आदिवासी... जसे आहेत तसे!

महाराष्ट्र शासनाने नुकतंच ‘आदिवासींचे अंतरंग’ नावाचं कॉफी टेबल पुस्तक प्रकाशित केलं आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त त्याची निर्मिती करण्यात आली आहे.
Aadivasinche Antarang Book
Aadivasinche Antarang BookSakal
Updated on

महाराष्ट्र शासनाने नुकतंच ‘आदिवासींचे अंतरंग’ नावाचं कॉफी टेबल पुस्तक प्रकाशित केलं आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त त्याची निर्मिती करण्यात आली आहे. आदिवासींसाठीच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचतात का, याबद्दल कायम आक्षेप नोंदवले जातात. खरे गरजू लाभार्थी होतात काय, याबद्दल शंका घेतली जाते. या कॉफी टेबल बुकचं असं होऊ नये, या अपेक्षेसह पुस्तकाबद्दलचा हा वेचा...

डोंगरकपारीत आणि दऱ्याखोऱ्यांत राहणाऱ्या वन्यजीवांबद्दल शहरीबाबूंना अन् शहरीबायांनाही (हो, महिलांचा उल्लेख हवाच!) प्रचंड कुतूहल असतं. प्राणिसृष्टीतली श्वापदं जंगलात कशी वागतात, जंगलचे कायदे नेमके कसे असतात याबद्दलची उत्सुकता गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढली आहे. जंगल पर्यटन हा कुतूहलाचाचा विषय आहे. त्या परिसरात राहणाऱ्या मानवी आयुष्याबद्दलही अशीच आणि तितकीच उत्सुकता शहरी मंडळींना असते का?

विकासगंगेपासून दूर असलेल्या, डोंगरदऱ्यात, गिरीकुहरात जगणाऱ्या आदिवासींची ओळख नेमकी काय आहे? ते कसे जगतात? जगण्याची त्यांची पद्धत कशी आहे? त्यांची संस्कृती नेमकी कशी असते? त्यांच्या चालीरीती काय? सहज मनात डोकावणाऱ्या या प्रश्नांची नेमकी उत्तरं शोधायचा प्रयत्न कधी आपण करतो का...?

समजा या गिरीजन वनजनांचा विचार मनात डोकावलाच अन् उत्सुकता शमवण्याचा प्रयत्न केलाच तर पार शंभरेक वर्षं मागे जावं लागतं. टाईम मशीनमध्ये बसून! भारतीय लेखक, समाजचिंतक आदिवासींबद्दल विपुल लेखन करत असले तरी जाणते जन जाऊन पोहोचतात ते वेरियर एल्विनपर्यंत. सातासमुद्रापलीकडून आलेला हा ब्रिटिश अधिकारी भारतातल्या आदिवासी जमातीत जाऊन राहिला.

त्यांच्यातीलच एक झाल्याशिवाय त्यांचं जगणं समजणार नाही या भावनेने एल्विन यांनी आदिवासी महिलेशी लग्नही केलं. नंतर हेही शोषणच नाही का, अशा तक्रारीही झाल्या. या तक्रारी रास्तच आहेत; पण आदिवासींच्या दुनियेत डोकवायचं असेल तर एल्विनसारख्यांशिवाय पर्याय नाही. एकुणात आदिवासींना समजून घ्यायचं असेल तर ते परकीय चष्म्यातूनच अशी परिस्थिती! ती रूढ झाली यालाही वर्षं लोटली.

त्याला छेद देणारं काही तरी आता वेगाने घडू लागलं आहे. लेखक लिहिताहेत अन् शासनही त्यांच्या प्रयत्नांना हातभार लावत आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाने नुकतंच ‘आदिवासींचे अंतरंग’ नावाचं कॉफी टेबल पुस्तक प्रकाशित केलं आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त त्याची निर्मिती करण्यात आली आहे. आदिवासींना समजून घेण्यासाठी ते मदत करू शकेल आणि उत्सुकता वाढवण्यात महत्त्वाचं योगदानही देऊ शकेल.

कॉफी टेबल बुकद्वारे उत्सुकता वाढवण्याचे प्रयत्न अनेक प्रतिष्ठान करत असतात. महाराष्ट्रात सार्वजनिक उपक्रम आणि नागरी प्रशासन अशा प्रकारची प्रकाशनं काढत असतात. शासनाचा भाग असलेल्या आदिवासी विकास मंत्रालयातर्फे असं प्रकाशन होणं महत्त्वाचं आहे.

