हल्ली एक ओरड कायमच ऐकू येते, ती म्हणजे हल्लीच्या मुलींच्या अपेक्षाच फार... ही ओरड वधुसंशोधनासाठी बाहेर पडलेले वरपिते आणि मातांकडुन ऐकु येते. खरचं यात किती तथ्य आहे, त्याचा पंचनामा करणारा हा लेख .
सध्या ज्या जोडप्यांचे मुलगे लग्नाचे आहेत त्यांनी वयाची पन्नाशी गाठलेली असते. त्यांनी सध्याच्या मुलींबद्दल ओरड करण्यापुर्वी त्यांच्या विवाहावेळची, आणि त्याहीपुर्वी जे विवाह झाले त्यावेळची परिस्थिती आठवून पहावी. साधारण 40 वर्षांपुर्वी मुलींना विज्ञान शाखा जमणार नाही हे लोकांनी ठरवून टाकले होते. त्यामुळे काही अपवाद वगळता मुली कला , वाणिज्य किंवा गृहशास्त्र या शाखांतच शिक्षण घेताना दिसत. त्यातही "भाजीची पेंडी ताजी असते तो पर्यंतच तिला मागणी असते,' अशी मुक्ताफळे ऐकवणारे महापुरुष आपल्या मुलींना कॉलेजची जेमतेम एक-दोन वर्षे केल्यावर विवाहबंधनात अडकवून ठेवत. याशिवाय, बऱ्याचदा एक अजब तर्कट चाललेले असे. ते म्हणजे "धाकट्या बहिणींची लग्न व्हायला हवीत'. म्हणुन मोठीचे लग्न आटपून टाकले जाई. मग ती शिक्षणात हुशार असली तरी तिच्या मनाविरुध्द तिच्या गळ्यात विवाहाचे जोखड अडकविले जाई. विज्ञान शाखा आणि मेडिकल, अभियांत्रिकी हे प्रांत फक्त मुलांसाठीच राखीव होते. मुलींकडुन आजिबातच स्पर्धक न उतरल्याने कोठलेही मेषपात्र इंजिनिअर, डॉक्टर, फार्मसिस्ट म्हणुन मिरवताना दिसत असे. बायकांनी नोकरी करायची ती विधवा झाल्यावर संसाराचा गाडा ओढायला, नवरा बेजबाबदार निघाला म्हणून; किंवा संसाराला पैसा पुरेना झाला म्हणून. हा प्रकारच मुळात आग लागल्यावर विहीर खणण्याचा होता. त्यामुळे आर्थिक स्वातंत्र्यासाठी मुलींचे शिक्षण हे तत्त्वच मान्य नव्हते. आताच्या मानाने बेकारी बरीच कमी होती. त्यातही सुशिक्षित स्त्रीदेखील "रांधा , वाढा, उष्टी काढा' हेच तिचे कर्तव्य असल्याचे मनावर पुरते बिंबल्याने सक्षम असुनही नोकरीसाठी उमेदवार नसे. त्यामुळे स्त्रियांची बेकारी गृहीतकात धरलीच जात नसे ( जी आताही धरली जात नाही ). बॅंकेत भरपुर पगाराची नोकरी असलेली कारकुन मुलेदेखील लग्नाच्या बाजारात मिजाशीत असत. मग इंजिनिअर आणि डॉक्टर झालेल्यांची ऐट तर विचारुच नका.
