बिनीचे कार्यकर्ते

प्रकाश आणि विनायक हे वयम् चळवळीचे पहिले पूर्णवेळ कार्यकर्ते. माहिती अधिकाराचा आम्ही पहिल्यांदाच वापर केला, तेव्हा या दोघांनीच ते अर्ज दाखल केले.
बिनीचे कार्यकर्ते
Updated on
Summary

प्रकाश आणि विनायक हे वयम् चळवळीचे पहिले पूर्णवेळ कार्यकर्ते. माहिती अधिकाराचा आम्ही पहिल्यांदाच वापर केला, तेव्हा या दोघांनीच ते अर्ज दाखल केले.

प्रकाश आणि विनायक हे वयम् चळवळीचे पहिले पूर्णवेळ कार्यकर्ते. माहिती अधिकाराचा आम्ही पहिल्यांदाच वापर केला, तेव्हा या दोघांनीच ते अर्ज दाखल केले. त्यात आम्ही इतक्या प्रकारची माहिती मागितली की त्या खात्याशी संबंधित लोकांनी या दोघांवर दबाव आणला. प्रकाशला धमक्या मिळाल्या आणि विनायकला धमकीबरोबर प्रलोभनही दाखवून झाले, पण तात्पुरत्या माघारीनंतर काम पुन्हा सुरू झाले...

दापटी हे जव्हार तालुक्यातले एक पाणीटंचाईने ग्रस्त गाव! विनायक या गावातला एक धडपड्या युवक. आई-वडिलांचा आधार लवकर हरपल्यानंतर अनेकांची मदत घेऊन, कष्ट सोसून बारावीपर्यंत शिक्षण त्याने पूर्ण केले. मग वस्तीशाळा योजनेत, एकल विद्यालय योजनेत गावातल्या शाळाबाह्य मुलांना शिकवण्याचे काम त्याने मिळवले. त्यातून त्याचे सामाजिक वर्तुळ विस्तारत गेले. मैत्री जोडणं स्वभावातच असल्यामुळे अनेक गावांमधले समानशील युवक विनायकचे मित्र झाले. गावात योग्य सरकारी सेवा मिळत नाही म्हणून उपोषणाला तो बसला तेव्हा अनेक जणांचा पाठिंबा त्याला मिळाला.

पोटापाण्याची भ्रांत लहानपणी अनुभवल्यामुळे त्याला कोणाचेही तसे हाल होताना दिसले तर तो गलबलून जात असे. अन्याय सोडवण्यासाठी त्याने एक संघटनाही स्थापन करण्याचा प्रयत्न केला. याच काळात आम्ही जव्हारमध्ये भेटलो. दीपाली आणि मी अनेक प्रकारच्या कामांचा अनुभव घेत घेत जव्हारमध्ये आलो होतो. गावाच्या आंतरिक शक्तीवर आधारित विकासाची स्वयंस्फूर्त घडण असेल असं काम करायचं, अशी पुसट कल्पना तेव्हा मनात होती. पण काय-कसं-कुठं या बाबतीत चाचपडणं चालू होतं. तेव्हा विनायक वारंवार भेटून आम्हाला आग्रह करी. इथेच काम करा. आम्हाला सांगा काय करायचं, आम्ही करू.

गावोगावी पायी फिरून वन हक्कांबाबत लोकांना माहिती देऊ, लोकांचे काय म्हणणे आहे ते ऐकू, असे ठरवून आम्ही १२ दिवस १२ गावे पायी हिंडलो. तेव्हा आमच्याबरोबर फुकट अशी हिंड-फिर कोण करणार? त्यामुळे मी प्रकाशला विचारलं. प्रकाश कोगदे-पाटीलपाडा गावचा. त्याने दहावीनंतर शाळेला रामराम ठोकला होता. घरी त्या वेळी तोच जास्त शिकलेला होता. अनौपचारिक शिक्षण चळवळीच्या कामात मी असताना त्याची गाठभेट झाली होती आणि पुढे अनेक वर्षे तो त्या चळवळीच्या कामात राहिला होता. त्यामुळे आमची जुनी मैत्री होती. खिसा रिकामा ठेवून, चपला न घालता काही दिवस केवळ लोकाश्रयावर जगायचे, अशा माझ्या प्रयोगातही तो सामील झाला होता. त्यामुळे आताही समाजासाठी हिंडायचे म्हटल्यावर त्याने मानधन किती, असे विचारले नाही. प्रकाश १० दिवस हिंडायला तयार होता, काही दिवस जगन्नाथ बरोबर राहणार होता आणि काही दिवस विनायक.

