर्माचा भाग होता आणि या अर्थानं ते भारतभर पसरला होता. महाराष्ट्रधर्म हा वर्णाश्रमधर्मावर आधारलेल्या वैदिक धर्माच्या मर्यादा ओळखतो व तेवढ्यापुरती त्याच्यापासून फारकत घेतो.

महाराष्ट्रधर्माचं हे वैशिष्ट्य न्या. महादेव गोविंद रानडे आणि राजारामशास्त्री भागवत यांनी ओळखलं होतं. महाराष्ट्रीय या नात्यानं आपलं राष्ट्र आणि जग यासंबंधीची कर्तव्यं पार पाडणं याचा अर्थ महाराष्ट्रधर्म. ज्ञानेश्‍वर जेव्हा विश्वासाठी पसायदान मागतात, तेव्हा ते महाराष्ट्रधर्माचं पालन करत असतात!

वर स्पष्ट केल्यानुसार, प्रार्थना हा एक उपाय असला तरी तो काही एकमेव उपाय नव्हे. आपल्याला जे हवं आहे, ते प्राप्त करण्यासाठी आवश्‍यक ते कर्म केलं पाहिजे. संत रामदास स्वामींच्या शब्दात सांगायचं झालं तर प्रार्थना ‘भगवंताचं अधिष्ठान’ मिळवून देते; पण तरीही ‘चळवळी’ची म्हणजे कर्माची गरज उरतेच; मग ते कर्म सामाजिक असेल किंवा राजकीय. त्या वेळी तेच स्वकर्म आणि तोच स्वधर्म ठरतो. स्वतःच्या प्रपंचासाठी किंवा वर्णाश्रमधर्मानुसार किंवा प्रचलित व्यवस्थेला अनुसरून केलेली कर्मं वेगळी.

महाराष्ट्रधर्माला अनुसरून कर्मं करायची झाली तर स्वार्थपरायणतेपोटी केलेली वैयक्तिक कर्मं किंवा व्यवस्थेला अनुरूप असलेली कर्मं यांच्याशी प्रसंगी संघर्ष होऊ शकतो. त्या संघर्षाला सामोरं जाऊन त्यावर मात करणं हासुद्धा महाराष्ट्रधर्माचाच भाग आहे. 

यासंदर्भात खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची साक्ष काढणं उचित होईल.

सन १९०१ मध्ये न्या. रानडे, १९१५ मध्ये नामदार गोखले आणि १९२० मध्ये लोकमान्य टिळक अशा पुढाऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर भारतीय राजकारणात एक पोकळी निर्माण झाली होती. ती पोकळी भरून काढण्यासाठी महात्मा गांधीजी पुढं सरसावले आणि बघता बघता त्यांचं नेतृत्व उभं राहिलं. 

महाराष्ट्र मागं पडला. डॉ. आंबेडकर म्हणतात ः ‘‘हिंदी राजकारणातील महाराष्ट्रीयांच्या वाट्याचा इतिहास पाहिला तर महाराष्ट्रीय त्यात मागे पडत चालले आहेत, या गोष्टीबद्दल मला तरी निदान शंका वाटत नाही. महाराष्ट्रीय लोक व्यापारात आतापर्यंत कधीच पडलेले नाहीत. त्यामुळे विपुल द्रव्य किंवा पैसाही त्यांनी कधी केला नाही. ज्या वेळी इतर भागातले हिंदी लोक परकीयांच्या जुलमाखाली पिडले जात होते, त्या वेळी महाराष्ट्रीयांच्या पूर्वजांनी आपले सारे आयुष्य स्वराज्याचा कारभार हाकण्यात घालविले. त्यांचे रक्त त्यापायी खर्च पडले.’’

महाराष्ट्रीयांना व्यवहारज्ञान कमी म्हणून ते मागे पडत आहेत, असं एक मत तेव्हा मांडलं जात असे. डॉ. आंबेडकर ते फेटाळून लावतात. त्यांच्या मते ‘‘महाराष्ट्रीयांइतकी व्यवहारबुद्धी हिंदुस्थानातील इतर कोणत्याही प्रांतीयांत आढळू शकणार नाही. महाराष्ट्रीयांइतका ऱ्हास इतर कोणाही प्रांतीयांत आढळू शकणार नाही. महाराष्ट्रीयांचा ऱ्हास इतर कोणत्याही कारणाने झालेला असो; पण व्यवहारबुद्धीच्या अभावामुळे मात्र तो खचित झालेला नाही. महाराष्ट्रीयांची पीछेहाट का झाली याचे कारण त्यांचे जीवित महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी कामी आले. राजकारण खेळविण्यात, राज्यकारभार हाकण्यात त्यांचा काळ निघून गेला. माझ्या या म्हणण्याची इतिहासच साक्ष देत आहे. धनाढ्य श्रेष्ठीचे नाव महाराष्ट्राच्या इतिहासात तुम्हाला ऐकू येणार नाही; पण सेनानी, मुत्सद्दी, राजकारणी पुरुष यांची नावे घडोघडी तुम्हाला सापडू शकतील. जगातील कोणत्याही देशाला अभिमान वाटावा अशी ही नावे आहेत.’’

