#MokaleVha : समलैंगिक नात्यात लग्न करता येईल?

MokaleVha
MokaleVha
Updated on

समलैंगिक नात्यात लग्न करता येईल?
मी ३२ वर्षांचा तरुण असून, गेल्या ४ वर्षांपासून समलैंगिक नात्यात आहे. त्याबाबत दोघांच्या घरी कळल्यावर त्यांनी त्यास खूप विरोध केला. शिवाय वारंवार हे अनैसर्गिक, चुकीचे आहे व समाजात याला मान्यता नाही, हेही समजावण्याचा प्रयत्न केला. आमच्या नात्याचा घरच्यांना त्रास होतोय म्हणून आम्ही हे नाते तोडण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु, आम्हाला हे नाते तोडणे शक्य होत नाहीये. नुकतेच समलैंगिक संबंधांच्या कायद्यात बदल झालेले वाचले. त्यामुळे आम्ही आता कायद्याचा अडसर नाही म्हणून लग्न करायचे ठरवत आहोत. आम्हाला लग्न करता येईल का? कायदेशीर काय-काय अडचणी आहेत? 
समलैंगिकतेला आपल्या समाजात पूर्वीपासून वेगळ्या नजरेने बघितले जाते. पूर्वीच्या कायद्यानुसार दोन व्यक्तींमधील संमतीपूर्वक समलैंगिक संबंध अनैसर्गिक कृत्य म्हणून गुन्हा होता. काही काळापासूनच आपल्याकडे हा विषय सामाजिक संस्था, कार्यकर्ते यांच्यामुळे उघडपणे बोलला जाऊ लागला.

त्याचाच परिणाम म्हणून पुढाकार घेऊन दाखल केलेल्या याचिकेचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय म्हणून भा. दं. वि. कलम ३७७ रद्दबातल करण्यात आले आहे. त्यामुळे कायद्यानुसार तुमचे नाते आता गुन्हा अथवा बेकायदेशीर नाही.

परंतु, अजूनही स्त्री-पुरुष विवाहाअंतर्गत पती अथवा पत्नीला मिळणाऱ्या कायद्यातील कुठल्याही तरतुदींचा लाभ अथवा कायद्याचे संरक्षण तुम्हाला मिळणार नाही. तुमच्या विवाहाची कायदेशीर नोंदणीही होणार नाही. तुम्ही स्वतःच्या समाधानासाठी पारंपरिक पद्धतीने विवाह करू शकता. हळूहळू समाजाने ही नाती स्वीकारण्यास आणि मान्य करण्यास सुरुवात केली आहे.

तुम्हालाही तुमचे नातेवाईक मित्रपरिवार व समाज यांनी तुमचे नाते स्वीकारावे, यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. शिवाय एकत्र राहण्यासाठी घर मिळवताना, नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी व इतर ठिकाणी तुम्हाला या गोष्टींमुळे खूप विरोध आणि टीकेला सामोरे जावे लागेल. या सर्व अडचणींना ठामपणे तोंड देण्याची मानसिक तयारी असेल व तुम्ही समलैंगिक  असल्याचा न्यूनगंड बाळगला नाही, तर तुम्ही निश्चितपणे एकत्र राहू शकता. तुम्ही समुपदेशकाच्या मदतीने तुमच्या घरच्यांचे मन वळविण्याचे व मानसिकता बदलण्याचे प्रयत्न करा. तुमच्या नात्यात तुमच्या घरच्यांची साथ मिळाली, तर तुम्हाला कमी अडचणींना तोंड द्यावे लागेल.

वाढत्या जबाबदाऱ्यांमुळे आर्थिक ताणतणाव
मी ३२ वर्षांचा पदवीधर युवक आहे. मी १० वर्षांपासून नोकरी करीत आहे. माझ्या लग्नानंतर माझ्यावर आर्थिक जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. बऱ्याच वर्षांत पगारवाढ अथवा बढती मिळाली नाही. नोकरीतील स्पर्धा, ताणतणाव, अंतर्गत राजकारण तसेच अपुरा पडणारा पगार व संसारातील वाढलेल्या आर्थिक गरजा यांचा ताळमेळ न बसल्याने मला सतत नैराश्‍य येते. त्यात आता बाजारात मंदी आल्यामुळे नोकरीबाबतही अस्थिरता वाटू लागली आहे. अतिताणतणावामुळे सतत आत्महत्येचा विचार येतो. यापूर्वीही एकदा मी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

