ज्येष्ठ पटकथाकार सलीम-जावेद या द्वयीमधले सलीम खान ड्रम वाजवताना ज्या गाण्यात दिसतात, ते गाणं ‘ओ हसीना जुल्फोंवाली जाने जहाँ...’ संगीतकार राहुलदेव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘तीसरी मंझिल’ सिनेमातल्या या गाण्यात दुसऱ्या अंतऱ्यापूर्वी हेलन ही एखाद्या जिम्नॅस्टला लाजवेल अशा पद्धतीनं घसरगुंडीवरून उतरते...यानंतर शम्मी कपूर ब्रास सेक्शनमधलं जे वाद्य वाजवतो, त्याला ‘ट्रम्बोन’ असं म्हणतात. शम्मी कपूर ते वाजवताना पाईप स्लाईड मागं-पुढं सरकवताना दिसतो. सरकवण्यासाठी जी पट्टी असते, तिची लांबी जास्त असेल, त्यानुसार स्वर बदलतो. असं सरकवत वाजवल्यामुळं वेगवेगळ्या पिचमध्ये वाजवता येतंच; शिवाय मिंडचा परिणामही साधता येतो. हा परिणाम शम्मी कपूरनं वाजवताना अभिनयाद्वारेही लाजवाबपणे दाखवला आहे. त्याचा ढंग विनोदी असला तरी स्वर आणि कान सच्चा आहे, हे ते गाणं बघताना जाणवतं.
***
संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी स्वरबद्ध केलेल्या ‘आ जाने जा’ या ‘इंतकाम’ सिनेमातल्या गाण्यात ट्रम्बोनचा वापर प्रकर्षानं जाणवतो. ॲनीबॉल कॅस्ट्रो यांनी या गाण्यात ट्रम्बोन वाजवलं आहे, असं समजलं. याच कलाकारानं वाजवलेलं आणखी एक गाणं म्हणजे, ‘जब अंधेरा होता है’ (सिनेमा : राजा-रानी, संगीतकार : राहुलदेव बर्मन). ट्रम्बोनला ब्रासवर्गीय इतर वाद्यांप्रमाणे वॉल्व्ह नसतो. स्वराच्या अंदाजानं स्लाईड पुढं-मागं करावी लागते. हे वाद्य व्हायोलिनसारखं आहे. ते एकतर सुरात वाजेल किंवा बेसूर. कणसूर वगैरे काही नाही! बियास्को मोन्सोरेट यांनी राहुलदेव बर्मन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, कल्याणजी-आनंदजी, राजेश रोशन, बप्पी लाहिरी, इलायराजा अशा अनेक संगीतकारांकडं ट्रम्बोन वाजवलं आहे. ‘शालिमार’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘शान’, ‘मिस्टर नटवरलाल’ हे त्यातले काही सिनेमे.
***
लक्षपूर्वक ऐकलं तर ‘आ जाने जा’ या गाण्यात ब्रास सेक्शनमधली बरीच वाद्यं वाजतात. ट्रम्बोन, ट्रम्पेट, फ्रेंच हॉर्न, कोर्नेट, ट्युबा इत्यादी. यातलं कोणतं वाद्य केव्हा वाजवायचं, हे त्या वाद्याच्या पिचवर (स्वरावर) अवलंबून असतं. ब्रास वाद्याचा स्वर त्या वाद्याच्या पाईपच्या लांबीवर अवलंबून असतो. पाईपच्या वेटोळ्याला क्रूक्स असं म्हणतात. सगळ्यात खालच्या स्वरात वाजवायचं असेल, तर ट्युबा वाजवतात. कोणत्याही बॅंडमध्ये एक वादक मोठ्ठ्या तोंडाचं वाद्य वाजवत असतो, त्याला ट्युबा असं म्हणतात. ट्रम्बोनव्यतिरिक्त ब्रास सेक्शनमधल्या इतर वाद्यांना तीन ते पाच वॉल्व्ह, कीज् असतात. आपल्याला तीन वॉल्व्ह सहज दिसतात. बिगुल आपण पाहिलेला/ ऐकलेला असतो. त्याला वॉल्व्ह नसतात. ब्रास सेक्शनमधल्या वाद्यांबद्दलची ही तांत्रिक माहिती डॉ. दत्ता कुंभार यांनी दिली. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.
***
आपला असा समज असतो, की ‘फ्यूजन’ हा प्रकार अलीकडंच आलेला आहे; पण पाश्चिमात्य वाद्यं आपण फार पूर्वीपासून ऐकत आहोत. ब्रास सेक्शनमधली वाद्यं हिंदी सिनेसंगीतामध्ये वाजवली जाणं केव्हापासून सुरू झालं? १९४०-५० मध्ये संगीतकार सी. रामचंद्र यांनी ‘आना मेरी जान संडे के संडे (शहनाई), मेरे पिया गये रंगून (पतंगा), गोरे गोरे ओ बांके छोरे (समाधी), शोला जो भडके (अलबेला) अशा गाण्यांमधून या वाद्यांचा वापर सुरू केला. ब्रासवर्गीय वाद्यांचं वैशिष्ट्य म्हणजे, ही वाद्यं फुंकून वाजवली जात नाहीत. ओठांच्या कंपनातून फुर्रर्र असा आवाज काढून (Embouchure) वाजवली जातात. ब्रासवादकला ‘बझ’ असं म्हणतात. अशी वाद्यं वाजवत असताना दमसास टिकवून ठेवणं, बेमालूमपणे श्वास घेणं हे वादकाचं कौशल्य असतं. ते रियाजानं कमावलं जातं.