पुढे प्रकाश आणि विनायक हे वयम् चळवळीचे पहिले पूर्णवेळ कार्यकर्ते झाले. माहिती अधिकाराचा आम्ही पहिल्यांदाच वापर केला, तेव्हा या दोघांनीच ते अर्ज दाखल केले. त्यात आम्ही इतक्या प्रकारची माहिती मागितली की त्या खात्याशी संबंधित लोकांनी या दोघांवर दबाव आणला. प्रकाशला धमक्या मिळाल्या आणि विनायकला धमकीबरोबर प्रलोभनही दाखवून झाले. त्या वेळी आमच्या पाठी ना लोकांचे बळ होते ना कायद्याचा पुरेसा अभ्यास होता. त्यामुळे आम्ही माघार घेतली, पण माघारीनंतर येणारी खुमखुमी स्वस्थ बसू देईना. त्यामुळे त्यानंतर काही महिन्यांनी त्यातल्या काही बाबी कमी करून एकाच विषयातली माहिती आम्ही पुन्हा एकदा मागितली.

या वेळी एक अर्ज माझ्या नावाचा आणि एकेक या दोघांचा होता. विषय वेगवेगळे होते. त्याच सोबत पुण्यातून जव्हारला आलेला एक मित्र प्रियदर्शन सहस्रबुद्धे याने इंटरनेटवरून रोजगार हमीची माहिती काढायला आम्हाला शिकवले होते. पुढे प्रियदर्शनने त्याच्या पहिल्या कमाईतून वयम्‌ला एक लॅपटॉप भेट दिला. इंटरनेटवरची माहिती सांगत होती की मजुरांना पन्नास हजार मजुरी दिली आणि प्रत्यक्ष मजुरांना विचारले तर त्याच्या एक तृतीयांश आकडे येत होते. या माहितीचे प्रिंट काढून विनायकने आणि प्रकाशने आपापल्या गावातल्या दहा लोकांना वाटून टाकले. बातमी अशीच पसरू दिली. पुन्हा त्या खात्याच्या लोकांनी दबाव आणायचा प्रयत्न केल्यावर गावातले दहा लोक भांडायला आले.

आमची मजुरी कुठे गेली बोला, पहिले ती मजुरी द्या, मग गावात या... असे तावातावाने लोक बोलू लागले. आपल्यावर अन्याय झाला, आपल्या वाट्याचे कुणी तरी खाल्ले... असे कळले की लोक कसे रगेवर येतात, हे आम्हाला पहिल्यांदाच कळत होते. तेव्हा एकट्या विनायकवर दबाव टाकून उपयोग नाही, हे त्या खात्यालाही कळले आणि मग त्यांनी चक्क मांडवली केली. विनायक म्हणाला, माझ्याशी एकट्याशी तडजोड करून उपयोग नाही. गावासमोर दहा लोकांसमोरच बोलणे झाले पाहिजे. लोकांनी माहितीच्या प्रिंट त्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या हातात देण्याच्या बदल्यात दोन बंधारे आणि त्या बंधाऱ्यांचे रेती-खडी पुरवठ्यासकट सगळे काम मिळवले.

