वयम् चळवळीसाठी कुणालाही मुलींना बोलावून आणावे लागले नाही. त्या कुठल्यातरी एका टप्प्यावर आमच्याशी कनेक्ट झाल्या आणि काम करू लागल्या. त्यातली जयश्री एका फेलोशिपद्वारे ‘वयम्’च्या संपर्कात आली. दुसरी गायत्री. सुरुवातीला जंगल, जंगलात वावरणारी माणसं, पर्यावरण रक्षण या बाबतीत तिला ढीगभर प्रश्न पडले होते. तिसरी प्रेमा आणि चौथी निवेदिता. या चार मुलींनी वयम् चळवळीला चार चाँद लावले, त्यांची ही गोष्ट...
खर्डी गावातून नदी ओलांडून खरपडपाड्यात जाणं सोयीचं पडतं. दुसरी वाट आहे ती दाभोशातून डोंगर ओलांडून येण्याची. त्यापेक्षा खर्डीत दुचाकी ठेवायची आणि नदी ओलांडून खरपडपाड्यात जायचं. दोन-तीन वर्षे संघर्ष करून खरपडपाड्याला आता रस्ता झाला आहे. खरपडपाड्यात सहसा जाताना त्यातल्या त्यात उथळ पाणी बघून, शक्यतो कपडे कोरडे राहतील अशी काळजी घेत आम्ही जायचो. पण तसं न करता खोल पाण्यातून पोहत जायचा मार्ग निवडणारी जयश्री.
दोन्ही काठांवरच्या शाळकरी पोरांशी तिची दोस्ती असल्यामुळे तेही तिच्याबरोबर जायचे. निसर्गवासात सहज होणारं शिक्षण हे जयश्रीने या पोरांबरोबर अनुभवलं. ही मुलगी मूळची मुंबईतली. आर्किटेक्ट झाल्यानंतर तिला सरळ आरसीसीच्या जंगलात शिरायचा मार्ग होता, पण ती इकडे वळली. एका फेलोशिपद्वारे ‘वयम्’च्या संपर्कात आली. एक वर्ष तिने आमच्यासोबत काम केलं आणि मग जगाचा अनुभव घ्यायला बाहेर पडली. तीन वर्षांनी जयश्री पुन्हा वयम् चळवळीत आली आणि शालेय विद्यार्थ्यांबरोबरच काम करायचंय असं ठरवून आली. भिंतीबाहेरचं शिक्षण आणि भिंतीतलं शिक्षण यांची सांगड घालायचे प्रयोग वयम् चळवळीने आधीही केले होतेच. आता एक पूर्णवेळ कार्यकर्ती आहे म्हटल्यावर धडपड प्रयोगशाळा आणि उकल अशा दोन प्रकल्पांची संकल्पना आणि आखणी आम्ही केली.
ज्या मुलांना शाळेतल्या चौकटीत ‘ढ’ मानलं जातं आणि जी मुलं कंटाळून शाळेच्या बाहेर राहू लागतात, ती मुलं धडपड प्रयोगशाळेच्या सत्रांना आत येत. पक्ष्यांच्या माहितीचा कोश मुलांनी लिहिला. या प्रसंगांचा जयश्रीला इतका आनंद होत असे, की तिच्या डायरीत असे अनुभव कोरले जात. मुलांच्या मजेत सामील होणं, त्यांनी रूढ शिष्ट कल्पनांपेक्षा वेगळंच काहीतरी मांडलेलं नीट उकलता येणं, हे जयश्रीला छान जमलं होतं. कामाचं ध्येय हा व्यक्तीचाही ध्यास झाला तर छान काम होतं. जयश्री तशी समरस झाली. हे काम करतानाच जयश्रीला तिच्या आयुष्याचा सूर सापडला. मुलांसाठी चित्रं काढण्याचा. आता तिने तेच करिअर करायचे ठरवले आहे आणि मुंबईत राहून अनेक संस्था-प्रकाशनांबरोबर तिचे हे काम चालू आहे.
१२-१३ वर्षांपूर्वी असेल. आपलं पर्यावरण या मासिकातून बोलतेय, म्हणून गायत्रीचा फोन आला. जंगल, जंगलात वावरणारी माणसं, पर्यावरण रक्षण या बाबतीत तिला ढीगभर प्रश्न पडले होते. हे प्रश्न नेहमीच्या शहरी पर्यावरणप्रेमींना पडत नाहीत. हे पाणी वेगळं होतं. मग एकदा ती जव्हारला आली आणि तिला पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं वयम् चळवळीत सापडताहेत असं तिला वाटू लागलं. जमेल तितके वेळा जव्हारला यायचं आणि जमेल तितकं ते काम करायचं असं तिने तेव्हाच सुरू केलं.
