भारतातील स्त्रीची दैन्यावस्था आणि मार्गारेट सँगर

Margaret-Sanger
Margaret-Sanger
Updated on

आपण भारतीय लोक कोणत्याही गोष्टीचे माकड करण्यात प्रविण आहोत. आज आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे. हा दिन मुळात का पाळला जातो? तर पुरुष प्रधान संस्कृतींमुळे निर्माण झालेले स्त्रियांचे प्रश्न सोडवण्यासाठी पावले उचलली जावीत म्हणून. पण आपण तो एखादा सण असावा तसा साजरा करुन त्याचे गांभीर्यच नाहीसे केलेले आहे .

स्त्रियांच्या मानवी हक्कांबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे माननीय न्यायमूर्ती ए.के. सिक्री यांनी एक विशिष्ट भूमिका मांडली होती. ''गर्भात काही दोष आहे का, हे पहाण्यासाठी सोनोग्राफी तंत्राचा वापर करायला हवा. पण आपण त्या तंत्रज्ञानाचा वापर स्त्री गर्भाची कत्तल करण्यासाठी करत आलो आहोत,'' असे ते म्हणाले होते. जेव्हा आपण देशातील जनतेच्या जनन हक्कांची ( Reproductive rights )चर्चा करतो तेव्हा एक लक्षात येते, की स्त्रियांना मुल हवे की नको हे ठरवण्याचाच हक्क आपण नाकारलेला आहे. भारतीय स्त्रियांना मानवी हक्कांची चवच चाखु देत नाहीत.

जनन हक्काचा उल्लेख करताना 19 व्या शतकातील प्रख्यात अमेरिकन लेखिका, जनन नियंत्रण कार्यकर्त्या, लैंगिक शिक्षणाच्या पुरस्कर्त्या, नर्स मार्गारेट सँगर यांचे नाव आठवल्याशिवाय रहात नाही. त्यांनीच जनन नियंत्रण (Birth control ) हा शब्द अमेरिकेत रुढ केला. त्या काळी युरोप आणि अमेरिकेत संतती नियमनाच्या साधनांअभावी अनेक स्त्रिया सततच्या बाळंतपणामुळे क्षयरोगाला बळी पडत. नकोसे गरोदरपण टाळण्यासाठी शास्त्रीय माहितीअभावी त्या गर्भपात करुन घेत आणि अतिरक्तस्त्रावानेही मृत्युमुखी पडत. त्या देशांत बालविवाह प्रचलित नव्हते, तरीही ही अवस्था तेथे होती. तेव्हा भारतासारख्या देशांत तर याविषयी बोलायलाच नको. सॅन्गर यांची आई 22 वर्षांत एकुण 18 वेळा गरोदर राहिली आणि तिची 11 अपत्ये जिवंत राहिली. मार्गारेट त्यांपैकी 6 वे अपत्य. अपत्यसंख्या जास्त असली की गरीबी येते, असलेल्या दारिद्रयात वाढ होते हे भारतात या आधुनिक काळातही अनेकांना अजुनही समजत नाही. पण मार्गारेट यांना ते समजत होते. त्या काळी अमेरिकेत कॉमस्टॉक कायद्याप्रमाणे संतती नियमनाबद्दल बोलणे, संततीनियमनाचा प्रचार करणे हे अश्‍लील समजले जात असे आणि त्यासाठी तुरुंगवासाची शिक्षा होती. मार्गारेट यांनी या विघातक कायद्याला न जुमानता संततीनियमनाच्या प्रचारासाठी प्रयत्न सुरु केले. त्यांना या कामात त्यांचा घटस्फोटित पहिला नवरा आणि दुसरा नवरा असे दोघेही मदत करत होते. त्यांच्यावर संततीनियमनाचा प्रचार करते म्हणुन खटला भरला गेला. त्या काळात त्या ब्रिटनमधे निघुन गेल्या. तेथे त्यांची भेट मुक्ततेचा सिध्दांत सांगणाऱ्या हॅवलॉक एलिस यांच्याबरोबर झाली. त्यामुळे स्त्रियांसाठी लैंगिक संबंध नुसते सुरक्षितच नाहीत; तर आनंददायकही झाले पाहिजेत हा नवा विचार मिळाला. 

याच काळात त्यांनी युरोपमधे संततीनियमनासाठी वापरात असलेल्या साधनांची माहिती करुन घेतली. त्यांनी त्यावर अनेक पुस्तकेही लिहिली. त्यांच्यावर खटला चालवला गेला तेव्हा त्या न्यायाधीशाने निर्णय दिला की लैंगिक संबंधातुन गरोदर रहायचे नाही, अशा प्रकारचे संरक्षण घेण्याचा अधिकार स्त्रियांना नाही. त्यांनी या निर्णयाविरुध्द अपिल केले. तेव्हा न्यायमुर्ती फ्रेडरिक इ.क्रेन यांनी निर्णय दिला की वैद्यकीय तज्ज्ञ संततीनियमनासाठी उपाय सुचवु शकतील. हा निर्णय म्हणजे मार्गारेट यांच्या विचारांचा विजय होता. त्यांना समाजातील श्रीमंतवर्गाकडुन या कामासाठी भरघोस आर्थिक मदतही झाली. याच काळात त्यांनी सुनियोजित पालकत्व ही संकल्पना रुढ केली. त्याच बरोबर त्या कमी गुणवत्तेचे (अपंग ,मतीमंद या सारख्या आरोग्याच्या समस्यांनी ग्रस्त असलेले मुल) मुल जन्माला येऊ नये या मताच्या पुरस्कर्त्या होत्या. जो पर्यंत स्त्रियांना नकोशा बाळंतपणातुन मुक्ती मिळत नाही तो पर्यंत समाजाचा आर्थिक स्तर उंचावणे अशक्‍य आहे हे त्यांना समजत होते. त्यांनी अमेरिकन बर्थ कंट्रोल लीगची स्थापना केली. या लीगची तत्वे आत्ताच्या काळातील बहुसंख्य भारतीयांना न मानवणारी आहेत; पण ती एका अर्थी अमेरिकन समाजाच्या उत्कर्षामागची कारणेच आहेत. ती तत्वे खालील प्रमाणे:

