माउंट के-२ : गिर्याराेहकांचं गिरिशिखर

हवेतील ऑक्सिजनचं प्रमाण १-२ टक्के इतकं विरळ होतं. वर्षभर इथे असणाऱ्या वाऱ्यांचा ताशी वेग हा शंभर किलोमीटर किंवा त्याहून अधिक असतो.
Mount K2  mountain peak himalaya thomas montgomery
Mount K2 mountain peak himalaya thomas montgomerySakal
Updated on

- उमेश झिरपे

जगात चौदा अशी शिखरं आहेत, ज्यांची उंची ही आठ हजार मीटरपेक्षा उंच आहे. ही सर्व शिखरे हिमालयातच वसलेली आहेत. यांना अष्टहजारी शिखरं असं म्हणतात. आठ हजार मीटर या उंचीला वेगळं वलय व आयाम आहे. आठ हजार मीटरहून पुढे जेवढं वर जातो, तेवढी तिथे असणारी परिमाणं बदलतात.

हवेतील ऑक्सिजनचं प्रमाण १-२ टक्के इतकं विरळ होतं. वर्षभर इथे असणाऱ्या वाऱ्यांचा ताशी वेग हा शंभर किलोमीटर किंवा त्याहून अधिक असतो. अगदी बोटावर मोजण्याइतके दिवस वगळता. याच दिवसांमध्ये गिर्यारोहक या शिखरांवर चढाई करण्याचा प्रयत्न करतात. जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट या अष्टहजारी शिखरांचं शिरोमणी.

मात्र, चढाईच्या दृष्टीने काठिण्य पातळीमध्ये एव्हरेस्टला देखील मागं टाकणारी जी काही मोजकी शिखरं आहेत, त्यातील अव्वल शिखर म्हणजे ‘माउंट के-२’. भारताच्या उत्तरेला काश्मीरच्या भागांत, ज्याला आपण पाकिस्तानव्याप्त काश्मीर असं म्हणतो.

आठ हजार ६११ मीटर उंच असलेलं ‘माउंट के-२’ हे उंचीनुसार जगातील दुसरं शिखर, अगदी एव्हरेस्टच्या खालोखाल. मात्र, गिर्यारोहणाच्या दृष्टीने त्याहून अवघड. येथील आव्हानांची साक्ष देतं, या शिखरावर आतापर्यंत यशस्वी झालेल्या चढाया.

आजपर्यंत एव्हरेस्टवर अंदाजे आठ-नऊ हजार वेळा चढाई यशस्वी झाली असेल. हाच आकडा माउंट के-२ वर फक्त अंदाजे चारशे इतका कमी आहे. कसलेल्या गिर्यारोहकांचं स्वप्न हे के-२ असतं, म्हणूनच याला गिर्यारोहकांचं गिरिशिखर असं म्हणतात.

एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात म्हणजेच १८५० च्या सुमारास द ग्रेट ट्रिग्नॉमेट्रिक सर्व्हे ऑफ ब्रिटिश इंडिया मार्फत हिमालयातील विविध शिखरांची उंची मोजण्याचं, त्यांचं नामकरण करण्याचं मोठं काम चालू होतं.

यात १८५६ मध्ये थॉमस मॉंटगोमेरी यांनी सर्व्हे दरम्यान काराकोरम हिमालयातील जवळपास २१० किलोमीटरचं एक चित्र रेखाटलं. यात दोन अतिउंच शिखरं त्यांना गवसली, ही काराकोरम परिसरातील होती, म्हणून एकाच नाव ठेवलं, के-१ व दुसऱ्याचं के-२. या सर्व्हे दरम्यान ज्या शिखरांना नावं नाहीयेत त्यांना अशी आद्याक्षरं किंवा इतर अभ्यासातील नोंदीनुसार नावं दिली जायची, पुढे त्यांचं स्थानिक नाव शोधलं जायचं व त्यानुसार त्यात बदल केले जायचे.

यातील के-१ हे मशेरब्रुम या स्थनिक नावानं ओळखलं जायचं, अशी माहिती मिळाल्यावर के-१ हे नाव हटवलं गेलं. के-२ च्या बाबतीत असं काही झालं नाही, म्हणून के-२ हे के-२ च राहिलं. याचं दरम्यान हेन्री हवेर्शाम गॉडवीन - ऑस्टिन यांनी काराकोरम व के-२ परिसरात प्रचंड व झपाट्याने शोध मोहिमा केल्या. त्यांच्या नोंदी आजही अत्यंत उपयोगी व बहुमूल्य आहेत.

जसं जॉर्ज एव्हरेस्ट यांच्या कामाची पावती म्हणून पीक-१५ या ८ हजार ८४८ मीटर या उंच शिखराचं माउंट एव्हरेस्ट असं नामकरण झालं, जगातील सर्वांत उंच असं हे शिखर आहे. तसं के-२ या शिखराचं देखील नामकरण गॉडवीन- ऑस्टिन शिखर करावं अशी मागणी होती, मात्र ती काही पूर्ण झाली नाही. तरीही आज के-२ या शिखरांचं टोपण नाव म्हणून गॉडवीन-ऑस्टिन असंच सांगितलं जातं.

के-२ शिखरावर चढाई म्हणजे गिर्यारोहकांसाठी मोठं आव्हान. आजपर्यंत प्रत्येक चार यशस्वी शिखर चढाया मागं कमीत कमी एक मृत्यू निश्चित आहे. शिखरावर पहिली यशस्वी चढाई झाली १९५४ मध्ये. १९५४ मध्ये ३१ जुलै रोजी इटालियन मोहिमेअंतर्गत अर्दितो डेसिओ, लिनो लॅसदेली व अचाईल कॉम्पॅग्नोनी यांनी के-२ शिखरावर पहिलं पाऊल ठेवलं. त्यानंतर तब्बल २३ वर्ष लागली दुसऱ्या यशस्वी चढाईसाठी. १९७७ मध्ये ९ ऑगस्ट रोजी इचिरो योशिजावा यांच्या नेतृत्वाखाली जपानी मोहिमेने यश मिळवलं.

