पर्यावरणाचा ऱ्हास, जंगलांची कत्तल, निसर्गाचा असमतोल, काँक्रिटची जंगले हे सध्याच्या काळातील अत्यंत ज्वलंत मुद्दे आहेत. शहर, राज्य, देश पातळीवरच नाही, तर जागतिक स्तरावर हे महत्त्वपूर्ण मुद्दे असून सध्याच्या पृथ्वीच्या परिस्थितीला निसर्गावर माणसानं ओढलेला आसूड कारणीभूत आहेत. दुसरीकडे महाराष्ट्रातील शहरीकरणाचा वेग पाहता, शहरांमध्ये सोयी-सुविधांचीही प्रचंड गरज निर्माण होत आहे. शहरातील मुलभूत सोयी-सुविधांवर प्रचंड ताण येत आहे. मात्र विकास साधत असताना पर्यावरणाकडे दुर्लक्ष होऊ नये, याची खबरदारी नाशिकमधील प्रशासनाला आणि नागरिकांना घ्यावी लागणार आहे.
राज्याचे पर्यावरण मंत्री आणि तरुणांचे लाडके नेतृत्त्व असलेले आदित्य ठाकरे नाशिकमधील उड्डाणपूल आणि झाडांच्या संदर्भातील आढावा घेण्यासाठी येत आहेत. नाशिककर त्यांच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत. काही मुद्दे आदित्य यांच्यासमोर मांडण्यासाठी केलेला हा प्रपंच. आदित्यजी, पर्यावरणातील आपला दांडगा अभ्यास आहे. राज्यातील विकासाची धोरणे ठरविताना पर्यावरणाचे प्रश्न अग्रक्रमानं समोर येत आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होऊ न देता शहरांचा विकास साधण्याचे समतोल कौशल्य महाविकास आघाडी सरकारला साधावं लागणार आहे. नाशिककरांनाही आपल्याकडून हेच अपेक्षित आहे...
नाशिकसारख्या मेट्रोकडे वाटचाल करणाऱ्या विकसनशील शहराचा प्रचंड विस्तार होत आहे. विकास आणि पर्यावरण या दोघांचा समन्वय साधत नाशिकला पुढे जावं लागणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. नैसर्गिक संपत्तीची विपुल संपदा नाशिकला लाभली आहे. त्यामुळे या जैवविविधतेचे जतन, संवर्धन होण्याची गरज आहे. कुठलेही रस्ते रुंदीकरण असो अथवा पूल झाडांच्या छाटणीचा, पुनर्रोपणाचा किंवा तोडणीचा विषय त्यात येणार हे स्वाभाविक आहे. आता विकास साधताना किती झाडं हा वाचवता येऊ शकतात, यात खरं कौशल्य आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जी झाडं तोडली जातील, त्याच्या बदल्यात लावण्यात येणारी झाडे कशारितीने लावली जातील, याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.
त्रिमूर्ती चौक ते सिटी सेंट्रल मॉल आणि सिटी सेंट्रल मॉल ते मायको सर्कल असे दोन उड्डाणपूल नाशिक शहरात प्रस्तावित आहेत. नगररचना करताना किंवा वाहतुकीच्या संदर्भात विचार करताना पुढील १५-२० वर्षांचं व्हीजन डोळ्यासमोर ठेवून नगररचना अभियंते आराखडे आखत असतात. मुंबईच्या वाहतूक समस्येचा विचार करता जर नितीन गडकरी यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना ५५ उड्डाणपूल निर्माण केले नसते, तर आजच्या मुंबईचा विचार करणंही अवघड झालं असतं. ठाण्यात पोहोचल्यानंतर मंत्रालयापर्यंत जाण्यासाठी उड्डाणपूल नसते तर किमान चार तास आज लागले असते. नितीन गडकरी महोदयांना त्यामुळेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ''रोडकरी'' ही उपाधी बहाल केली होती. उड्डाणपुलांशिवाय आजच्या मुंबईची कल्पना केवळ अशक्य आहे. त्यामुळे १५-२० वर्षांनंतर वाढणाऱ्या नाशिकचा विचार करुन नगर नियोजनाचा विचार होणं गरजेचं आहे.
उड्डाणपुलाभोवती फिरणाऱ्या राजकारणाशी सामान्य माणसाला काही देणेघेणे नाही. नाशिककरांना इथलं पर्यावरणही जपायचं आहे आणि विकास देखील साधायचा आहे. राहता राहिला प्रश्न सिमेंटच्या प्रतवारीचा. याबाबत ४० वरुन ६० केलेली प्रतवारी हा तज्ज्ञांच्या समितीने घेतलेला निर्णय आहे. उड्डाणपुलाच्या खांबांची जाडी कमी करायची झाल्यास आणि वृक्षतोड कमी होऊ द्यायची असेल तर अधिक प्रतवारीचे सिमेंट वापरणे गरजेचे आहे, त्याशिवाय त्याला मजबुती मिळू शकत नाही, त्यामुळे या संदर्भात उच्च न्यायालयात होणाऱ्या युक्तिवादांकडे बारकाईने पाहावे लागेल.
त्रिमूर्ती ते सिटी सेंट्रल मॉल या उड्डाणपुलासाठी ९४ झाडांपैकी ३० झाडे कटिंगमध्ये येत असल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झालेलं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यात म्हसोबा महाराज मंदिरालगतचे वटवृक्ष येत नाही. त्यामुळे दोनशे वर्षे जुन्या या वटवृक्षाला काहीही धोका नाही. पैकी ७ झाडांचे पुनर्रोपण शक्य आहे. १३ झाडांचे पुनर्रोपण शक्य होणार नाही, त्याबदल्यात त्याच वयोगटातील झाडे लावण्यात येणार आहेत. सिटी सेंट्रल मॉल ते मायको सर्कल या उड्डाणपुलासाठी बाधित होणाऱ्या झाडांचं सर्वेक्षण सुरु आहे. हे दोन्ही उड्डाणपूल पूर्ण झाल्यानंतर सिडको आणि परिसरातील वाहतूकधारक नागरिक अवघ्या चार ते पाच मिनिटांत त्रिमूर्ती चौकातून त्र्यंबक रोडवरील महापालिकेच्या जलतरण तलावासमोर उतरु शकतील. नाशिकचं नाशिकपण जपतं या शहरानं विकासाच्या उंच भराऱ्या घ्याव्यात, यासाठी नाशिककर कमालीचे आसुसलेले आहेत...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.