प्रत्येक ठिकाणी प्रचंड स्पर्धा, दुसऱ्यांबरोबर सतत केलेली स्वतःची तुलना व ध्येय गाठण्यास लागणारा वेळ व त्यासाठी नसलेला संयम, यामध्ये आजकालची युवा पिढी गुरफटली आहे. वैयक्तिक अथवा व्यावसायिक जीवनात आलेल्या अपयशाने निराशावादाकडे खेचली जात आहे. आत्महत्या हा त्यातून बाहेर येण्याचा निश्चितच मार्ग नाही. यापूर्वीही तुम्ही आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. यावरून तुम्ही खूप दिवस नैराश्याने ग्रासलेले आहात, हे लक्षात येते. आत्महत्या करणे, हा कायदेशीर गुन्हा आहेच. परंतु, हा अतिशय टोकाचा चुकीचा निर्णय आहे. तुमच्या चुकीच्या वागण्याने तुमचे कुटुंब व जवळच्या लोकांच्या आयुष्यावरही नकळत परिणाम होत असेल, तुमच्यावर त्यांचीही जबाबदारी आहे, हेही तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही विश्वास ठेवून तुमच्या कुटुंबाशी, मित्र-मैत्रिणींशी अडचणीबाबत मनमोकळेपणाने बोललात तर ते तुम्हाला नक्कीच मानसिक आधार देतील.

तुम्हाला तातडीने तुमच्या नैराश्यावर काम करणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्ही मानसोपचारतज्ज्ञाची मदत घ्या. आपल्याकडे अजूनही मानसोपचारतज्ज्ञाकडे जाण्याचा सकारात्मक दृष्टिकोन नाही. अजूनही लोक आपण मानसिक आजारावर उपचार घेत आहोत, हे कळल्यावर समाज आपल्याकडे चुकीच्या नजरेने बघेल, या नकारात्मक विचाराने मानसोपचारतज्ज्ञाकडे जात नाहीत. त्यामुळे बरेचसे मानसिक आजार प्राथमिक स्वरूपाचे असताना उपचार न केल्याने गंभीर रूप धारण करतात.

नैराश्य हा असाच एक सामान्य वाटणारा समाजात वेगाने वाढत चाललेला दुर्लक्षित मानसिक आजार आहे. त्याच्यावर लवकरात लवकर उपचार घेणे गरजेचे आहे. मानसोपचारतज्ज्ञ समुपदेशनाने तुम्हाला तणावाशी सामना करण्यासाठी व त्यातून बाहेर पडण्याकरिता योग्य मार्गदर्शन करतील व तुमच्या आयुष्याला सकारात्मक दिशा मिळेल.

नातीला तिच्या वडिलांकडे पाठवायचे नाही
माझ्या मुलीचे बाळंतपणात २ वर्षांपूर्वी निधन झाले. आमची नात मुलीच्या मृत्यूनंतर मी व माझ्या पत्नीसोबत राहते. आम्हाला एकमेकांचा लळा लागला आहे. आमची मुलगी बाळंतपणाच्या वेळी आमच्याकडे आली असताना तिला सासरी चांगली वागणूक मिळत नसल्याचे ती बोलली होती. त्यामुळे आम्ही जावयाला नातीला भेटू देत नाही. त्याने मुलीचा ताबा मिळविण्यासाठी कोर्टात केस केली आहे. आम्हाला आमच्या नातीला जावयाकडे पाठवायचे नाही. यात कायदा काय मदत करू शकतो?

कायद्यानुसार १८ वर्षांखालील अपत्याचा कायदेशीर ताबा प्रथमतः त्याच्या नैसर्गिक पालकांना म्हणजे आई अथवा वडिलांना मिळतो. कोर्ट नैसर्गिक पालक हयात असताना मूल नैसर्गिक पालकाकडे सुरक्षित राहणार नाही अथवा ते त्याचा सांभाळ करण्यास योग्य नाहीत, असे काही सयुक्तिक गंभीर कारण असेल; तरच मुलाचे चांगले भविष्य व हित लक्षात घेऊन मुलांचा ताबा त्यांना न देता जवळच्या नातेवाइकांना देते. कोर्ट दोन्ही पक्षांची बाजू ऐकून मुलाला भावनिक, शैक्षणिक, पालनपोषण व सुरक्षित वातावरण, या गोष्टी कोण चांगल्या रीतीने देऊ शकेल, याचाही विचार करते. या बाबी लक्षात घेऊन मुलीला भेटण्याचा अधिकार व ताबा कोणाला द्यायचा, हे ठरवेल.