आता हे नेतृत्व गावाच्या पलीकडे जायला तयार झाले होते. वेगवेगळ्या गावांमध्ये हिंडणे, आपला अनुभव सांगणे आणि तुम्ही कायदा शिका, फायदा मिळवा, असे कमालीच्या आत्मविश्वासाने हे बोलू लागले. हातेरी, आक्रे, दापटी अशा तीन-चार गावांपलीकडे काम पसरू लागले. लोकांना कळू लागले, तसतसे लोक पंचायतीत आणि इतर कचेऱ्यांमध्ये जाऊन प्रश्न विचारू लागले. वन हक्कांसाठी माहिती अधिकार कायदा प्रचंड संख्येत वापरण्याचा विक्रम चळवळीने २०१३ मध्ये केला. माहिती आयुक्तांचा आदेश लोकांपर्यंत पोचावा, यासाठी ‘लोकशाही विजय यात्रा’ चळवळीने काढली. एकूण ही चळवळ वाढते आहे, हे राजकारण्यांना कळायला वेळ लागला नाही. हे विनायक, प्रकाश गावोगावी जाऊन लोकांना भडकवतात, असा प्रचार सुरू झाला. तो कोण मुंबईहून आलेला मिलिंद त्यांना अक्कल शिकवतो, अशी फोडणीही त्यासोबत होतीच.

तोपर्यंत वयम् चळवळीत काहीही पदे नव्हती. सर्वांचे पद एकच- कार्यकर्ता! आक्रे गावातल्या एका कार्यकर्त्याला त्याची भाषा ऐकून तेव्हाच्या बीडीओंनी त्याला विचारले होते, ‘‘तुला कोणी शिकवला हा शहाणपणा? कोण आहे तुमचा प्रमुख नेता?’’ त्यावर त्या कार्यकर्त्याने सांगितले, ‘‘मीच आहे प्रमुख आणि मी भारतीय नागरिक आहे, मला हा शहाणपणा घटनेनेच शिकवला आहे.’’ पुढे पुढे असं बोलतो म्हणजे हा वयम्‌वाला आहे असं नोकरशाही ओळखू लागली.

चळवळीने केलेल्या जागरणामुळे ज्या स्थानिक छोट्या राजकारण्यांना पोटदुखी होऊ लागली होती, त्यांना अस्मितावाद्यांनी एक कोलित दिले. आम्ही बोलतानाचे काही व्हिडीओ कापून संदर्भ तोडून ते व्हॉट्सअपवर व्हायरल केले आणि हा कसला तरी अपमान आहे वगैरे सुरू झाले. तेव्हा पोलिस ठाण्यात आम्हाला घेरून खोट्या केसेस टाकण्याचे प्रयत्न झाले. आमच्या जातींवर बोट ठेवून आरोप झाले. त्यावेळी स्वप्नील आणि रवींद्र हे दोन पुणे आणि गडचिरोली जिल्ह्यातून आलेले कार्यकर्तेही आमच्या टीममध्ये होते. विनायक, प्रकाश, अनिल यांनी तेव्हा छातीचा कोट केला होता. जेव्हा जेव्हा जातीयवादी आमच्या चळवळीवर धावून आले, तेव्हा तेव्हा यांनी तो हल्ला परतवला. विनायक तर त्यांना म्हणे, ‘आम्ही सारे एका ताटात जेवतो. आमच्या देवाला जसा आम्ही नैवेद्य दाखवतो तसाच हेही दाखवतात. आमची साऱ्यांची जात एकच आहे, आम्ही सारेच आदिवासी आहोत.’

चळवळीला काही औपचारिक रचना हवी, असा विचार या आरोप-चिखलफेकीच्या काळात सुरू झाला, मग चळवळीची एक कार्यकारिणी तयार झाली. आणि त्या कार्यकारिणीने अध्यक्ष म्हणून विनायक थाळकर यांची, तर कार्यवाह म्हणून प्रकाश बरफ यांची निवड केली. आज हे दोघेही वयम्‌चे प्रमुख कार्यकर्ते म्हणून जिल्ह्यात सर्वत्र माहीत आहेत.

(लेखक वयम् चळवळीचे विश्वस्त आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.