उड्या मारून दमली, की माकडे एकमेकांची पाठ खाजवत बसतात. केसांमधल्या उवा काढतात आणि खातात किंवा मारून टाकतात. वरकरणी आपल्याला हा माकडांचा एक साधा सोपस्कार वा जीवनशैली वाटते; परंतु त्याचे एक वैशिष्ट्य आहे. माकडे मैत्री करण्यासाठी एकमेकांची पाठ खाजवून देतात. पाठी खाजवणे हा केवळ त्यांचा सोपस्कार नसतो, तर त्यातून त्यांना एकमेकांशी मैत्री करायची असते. सलगी करायची असते. आज आपण देशानुसार, रंगानुसार, जातींनुसार, पंथांनुसार, भाषेनुसार गटागटांत विखुरले गेलो आहोत. आपल्याला आता एकमेकांची पाठ खाजवण्याची खरी गरज आहे. निखळ, निकोप संवादाची गरज आहे. म्हणूनच चला, जरा पाठ खाजवूयात...