परंतु, तरीही मुलीला सासरी नक्की काय त्रास होता, याची तुम्ही शहानिशा करा. तुम्ही कदाचित अतिभावनात्मक झाल्यामुळे व नातीत गुंतल्यामुळे तुम्ही तुमच्या जावयाकडे नकारात्मकपणे पाहत असाल. तुमची नात आईच्या प्रेमाला पारखी झालीच आहे. वडिलांनाही भेटू न दिल्याने  ती वडिलांच्या प्रेमालाही पारखी व्हावी का, हाही विचार करावा. गंभीर समस्या नसेल तर तुमच्या नातीवरही वडिलांच्या प्रेमाचा हक्क डावलून तुम्ही एकप्रकारे अन्याय करीत आहात. त्यासाठी वेगळ्या दृष्टिकोनातून जावयाकडे पाहून त्यांच्याशी बोलून एकमेकांमधील अढी दूर करायचा प्रयत्न करा. तरीही, गंभीर समस्या असल्यास तुमचे वकील तुम्हाला योग्य ती कायदेशीर मदत करतीलच. 

मुलांचे ताणतणाव
शाळा, शिकवणी, छंदवर्ग यामुळे मुलांना येणारे ताणतणाव तसेच विभक्त झालेल्या कुटुंबांमधील मुलांच्या मानसिकतेवर होणारे परिणाम यावर नुकतेच ‘मुलांचे ताणतणाव’ या विषयांतर्गत फेसबुक लाइव्ह आयोजित करण्यात आले होते. यावर आलेल्या प्रश्‍नांची समुपदेशक प्रफुल्ला रानडे यांनी उत्तरे दिली आहेत. 

आमची घटस्फोटाची केस चालू आहे. आम्हाला नऊ वर्षांची मुलगी आहे. सध्या ती आईकडे राहते. सुटीला ती माझ्याबरोबर येते. मी तिला आवडीने बाहेर फिरायला नेतो. तेव्हा ती खूप वस्तू मागणे, महागडे खाणे असे करते. मला खूप राग येतो. पण तिला काही बोलता येत नाही, कारण ती एकाच दिवसासाठी येते. तिला हे सर्व आई शिकवत असते.

मुलीला आई शिकविते म्हणून मुलगी तुमच्याकडे महाग वस्तू, खाण्याच्या गोष्टी मागते, हा विचार जरा बाजूला ठेवा. असे होतही असेल, परंतु मुलगी नऊ वर्षांची आहे. इतर मैत्रिणींचे बघून तिला या गोष्टी कराव्याशा वाटत असतील. मैत्रिणींचे बाबा त्यांना फिरायला नेल्यावर नवीन वस्तू घेऊन देणे, हॉटेलमध्ये नेणे असे करत असतील. त्यामुळेसुद्धा तुमची मुलगी तुमच्याकडे मागणी करत असेल. कारण त्यामुळे तिलापण तिच्या मैत्रिणींना, ‘माझे बाबापण मला नवीन वस्तू घेऊन देतात. हॉटेलमध्ये नेतात, खाऊ घालतात’, असे अभिमानाने सांगता येत असेल. बाबा आमच्याजवळ राहात नसले तरी ते माझे खूप लाड करतात, असे सांगता येत असेल. दुसरी बाजू तुमची बायकोसुद्धा चांगल्या मनस्थितीत नसेल म्हणून तिची चिडचिड होत असेल.

एकादवेळेस तिला खरेच हे परवडत नसेल. तुमच्या बाजूने तुम्ही मुलीला समजावून सांगा, तिच्या मनात विश्‍वास निर्माण करा. तसेच इतर चांगल्या गोष्टींची जाणीव करून द्या. पुस्तके वाचून दाखवा- एकत्र बसून वाचणे, एखादा खेळ खेळणे, मुलांसाठी असलेल्या नाटकांना नेणे, तिला डोंगर-गड यांची माहिती करून द्या. एकच दिवस मुलगी येते म्हणून तिचे अवास्तव लाड करू नका. योग्य/अयोग्य याची जाणीव तिला करून द्या. 

मुलगा सीबीएसईला सहावीत आहे. शिकवणीलाही जातो. त्याला गिटार आवडते म्हणून गिटार वाजवायच्या क्लासलाही घातले आहे. क्लासला घालून तीन महिने झाले आहेत. पण सध्या तो खूपच शांत झाला आहे. मला त्याचे खूप टेंशन येते. तो घरी आला तरी अभ्यास करत बसतो. बोलणे फारच कमी झाले आहे त्याचे.

