बिबट्या, वाघ आणि आमचा ‘कार्बन’

एके दिवशी सकाळी मामा धावत धावत आले. जमिनीमध्ये त्यांना मोठ्या पंजाचे ठसे उमटलेले दिसले. ‘वाघ आला, वाघ आला’ म्हणत त्यांनी अख्ख्या गावाला बोलावलं, त्याची ही गोष्ट...
Home
HomeSakal
Updated on

एके दिवशी सकाळी मामा धावत धावत आले. जमिनीमध्ये त्यांना मोठ्या पंजाचे ठसे उमटलेले दिसले. ‘वाघ आला, वाघ आला’ म्हणत त्यांनी अख्ख्या गावाला बोलावलं, त्याची ही गोष्ट...

आमच्या शेतात आम्ही राहू शकत नसलो तरी घावरीच्या आमच्या छोट्याशा घरात मात्र आम्ही छान रमलो होतो... आमच्यापेक्षा आमचा ‘कार्बन’ (आमचा श्वान) जास्त रमला होता... कुठल्याही प्राण्याला शेवटी घरात ठेवलं तर ती शिक्षाच असते... आणि इथे थेट जंगल! पुण्याच्या घरामध्ये असताना हुप्प्यासारखा बसलेला असायचा तो. इथे किती हुंदडू आणि किती नको, असं झालं होतं त्याला...

मामा-मामींनी (ज्यांच्या घरात आम्ही राहत होतो) त्यांच्या शेतात गहू पेरला होता. आजूबाजूला पूर्ण जंगल असल्यामुळे वानरांचा त्रास हा कायमच होता. ‘कार्बन’ आता मस्त वानर पिटाळायला लागला होता... मामींनी ‘धर धर धर धर’ म्हणून हाक मारली की हा उड्या मारत गेलाच त्यांच्या मागे. त्याच्या आणि आमच्या पायांना माती लागत होती आणि इतक्या वर्षांचा सगळा क्षीण स्वतःमध्ये शोषून घेत होती. आम्ही बरे होत होतो, शरीराने आणि मनानेसुद्धा!

घावरीमधल्या आमच्या घराच्या वास्तव्यामध्ये इतक्या सुंदर गोष्टी आम्ही पाहिल्या... घराच्या डाव्या बाजूला एक डेरेदार झाड होतं. त्याच्यावर रोज सकाळी आम्हाला पॅराडाईज फ्लाय कॅचर (Paradise Fly Catcher) दिसायचा. एरवी एक्झॉटिक बर्ड (Exotic Bird) म्हणून तो गणला जातो, पण इथे रोज आमच्यासमोर... Magpie Robin, Oriole, Barbet, Malabar Whistling Thrush, Red-Whiskered Bulbul... किती किती नावं घ्यावीत. सकाळ व्हायची ती त्यांच्या आवाजानेच...

मामा-मामींनी त्यांच्या शेतात गहू पेरला होता... त्या शेतामध्ये रोज होत जाणारे बदल हे इतके सुंदर होते... एके दिवशी मात्र फारच मजा झाली. दिवशी म्हणजे रात्री. माझी आई महाबळेश्वरला आमच्याबरोबर राहायला आली होती. सोबत ‘कार्बन’ होताच... त्या रात्री मामा-मामी त्यांच्या गावामध्ये गेले होते. दोन-तीन दिवसांसाठी सगळी जबाबदारी आमच्यावर टाकून गेले होते...

गहू चांगला वर आला होता आणि त्याच्या लोंब्या खायला वानर अन् बाकी प्राणी यायला लागले होते... रात्री साधारण दीड-दोनची वेळ असेल...‘कार्बन’ जोरजोरात भुंकायला लागला. इकडे राहून त्याची चाहूल पक्की झाली होती. एरवी कोणी माणूस आला तर त्याचं भुंकण वेगळं असतं, पण त्या रात्री मात्र तो वेड्यासारखा भुंकत होता. दारावर धावून जात होता.

कोणीतरी जनावर शेतात आलं होतं हे नक्की. आम्ही पूर्णपणे जंगलात राहत असल्यामुळे बिबट्या असण्याचीही शक्यता होती. सोबत ‘कार्बन’ असल्यामुळे भीती असायचीच. गावात बिबट्याने अनेक कुत्र्यांना उचलून नेलं होतं. बरं, त्यात मामा-मामी शेत आमच्यावर सोडून गेले असल्यामुळे बाहेर जाऊन काय आहे हे बघणं अनिवार्य होतं... आई घाबरली होती. तिला ‘कार्बन’ला धरून ठेवायला सांगितलं, कारण तो बाहेर पळाला असता तर सगळंच अवघड झालं असतं...

मी आणि स्वप्नील बाहेर पडलो. समोर बघतो तर काय... गव्यांचा एक अख्खा कळप शेतात शिरला होता आणि आरामात चरत बसला होता. दोन मोठे होते. नर-मादी अंधारात ओळखणं शक्य नव्हतं आणि एक लहान पिल्लू होतं. झाली न पंचाईत... आता करायचं काय? बरं, काही करायला गेलो आणि ते अवजड धूड अंगावर धावून आलं तर अवघड होतं.

