राष्ट्रीय स्वयंसेवक संघ : शतकाची हाक

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ : शतकाची हाक
Updated on

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) ही स्वयंसेवी संघटना गेल्या ९५ वर्षांपासून हिंदुत्वाच्या विचाराने राष्ट्रउभारणीचे काम करतेय. या संघटनेला मातृस्थानी मानणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे सरकार आज केंद्रात आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात शिरून चिकाटीने काम करणाऱ्या स्वयंसेवकांच्या या संघटनेचे स्थान केंद्रातील सत्तेमुळे अधिकच महत्त्वाचे ठरले. संघाच्या सर्वांत महत्त्वाच्या पदावरील व्यक्तीची - सरकार्यवाहाची निवडणूक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणी सभेत दर तीन वर्षांनी होते. नुकतीच या पदावर दत्तात्रय होसबाळे यांची निवड झाली. सरसंघचालकाच्या खालोखालचे हे पद. सरकार्यवाह हा संघटनात्मक कामाला, निर्णयप्रणालीला, परिवारातील अन्य संस्थांसोबतच्या संवादाला जबाबदार असतो. व्यवस्थापन शास्त्राच्या भाषेत चीफ ऑपरेटिंग ऑफिसर! 

संघाचे काम व्यक्तीवर अवलंबून नसले तरी सरसंघचालक अन सरकार्यवाह संघटनेच्या कामावर त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव टाकतातच. सामान्यत: १० ते १५ वर्षे असा त्यांचा कार्यकाळ. त्यामुळे प्रत्येक निवड किमान दशकभराच्या कामावर प्रभाव टाकणारी ठरते. नजीकच्या भूतकाळात भैय्याजी जोशी, मोहन भागवत, हो.वे.शेषाद्री यांनी ही जबाबदारी सांभाळली. २०२५ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापनेची शताब्दी असल्याने या वर्षी झालेली दत्तात्रय होसबाळे यांची निवड लक्ष्यार्थाने महत्त्वाची आहे. 

या निवडीतले आणखी एक वेगळेपण. आजवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या मूळ संस्थेत कारकीर्द घालवलेल्या प्रचारकाचीच या पदावर निवड होते. कधीही संघाव्यतिरिक्त संघटनेतील कार्यकर्त्यावर अशी जबाबदारी सोपवली गेली नव्हती.  होसबाळे यांचे तसे नाही. ते संघविचाराने काम करणाऱ्या पण परिवाराचा घटक असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत दोन दशके सक्रिय होते. संघाचे तिसरे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी परिवारातील विविध संघटनांच्या विस्ताराकडे लक्ष दिले. त्यांच्या संगोपनाची जबाबदारी सरकार्यवाहाकडे सोपवली. विश्व हिंदू परिषदेचे अशोक सिंघल, भारतीय मजदूर संघाचे दत्तोपंत ठेंगडी हे संघटनेची जबाबदारी निभावत राहिले पण ते पैतृक संघटनेचे कार्याधिकारी झाले नाहीत. त्यामुळे होसबाळे यांचा अपवाद लक्षात घेण्यासारखा असून जोजावलेल्या संघटनांकडे प्रत्यक्ष संघाची सूत्रे सोपवायला अडचण न वाटणे, हा महत्त्वाचा बदल.

वाजपेयी सरकारच्या काळात संघ आणि भाजप यांच्यातील शीतयुद्ध उघडपणे समोर आले. मोदीकाळात मात्र असे झाले नाही. येत्या काळातही संघ-भाजप संघर्ष टाळणे आवश्यक! या धर्तीवर मोदी सरकार आणि संघपरिवार दोन्ही स्वतंत्रपणे काम करतील, त्यांच्यात संघर्षाचे मुद्दे उपस्थित होणार नाहीत हा सुवर्णमध्य साधण्याची चर्चा दत्तात्रय होसबाळे यांच्या पुढाकाराने झाली असे म्हणतात. भाजपच्या ३०० पैकी किमान १०० खासदार अभाविपमुळे होसबाळे यांच्या संपर्कातले. उत्तर प्रदेशातल्या अत्यंत महत्वाच्या विधानसभा निवडणुकीत परिवाराने सुसूत्रपणे भाजपच्या मागे उभे रहावे, याची रचना करण्यासाठी होसबाळे तेथे एक वर्ष मुक्कामी होते. नॉर्थ ईस्टचा अनुभव ही होसबाळे यांची जमेची बाजू.

सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी दिल्लीत भविष्यातल्या भारताविषयीच्या कल्पना मांडल्या. तंत्रस्नेही वातावरण, आर्थिक नितीने आक्रसलेले जग, त्यामुळे उपलब्ध झालेल्या संधी आणि निर्माण झालेली आव्हाने यांचा एकत्रित धांडोळा संघ घेतोय असे दिसते. भारतातील ५० टक्के लोकसंख्या ३५ वर्षांखालील. पुढच्या पिढीपर्यंत भारतातील शाश्वत मूल्ये कशी पोहोचवणे हीच संघाच्या आगामी वाटचालीची दिशा असेल.

हिंदू विचाराला अनुकूल झालेले वातावरण देशात कायम रहावे यासाठीची सतत संघटनेला सक्रिय ठेवावे लागेल. सत्तेत रमणारे कार्यकर्ते दूर ठेवून, भाजपच्या छायेतून बाहेर येवून, संघाला अभिप्रेत असलेला विस्तार हे आव्हान असेल. ते पेलत नव्या सरकार्यवाहांना पुढच्या शतकाला सामोरे जाण्याची तयारी करावी लागेल. हे शतक कोरोनासारख्या साथींचे, पर्यावरण ऱ्हासाचे, ग्बोबल वार्मिंगचे, भयावह बेरोजगारीचे, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अतिरेकी वापराचे, आर्थिक विषमतेचे असू शकेल. त्यावरचे उत्तर भारतीय विचारधारेत आहे, हे सांगण्याची कसरत फार महत्त्वाची आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.