हेव्यादाव्यांनी साम्राज्य पोखरलं

मराठी माणसाने देशाचं नेतृत्व करावं, असं आपल्याला काही वर्षांपूर्वी वाटायचं. बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे लोक ते नेहमी बोलून दाखवायचे.
maharashtra politics
maharashtra politicssakal
Updated on

यशवंतरावांच्या नेतृत्वाने महाराष्ट्राने ज्या प्रकारे पंचायतराज विकसित केलं, देशात पहिल्यांदा एमआयडीसी बनवल्या किंवा वसंतराव नाईकांनी हरित क्रांती आणि शेतीसाठी जेवढं मोठं काम केलं, तसं भरीव काम आजकाल का होताना दिसत नाही? मराठी माणसं आपापसात अभिमानाने सांगतात, की शनिवार वाड्याचं एक दार दिल्लीवर नजर ठेवण्यासाठी होतं. प्रत्यक्षात आपसातल्या हेव्यादाव्यांनी आपलंच साम्राज्य गेलं.

मराठी माणसाने देशाचं नेतृत्व करावं, असं आपल्याला काही वर्षांपूर्वी वाटायचं. बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे लोक ते नेहमी बोलून दाखवायचे. अर्थात हे दुसरं कुणी करावं, असं त्यांना वाटायचं. प्रमोद महाजनांना ती संधी मिळेल, असं वाटत असताना त्यांचा दुर्दैवी शेवट झाला. शरद पवार, नितीन गडकरी यांना ती संधी हुलकावणी देत राहिली आणि आता अशी परिस्थिती आहे, की तसं कुणी नेतृत्वही दिसत नाही. वाईट वाटेल; पण मराठी माणसालाही ती अपेक्षा दिसत नाही.

नुसती अपेक्षा कशी ठेवणार? तसं नेतृत्व दिसायला नको? पण असं का झालं? सहकाराचा मार्ग देशाला दाखवणाऱ्या महाराष्ट्रातल्या नेत्यांमध्ये सहकाराची भावना का उरली नाही? संपूर्ण महाराष्ट्र एकदिलाने एखाद्या नेत्याच्या पाठीशी का उभा राहत नाही? रतन टाटा आणि अदाणींमध्ये जेवढा फरक वाटतो, तेवढाच यशवंतराव चव्हाण आणि आजच्या नेत्यांमध्ये वाटतो.

नुसतंच श्रीमंत आणि प्रसिद्ध. यांनी घडवलेली माणसं किती आहेत? महाराष्ट्रासाठी काय विचार आहे? यशवंतरावांच्या नेतृत्वाने महाराष्ट्राने ज्या प्रकारे पंचायतराज विकसित केलं, देशात पहिल्यांदा एमआयडीसी बनवल्या किंवा वसंतराव नाईकांनी हरित क्रांती आणि शेतीसाठी जेवढं मोठं काम केलं, तसं भरीव काम आजकाल का होताना दिसत नाही?

लोकमान्य टिळक म्हणाले होते, ‘प्राचीन काळी आमचे शास्त्रज्ञ स्वतंत्र संशोधन करीत; पण पुढे ते मागल्या शास्त्रज्ञांचे सिद्धान्तच खलीत बसले. त्यामुळे सर्व प्रगती थांबली.’ राजकारणात आज हेच होतंय. पूर्वी नेते गावोगाव फिरायचे. लोकांना भेटायचे. स्वतःची विचारसरणी असायची. आज फक्त ती पुण्याई वापरून राजकारण चालू आहे. शिवसेना सोडा, शेकाप किंवा कम्युनिस्ट तरी काय नवीन मुद्दे बोलतात? भाजप आणि काँग्रेस जे दिल्ली सांगेल ते बोलतात.

देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राष्ट्रीय नेता होण्याची क्षमता आहे; पण हिंद केसरी होण्याची ताकद असणाऱ्या पैलवानाने गल्लीतल्या पोरांना दंडातल्या बेटकुळ्या दाखवत फिरण्यात धन्यता मानावी तशी त्यांची अवस्था झालीय. राज्यातच एवढे शत्रू निर्माण करून ठेवलेत. एकनाथ शिंदे, अजित पवार यांना तर दिल्ली फक्त बुके घेऊन भेटायला जाण्यासाठीच वाटत असावी. मग मराठी माणसाने कुणाकडे बघायचं?

