- मिहिर गोडबोले mihirgodbole@gmail.com
निसर्गाच्या अजब कार्यपद्धतीचं मला नवल वाटत राहिलं. पूर्वीचे शिकारी निसर्गाचं वर्णन करत, तसे हे रक्तलाल दाता-तोंडाचे किंवा तसलीच लालभडक नखं असलेले क्रूर प्राणी नव्हते. हे तर परिस्थितीशी छानपैकी जुळवून घेणारे, समाधानी जीव होते. या जगात आमच्यापेक्षा कितीतरी अगोदरपासूनच त्यांची मालकी वहिवाट असल्यानं जगाशी मस्त मिळून-मिसळून ते अगदी निवांत जगत होते.
भोवतालच्या विरळ परिसरावर मी सर्वदूर नजर टाकली. समोर पसरलेल्या गवताच्या विस्तीर्ण पट्ट्यांवर डौलदार चिंकारांचा एक छोटासा कळप, मानेवर काळा पट्टा असलेला एक चुकार ससा आणि सकाळच्या शिकारीला निघालेली मुंगसाची एक जोडी माझ्या नजरेस पडली. सन २००८ मध्ये पुण्यापासून चाळीसेक किलोमीटर दक्षिणेला असलेल्या दिवेघाटात मी गेलो होतो. तऱ्हेतऱ्हेच्या पक्ष्यांसाठी दिवेघाट प्रसिद्ध आहे. हिवाळा सुरू होता. स्टोनचॅट्स, व्हीटइअर्स अशा स्थलांतरित पक्ष्यांपासून ते आपल्या खाटीक, तीतर आणि धाविक यांसारख्या अनेक स्थानिक पक्ष्यांची दिवेघाटाच्या लौकिकाला साजेशीच गर्दी तिथं जमली होती.
जणू वन्यजीवांनी भरलेल्या एखाद्या अभयारण्यातच आम्ही शिरलो होतो. धूळ उडवणारा एक कच्चा रस्ता चढ-उतारांनी भरलेल्या उंच-सखल प्रदेशातून चालत चालत आम्ही एका टेकडीवरच्या गवताळ पठारावर पोहोचलो.
समोरचं दृश्य पाहताच दिङ्मूढ होऊन मी जागच्या जागीच ब्रेक दाबला. पाच लांडग्यांचा एक कळप सकाळचं कोवळं ऊन्ह खात मजेत पहुडला होता. माझी गाडी मी थोडी पुढं घेऊ लागलो तरी ते बारकाईनं सारे न्याहाळत राहिले. जराही विचलित झालेले नव्हते ते; परंतु अत्यंत सावध होते. सुरक्षित अंतरावर थांबून दिवसातील काही क्षण लांडग्यांच्या कळपाबरोबर घालवण्याचा अविस्मरणीय अनुभव माझ्या वाट्याला आला.
विश्रांतीचा आनंद लुटत असलेल्या, जिभेनं किंवा नाकानं एकमेकांना घासत स्वच्छ करत बसलेल्या, मधूनच जरा अधिकच जवळ येऊ पाहणाऱ्या मोकाट कुत्र्याला हुसकावणाऱ्या त्या लांडग्यांना मी पाहतच बसलो.
सूर्य कलू लागताच हा कळप टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या धनगरांच्या वस्तीकडे वळला. कुतूहलापोटी मी त्यांच्या मागून निघालो खरा; पण तेवढ्यात ते त्यांच्या ओळखीच्या रानात दिसेनासे झाले. मग मी तिथल्या धनगरांबरोबर खूप गप्पा मारल्या. हे धनगर या लांडग्यांबरोबरच या परिसरात वर्षानुवर्षं राहत होते, असं मला त्या गप्पांतून कळलं. परस्परसहिष्णुता, स्वीकार आणि विश्वास यांच्या आधारावर पूर्वापार उभं राहिलेलं ते जुनं, मुरलेलं नातं होतं. गेल्या काही वर्षांत या प्रदेशातील वन्यजीवनाचं मी बरंच दस्तावेजीकरण केलं आहे. गवताळ प्रदेश हा बहुधा भारतीय उपखंडातील सर्वात कमी जाणून घेतला गेलेला, सर्वात कमी महत्त्व दिला गेलेला नैसर्गिक अधिवास असावा. या प्रदेशाच्या संरक्षणार्थ झटणं हे मी माझं जीवितकार्य मानलं आहे.
अंतरात्म्याच्या या उर्मीपायीच सन २०१९ मध्ये माझ्या हातून ‘ग्रासलँड ट्रस्ट’ची (गवताळ प्रदेश विश्वस्त निधी) स्थापना झाली. गवताळ प्रदेशावर अवलंबून असणाऱ्या लोकसमूहांकडूनच शिकत शिकत त्यांचं कल्याण साधणं आणि हा प्रदेश आणि त्याचं मूल्य यांची सर्वाधिक जाण असलेल्या स्थानिक समूहांच्याच सहभागानं इथल्या परिसंस्थेचं (पर्यावरणव्यवस्थेचं) संरक्षण करणं हे या ट्रस्टचं उद्दिष्ट आहे.
