मनमोराचा पिसारा : लेबल्‍स

कॉलनीतील काही उद्योगी स्‍त्रियांनी मात्र ती एवढी नटून-थटून कोणाला भेटायला जाते, याचा छडा लावायचा ठरविला आणि त्‍याप्रमाणे हेरगिरी सुरू झाली.
लेबल्‍स
लेबल्‍सsakal
Updated on

डॉ. भाग्‍यश्री कुलकर्णी

गेले काही दिवस ती रोज नवरा कामासाठी घराबाहेर पडला, की चुडीदार किंवा झुळझुळीत साडी नेसून, अंगभर दागिने घालून, हलकासा मेकअप करून, केसांत प्‍लास्‍टिकचा गजरा किंवा फुले माळून बाहेर पडायची. जात्‍याच सुंदर असणारी ती अधिकच सुंदर, प्रसन्न दिसायची. कॉलनीतील सगळ्या बायकांचा जळफळाट व्‍हायचा. कारण ती कोणालाच भाव द्यायची नाही. एवढ्या सुंदर, नाजूक बायकोला, तिचा नवरा दारू पिऊन रोज मारहाण कसा करतो आणि ही सुद्धा मुकाट्याने मार का सहन करते, असा प्रश्‍न शेजारपाजारच्या समस्‍त पुरुषवर्गाला पडत होता. काही महिन्यांपूर्वीच ती भाडेकरू म्‍हणून तिथे राहायला आली होती. कोणाच्‍यात मिसळत नसल्‍यानं तिच्‍याबाबत फारशी माहिती कोणालाच नव्‍हती.

कॉलनीतील काही उद्योगी स्‍त्रियांनी मात्र ती एवढी नटून-थटून कोणाला भेटायला जाते, याचा छडा लावायचा ठरविला आणि त्‍याप्रमाणे हेरगिरी सुरू झाली. कधी कधी ती एका गोऱ्या-गोमट्या, तिच्‍याहून वयाने लहान दिसणाऱ्या मुलासोबत कुठे तरी जाते, याचा छडा लागला आणि तिला लेबल्‍स लावण्‍याची एकच अहमहमिका सुरू झाली. बाहेर लफडं आहे, चालूच आहे, तिच्‍या अशा प्रकरणामुळेच नवरा मारत असेल, असं काही असल्‍याशिवाय का एवढे दागिने, कपडे मिळतात? देवा, बरं झालं, अशा बाईपासून चार हात लांब राहिलो ते, नाहीतर आमच्‍या ह्यांना पण जाळ्यात ओढलं असतं... घरबुडवी मेली, बेशरम.. इत्‍यादी अनेक विशेषणांनी तिची आरती होऊ लागली.

लेबल्‍स
मनमोराचा पिसारा : एकतेचं बाळकडू

चर्चा वाढल्यावर कळत-नकळत मीही तिचं निरीक्षण करू लागले. ती सुंदर तर होतीच; पण तिच्‍या सुंदर, नाजूक चेहऱ्यामागे एक वेदना असल्‍याचं मला जाणवलं. संधी मिळाली की तिच्‍याशी बोलून त्‍या वेदनेमागचं आणि एकूणच प्रवादामागचं कारण शोधायचं, असं मी ठरवलं. अचानक मला ती संधी चालून आली. तिच्‍या नवऱ्याला ताप आल्‍यानं ती फार गोंधळून, भांबावून गेली होती. मी दारात उभी असल्‍याचं पाहून ती माझ्याकडे आली. मी माझ्याजवळ असणारी क्रोसिन तिला दिली आणि नाहीच उतरला ताप, तर डॉक्‍टरांच्‍याकडं जाऊ, असं सांगितलं. नंतरच्‍या दोन-चार भेटीत तिनं तिचं मन माझ्याजवळ मोकळं केलं. घरात असलेले सर्व पैसे, सगळे दागिने घेऊन पळून जाऊन तिनं लग्‍न केलं होतं.

माहेरच्‍या आणि सासरच्‍या घराची दारं तिच्‍यासाठी बंद होती. ज्‍याच्‍यावर तिनं प्रेम केलं, तो अट्टल ‌दारूडा, विकृत स्‍वभावाचा निघाला. तिच्‍याआधीही त्‍याने दोन मुलींना फशी पाडलेलं होतं. तिला त्‍याचं खरं रूप जेव्‍हा कळलं, तेव्‍हा धरणीमायेनं आपल्‍याला पोटात घेतलं तर बरं होईल, असं तिला वाटलं होतं. आपण फसले गेलो, हे आईला सांगावं, म्‍हणून तिनं आईला फोन केला, तेव्‍हा ती पळून गेल्‍यामुळं तिची आई अंथरुणाला खिळली होती, हे तिला तिच्‍या धाकट्या भावाकडनं समजलं. ती सुखात असलेली पाहण्‍यासाठी ती माउली तळमळत होती. आपण संसारात सुखी असल्‍याचं पाहून तिच्‍या प्रकृतीत नक्‍कीच सुधारणा होईल, हे तिला माहीत होतं. म्‍हणूनच ती तिचे कडक स्‍वभावाचे बाबा आणि दादा घराबाहेर पडले, की आईला भेटून येत होती.

लेबल्‍स
माध्यम स्वातंत्र्यवीर!

कधीमधी तिचा धाकटा भाऊ तिला घेऊन जाण्‍यासाठी कॉलनीच्‍या कोपऱ्यावर थांबायचा. तिच्‍या घरी गेल्‍याचं बाबांना किंवा तिच्‍या नवऱ्याला कळलं तर अघटित घडेल, या भीतीनं तो तिच्‍या घरी जात नव्‍हता. आईला सुखात असल्‍याचं भासविण्‍यासाठी ती बेन्‍टेक्‍सचे दागिने घालायची, मैत्रिणीकडून मागून आणलेले, तिने वापरलेले पण आता तिला नको असलेले कपडे घालायची. नवऱ्याबद्दल खूप छान बोलायची. तिला सुखात असल्‍याचं पाहून आईच्‍या प्रकृतीत फरक पडत होता. कालांतराने सर्व काही ठीक होईल, या आशेवर ती जगत होती.

लेबल्‍स
मनमोराचा पिसारा : गोड स्वप्नं!

तिचं बोलणं ऐकून तिला नावं ठेवणाऱ्या स्त्रियांच्‍या मानसिकतेची कीव आली. खरंच, आपण किती सहजपणे एखाद्याला मठ्ठ, बावळट, मंद, अक्‍कलशून्‍य, नंदिबैल, चालू, गर्विष्‍ठ, स्‍वार्थी, खडूस, क्षुद्र, कुचकट... अशी विशेषणं म्‍हणजेच ‘लेबल्‍स’ लावतो. सत्‍य परिस्‍थिती जाणून घेण्‍याचे कष्‍टही घेत नाही. बोलताना थोडा विचार करून बोललं गेलं, तर समोरच्‍या व्‍यक्‍तीच्‍या अंत:करणाला चरे पडणार नाहीत. लेबल्‍स लावणाऱ्या व्‍यक्‍तींसाठीही दुसरी कोणीतरी व्‍यक्‍ती लेबल्‍स लावीत असते, याचं भान ठेवलं पाहिजे आणि आपली ही वाईट सवय जाणीवपूर्वक घालवली पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.