मधल्या काळात तिने सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय जैवविविधता मंडळात काम केले. लोकसहभाग हे असे मर्यादित वेळात उरकण्याचे काम नाही आणि शासनाच्या अजेंड्यावर लोकसहभाग होत नसतोय, हे तिला तिथे अनुभवता आले. ‘वयम्’च्या शैक्षणिक उपक्रमांत तिचा सतत स्वयंसेवी सहभाग होता. पुन्हा येणे-जाणे वाढले आणि त्याच सुमारास सामूहिक वन हक्क मिळालेल्या आणि जंगल सांभाळायला उत्सुक अशा दहा गावांमध्ये ‘जंगल जीविका अध्ययन’ हा प्रकल्प करायचे ठरले. गायत्रीने या प्रकल्पाची धुरा स्वीकारली आणि तीही पूर्णवेळ टोळीत सहभागी झाली.
जंगलाबद्दल कोणी काही बोलायला लागले की, लोक हळूच त्या माणसाची परीक्षा घेतात. एखादे झाड दाखवून त्याबद्दल आपल्याला काही माहीतच नाही असे दाखवून विचारतात. गायत्रीने अशा परीक्षाही पास केल्या होत्या. मघा म्हटले तसे संघटनेचे ध्येय आणि तिचा ध्यास हे पूर्ण एकरूप झाले होते.
अडीच वर्षे हे काम पूर्ण करून गायत्री ओक आता डोंबिवलीत राहून पीएचडी आणि अशीच काही जंगलवाली कामं करते आहे. जशा या दोघी, तशाच चळवळीच्या हक्क जागरण कामात असलेल्या दोघी म्हणजे प्रेमा आणि निवेदिता. प्रेमा नाशिकला एमएसडब्ल्यू करून परत जव्हारमधल्या तिच्या मूळ गावी आली होती. तिला चाचणी म्हणून काही गावांतल्या महिलांना एकत्र आणून रानभाजी महोत्सव घ्यायला सांगितले, तो तिने यशस्वी करून दाखवला आणि मग ती पूर्णवेळ कार्यकर्ती म्हणून पुढे तीन वर्षे राहिली.
सदा हसतमुख, सौम्य बोलणं, शिडशिडीत उंच अंगकाठी, अशी ही मुलगी चळवळीसाठी गावातल्या राजकीय पुढाऱ्यांशी भांडायची वेळ आली तर ओढणी कमरेला खेचून वाघीण व्हायची! पायाला झालेल्या एका दुखापतीमुळे तिला गावोगावचा प्रवास करणे अशक्य झाले आणि ‘वयम्’चे काम सोडावे लागले. प्रेमा खिरारी आता एका संस्थेत प्रकल्प संयोजक म्हणून काम करते आणि माहेरी यावं तसं अधूनमधून भेटायला येते.
निवेदिता सफाळ्याजवळच्या एका गावातली. तिने आधी कधी चळवळीचे काम केले नव्हते, पण ती आत्मविश्वासाने यात उतरली. भराभरा शिकली आणि जव्हार तालुक्याची प्रमुख झाली. गावोगावी भेटलेली माणसे-बाया यांची ओळख निवेदिता टिकवून ठेवत असे. तिच्याकडे प्रत्येक गावातले पाच-सात तरी नंबर असायचेच.
एकेका दिवशी पाच-सहा गावांतल्या मजुरांच्या कामावरच्या मिटिंग करण्याचा विक्रम तिच्याच नावावर असेल. तीन वर्षांत निवेदिता गावागावांतल्या बायांच्या इतकी लाडाची झाली की मोर्चात ती दिसल्यावर त्यांना हायसे वाटे. काही कार्यालयीन कामे तिची नावडती होती, पण चळवळीला गरज आहे म्हटल्यावर कामाला नाही म्हणायचे नाही, हे तिने सतत पाळले. गेल्याच वर्षी निवेदिता एका ध्येयवादी सेंद्रिय शेतकरी तरुणाशी विवाहबद्ध होऊन वर्ध्याला गेली आहे.
या चार मुलींनी वयम् चळवळीला चार चाँद लावले. दीपालीताईंबरोबर या सगळ्या जणींनी चळवळीत महिलामार्ग प्रशस्त केला. ‘वयम्’च्या प्रत्येक शिबिरात, मोर्चात, कार्यक्रमात महिला सहभाग भरभरून दिसतो. समतेच्या मार्गाकडे जायला या पाच जणींनी सोपी केलेली पायवाट कारणीभूत आहे.
(लेखक वयम् चळवळीचे विश्वस्त आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.