सध्या हा ग्रासलँड ट्रस्ट वनखात्याच्या सहकार्यानं काही प्रकल्पांसंदर्भात काम करत आहे. जैवविविधता, गवताळ प्रदेशातील परिसंस्थेच्या संरक्षणाचं महत्त्व, तसंच या अधिवासांत यापुढं चर काढणं आणि अनावश्यक वनीकरण थांबवणं याविषयी प्रशिक्षणसत्रे ट्रस्टतर्फे आयोजित केली जातात. या अधिवासांच्या सीमेजवळ राहणाऱ्या नागरी आणि अर्धनागरी जनतेसाठी जाणीवजागृती सत्रेही आयोजिली जातात. वन्यप्राण्यांचा अधिवास जवळच असल्यानं या लोकांना तिथल्या शिकारीप्राण्यांच्या त्रासाला तोंड द्यावं लागतं.
‘ग्रासलॅंड ट्रस्ट’ हा रहिवासी-शेतकरी-धनगरांना त्यांच्या परिसरातील जैवविविधता किती महत्त्वाची आहे याचा नेटका परिचय करून देतो. त्यांच्या मनात त्याविषयी अभिमान जागृत करून ही परिसंस्था आणि वन्यजीवन -विशेषतः ज्यांना ते मान देतात; पण त्यांचा जीव धोक्यातही आणतात असे प्राणी - जतन करण्याची प्रबळ इच्छा निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. पाळीव प्राण्यांची वन्यप्राण्यांकडून हत्या झाल्यावर मिळणारा मोबदला त्वरेनं मिळावा यासाठी आम्ही मदत करतो. सौरशक्तीवर चालणारे दिवे त्यांना पुरवतो. बदला घेण्याच्या भावनेनं होणाऱ्या वन्यप्राण्यांच्या हत्या थांबतील किंवा कमी होतील या स्वरूपाचे शाश्वत उपजीविकेचे पर्यायी मार्ग आम्ही त्यांना पुरवतो. ते मार्ग त्यांच्या परंपरेला साजेसे असावेत अशीही दक्षता घेतो.
अधिकाधिक लोकांपर्यंत संदेश पोहोचावा यासाठी गवताळ प्रदेशाचे महत्त्व हा विषयावर पर्यावरणरक्षणविषयक चित्रपटांच्या निर्मितीसाठीही आम्ही कार्यरत आहोत. पुणे जिल्ह्यात प्राण्यांच्या शरीरात जीपीएस कॉलर बसवण्याच्या संशोधनप्रकल्पालाही आमच्या टीमनं साह्य केलं आहे. यामुळे संबंधित प्राण्यांच्या सर्व हालचाली आपल्याला कळू शकतील.
यापुढील संरक्षणनीती आखण्यास त्याचा खूप उपयोग होईल. ‘वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ आणि ‘अशोका ट्रस्ट’ यांच्या वतीनं परिसरविज्ञान आणि पर्यावरण यासंबंधीच्या संशोधनार्थ हा प्रकल्प राबवला जात आहे.
खालच्या स्तरावरून वर येणाऱ्या अशा पद्धती महत्त्वाच्या आहेतच. तथापि, पायाभूत संरचना म्हणून गवताळ प्रदेशाचं स्थान जाणून त्याला मान्यता देणं, त्याचं संरक्षण करणं आणि पुनर्स्थापन करणं यासाठी राष्ट्रीय केंद्र-राज्यधोरण आखून उच्च स्तरावर पुढाकार घेण्यावाचून आता पर्याय उरलेला नाही. सध्या असे बरेच गवताळ प्रदेश ‘नापीक जमीन’ या श्रेणीत टाकले गेलेले आहेत. याद्वारे त्यांचं रूपांतर शेतजमिनीत, नागरी विकासक्षेत्रात आणि दुःखाचं म्हणजे, नव्या वनीकरण प्रकल्पात करायला मुक्तद्वार ठेवलं आहे.
नवं वनीकरण म्हणजे फायद्यापेक्षा तोटाच जास्त करण्यात करदात्यांचा पैसा वाया घालवणं होय. गवताळ प्रदेशांना त्यांच्या हक्काचा योग्य तो सन्मान देणारं कडक धोरणच गैरव्यस्थापनाला आळा घालू शकेल. अशा कडक धोरणामुळे या प्रदेशातील लोकांच्या पाळीव जनावरांसाठी कायमचा चारापुरवठा उपलब्ध होऊन त्यांच्या उपजीविकेला साह्य होईल. सुयोग्य व्यवस्थापन केलं तर तिथं पक्षीनिरीक्षक अधिक प्रमाणात येऊ लागतील. भविष्योन्मुख असा हा पुनर्निर्मित परिसर पाहण्यासाठी इतर निसर्गप्रेमीही आकृष्ट होतील. रहिवाशांच्या उत्पन्नात त्यामुळे भरच पडेल.
दिवेघाटातील लांडग्यांचा तो कळप आणि भारतीय उपखंडातील एकंदर वन्यजीवन हा गवताळ प्रदेशातील रहिवाशांच्या उपजीविकेचा स्रोत आणि अभिमानाचा विषय ठरेल. मी त्या दिवसाची आतुरतेनं वाट पाहत आहे. कौतुकाला पारख्या असूनही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या गवताळ प्रदेशातील परिसंस्था पृथ्वीवरील अवघ्या जीवनाच्याच अस्तित्वाची गुरुकिल्ली हातात बाळगून आहेत.
(लेखक ‘ग्रासलँड ट्रस्ट’चे संस्थापक असून, पुणे जिल्ह्यातील गवताळ प्रदेशातील जैववैविध्य कस जतन होईल यासाठी प्रयत्नशील आहेत.)
(अनुवाद : अनंत घोटगाळकर)
anant.ghotgalkar@gmail.com
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.