जागतिक ख्यातीचे पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी ही मेंढा (लेखा)च्या शास्त्रोक्त वनव्यवस्थापनाची मुहूर्तमेढ रोवली, ज्याला पुढे डॉ. विजय एदलाबादकर यांनी उत्तम दिशादर्शन
- मिलिंद उमरे
‘दिल्ली, मुंबई मावा सरकार-मावा नाटे माटे सरकार'' म्हणजे ‘दिल्ली, मुंबईत आमचं सरकार-आमच्या गावात आम्हीच सरकार’ ही घोषणा देत आपले वनाधिकार प्राप्त करणारं देशातील पहिलं गाव असलेलं मेंढा (लेखा) आता कुणालाही अपरिचित राहिलेलं नाही.
या गावाला आपले वनहक्क व इतर अधिकार मिळवून देण्यासाठी समर्थपणे नेतृत्व करणारे डॉ. देवाजी तोफा (होय. अल्पशिक्षित असलेले देवाजी तोफा यांनी जे अफाट कार्य केलं, त्याची दखल घेत गोंडवाना विद्यापीठानं त्यांना १२ ऑक्टोबर २०२१ रोजी दीक्षान्त समारोहात राज्यपालांच्या हस्ते मानद मानवविज्ञान पंडित (डी. लिट.) ही मानद डॉक्टरेटची पदवी दिली आहे.
त्यामुळे ते आता डॉ. देवाजी तोफा आहेत.) यांना मोलाची साथ दिली ती मोहन हिराबाई हिरालाल यांनी. त्यांनी कायद्याचा बारकाईने अभ्यास करून अत्यंत क्लिष्ट बाबींना आदिवासी गावबांधवांसमोर त्यांना समजेल अशा भाषेत मांडलं.
जागतिक ख्यातीचे पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी ही मेंढा (लेखा)च्या शास्त्रोक्त वनव्यवस्थापनाची मुहूर्तमेढ रोवली, ज्याला पुढे डॉ. विजय एदलाबादकर यांनी उत्तम दिशादर्शन दिले. प्रा. डॉ. कुंदन दुफारे यांनी वनउपजाचे शाश्वत संकलन व्हावे यासाठी मेंढा येथे अनेक प्रयोग करून अभ्यास मॉडेल बनवले. अॅड. लालसू नागोटी व सैनु गोटांनी ग्रामसभांची संघटनशक्ती वाढवली. क्रेन्स संस्थेनं सामूहिक वनाधिकार व जैवविविधता कायद्यावर डॉ. अमित सेटीया यांच्या माध्यमातून १०० हून अधिक ग्रामसभांना प्रशिक्षण दिलं. आता जिल्हा प्रशासन व गोंडवाना विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने एकल ग्रामसभा प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आलं आहे.
जिल्हाधिकारी संजय मीणा व कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांचं उत्तम नेतृत्व व नियोजनातून अनेक ग्रामसभांना सामुदायिक वनाधिकार कायद्याचं योग्य शिक्षण प्राप्त होत आहे. पण, ही संकल्पना केवळ मेंढा (लेढक) या गावापुरती मर्यादित राहिली की, असेच प्रयोग इतरत्रही सुरू आहेत हे जाणून घेण्यासाठी गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज पार करत थेट कुरखेडा गाठलं. इथं ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ ही संस्था स्थापन करून १९८४ पासून अविरत कार्य करणारे डॉ. सतीश गोगुलवार, शुभदा देशमुख आहेत.
डॉ. गोगुलवारांनी इजामसाय काटेंगे यांना भेटायला सांगितलं. मग तिथून निघालो कोरचीकडे. कोरचीत इजामसाय काटेंगे वाटच बघत होते. ते ९० गावांना संघटित करून स्वयंशासनाचे प्रयोग करत आहेत. काटेंगे सांगू लागले, ‘‘सर, आम्ही सात क्लस्टर तयार केले. यात बोडेसरा (पडीयालजोब), कुवारपाट (सावली), दंतशिरो (जांभळी), रावपाट गंगाराम घाट (झेंडेपार), समशेरगड, कुवारपाट (कोहका), जप्रागड या क्लस्टरचा समावेश आहे. यातील प्रत्येक क्लस्टरशी १० ते १५ गावं जुळलेली आहेत. अशी जवळपास ९० गावं किंवा ग्रामसभा जुळल्यानं आम्ही याचं महाग्रामसभा नावाचं फेडरेशनही सुरू केलं आहे. त्या माध्यमातून ग्रामसभांना मार्गदर्शन, तांत्रिक माहिती, प्रशिक्षण व मदत दिली जाते.’’