आपल्या मुलीसाठी स्थळ बघायला आलेल्या मुलींच्या आईबापाला अत्यंत अपमानास्पद रीतीने वागवले जात असे. त्यांना बाहेरच्या खोलीत तासनतास बसवून, दुर्लक्षित केले जाई. एखादा जेता आपल्या मांडलिकाबरोबर जो व्यवहार करेल तोच व्यवहार वरपक्षाकडचे लोक मुलीच्या कुटूंबीयांशी करत. युध्दात जिंकण्यासाठी निदान काही शौर्य गाजवावे लागते. आपल्या जीवावर उदार होऊन लढावे लागते. पण इथे कुठलीही लढाई न करताच एक ठरलेला पक्ष दुसऱ्यापुढे गुडघे टेकुन असे. मग मुलगी पाहण्याचे कार्यक्रम होत. त्यावेळी मुलीला प्रकाशाच्या झोतात खालमानेने बसवले जाई. मग तिला अगदी बाळबोध स्वरुपाचे प्रश्न विचारले जात. कधीकधी तिला पहायला आलेला मुलगा (मला मुलीला दाखवणे आणि मुलगा पहायला येतो ही वाक्यरचनाच आवडत नाही. पण त्यावेळी मुली आणि गुरं यांच्यात काहीही फरक केला जात नव्हता, त्यामुळे मी इथे ती वाक्यरचना केली आहे ) आपल्या अतिशहाण्या मित्रांनाही बरोबर घेऊन आलेला असे. मग ते भोचक मित्र त्या मुलीला रोजच्या जगण्याला आवश्यक नसलेले काहीही प्रश्न विचारुन भंडावून सोडत. अमुक अमुक इमारतीच्या जिन्याला किती पायऱ्या आहेत असले निरर्थक प्रश्न विचारले जात. मुलाची आई सांगे, "आमच्या मुलींनी याला कडेवरुन खेळवले आहे. त्यांची हौसमौज झाली पाहिजे'. एकुणच हा प्रकार म्हणजे "आयजीच्या जीवावर बायजी उदार' आणि मुलींसाठी तोंड दाबुन बुक्क्यांचा मार असा होता. मुलीला भाऊ नसेल आणि तिच्या बापाची काही इस्टेट असेल, तर त्या इस्टेटीकडे डोळा ठेऊनही विवाह जमत. याशिवाय समजा मुलगा आणि मुलगी एकमेकाला पसंत असले तरी वधुपित्याला न परवडण्याइतक्या हुंड्याच्या मागणीमुळे ते लग्न जमत नसे. इथे मला गोपाळराव आगरकरांचे विचार आठवतात. ते म्हणत, "जे विवाह विवाहेच्छु मुलामुलींच्या आवडीनिवडीचा विचार न करता, त्यांच्या नातेवाईकांकडून ठरवले जातात ते विवाह दोघेही सज्ञान असले तरी बालविवाहच असतात'.
विवाहसंबंधातले अर्थकारण मुलींचे विवाह करण्यास अडचणीचे ठरत असत. पण त्याचवेळी एखाद्या मुलीने काही अटी घालायचा प्रयत्न केला तर तिला अतिशहाणे ठरवले जात असे. त्या अटी अवाजवी नसायच्या. पण त्या मुलीला असह्य टीका सहन करावी लागे. नमुना म्हणुन त्या अटी देते 1) माझी बहिण/भाऊ शिकत आहे. त्यामुळे तिच्या / त्याच्या शिक्षणासाठी मी माझ्या पगारातील निम्मा पगार माहेरी देणार
2) मला आर्थिक स्वातंत्र्य महत्वाचे वाटते, त्यामुळे मी नोकरी सोडणार नाही
3) नोंदणी पध्दतीने लग्न करणार. खर्च करुन लग्न करणार नाही
4) मी नोकरी करणार असल्याने नवऱ्यानेही माझ्याबरोबरीने घरकामाला हातभार लावला पाहिजे
5) माझे आईवडिल वृध्द आहेत. त्यांच्याकडे लक्ष देणे हे प्रत्येक बहिणीचे कर्तव्य आहे. त्यामुळे मी माझ्या आईवडिलांना संभाळणार...
नवऱ्याने घरात आपल्या बरोबरीने काम केले पाहिजे यासारख्या अटी घालायची वेळ येत असे; कारण घरकाम हे बायकांचेच हे अंगवळणी पडले होते (अजुनही फारसा फरक नाही). त्याच काळात गर्भजल चिकित्सा करुन स्त्रिगर्भ असला तर पाडायची एक नवी सोय (?) उपलब्ध झाली होती. त्यामुळे विवाहित स्त्रीसाठी हे एक नवेच संकट समोर उभे ठाकले होते. मुलगा होईपर्यंत गरोदरपण, गर्भपात ,पुन्हा गरोदरपण या चक्रात तिला अडकणे भाग पडले होते .
अजूनही सुनेने (आणि बायकोने) मुल हवे की नको हे ठरवण्याचा अधिकार मागितलेला चालत नाही. त्यामुळे सुनांवर मुल जन्माला घालायची जबरदस्तीच होते. काहीजण म्हणतात की मुल नको तर लग्न कशाला करायचे ? त्यांच्यासाठी माझे उत्तर आहे की कोणीही अपत्यजन्मासाठी लग्न करत नाही. तसे असते तर अपत्य झाल्यावर नसबंदीची शस्त्रक्रिया करायची गरजच पडली नसती. लोकांनी आपणहून ब्रह्मचर्याचे पालन केले असते. मग मुल झाल्यावर मात्र तिच्यामागे मुल (नातवंड) हवे म्हणुन भुणभुण लावणारे नवरा आणि आजी आजोबा ते मुल संभाळायची जबाबदारी झटकतानाही दिसतात. त्यातही ती नात असली तर हे दुर्लक्ष स्पष्टच दिसते. अशावेळी जर आपल्याला मिळालेल्या अप्रिय वागणुकीची प्रतिक्रिया म्हणुन सुनेने सासु सासऱ्यांबरोबर वाईट वर्तन केले तर ते चालवून घेतले पाहिजे. पण तसे होत नाही. या सर्व कटकटींतुन स्वत:ला कमीत कमी त्रास व्हावा असे वाटत असेल तर मुलींनी अटी घालुनच विवाह करावेत. मग त्यांच्या अपेक्षाच फार अशी कोणी कितीही कोल्हेकुई केली तरी त्याकडे साफ दुर्लक्ष करावे.