आम्ही असे गृहित धरतो की बालकांना :

  1. प्रेम मिळाले पाहिजे .
  2. आईची प्रामाणिक इच्छा असेल तरच मुल जन्माला आले पाहिजे .( भारतात 99.99 % अपत्यजन्म हे बाईवर लादलेले असतात .)
  3. जन्म देताना आरोग्यपुर्ण जीवनाची खात्री देता यायला हवी. तसे नसेल तर अपत्यजन्म टाळले पाहिजेत.

(सध्या आपल्या देशात आयोडिन मिठाची सरकारी जाहिरात उदाहरणार्थ पाहता येईल. गरोदर स्त्रीला मिठाच्या किंमतीची काळजी लागते. पण अपत्यजन्मानंतरच्या खर्चाचा मात्र कोठेही विचार केला जात नाही. सरकारनेच गरोदर स्त्रीला सकस आहार दिला पाहिजे, बाळंतपणाचा खर्च केला पाहिजे. सरकारी दवाखान्यात हेळसांड झाली की वाहिन्या बोंबा मारायला लागतात. कुपोषित बालके असु नयेत, हीदेखील सरकारचीच जबाबदारी. जरी कुपोषण असले तरी समाजसेवी म्हणवल्या जाणाऱ्या संस्था कुटुंब नियोजनाचा प्रचार करत नाहीत; पण सरकारच्या नावाने ओरडा सुरु करतात. कुटुंब नियोजनाचा प्रचार केला तर NGO चेच कुपोषण होईल ही सार्थ भिती त्या मागे आहे .)

मार्गारेट सँगर या डाव्या विचारसरणीच्या होत्या. पण भारतीय डावे कधी कुटुंब नियोजनाबद्दल बोललेले मला माहित नाही. सध्याच्या परिस्थितीत भारतातले प्रश्न म्हणजे मानवी जीवनाला गरजेचे असलेले नैसर्गिक स्त्रोत आटत चालले आहेत. काही पुर्ण आटले आहेत उदाहरणार्थ वाळुचे दुर्भिक्ष्य, पाण्याचे दुर्भिक्ष्य, स्वच्छ हवेचे दुर्भिक्ष्य, कचऱ्याचा पेटलेला प्रश्न असे असंख्य प्रश्न सुटणे अशक्‍य झाले आहे ते सतत वाढणाऱ्या लोकसंख्येने. त्यासाठी इथे अनेक मार्गारेट सँगर जन्माला यायची गरज आहे. भारतीय समाज हा अपत्यजन्माकडे ,त्यातही मुलगा जन्माला येण्याकडे पुर्णपणे स्वार्थी मनोवृत्तीतुन पहात आला आहे. त्यासाठी हा समाज अमानुषतेचा कळसही गाठतो. जर अपत्यजन्म हे म्हातारपणची सोय म्हणुन असतील, म्हणजेच देशाच्या कल्याणासाठी नसतील तर सरकारने त्यासाठी खर्च करणे म्हणजे 'आंधळं दळतय आणि कुत्रं पिठ खातयं' असेच आहे. एक अपत्य की दोन अपत्य हा इथे प्रश्न नसून, त्या जन्माला येणाऱ्या संततीला मानवी गरजेच्या वस्तु वैध मार्गाने आणि सहज मिळणार आहेत का, हा प्रश्न आहे. भारतात डावे अडकले आहेत ते जातीय आणि वर्गीय वाद उकरुन काढत. खरा प्रश्न आहे तो स्त्री-दास्य दूर करण्याचा. त्याकडे तथाकथित पुरोगाम्यांना लक्ष द्यायला वेळच नाही. मार्गारेट सँगरना अमेरिकन समाजाकडुन मिळालेला पाठिंबा पाहता इथेच भारतीय आणि पाश्‍चात्य समाजमनातील फरक स्पष्ट होतो.

टीप : मार्गरेट सँगर यांचे संततीनियमन हे निव्वळ स्त्रियांच्या आरोग्यासाठीच होते. मार्गारेटना गर्भपात मान्य नव्हता. गर्भधारणा टाळली जावी हाच त्यांचा दृष्टीकोन होता. त्यांची विचारसरणी पुर्णपणे नैतिक आणि दयाळु भावनेची होती. पण र.धो. कर्वेंचे संततीनियमन हे पुरुषांच्या अनैतिक वर्तनाला समर्थन देण्यासाठी होते. त्यामुळे मार्गारेट सँगरच खऱ्याखुऱ्या संततीनियमनासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्या होत्या, असे म्हणावेसे वाटते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.