वर्ष दोन हजार सतरामध्ये महाग्रामसभेची स्थापना झाल्यावर गावांनी तेंदूपत्त्याचा व्यवसाय स्वत: करायचं ठरवलं. उन्हाळ्यात तेंदू वृक्षाला येणारी पानं म्हणजे सोन्याच्या पानांपेक्षा कमी नाहीत. या एकाच व्यवसायावर अनेकांचं वर्षभराचं बजेट अवलंबून असतं. पण, आजवर हा व्यवसाय वनविभाग करायचं. ग्रामसभांनी पुढं येत तेंदूपत्ता व्यवसाय स्वत:च करायला सुरुवात केली. त्यामुळे अधिक मोबदला मिळू लागला. कोरचीत महाग्रामसभेचं कार्यालय उभं झालं आहे. इजामसाय काटेंगे या महाग्रामसभेचे सल्लागार आहेत. आता गावांमध्ये मधप्रक्रिया केंद्रही उभारण्यात आलं आहे. शिवाय वनोपजावर प्रक्रिया केलेली उत्पादनांच्या विक्रीसाठी चार वनधन केंद्रेही त्यांनी उभारली आहेत. झेंडेपार गावात होऊ घातलेल्या लोहखाणीला विरोध करत २००८ पासून या ग्रामस्थांनी इथलं जल, जंगल, जमीन उद्ध्वस्त करू पाहणाऱ्या कंपन्यांची वाट रोखून धरली आहे. शिवाय वडसा ते छत्तीसगडकडे कोरचीच्या जंगलातून जाणाऱ्या मोठ्या वीजवाहिनीला इथल्या १६ गावांनी विरोध करून महावितरणकडून पाच कोटी रुपयांची नुकसानभरपाई मिळवली आहे.
काटेंगे म्हणाले, ‘‘आमच्याकडे दरवर्षी एप्रिल महिन्यात रावपाट गंगाराम घाट यात्रा असते. या यात्रेच्या दुसऱ्या दिवशी महिलांची विशेष ग्रामसभा होते. या ग्रामसभेत केवळ महिलांनाच बोलण्याचा अधिकार असतो. २०१८ मध्ये या सभेत एक महिला म्हणाली, तेंदू संकलनाचे आमचे मजुरीचे पैसे तुम्ही आमच्या नवऱ्याच्या बँक खात्यात जमा करता. ते व्यसनात किंवा इतर गोष्टीत पैसे खर्च करतात. आमच्या मेहनतीचे पैसे आमच्या खात्यात का जमा होऊ नयेत ? या एकाच प्रश्नानं चित्र बदललं. आता महिलांचं स्वत:चं बँक खातं आहे आणि त्यांच्या मजुरीचे पैसे त्यांच्याच खात्यात जमा होतात.’’ काटेंगे यांचा निरोप घेऊन मी धानोरा तालुक्याची वाट धरली. गॅरापत्तीमार्गे सावरगावहून धानोऱ्याला पोहोचलो.
पुढे गडचिरोलीकडे जाताना वाटेत आपलं मेंढा (लेखा) आलं. गावात साधासा कुर्ता, धोतर, गळ्यात गमछा, खांद्यावर शबनम अशा नेहमीच्या पेहरावातील डॉ. देवाजी तोफा दिसले. मग गप्पा सुरू झाल्या. देवाजी तोफा सांगू लागले, ‘‘आम्ही कोया, कोयतूर इथले मूळनिवासी. आम्हाला आमचं दिल्ली, मुंबईचं सरकार मान्य आहे. पण, हे सरकार शेवटी आम्ही जनताच निर्माण करते ना? मग मूळ मालक आम्हीच की नाही? सरकारची धोरणं वातानुकूलित खोलीत तयार होतात. इथं गावात परिस्थिती वेगळी असते. त्यामुळे गावगणराज्याची संकल्पना बळकट झाली, तर राष्ट्र बळकट होईल.’’ त्यांचं ओघवत्या शैलीतलं बोलणं सुरू झालं की, ऐकत राहावं वाटतं. पण, मला पुन्हा पुढं जायचं होतं.