या सगळ्या मोहिमा झाल्या उन्हाळ्याच्या दिवसांत. जुलै-ऑगस्टमध्ये. हिवाळी दिवसांतील के-२ शिखरावरील पहिली यशस्वी मोहीम घडली ती थेट २०२१ मध्ये. १९५० पासून गिर्यारोहकांनी अष्टहजारी शिखरांवर यशस्वी मोहिमांना सुरवात केली. गिरिशिखरांवर केली जाणारी चढाई ही उन्हाळी दिवसांत असते.

कारण उन्हाळी दिवसांतील हवामान त्या मानानं चढाईसाठी अनुकूल असते. हिवाळी दिवसांत मात्र या शिखरांकडे ढुंकूनही पाहू नये, असं म्हटलं जायचं, कारण वाऱ्याच्या ताशी वेग, चढाई मार्गावरील आव्हाने ही मानवाला जिवंत ठेवणारी नाहीत. अशा वातावरणात प्रत्येक श्वासागणिक गिर्यारोहकांचा शारीरिक व मानसिकदृष्ट्या कस लागतो. हे आव्हान गिर्यारोहकांनी पेलायचे ठरविले अन् त्यातून हिवाळी गिर्यारोहण मोहिमांचा उगम झाला.

एव्हरेस्ट शिखरावर हिवाळी दिवसांतील पहिली चढाई ही १९८० मध्ये झाली. १९८० च्या दशकांत पोलिश गिर्यारोहकांनी हिवाळी गिर्यारोहण मोहिमांना आयाम द्यायचं ठरविलं. आंद्रेज जवाडा यांच्या नेतृत्वाखाली सात विविध अष्टहजारी शिखरांवर मोहिमा यशस्वी झाल्या.

मात्र के-२ तेव्हाही राहिलंच. १९८६ च्या पहिल्या हिवाळी चढाई प्रयत्नापासून ते २०२१ पर्यंत विविध कसलेल्या गिर्यारोहकांचं लक्ष्य होते के-२. यातून अनेक मोहिमा उभ्या राहिल्या, अनेक कडव्या झुंज के-२ शिखराच्या कड्याने पाहिल्या. इथं अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. मात्र, के-२ बधला नाही.

२०२१ च्या जानेवारी महिन्यांत ६० हून अधिक दिग्गज गिर्यारोहकांनी आपला मोर्चा के-२ कडे वळविला. त्यात २२ विविध देशांतील गिर्यारोहक होते व २७ मदतनीस शेर्पा हे शिखरमाथ्यापर्यंत गिर्यारोहकांना साथ देणार होते. हे शेर्पा देखील तेवढेच तगडे व दिग्गज गिर्यारोहकच होते. मोहीम जेव्हा निर्णायक टप्प्यात होती, तेव्हा खराब हवामान, बिकट होणारी परिस्थिती व त्याचा शारीरिक व मानसिकदृष्ट्या होणारा परिणाम बघता अनेक गिर्यारोहकांनी मागे परतायचे ठरविले.

साहजिकच त्यांच्यासोबत असणाऱ्या शेर्पा गिर्यारोहकांना देखील खाली जावे लागणार होते. हे सर्व जण कॅम्प १ - कॅम्प २ च्या इथे असताना निर्मल पूर्जा या दिग्गज नेपाळी गिर्यारोहकाने कल्पना मांडली, की के-२ दृष्टिक्षेपात आहे, जर इतर आंतरराष्ट्रीय गिर्यारोहकांना जमत नसेल तर सर्व नेपाळी शेर्पा एकत्र येऊन चढाई करू या व के-२ शिखर चढाई हिवाळी दिवसांत यशस्वी करण्याचे आव्हान पेलवू या.

सगळ्यांनी होकार भरला व सुरू झाली एक भूतो न भविष्यति चढाई. सगळ्यांना आव्हानांवर मात करत शिखरमाथ्याच्या अगदी थोडे खाली निर्मल पूर्जा, मिन्ग्मा जी शेर्पा, मिन्ग्मा डेव्हिड शेर्पा, मिन्ग्मा तेन्झी शेर्पा, गेलजेन शेर्पा, पेम चिरी शेर्पा, दावा टेम्बा शेर्पा, दावा तेनजिन शेर्पा, किलू शेर्पा व सोना शेर्पा यांनी एकत्र येऊन नेपाळी राष्ट्रगीत म्हणत के-२ शिखरावर पाऊल ठेवले व एक नवा इतिहास घडवला.

अधिकृतरीत्या भारताचा भूभाग असूनही आजपर्यंत एकाही भारतीयाला के-२ मोहिमेवर जाता आले नाही, हे खूप मोठं शल्य माझ्यासारख्या गिर्यारोहकाच्या मनात आहे. पाकिस्तानव्याप्त काश्मीर जो हिमालयाच्या काराकोरम पर्वतरांगेचे घर आहे, तिथं असणारी शिखरं अन् तेथील भौगोलिक वैशिष्ट्यं ही शब्दातीत आहेत. हा संपूर्ण भूभाग लवकरच आपल्या ताब्यात येईल व भारतीय गिर्यारोहक के-२ व इतर अष्टहजारी शिखरांवर तिरंगा डौलाने फडकावतील, हा विश्वास आहे.

(लेखक हे ज्येष्ठ गिर्यारोहक असून ‘अखिल महाराष्ट्र गिर्यारोहक महासंघा’चे अध्यक्ष आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.