- अपूर्वा जोशी, apurvapj@gmail.com / मयूर जोशी, joshimayur@gmail.com
विजय नुकताच अभियंता झाला होता, पण आता त्याला नोकरी करायची नव्हती, त्यामुळं तो नवीन व्यवसायाच्या संधी शोधत होता. अशातच त्याला त्याच्या एका मित्राने एक जाहिरात दाखवली, ‘घरबसल्या एक्सपोर्टर बना’, आणि इच्छुकांना एका नंबरवर फोन करायला सांगितलं होतं. विजयनं त्या नंबरवर फोन केला आणि सगळं प्रपोजल समजून घेतलं.
अशा पद्धतीच्या घोटाळ्यांबद्दल तशी विजयला बरीच माहिती होती, विविध कामांसाठी आगाऊ रक्कम मागणाऱ्या घोटाळ्यांबद्दल त्याला पुरेशी माहिती होती. पण या फोनवर तशी गुंतवणूक किंवा आगाऊ रकमेची काही मागणी झालेली नव्हती, पण बरंच तांत्रिक ज्ञान या कामासाठी आवश्यक होतं.
दुबईच्या एका कंपनीला ॲल्युमिनिअम पाइप, काही सेन्सर्स, बॉल बेअरिंग वैगरे काही गोष्टी निर्यात करायचं काम त्याला करावं लागणार होतं, बऱ्याच गोष्टी शिकायला लागणार होत्या, पण त्यासाठी त्याची तयारी होती. तूर्तास विजयची कोणती कंपनी वगैरे नसल्यामुळे त्याला एक डेबिट कार्ड दिले जाणार होतं. फक्त एटीएममधून पैसे काढायची एक अट होती, एका विशिष्ट दिवशी, त्याच्या गावातल्या एका ठरलेल्या बँकेच्या एटीएमवरून ठरावीक वेळेलाच हे पैसे काढायला लागणार होते.
साधारण शंभर रुपये काढले तर त्यातून ९० रुपये हे मटेरियल आणि शिपिंग साठी खर्च करायचे होते आणि उरलेले दहा रुपये हा त्याचा निव्वळ नफा होता. विजयने थोडा विचार केला, गुंतवणूक, किंवा आगाऊ रक्कम काही नसल्याने आणि काम करायचा दांडगा उत्साह असल्याने त्याने तत्काळ या कामासाठी हो कळवलं कारण फोनवर बोलले गेलेले सगळे आकडे लाखांच्या घरात होते. काही वर्षांत विजय एक प्रतिष्ठित व्यावसायिक बनायची स्वप्न पाहायला लागला होता.
एके दिवशी त्याच्या घरी एटीएम कार्ड आले. दुसऱ्या दिवशी एका दुबई मधील अरबी नाव असलेल्या गृहस्थाचे ई-मेल आले आणि त्यात तारीख, वेळ इत्यादी सगळ्या गोष्टी दिल्या गेलेल्या. विजय शांतपणे जाऊन पैसे काढून आला, नंतर गावाच्या बाजारात स्वस्तात पण टिकाऊ असे ॲल्युमिनियम पाइप, सेन्सर, बॉल बेअरिंग आणि इतर गोष्टी ज्या ई-मेल मध्ये सांगितलेल्या त्या विकत घेतल्या.
त्याच्या वडिलांचे एक ओळखीचे गृहस्थ जे परदेशी वस्तू कुरिअर करण्याच्या व्यवसायात होते, विजयने त्यांच्याकडेच या वस्तू दुबईला पाठवायला दिल्या आणि त्याचे बाजार भावाप्रमाणे रोखीने दिले. आणि विशेष म्हणजे त्याच्याकडे सगळे खर्च संपल्यावर १० टक्क्यांपेक्षा जास्त पैसे उरलेले म्हणजे विजयची कामगिरी चोख होती तर. काही दिवसात माल व्यवस्थित मिळाल्याची ई-मेल पण त्याला आलेली होती. सगळं कसं स्वप्नवत चाललं होतं. पण जेव्हा गोष्टी स्वप्नवत घडतात ना तेव्हा त्यात काहीतरी काळंबेर असायची शक्यता पण वाढते.
साधारण तीन महिने झाले असतील व्यवसायाला, विजयच्या घरी एके दिवशी दुपारी पोलिस आले. त्याला चौकशीसाठी पोलिस चौकीवर नेले, कोणत्या तरी फोटो सोबत त्याच्या चेहरा मॅच केला आणि त्याला अटक केली. आपल्या सोबत काय घडतंय हे त्याला कळायच्या आतच तो अटकेत होता. हे एक खूप मोठे षडयंत्र होते.
