हिमनद्यांनी वेढलेला माउंट कामेट

तिबेट व भारताची सीमा म्हणजे विस्तीर्ण पसरलेला हिमालय. लडाखपासून अगदी अरुणाचलपर्यंत तिबेट व भारताच्या मध्ये हिमालयातील विविध पर्वतरांगा अन् नद्यांचा समावेश आहे.
Himalaya Mount Comet
Himalaya Mount Cometsakal
Updated on

तिबेट व भारताची सीमा म्हणजे विस्तीर्ण पसरलेला हिमालय. लडाखपासून अगदी अरुणाचलपर्यंत तिबेट व भारताच्या मध्ये हिमालयातील विविध पर्वतरांगा अन् नद्यांचा समावेश आहे. यातील उत्तराखंड राज्यातील गढवाल भागामध्ये हिमालयातील झस्कार रांगेचा समावेश होतो. या पर्वतरांगेचं वैशिष्ट्य म्हणजे येथील उंचच उंच शिखरं.

पाकिस्तानव्याप्त काश्मीर वगळता भारताच्या हद्दीत असलेल्या हिमशिखरांपैकी दुसरं उंच शिखर म्हणजे माउंट कामेट याच पर्वतरांगेत वसलेलं आहे. पश्चिम हिमालयाचा भाग असलेल्या या शिखराची उंची आहे तब्बल सात हजार ७५८ मीटर. माना, अबी गामीन, मुकुट पर्वत यांच्यासारखी पर्वत शिखरं, विस्तीर्ण पसरलेल्या हिमनद्या अन् अनवट हिमालय यांच्या सान्निध्यात कामेट शिखर उभं आहे.

दुरून पाहिल्यावर असं वाटतं, की हिमानं आच्छादलेला एखादा मोठा पिरॅमिड. ज्याचा माथा हा काहीसा सपाट आहे.

१८५० च्या दशकांत हिमालयातील विविध शिखरं व त्याची विविध रूपं ब्रिटिशांनी जगासमोर आणली. अनादी काळापासून उभ्या असलेल्या, भारताच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष सांगणाऱ्या विविध शिखरांपैकी एक असलेले कामेटचा पहिलं सर्वेक्षण १८५५ मध्ये अँड्रू वॉ यांनी केलं. गिर्यारोहणाच्या दृष्टीनं मात्र कामेट प्रकाशझोतात आले ते १९०७ मध्ये. गिर्यारोहणाच्या क्षेत्रामध्ये कामेटची गणना ही रांगडा पर्वत म्हणून केली जाते.

ब्रिटिश गिर्यारोहक टी. जी. लॉंगस्टाफ़, एम. पी. नोल्स आणि सी. एफ. मीड यांनी या रांगडेपणाचा चांगलाच अनुभव घेतला. सतत बदलणारं हवामान, तुफान हिमवर्षाव आणि मुळात कामेट शिखराची भौगोलिक रचना यांमुळे या शिखरावरील पहिली गिर्यारोहण मोहीम अर्थातच अयशस्वी ठरली. त्या काळात समाजानं आधुनिकतेची कास धरलेली नव्हती.

त्यामुळं अर्थातच गिर्यारोहण क्षेत्रात देखील उपकरणं, विविध संसाधनं यांची ओळख व्हायची होती, त्यामुळे गिर्यारोहकांना समोर येणारी आव्हानं पेलताना सर्वच आघाड्यांवर कस लागायचा. त्या परिस्थितीचा विचार करता कामेट शिखर चढाईचा विचार करणं, हे देखील धाडसाचं होतं. त्यानंतर तब्बल २४ वर्षांनी फ्रँको-स्विस गटाने कामेटचं शिवधनुष्य पेलण्याचा निर्धार केला.

चार्ल्स पाथ यांच्या नेतृत्वाखाली पॉल बाऊर, रेमंड लंबर्ट, क्वेनेट रिली यांनी सर्व आव्हानांचा सामना करत कामेट शिखर गाठलं. त्या काळी इतक्या उंच शिखरावर चढाई करणं हे दुर्मीळ होतं. गिर्यारोहण क्षेत्राची खरी पायाभरणी करण्यात ज्या घटनांचा समावेश होतो, त्यापैकी एक म्हणजे १९३१ ची ही चढाई असं मानलं जातं. गिरिप्रेमीनं देखील १९९४ मध्ये माउंट कामेट शिखर मोहिमेचं आयोजन केलं होतं.

राजेश पटाडे, प्रसाद ढमाल, मोरेश्वर कुलकर्णी, वसंत लिमये अशा तगड्या गिर्यारोहकांचा संघ होता. मात्र, कामेटची आव्हानं गिरिप्रेमीच्या गिर्यारोहकांच्या जिद्दीपेक्षा वरचढ ठरली. मोहीम अयशस्वी झाली. मात्र, या संघाला रिकाम्या हातानं परत जाणं मान्य नव्हतं.