महाराष्ट्रातल्या लोकांनी इतरांप्रमाणे व्यापाराचा मार्ग स्वीकारला नाही, लक्ष्मीची कृपा संपादन करण्याचा प्रयत्न केला नाही, तिच्या मागे ते लागले नाहीत, हे नमूद करून डॉ. आंबेडकर एक विदारक सत्य सांगतात. ते म्हणतात ः ‘‘आज कशाला किंमत असेल तर ती एका पैशाला! पैशाने बुद्धी काबीज केली आहे. निदान बुद्धी आणि शील या दोहोंवर त्याने मात केली आहे, हे तरी खासच होय!’’

यासंदर्भात डॉ. आंबेडकर हे रानडे, टिळक आणि गोखले या त्रयीचा गौरवपूर्ण उल्लेख करतात. ‘‘महाराष्ट्रीय म्हणून म्हणवून घेण्यात मला अभिमानच वाटतो. माझ्या महाराष्ट्रीयत्वाचा मला फार फार अभिमान आहे, ही गोष्ट मी येथे ठासून सांगतो. महाराष्ट्रीयांत असे काही गुण आहेत, जे इतर प्रांतीयांत तुम्हाला दिसून यावयाचे नाहीत,’’ असं डॉ. आंबेडकर स्पष्ट करतात.

स्वतः डॉ. आंबेडकर हेही अशाच कर्तृत्ववान महापुरुषांच्या मालिकेतले होते, हे वेगळं सांगायची गरज नाही. विशिष्ट परिस्थितीचा परिपाक म्हणून त्यांना काँग्रेसविरोधाचं राजकारण करणं भाग पडलं. तथापि, स्वातंत्र्यप्राप्तीच्या प्रसंगी जेव्हा स्वतंत्र भारताची राज्यघटना तयार करण्याची वेळ आली, तेव्हा त्यासाठी योग्य व्यक्ती म्हणजे डॉ. आंबेडकर, अशी खुद्द गांधीजींचीच खात्री पटली. त्यामुळं काँग्रेसनं त्यांना त्यासाठी पाचारण केलं. त्यांनीही ही जबाबदारी उमदेपणानं स्वीकारून समर्थपणे निभावून दाखवली.

डॉ. आंबेडकरांपूर्वी रानडे, टिळक आणि गोखले यांच्या काळाचे साक्षी असलेल्या राजारामशास्त्री भागवत यांनी महाराष्ट्र, मराठी माणसं व मराठी भाषा यांविषयी विचारप्रवर्तक लेखन केलं होतं. त्यात त्यांनी मराठी माणसांच्या कर्तबगारीची व योगदानाची यथोचित मीमांसा केली होती. त्याची सविस्तर चर्चा मी ‘गर्जा महाराष्ट्र’ या पुस्तकात केलेली आहेच; पण ‘राजारामशास्त्री झाले तरी महाराष्ट्रीयच; त्यामुळं त्यांनी आपल्या प्रदेशाच्या अभिनिवेशातून महाराष्ट्राला झुकतंच माप दिलं असणार; त्यांच्या लेखनात वस्तुनिष्ठता असण्याची शक्‍यता कमीच,’ असा आक्षेप कुणी घेईल. त्याला उत्तर द्यायच झालं तर ते परप्रांतीय तटस्थ साक्षीदारामार्फतच द्यावं लागेल.

सुदैवानं असा साक्षीदार उपलब्ध आहे. त्याचं नाव (सर) जदुनाथ सरकार. जदुनाथ सरकार हे विख्यात इतिहाससंशोधक असून ते बंगाली होते. Shivaji and his Times हा शिवचरित्रावरचा त्यांचा ग्रंथ विसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात प्रसिद्ध झाला. त्या वेळी राजारामशास्त्री काळाच्या पडद्याआड गेले होते व डॉ. आंबेडकरांचा उदय अजून व्हायचा होता.

जदुनाथांनी स्पष्टपणे कबुली दिली आहे ः ‘हिंदुस्थानात मराठे हे अग्रेसर असून, आज तरी त्यांची बरोबरी करील, असे हिंदुस्थानात कुणी दिसत नाही.’

जदुनाथांचं हे मत तत्कालीन कोणत्याही माणसाला मान्य झालं असतं; मग तो महाराष्ट्रीय असो किंवा नसो. याहीपेक्षा अधिक महत्त्व आहे ते जदुनाथांच्या पुढच्या मताला. जदुनाथ म्हणतात ः ‘मराठ्यांनी आणखी काही गुण आत्मसात केले तर आणखी शंभर वर्षांनी ते संपूर्ण जगात अग्रेसर ठरतील!’