आता माझ्या दृष्टीने विवाह करताना मुलींनी काय करावे ते सांगते :
1) खर्च करुन डामडौलाने विवाह करणे टाळावे. काही जण म्हणतात की लग्न एकदाच होते. ते सध्याच्या काळात खरे नाही. लग्न करताना खर्च केला की घटस्फोट घ्यायची इच्छा झाली तरी तो खर्च डोळ्यापुढे नाचून हैराण करु शकतो. तसेच हा खर्च मुलींना इस्टेट द्यायची नाही, या जन्मदात्यांच्या विचारांना बळ देतो. सध्या स्त्रीभृणहत्येमुळे मुलींची संख्या कमी झालेली आहे. अशावेळी मुलींनी आपल्या अपेक्षा रेटण्याची एक चांगली संधी आहे ती दवडु नये .
2) नवऱ्याला स्पष्ट सांगावे की नसबंदीचे ऑपरेशन त्यालाच करावे लागेल. अपत्यसंगोपनासाठी (सध्याच्या तीव्र बेकारीच्या परिस्थितीत ) आपल्या करिअरचा बळी देऊ नये. ज्याला अपत्यजन्माचा सोस असतो त्यानेच अपत्यसंगोपनासाठी करिअरला तिलांजली द्यावी .
3) जर नवऱ्याचे आईवडिल आपल्याबरोबरच रहाणार असतील तर आपलेही आईवडिल आपल्याबरोबर राहतील हे स्पष्ट करावे. नाहीतर फक्त बायकोचे आईवडिल चालणार नाहीत ही मनोवृत्ती दिसते. ती आजिबात चालवून घेऊ नये .
4) नवरा आणि सासरचे काय मनोवृत्तीचे लोक आहेत हे समजण्यास बराच वेळ लागतो. थोड्या काळाच्या संपर्काने चांगले मत बनवू नये. स्वभावाचा बऱ्यापैकी अंदाज येईपर्यंत आर्थिक व्यवहार वेगळे ठेवावेत. त्याचबरोबर मुल जन्माला घालायचीही गडबड करु नये. एकदा मुल जन्माला घातले की बाईची परिस्थिती अवघड होते. तिला नकोशा तडजोडी करत जगावे लागते.
5) लग्न करताना स्पष्ट करावे की; आपण एक स्वतंत्र व्यक्ती म्हणुन त्याच्या बरोबर येत आहोत. त्याची सेवक म्हणून नाही .
6) महत्वाचे : काही जोडपी आपला विवाहाचा खर्च वाचवून तो सामाजिक काम करणाऱ्या संस्थांना देतात . मी सांगेन की तसे काहीही न करता तो पैसा स्वत:च्या संसारासाठी ठेवावा. समाजकार्य करतो असे म्हणणारे पुढारी कुटूंब नियोजनाचा प्रचार न करता समाजात गरिबी वाढु देतात . ते "गरीबांचे मसीहा' त्यांचे ते समाजसेवेचे नाटक चालु ठेवू देत. आपण त्यासाठी त्याग करायची गरज नाही. शेवटी दान करताना ते सत्पात्री असावे. पोरवडा वाढवुन आलेल्या गरिबीला कोणीही पुरे पडणार नाही हे लक्षात घ्यावे आणि भावनेच्या भरात आपला पैसा वाया घालवु नये .
भारतीय समाज कुटूंब व्यवस्थेचे आणि विवाहसंस्थेचे कितीही गोडवे गात असला तरी ही विवाहसंस्था फक्त आणि फक्त आर्थिक व्यवहारांवरच उभी आहे. त्याला उगाच गोंडस रुप देऊ नये आणि त्या प्रचाराला मुलींनी बळी पडु नये. तेव्हा ज्या देशात विवाहसंबंध आर्थिक व्यवहारावर ठरतात आणि अपत्याकडे फायदा-तोटा या व्यापारी मनोवृत्तीनेच पाहिले जाते; त्या देशात भ्रष्टाचार बोकाळणारच. लोकांनी राजकारण्यांना दोष देण्याऐवजी स्वत:त सुधारणा करावी हे उत्तम...
|