***
‘हम किसी से कम नही’ या सिनेमातल्या ‘बचना ए हसीनों’ या गाण्याची सुरवात ऋषी कपूर ट्रम्पेट वाजवत करतो. गॅलरीमधून तो ट्रम्पेट वाजवत खाली येतो, तेव्हा या वाद्याची रेंज काय आहे, याची कल्पना येते. राहुलदेव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्यात ऋषी कपूर हे वाद्य कसं वाजतं ते दाखवतो. त्याचा एको इफेक्ट कसा येतो, हे तो तालात दाखवतो. गाण्याची लय त्याच्या अंगात भिनली आहे हे जाणवतं आणि गाणं बघता बघता प्रेक्षक ताल धरतो. असं हे ट्रम्पेट ब्रासवर्गातलं आणखी एक वाद्य. काही हत्तींच्या चीत्काराला ट्रम्पेट असं म्हणतात. ‘आनेवाला पल जानेवाला है’ हे गुलजार यांचं सुरेख काव्य राहुलदेव बर्मन यांनी स्वरबद्ध केलेले आहे, त्याची सुरवात ट्रम्पेटनंच. ‘बिनाका गीतमाला’चा सुप्रसिद्ध सरताज बिगुल ट्रम्पेटवरच वाजवण्यात आला आहे. बियास्को यांचे वडील पीटर अँथोनी मोन्सोरेट यांनी ‘अजीब दास्ताँ है ये...’(संगीतकार ः शंकर-जयकिशन) या गाण्यात पहिल्या कडव्यापूर्वी ट्रम्पेट फार सुरेख वाजवलं आहे.
***
ट्रम्पेटपेक्षा मोठं ब्रासवाद्य म्हणजे हॉर्न. हॉर्नचा पाईप गोल आकारात वळवलेला असतो. यात जर्मन, रशियन, फ्रेंच हॉर्न आणि बरेच स्थानिक प्रकारही आहेत. ‘शोले’चं शीर्षकगीत फ्रेंच हॉर्ननंच सजलेलं आहे. ही गाजलेली धून हॉर्नसाठी पुन्हा पुन्हा ऐकावी अशी आहे. ‘आनंद’ सिनेमात समुद्रकिनाऱ्यावरून फिरताना राजेश खन्ना याच्या तोंडी असलेलं आणि मन्ना डे यांनी गायिलेलं ‘जिंदगी कैसी ये पहेली हाए’ हे गाणं ट्रम्पेटनंच सुरू होतं. ‘कभी देखो मन नही जागे, पीछे पीछे सपनों के भागे, इक दिन सपनों का राही, यूँ चला जाए अकेले कहाँ’ या अतिशय सुंदर शब्दरचनेवर राजेश खन्ना यानं मान मागं वळवत नेहमीच्या लकबी केल्या आहेत. त्या लकबींवर कितीतरी लोक लट्टू होते. मात्र, या गाण्यासाठी खरी दाद द्यायला हवी ती संगीतकार सलील चौधरी, गायक मन्ना डे आणि गीतकार योगेश यांना. सलील चौधरी यांनी हिंदी सिनेसंगीतात पाश्चात्य संगीतामधले बरेच ट्रेंड आणले. या गाण्याच्या कडव्यात ट्रम्पेट आणि कोरस यांचा अतिशय अप्रतिम वापर केला गेला आहे.
***
लहानपणी आपण जास्त प्रयोगशील असतो. तोंडावर हात ठेवून वेगवेगळ्या पद्धतीचे आवाज काढणं हा प्रकार बहुतेकांनी त्या वयात केलेला असतो. नंतर आपण मोठे होत जात असताना ‘कोण काय म्हणेल’, या भीतीमुळं आपले हे असे ‘प्रयोग’ हळूहळू बंद होतात. ट्रम्पेटवर हात ठेवून काढला तर वेगळा आवाज येतो. अशाच प्रयोगातून ‘म्यूट ट्रम्पेट’ हा प्रकार उदयास आला असावा. ट्रम्पेटच्या पुढं लावण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे म्यूट असतात. हे म्यूट लावल्यामुळं ट्रम्पेटच्या आवाजाचा वेगळाच परिणाम मिळतो. संगीतकार सचिनदेव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘चलती का नाम गाडी’ या सिनेमातल्या दोन गाण्यांमध्ये ट्रम्पेट वाजतं; पण त्याचा आवाज वेगवेगळा आहे. महाबळेश्वर इथं चित्रीकरण झालेल्या ‘हाल कैसा है जनाब का...’(गायक किशोरकुमार-गायिका आशा भोसले) या गाण्याच्या कडव्यात ट्रम्पेट वाजतं. ‘एक लडकी भीगीभागी सी’ या गाण्यात जो आवाज ऐकू येतो ते म्यूट ट्रम्पेट आहे. विशेष म्हणजे, याच गाण्यात किशोरकुमार म्यूट ट्रम्पेटचा ‘वॉ वॉ वॉ’ असा आवाजही काढतो. या गाण्याचं चित्रीकरण सांगीतिक अंगानं झालं आहे. म्हणजे असं की, गॅरेजमधल्या दुरुस्तीच्या अवजारांचा वापर करून किशोरकुमारनं वाद्यांच्या आवाजांची ओळख करून दिली आहे. हे सदाबहार गाणं कोणत्या प्रकारचं आहे, त्याबद्दल पुढच्या लेखात...
'सप्तरंग'मधील इतर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.