जदुनाथांनी वर्तवलेलं हे भाकीत खरं झालं नाही, हे मान्यच करावं लागतं. ते का झालं नाही, हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे; पण त्याचं उत्तर एकाच वाक्‍यात द्यायचं झालं तर ‘महाराष्ट्रातल्या लोकांनी -महाराष्ट्रधर्माचं नीट आचरण केलं नाही,’ असं द्यावं लागतं.

मराठ्यांनी महाराष्ट्रधर्माचं नैष्ठिक आचरण केलं, तेव्हा ते किती पुढं गेले होते, याची साक्ष इतिहासच देतो. या आचरणामुळंच शिवाजीमहाराजांच्या काळात महाराष्ट्राला स्वराज्याची स्थापना करता आली. संत रामदासांनी संभाजीराजांना केलेला ‘मराठा तितुका मेळवावा। महाराष्ट्रधर्म वाढवावा।’ हा उपदेश या दृष्टिकोनातून पाहिला तरच त्याची संगती लावता येते. इतिहासाचार्य राजवाडे समजतात, तसा त्याचा अर्थ वर्णधर्म व जातीधर्म असा संकुचित केला तर तेव्हाचा बहुजन समाज स्वराज्याच्या महाप्रकल्पात का सहभागी झाला याची संगती लावता येणार नाही.

स्वराज्य स्थापन करण्याच्या शिवरायांच्या कामगिरीइतकीच; किंबहुना तिच्यापेक्षा कांकणभर अवघड अशी कामगिरी शिवरायांच्या पश्‍चात महाराष्ट्राला करावी लागली. दिल्लीच्या मोगल तख्ताचा बलाढ्य बादशहा औरंगजेब सर्व सामर्थ्यानिशी दख्खनमध्ये उतरला. विजापूरची आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांचं स्वराज्य यांचा निकाल 

लावून संपूर्ण भारत मोगलांच्या अमलाखाली आणण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती. आदिलशाही आणि कुतुबशाही यांचा नायनाट करायला त्याला फार वेळ लागला नाही. त्यानंतर त्यानं सर्व लक्ष महाराष्ट्रावर केंद्रित केलं. त्यासाठी तो पंचवीसेक वर्षं झगडला; पण त्याला ते जमलं नाही. उलट, शेवटी हताश होऊन, महाराष्ट्राच्या भूमीतच मृत्यूला सामोरं जायची वेळ त्याच्यावर आली.

स्वराज्यरक्षणाचं हे आव्हान पेलण्यात मराठे यशस्वी झाल्यानंतर त्यांनी स्वराज्यविस्ताराचा प्रकल्प हाती घेतला. सन १६०७ पर्यंत महाराष्ट्रात मोगलांच्या सैन्याशी लढणारे मराठे दहा-बारा वर्षांतच दिल्ली शहराच्या वेशीवर ठाकून मोगल सत्तेलाच आव्हान देऊ लागले. या प्रक्रियेचं पर्यवसान मराठ्यांच्या साम्राज्यात व्हायला वेळ लागला नाही.

सतराव्या शतकाच्या मध्यावर हिंदुस्थानच्या राजकारणाची सूत्रं मराठ्यांच्या हाती येणं ही काळाची गरज होती. या वेळी एकीकडं अफगाणिस्तान आणि दुसरीकडं ईस्ट इंडिया कंपनी हिंदुस्थानवर सत्ता गाजवण्यास उत्सुक होती. त्यांचे मनसुबे केवळ मराठ्यांमुळंच उधळले जाऊ शकले. अफगाण सत्ताधीश अहमदशहा अब्दाली याचं आव्हान मराठ्यांनी स्वीकारलं, याचा अन्वयार्थ इतिहासकारांना अद्याप नीटपणे लावता आलेला नाही. मराठे अब्दालीबरोबर पानपतच्या रणमैदानावर शर्थीनं लढले व पराभूत झाले, एवढंच सांगितलं जातं; पण मराठ्यांनी हा धोका पत्करला तो हिंदुस्थानला परकीय अमलापासून वाचवण्यासाठी, हे योग्य रीतीनं पुढं येत नाही. मराठ्यांचा हा पराक्रम आणि बलिदान हे त्यांच्या महाराष्ट्रधर्माशी सुसंगतच होतं. महाराष्ट्रधर्म हा हिंदू-मुसलमान धर्मांना ओलांडून पुढं जाणारा होता. धर्मानं मुसलमान असलेल्या दिल्लीच्या बादशहाच्या गादीचं रक्षण करायला धर्मानं हिंदू असलेले मराठे पुढं सरसावतात आणि अब्दाली नावाचं वादळ आपल्या अंगावर घेतात, हा त्यांच्या महाराष्ट्रधर्माचाच भाग आहे. त्यासाठीच त्यांनी मराठीच्या नगरीचा एवढा विस्तार केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.