तुमच्या प्रश्‍नावरून तुमचा मुलगा नक्की केव्हापासून शांत झाला आहे, हे समजत नाही. गिटार क्‍लासला घातल्यापासून शांत झाला आहे का? क्‍लासला आवडीने गेला आहे, परंतु आता ते गिटार शिकणे- वाजविणे जमत नाही का? अजून काही अन्य गोष्टी असतील की, त्या तो तुम्हाला सांगत नाही. एक लक्षात घेतले पाहिजे की, मूल आपल्या वागण्यात विसंगती दाखवते, तेव्हा ते मूल आपल्या मनातील गोंधळ स्पष्ट करत असते.

अशावेळी त्याला विश्‍वासात घ्या. तो विश्‍वास तुमच्या बोलण्यापेक्षा तुमच्या कृतीतून, स्पर्शातून, देहबोलीतून व्यक्त झाला पाहिजे. त्याला जाणवला पाहिजे. आपण आईला/बाबांना सांगितले तर ते मला समजून घेतील, हा विश्‍वास त्याच्या मनात निर्माण झाला पाहिजे. असे विश्‍वासाचे नाते निर्माण झाले तर त्याचा खूपच फायदा होतो. घरातील- बाहेरील वातावरणामुळे बऱ्याचदा मुलांच्या मनात भावनिक अस्वस्था येते व त्यातूनच मग त्यांना मानसिकरीत्या असुरक्षित वाटू लागते. त्याला सारखे प्रश्‍न विचारून भंडावून सोडू नका. त्याला त्याचा वेळ द्या. तरीसुद्धा त्याच्या वागण्यात बदल झाला नाही तर समुपदेशकाची मदत घेणे योग्य होईल. समुपदेशनासाठी- स्वाधार - ०२०-२५५११०६४

आम्ही विभक्त झालो आहोत. कोर्टाने ठरवून दिल्याप्रमाणे मी मुलाला सुटीत वडिलांकडे पाठवते. तो त्यांच्याकडे जाऊन आल्यानंतर फारच विचित्र वागतो. ‘तू वाईट आहेस’, असे सतत म्हणतो. त्याचे पप्पा खूप लाड करतात, मी त्याला फार काही देऊ शकत नाही. नवऱ्याचे दुसरे लग्न होऊन चार वर्षे झाली आहेत. त्यांना मूल होणार नाही, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. आता मुलगा म्हणतोय, ‘ती दुसरी आई (बायको) चांगली आहे. मला ती आई आवडते. पप्पा म्हणतात की, तू कायमचा आमच्याकडेच राहा, आम्ही तुझे लाड करू.’ मला यावर काय उत्तर द्यावे, सुचतच नाही.

तुमच्या मुलाचे वय किती आहे, याचा आपण उल्लेख केलेला नाही. कोर्टाने ठरवून दिलेल्या वेळेस तुम्ही मुलाला वडिलांकडे पाठवता, हे खूप चांगले आहे. कारण मुलांना आई-वडील दोघेही हवे असतात. घरी आल्यावर तो विचित्र वागतो, असे तुम्ही म्हणता, ती त्याची प्रतिक्रिया आहे. त्याला तुम्ही दोघेही हवे आहात, पण ते शक्‍य नाही. वडील खूप लाड करतात आणि म्हणून ते त्याला आवडत असतील, हे स्वाभाविक आहे. तो घरी आल्यावर तुम्ही त्याला खूप प्रश्‍न विचारता का? तसे असेल तर ते बंद करा. तो आपणहून सांगेल ते आनंदाने ऐकून घ्या. त्याच्या पप्पांना नावे ठेवू नका. मी त्याला काही देऊ शकत नाही, हे मनातून काढून टाका. प्रेम-ममता पैशात मोजता येत नाही.

मुलासाठी वेळ द्या. इतर गोष्टींची आवड त्याला लावा. तुमचे प्रेम तुमच्या बोलण्या, वागण्यातून दिसत असेलच. पण तो वडिलांना चांगले म्हणतो हे तुम्हाला आवडत नाही, हे पण त्याला जाणवत असेल. त्याबद्दल काळजी घ्या. त्याला, त्याच्या वयाच्या वृत्तीला समजून घ्या. तू वाईट आहेस हे तो स्वतःहून म्हणत नसणार. तसे जर वडिलांच्या घरी होत असेल तर ते तुमच्या हातात नाही. पण तुम्ही कशा चांगल्या आहात हे त्याला जाणवून देणे हे तुम्हीच करू शकता. गरज पडली तर समुपदेशकाची मदत घ्या. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.