विशिष्ट भूप्रदेशात राहणारे अन् तांत्रिक ज्ञानाच्या दृष्टीने मागास राहिलेला समूह अशी आदिवासींची व्याख्या प्रमाण ठरवून ‘आदिवासींचे अंतरंग’ तयार करण्यात आलं आहे. भौगोलिक निकषावरचं वर्गीकरण दाखवते, की महाराष्ट्रातील आदिवासी पश्चिम भारतातील. भाषा या निकषावर भारतातील आदिवासींचे मंगोलियन, प्रोटो ऑस्ट्रोलाईड आणि नेग्रिटो या तीन वंशांत विभाजन केले जाते. महाराष्ट्रातील आदिवासी या वर्गवारीत नेमके कुठे बसतात? भिल्ल कोरकू प्रोटो ऑस्ट्रोलॉईड वंशाचे; तर कोलाम, गोंड हे नेग्रिटो... ज्याला रूढ अर्थाने आपल्याकडे द्रविडीयन म्हणतात त्या वंशाचे.

वांशिक मूळ पाहिलं तर कोरकू ऑस्ट्रिक भाषा समूहातील आणि गोंड कोलाम द्रविडीयनमधले. भिल्ल वारली ठाकर यांचे वांशिक मूळ इण्डो युरोपियन भाषा समूहाचे. त्यातच महाराष्ट्रातील आदिवासी काही विशिष्ट जिल्ह्यांत एकवटलेले. मुंबई-पुण्याच्या प्रतिभावंत कलासक्त भूभागाजवळ असल्याने ठाकर समाज ‘आम्ही ठाकर ठाकर...’ म्हणून ‘जैत रे जैत’ या सिनेमातून जनतेसमोर आला.

डॉ. मंदा आणि डॉ. प्रकाश आमटे यांचा हेमलकसा प्रकल्प, डॉ. राणी आणि डॉ. अभय बंग यांच्या गडचिरोलीतील ‘सर्च’ संस्थेबद्दलची माहिती असते; पण आदिवासी जमातींची माहिती फारशी सोडा, अजिबात नसतेच. या अनास्थेला छेद देण्याचा प्रयत्न डॉ. राजेश मोरे यांच्या पुढाकाराने साकारलेल्या ‘आदिवासींचे अंतरंग’ या कॉफीटेबल बुकमध्ये केलेला दिसतो आहे.

टीआरटीआयमधील मानवशास्त्रज्ञ डॉ. जॉन गायकवाड आणि डॉ. चिद् विलास मोरे यांचा माहिती स्रोत असा उल्लेख आहे. श्रीकृष्ण परांजपे हे मुख्य छायाचित्रकार आहेत. आदिवासींची, त्यांच्या जगण्याची पाड्यापाड्यावर जाऊन घेतलेली छायाचित्रं हे या पुस्तकाचं बलस्थान आहे. २०११च्या जनगणनेनुसार भारतातील आदिवासींची लोकसंख्येतील टक्केवारी ८.९ आहे.

महाराष्ट्रातील आदिवासी जेमतेम ७३.१८ लाख. २०११ च्या लोकसंख्येत वाढून हा आकडा कदाचित ९० लाख झाला असेल. फार फार तर ९५ लाख. फारच ताणलं तरी सगळा मामला एक कोटीच्या आतला; पण मानववंश शास्त्राच्या दृष्टीने यातील प्रत्येक आदिवासी समाजाचं योगदान संपूर्ण देशाला समजणं फार महत्त्वाचं आहे. पुस्तकाने भौगोलिक विभागांचा निकष लावत आदिवासींची माहिती दिली आहे.

बरीच तपशिलात. सातपुडा, सह्याद्री असे दोन डोंगरकडांचे आणि सपाटीवरच्या गोंडवनाचे तीन विभाग केले आहेत. माहिती जुनीच आहे. परंपरागत प्रथा समजताहेत. त्या त्या समाजाच्या देवदेवता कोणत्या, पूजा पद्धती कशी असते, लग्नं कशी ठरतात यापासून प्रारंभ करून अंत्यसंस्काराची पद्धत काय असते इथवरचं सगळं सोप्या भाषेत सांगितलं आहे.

कोकणा जमातीची माहिती देताना ते ब्रह्नमा आणि वाघदेव जमातीची पूजा करतात. तडवी भिलही वाघदेवालाच पूजतात. हा वाघदेव म्हणजे जंगलचा राजा वाघ नव्हे; तर वाघदेव म्हणजे चंद्र. भिलाला जमात घिरसरी देवतेला कुलदैवत मानते. घरात चार भिंतीआत त्याची प्रतिमा ठेवली जाते. क्षेत्रपाल हे जसे नागरी प्रगत समाजात दिशांचं रक्षण करतात तसंच या समाजात शेतीचं रक्षण करतो खेतरपाल.

धानका जमातीचे लोक आम्ही हिंदू आहोत असं सांगतात, असा उल्लेख पुस्तकात आहे. ते वाघदेव, डोंगरदेव, कलंकादेवी अशा अस्सल आदिवासी आदिम देवतांबरोबरच मारुती, गणपतीचं पूजन करतात. पावरा जमात ही भिल्लांची उपशाखा. पावागड हे गुजरातमधील स्थान त्यांचे मूळ. खानदेशात, बुलडाण्यात पावरा राहतात, असा पुस्तकात उल्लेख आहे. कातकरी हा आदिवासी समाजही संख्येत मोठा. तसा पुढारलेला.