मी निघालो थेट खुटगाव (मेंढा) गावात. इथं माजी आमदार हिरामण वरखडे राहतात. फक्त एकदाच आमदार झाल्यानंतर पुन्हा राजकारणाकडे ढुंकूनही न बघता या जिल्ह्याच्या विकासासाठी स्वत:ला झोकून देणारे हिरामण वरखडे हे वेगळेच आहेत. मी पोहोचलो तेव्हा रस्त्याच्या कडेला विशाल वटवृक्षाखाली त्यांची ग्रामसभा सदस्यांची सभा सुरू होती. जवळपास ५२ ग्रामसभांचे सदस्य आले होते. त्यांच्या गाव कल्याणकारी संस्थेच्या मार्गदर्शनात अनेक गावांतील महिला-पुरुषांनी आपल्या सांदवाडीत (परसबागेत) सेंद्रिय पद्धतीनं विविध प्रकारची भाजीपाला पिकं घेतली. त्याबद्दल त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्याच्या नियोजनासंदर्भातच सभेत चर्चा सुरू होती. माजी आमदार वरखडे सांगू लागले, ‘‘बेटा, १९८५ मध्ये मी आमदार म्हणून निवडून आलो. त्याच काळात मेंढा (लेखा) गावाचा वनाधिकारासाठी संघर्ष सुरू होता. सरकारनं त्यांचं गावात बांधलेलं गोटुल उचलून नेलं. हे गोटुल म्हणजे आम्हा आदिवासींचं शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक संस्काराचं केंद्र, आमचं पवित्र स्थळ. मी गावात पाय ठेवला तेव्हा गावातील महिला त्वेषानं म्हणाल्या, सरकार हे व्यवस्थापक आहे, मालक नाही. खरे मालक जनता म्हणजे आम्ही आहोत. मग मालकाला न विचारता सरकारनं कोणत्या अधिकारानं आमचं गोटुल उचलून नेलं? आता तुम्हीच आमच्या समस्यांवर उपाय शोधा. मग मी ठरवलं की, आता पुन्हा आमदारकी, राजकारण यात गुंतायचं नाही. मी अनेक गावांत प्रयोग करत गेलो. आता आम्ही टवेटोलासह अनेक गावांमध्ये सेंद्रिय शेतीचे प्रयोग करतोय. सांदवाडीत भोपळा, भेंडी, वांगे, काकडी अशा भाजीपाल्याचं उत्पन्न कितीतरी पटीनं वाढताना दिसत आहे. म्हणून आम्ही प्रयोगात सहभागी झालेल्यांचा सत्कार करून हे यश साजरं करू. तुम्ही नक्की या.’’ मग, त्यांच्या अनेक प्रयोगांवर, स्वयंशासनावर चर्चा झाली. त्यांचा निरोप घेऊन मी टवेटोला गाठलं. हाताच्या वितीपेक्षा लांब आणि कोवळी भेंडी पाहून त्यांच्या प्रयोगाची यशस्विता लक्षात आली. कुठे वेलीवर भरगच्च दिसणाऱ्या लांबट काकड्या, कुठे टम्म फुगलेले भोपळे, तर कुठे असाधारण आकाराचे वांगे सारेच बघून मन हरखून गेलं. इथून पुढं छत्तीसगड सीमेवरच्या पेंढरी मार्गावर मोहगावातील बावसू पावे माझी वाट बघत होते. इथं बावसू पावे, देवसाय आतला व अनेक धडाडीच्या कार्यकर्त्यांच्या नेतृत्वात या ग्रामसभेनं गौण वनोपजातून मोठं उत्पन्न मिळवलं. त्यातून ७० लाख रुपयांचं छानसं गोदाम बांधलं. या जंगलात बांबू नव्हता. मग ग्रामसभेनं स्वत: जंगलात बांबूची लागवड केली. आता या बांबूपासूनही त्यांना उत्पन्न मिळत आहे. माझं लक्ष उत्तम गणवेशातल्या बालकांकडे गेलं. बावसू पावे म्हणाले, ‘‘साहेब, आपल्या अधिकाराची जाणीव आपल्याला शिक्षणातून होते. पण, शिक्षणासोबतच आमची वैभवशाली आदिवासी संस्कृती मुलांना सांगणं आवश्यक आहे. म्हणून आम्ही इथं गोंडी भाषेतली शाळा सुरू केली. आता मुलं आदिवासी संस्कृतीचं प्राचीन ज्ञानही घेत आहेत आणि आधुनिक ज्ञानही मिळवत आहेत.''
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.