मराठी माणसं आपापसात अभिमानाने सांगतात की शनिवार वाड्याचं एक दार दिल्लीवर नजर ठेवण्यासाठी होतं. प्रत्यक्षात आपसातल्या हेव्यादाव्यांनी आपलंच साम्राज्य गेलं. त्याआधी देवगिरीच्या रामदेवरायाचा पराभव. शत्रू चालून आलाय हे कळायलाच उशीर लागला. मुंबईची गोष्ट घ्या. तिचं महत्त्व इंग्रजांनी ओळखलं. बरं मुंबई पोर्तुगिजांकडे होती. त्या काळी पोर्तुगालला डच लोकांची भीती. त्यांनी आक्रमण केलं तर आपलं काय? मग त्यांनी इंग्रजांशी तह केला.

तहाचा भाग म्हणून इंग्रज राजपुत्राला आपली मुलगी दिली. हुंडा म्हणून मुंबई दिली. इंग्रजांनी मुंबई घेऊन काय करावं? त्यांनी मुंबई इस्ट इंडिया कंपनीला दिली. मुंबईचं नेमकं काय करावं हे आजही आपल्या नेतृत्वाला कळलेलं नाही. केवळ आपली सत्ता यावी किंवा टिकावी म्हणून मुंबईचा कारभार दिल्लीच्या इशाऱ्यावर करतात. मुंबई आजही ठरावीक दोन-तीन कंपन्यांना भाड्याने दिल्यासारखीच आहे.

गोपाळकृष्ण गोखले आणि टिळक हे त्या काळचे राष्ट्रीय नेते; पण दुर्दैवाने दोघांचं फारसं जमलं नाही. गांधींनी गोखलेंचं शिष्यत्व पत्करलं. या दोघांनंतर सगळी काँग्रेस गांधींच्या ताब्यात गेली. महाराष्ट्र नेतृत्वात मागे पडला. आपण महाराष्ट्र पुरोगामी म्हणतो; पण महाराष्ट्रात खूप नव्या गोष्टींना विरोध झाला. छपाईला विरोध झाला, पुण्यात बस सुरू झाली तर चेष्टा झाली, लस घ्यायला विरोध झाला आणि या सगळ्या काळात आपल्याला कमी भासली ती कणखर नेत्यांची.

फार कशाला मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेलाही विरोध झाला होता, पण त्यावर हुशारीने तोडगा निघाला. गुजरातसाठी मोदी, बंगालसाठी ममता किंवा दिल्लीसाठी जसे केजरीवाल आहेत, तसं महाराष्ट्रासाठी कोण आहे? बाळासाहेब महाराष्ट्र आणि मराठी माणूस बोलायचे तेव्हा त्यांना सत्ता मिळाली नाही. त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा घेतला तेव्हा सत्तेत आले. आता राज ठाकरे तेच करताहेत. महाराष्ट्राला केवळ आपल्या प्रश्नांवर बोलणारा नेता नको असतो का? का नेते कमी पडतात?

प्रबोधनकार ठाकरे म्हणाले होते, अखिल महाराष्ट्राला आपलेपणाने पोटाशी धरून त्यांच्या नानाविध अडचणींचा आणि आकांक्षांचा कडव्या मऱ्हाठी बाण्याने समन्वय करणारा नेता आज कोणीच नाही. मऱ्हाठ्यांची जूट फोडण्याचे प्रयत्न गेली वीस वर्षे सारखे चालू आहेत.

महा-राष्ट्राचा मऱ्हाठा परप्रांतीयाचा सनातन गुलाम राहावा, त्याच्या श्रमाची भाकरी ऐन घासाच्या वेळी आपण गिळून गलेलठ्ठ व्हावे, त्यांच्यातल्या पुढाऱ्यांचा त्यांच्याच हातून पाणउतारा करवावा आणि त्याला आपणच आपल्या दादागिरीच्या सौभाग्यासाठी निव्वळ ओझ्याचा बैल म्हणून राबवावा अशा तऱ्हेच्या कारवाया आणि कारस्थाने आज उघड्या माथ्याने चालू असूनही महाराष्ट्राचे डोळे उघडू नयेत ही मोठ्या दिलगिरीची गोष्ट आहे.

आजही त्यांचा शब्द न शब्द लागू होतो. बडे गुलाम अली खां महाराष्ट्राचं कौतुक करताना म्हणाले होते, गानेवाले जगह जगह पर होते हैं, सुननेवाले सिर्फ महाराष्ट्र में होते हैं... पण याचा अर्थ आपण कायम ऐकणारे व्हायचं, असा नाही. दिल्लीचे तख्त राखणारेच व्हायचं, असं नाही. दिल्लीला सुनावताही आलं पाहिजे. प्रसंगी दिल्लीत राज्यही करता आलं पाहिजे.

(लेखक चित्रपट लेखक, गीतकार, दिग्दर्शक आणि ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाचे पत्रलेखक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.