या जमातीत विधवा विवाहाला अनुमती आहे. अन्य नागरी समाजांप्रमाणेच इथे आतेघरी भाची सून चालते. बहुतेक सर्व आदिवासी जमातींत गावात उगवलेली नाचणी, बाजरी, उडद ही धान्यं खाण्याची प्रथा आहे. कोंबडं-बकरं मारून खाण्यात शहरवासी मागे नाहीत; पण आदिवासी समाज त्यांना देवतेला बळी देऊन खातो. शेती प्रथा रुजलेल्या आदिवासी जमातींची माहितीही पुस्तकात सविस्तर दिली गेली आहे. राज्यातील आदिवासी तसे काही जिल्ह्यांत एकवटलेले असले तरी हे जिल्हे भौगोलिकदृष्ट्या पसरलेले आहेत.

मुंबई-नाशिक परिसरातील आदिवासींना शहरीकरणाचा स्पर्श होणं तसं सोपं. हा तसाही महाराष्ट्रातील संपन्न टापू. पण तेथेही संपन्नता अशी ती नाहीच. प्रथापरंपरा पूर्वजांप्रमाणेच आजही पाळल्या जातात. त्याबद्दलचे उल्लेख मनोज्ञ आहेत. राखीव मतदारसंघांच्या राजकारणामुळे असेल, दबावगटामुळे असेल किंवा योजनांवर होणाऱ्या खर्चाच्या मोठ्या आकड्यांमुळे असेल; पण आदिवासींचा विचार सातत्याने होत राहिला.

विकासापासून दूर फेकल्या गेलेल्या आदिवासींमध्येही दलित आहेतच. आदिम राहिलेले. अतिमागास जमात अशी वर्गवारी करत भारत सरकारने प्रिमिटिव्ह व्हलनरेबल ट्रायबल ग्रुप असा दर्जा काही समाजांना प्रदान केला. प्रगतीचा अजिबातच स्पर्श न झालेले हे समाज. महाराष्ट्रातील तीन जातींचा या वर्गात समावेश करण्यात आला आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील माडिया ठाणे जिल्ह्यातलेतील काथोडी, ज्यांना कातकरी असं म्हटलं जातं अन् चंद्रपूर-यवतमाळ या विदर्भातील दोन जिल्ह्यांसह मराठवाड्यातील नांदेडात असलेलं कोलाम. या तीन समाजांचं अधिक सविस्तर चित्रण कॉफी टेबल बुकमध्ये आहे. प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन केलेलं छायाचित्रण समाजजीवन जिवंत उभं करतं. माहिती पूरक आहे. आदिवासींच्या समाजजीवनावर टाकलेला प्रकाशझोत उत्तम आहे.

गरजेचा तर आहेच. फक्त समाजाची स्थिती-प्रगती याचा आढावा पुस्तकात घेण्यात आला असता तर ते योग्य ठरलं असतं. विकास योजनांवर किती निधी खर्च झाला अन् त्यातील किती जिरला, किती फळला हे काही शासन सांगणार नाही, हे निश्चित; पण या आदिवासी शाखांमधले किती लोक शिकले, स्वतंत्र भारतात आयुर्मान किती वाढले, महिलांना आर्थिक-सामाजिक स्वातंत्र्य मिळते आहे का? (आदिवासींमधली स्त्री-पुरुष समानता हा अभिमानाचा आणि अभ्यासाचा विषय आहे), आरोग्य सुविधा किती विस्तारल्या, अमृत महोत्सवातल्या स्वातंत्र्याने आदिवासी भागात उद्योग पोहोचवले का, याचाही आढावा पुस्तकात घेता आला असता.

प्रगतीच्या खुणा पांढऱ्यावर काळे झाले तर बुद्धीला पटतात. देशाने काय केले ते कळून मन समाधान पावते. ‘अनलिमिटेड महाराष्ट्र’सारखी शासनाने छापलेली अन् पंढरपूरच्या वारीची माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फोटोंतून निघालेली देखणी कॉफी टेबल पुस्तकं नजरेला कमालीची सुखावतात. त्यात ‘आदिवासींचे अंतरंग’ या नव्या प्रकाशनाची भर पडली आहे.

पुस्तकाच्या अखेरीस वारली चित्रकार पद्मश्री जिव्या सोमा वशे, बीजमाता राहीबाई पोपरे आणि आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांची सचित्र माहिती आहे. त्यांची यशोगाथा उलगडून सांगितली आहे. या देखण्या आणि संग्राह्य पुस्तकाची प्रत महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांतील सार्वजनिक वाचनालयात तरी असावी. कसा प्रतिसाद मिळतो, ते आता पाहायचे.

महाराष्ट्राच्या आदिवासी भागातही पारतंत्र्याला झुगारून देणारे ठराव झाले होते. या आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांची काही नावे परिचित आहेत; पण अज्ञात योद्ध्यांची नावे त्यांच्यावरील छोट्या टिपणांसह पुस्तक आपल्याला देते, हे विशेष.

mrinalinin@gmail.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.