त्यांच्या एका ढुशीने घराचं दार मोडून पडलं असतं, पण शेत वाचवणं तर गरजेचंच होतं... काहीच न सुचून आम्ही ओरडायला लागलो... पण त्याचा त्यांना काहीही फरक पडला नाही. बराच वेळ प्रयत्न केल्यावर स्वप्नील घरातला टॉर्च घेऊन आला आणि त्यांच्या दिशेने मारायला लागला... मला भीती वाटत होती की ते त्या दिशेने धावत आले तर काय? पण टॉर्चचा फायदा झाला.

गव्यांच्या डोळ्यांवर प्रकाश पडल्यावर ते कदाचित घाबरले आणि जंगलाच्या दिशेने निघाले... आमच्या जीवात जीव आला. आम्ही हसत म्हणालो, ‘‘चला, पुढे जाऊन आपल्या मुलांना सांगायला एक (छोटीशी) शौर्यकथा मिळाली!’

अजून एके दिवशी अशीच मजा... गव्हाची रोपं वर येत असताना ‘कार्बन’ला त्या शेतात आम्ही जाऊ देत नव्हतो. तो गेला की नुसता नाचून यायचा आणि वर आलेली रोपं तुडवली जायची. ‘कार्बन’ तसा गुणी आहे. आम्ही समोर असताना त्याला नाही म्हटलं की तो नाही जायचा तिकडे... एके दिवशी सकाळी मामा धावत धावत आले.

आदल्या दिवशी त्यांनी रोपांना पाणी दाखवलं होतं. जमीन ओली होती आणि त्यामध्ये त्यांना मोठ्या पंजाचे ठसे उमटलेले दिसले. ‘वाघ आला, वाघ आला’ म्हणत त्यांनी अख्ख्या गावाला ते पंजे बघायला बोलावलं... सगळे जण येऊन डोकं खाजवून जात होते. येऊन येऊन अप्रूप म्हणून तो पंजा बघत होते.. वाघाबद्दलच्या गोष्टी बनायला सुरुवात झाली होती. कसा आला असेल, कुठून आला असेल..? गाव म्हटलं की कोणता पण विषय पुरतो.

सगळे एकत्र येऊन चर्चा सुरू होते... हे सगळं चालू असताना ‘कार्बन’ घरातून सटकला. सगळे जिथे जमले होते तिकडे गेला आणि त्यांच्या पुढ्यात नाचायला लागला. अर्थातच शेतात असल्यामुळे मामांनी त्याला तिथून हुसकून लावलं आणि घरी पाठवलं. तो गेल्यावर खाली बघतात तो काय? वाघाचा ठसा हुबेहूब ‘कार्बन’च्या पायाच्या ठशासारखा होता...

रात्री कधीतरी आमचं लक्ष नसल्याचं बघून ‘कार्बन’ शेतात फिरून आला असणार आणि अर्थात माती ओली असल्याने पायाचे ठसे उमटले असणार... सगळ्यांच्याच लक्षात ती गोष्ट आली आणि मग ते सगळे मामांना हसायला लागले... ‘लेका कुत्रा आणि वाघातला फरक कळत न्हाय होई’ एक जण बोलला आणि आम्हालाही हसू अनावर झालं. पुढचा अख्खा महिना मामा दिसले की जो तो हाक मारायचा, बघा बघा... घावरीचा वाघ आला!

या सगळ्यामध्ये शेतावर काम करायला एका जोडप्याच्या शोधात आम्ही होतो... पण महाबळेश्वरमध्ये कामाला माणसं मिळत नव्हती. सगळे हॉटेलमध्ये तरी कामाला होते किंवा बंगलेवाल्यांकडे माळी काम करत होते.

हाताखाली कोणी नसेल तर काहीच सुरू करता येत नव्हतं आणि एके दिवशी आमच्या एका मित्राचा आम्हाला फोन आला, की नंदुरबारवरून एक जोडपं त्याच्या १८ वर्षांच्या मुलाबरोबर घेऊन इकडे येऊन राहायला तयार आहे... आम्ही आनंदून गेलो. पुण्याला जाऊन त्यांना गाडीत बसवून घेऊन आलो. त्यांचा संसारसुद्धा गाडीच्या डिक्कीत मावला आणि आता शेत सावरायला सुरुवात होईल, अशा आशा आमच्या मनात पल्लवित झाल्या...

आम्ही ज्यांच्या घरात राहत होतो, त्या मामा-मामींच्या शेतात गहू पेरला होता. दोन-तीन दिवसांसाठी ते त्यांच्या गावी गेले होते. त्याच दरम्यान एका रात्री साधारण दीड-दोन वाजता ‘कार्बन’ जोरजोरात भुंकायला लागला. कुठलेतरी जनावर शेतात आलं होतं. बिबट्या असण्याची शक्यता होती. सोबत ‘कार्बन’ असल्यामुळे भीती असायचीच. गावात बिबट्याने अनेक कुत्र्यांना उचलून नेलं होतं. आमच्यासोबत माझी आईही होती. ती घाबरली. तिला ‘कार्बन’ला धरून ठेवायला सांगून मी आणि स्वप्नील बाहेर पडलो...

neilandmomo@gmail.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()