एका बँकेचा सर्व्हर उत्तर कोरियामध्ये बसून कोणीतरी हॅक केलेला आणि बँकेचा मुख्य संगणक आणि एटीएम यांच्यात होणारे सांकेतिक संवाद काही काळाकरिता बंद केला गेला होता, त्यामुळे बँकेच्या सर्व्हरला एटीएमवरून काही घडतंय हे समजायच्या आतच काही वेळाकरिता एटीएम अक्षरशः पैसे ओकायला लागलेलं ! ते पैसे त्याच वेळेस जाऊन, कार्ड टाकून केवळ गोळा करायचे काम विजयने केले होते.
एटीएमच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये एटीएम मधून पैसे गोळा करताना त्याचा चेहरा दिसला होता, बँकेचा सर्वर हॅक करून आलेले पैसे कोणा एका माणसाच्या खात्यात गेले नव्हते तर विजयसारख्या अनेक ‘मनी म्यूल्स’ने ते गोळा केले होते आणि आता त्या सगळ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं... आणि अनाहूतपणे विजयने तर एखाद्या अण्वस्त्र कार्यक्रमासाठी लागणाऱ्या गोष्टींचा पुरवठा केला असायची देखील शक्यता होती. बऱ्याचदा कोरिया किंवा इराण सारखी राष्ट्र त्यांच्या अण्वस्त्र कार्यक्रमात लागणारे ॲल्युमिनियम पाइप, किंवा बॉल बेअरिंग्स दुसऱ्या देशातून मागवतात. या गोष्टींना ‘ड्युअल युज गुड्स’ असे म्हटले जाते.
‘मनी म्यूल्स’ म्हणजे अक्षरशः पैसे वाहणारी खेचरं असतात, त्यांच्या ओळखपत्रांचा, त्यांच्या बँक खात्यांचा किंवा त्यांच्या चेहऱ्याचा उपयोग पैसे बँकिंग सिस्टिम मधून वाहून नेण्यासाठी केला जातो. या मनी म्यूल्समुळे तपास यंत्रणांसमोर खऱ्या गुन्हेगारापर्यंत पोचायला अनेक आव्हाने येत असतात. यांना गळाला लावण्यासाठी परदेशातील नोकरी, परदेशातील व्यवसाय अशा अनेक आकर्षक पद्धतीचा वापर केला जातो पण झटपट पैसे मिळवण्याच्या नादात ही मंडळी हे विसरतात, की आपण स्वतः विरुद्ध पुरावे निर्माण करत आहोत.
या खेचरांना प्रत्यक्षात कल्पनाही नसते, की आपण एका मोठ्या षडयंत्राचा भाग बनत चाललेलो आहोत. विजय हा अशीच एक शिकार होता आणि त्याच्या कडून हे काम कोणी करवून घेतले याची त्याला बिलकुलच माहिती नव्हती. म्हणून आम्ही कायम आमच्या लेखात आपल्या शिक्षण पद्धतीवर भाष्य करत असतो. आज फॉरेन्सिक अकौंटिंगच्या शिक्षणाच्या कवच कुंडलांशिवाय जेव्हा विद्यार्थी बाजारपेठेत उतरतात, तेव्हा ते नकळतपणे एखाद्या आर्थिक किंवा देश विघातक षडयंत्राचा भाग बनतात किंवा षडयंत्राची शिकार तरी बनतात.
‘सर्टिफाइड फॉरेन्सिक अकाउंटिंग प्रोफेशनल’ हा असाच एक कोर्स आहे, ज्यात वेगवेगळ्या घोटाळ्यांच्या पद्धती, घोटाळे शोधायच्या पद्धती, कायदे यावर विस्तृत चर्चा केली आहे. जो विद्यार्थ्यांसाठी गरजेचा आहे; या करिअर च्या वाटेला येताना अशा अभ्यासक्रमाचा उपयोग होईलच शिवाय आपण कोणत्या षडयंत्राचा भाग बनत नाही ना याची वास्तविक तपासणी सुद्धा विद्यार्थ्यांना करता येईल.
(लेखिका या सर्टिफाइड अँटीमनी लॉंडरिंगविषयक तज्ज्ञ आणि सर्टिफाइड बॅंक फॉरेन्सिक अकाउंटंट आहेत, तर लेखक हे चार्टर्ड अकाउन्टंट आणि सर्टिफाइड फॉरेन्सिक अकाउंटिंग तज्ज्ञ आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.