त्यांनी कामेटनं दिलेली हुलकावणी मागे सारून अगदी बाजूलाच उभ्या असलेल्या अबी गामीन या सात हजार ३५५ मीटर उंच शिखरावर चढाई केली. माउंट कामेट शिखराचा मार्ग हा पूर्वेकडील हिमनदीवरून सुरू होतो व मीड कोलच्या मार्गे शिखराकडं जातो.

अबी गामीन व माउंट कामेट शिखराचा मार्ग याच मीड कोलहून वेगळा होता. १९०७ मध्ये जेव्हा पहिल्यांदा कामेट शिखरावर मोहिमेचा प्रयत्न केला होता, त्या वेळी गिर्यारोहक सी. एफ. मीड हे अबी गामीन व माउंट कामेट यांना वेगळं करण्याऱ्या कोलपर्यंत पोहोचले होते. तेव्हाच्या काळाचा विचार करता अशी कामगिरी करणं हे अचाट होतं.

त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून या कोलला मीड कोल किंवा मीड यांची कोल असं नामकरण करण्यात आलं. या कोलहून शिखराकडं जाताना पश्चिमेकडून जोराने वाहणारे वारे गिर्यारोहकांची परीक्षा पाहतात. पठारसदृश भाग खालच्या भागात असल्यानं या वाहत्या वाऱ्यांना मोकळी दिशा मिळते, त्यामुळं यांचा वेग प्रचंड असतो.

सोबतच सततचा हिमवर्षाव व हिमनद्यांमुळं होणारी हालचाल गिर्यारोहकांना हैराण करून सोडतात. या सगळ्या दिव्यांतून पुढं गेलं, की अंगावर येणारी खडी चढण, तिथं असलेला टणक दगड गिर्यारोहकांचे स्वागत करतात, म्हणूनच अनुभवी अन् निष्णात गिर्यारोहकांची देखील कामेट शिखर चढाई करताना दमछाक होते.

कामेट शिखराचं, आजूबाजूच्या परिसराचं भौगोलिक महत्त्व मोठं आहे. तिबेट म्हणजे अर्थात चीन व भारताच्या सीमा ठरविणारा हा परिसर आहे. जुन्या काळापासून तिबेट व भारतामध्ये दळणवळण व विविध व्यापारी मार्ग जे तयार झाले त्यापैकी माना पास हा कामेट शिखर परिसरातच आहे. तसेच कामेटच्या दोन्ही बाजूंनी असलेल्या हिमनद्या या देखील हिमालयाशी निगडित जीवसृष्टीसाठी महत्त्वाच्या आहेत.

कामेट पश्चिम हिमनदी ही कामेट, अबी गामीन व मुकुट पर्वत प्रदेशातून पुढं विस्तारत जाते व सरस्वती नदीचा प्रमुख स्रोत बनते. दुसरीकडे कामेटची पूर्व हिमनदी ही कामेट व माना शिखरांच्या भोवती विस्तारात जाते व पुढे जाऊन धौलीगंगा व अलकनंदा नदीचा मुख्य स्रोत बनते. माउंट कामेट हा ‘ग्लेशियर ऑफ फायर’ म्हणून देखील ओळखला जातो.

सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी सूर्य किरणांनी न्हाऊन गेलेला शिखरमाथा एखाद्या तांबट रंगाच्या मुकुटासारखा भासतो. शिखराहून परावर्तित झालेले सोनकिरणं कामेट शिखराच्या सभोवताली असलेल्या हिमनद्यांवर म्हणजेच ग्लेशियर्सवर अशा पद्धतीनं दिसतात जणू काही या ग्लेशियर्सवर अग्निज्वाला फुटल्या आहेत. हे दृश्य मोहून टाकणारे असते.

भारताच्या पुरातन इतिहासामध्ये देखील माउंट कामेटचा विविध ठिकाणी उल्लेख आहे. हिमालयातील अनेक पर्वतांचं नातं हे भगवान शंकराशी जोडलं गेलं आहे, अर्थात कामेट देखील याला अपवाद नाही. १९०७ मध्ये रानीखेतपासून तब्बल दोन महिने घनदाट जंगलातून वाट काढत गिर्यारोहकांचा संघ कामेटच्या पायथ्याशी पोहोचला होता. आज परिस्थिती बऱ्यापैकी सुधारली आहे.

जोशी मठहून नीती गावापर्यंत ९० किलोमीटर गाडीचा प्रवास करून पुढं बासुधारा मार्गे डोबला ताल या माउंट कामेटच्या पायथ्यापर्यंत २३ किलोमीटरचा ट्रेक करून पोहोचता येतं. हा संपूर्ण मार्ग तसा खडतर आहे, त्यामुळं ट्रेकिंगचा उत्तम अनुभव असेल व नेहमीपेक्षा वेगळा हिमालय बघायचा असेल, तर हा ट्रेक उत्तम आहे.

(लेखक हे ज्येष्ठ गिर्यारोहक असून अखिल महाराष्ट्र गिर्यारोहक महासंघाचे अध्यक्ष आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.