पुन्हा नव्याने स्वप्नांचा पाठलाग!

महाबळेश्‍वरमध्ये जमीन घेतल्यानंतर सांगत होतो, की आम्हाला इकडे वेगवेगळे प्रयोग करायचे आहेत. तेव्हा पाठीमागे सगळेच आम्हाला हसत होते...
Dream
DreamSakal
Updated on

महाबळेश्‍वरमध्ये जमीन घेतल्यानंतर सांगत होतो, की आम्हाला इकडे वेगवेगळे प्रयोग करायचे आहेत. तेव्हा पाठीमागे सगळेच आम्हाला हसत होते...

कल्पना के हाथ से कमनीय जो मंदिर बना था

भावना के हाथ ने जिसमें वितानों को तना था

स्वप्न ने अपने करों से था जिसे रुचि से सँवारा

स्वर्ग के दुष्प्राप्य रंगों से रसों से जो सना था

ढह गया वह तो जुटाकर ईंट, पत्थर, कंकड़ों को

एक अपनी शांति की कुटिया बनाना कब मना है

है अँधेरी रात पर दीवा जलाना कब मना है...

- हरिवंशराय बच्चन

कित्येक वेळा वाचलेल्या अनेक गोष्टी अक्षरशः एखाद्या सायकॉलॉजिस्टसारख्या काम करतात... चांगलं वाचन हे वेळोवेळी उपयोगी येतं. दिशादर्शक, मार्गदर्शक म्हणून काम करतं... मी आणि स्वप्नीलने किती वेळा हरिवंशराय बच्चन यांची ही कविता वाचली कोणास ठाऊक; पण आमच्या पुढच्या प्रवासात ‘ती’ आमच्याबरोबर होती.

माणूस माणूस म्हणून का वेगळा आहे? किंवा आपण सगळ्यात प्रबळ प्रजाती का आहोत? याला अनेक कारणं आहेतच. मग भाषा असेल, हत्यारं बनवण्याचं कसब असेल, विकसित झालेला मेंदू असेल... पण त्याचबरोबर मला वाटतं की ‘जाणिवा’ म्हणजे अत्यंत प्रबळ अशा भावना! मग ती भीती असो, संताप असो, एखाद्या गोष्टीबद्दल आदर असो किंवा जगण्याची जिद्द... सगळ्या भावना जर नेमक्या प्रमाणात एकत्र आल्या, तर माणूस जग जिंकू शकतो किंवा संपवू शकतो. दोन्ही गोष्टी सध्या आपण बघत आहोत.

आमच्या बाबतीत या सगळ्या भावना दाटून आल्या होत्याच. जे काही घडलं होतं त्याने भीती मनात बसली होती. काहीही झालं तरी हिंमत हरायची नाही, ही जिद्द होतीच... आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, निसर्गाचा आदर करणं किती गरजेचं आहे, हे समजलं होतं. त्याच्या पाण्याच्या वाटा, त्याने निर्माण केलेले टप्पे, वर्षानुवर्षं राखलेलं गवत, वाढलेली झाडं आणि त्याच्याभोवती फिरणारं निसर्गचक्र... आपण त्याला समजून नाही घेतलं आणि त्याचा धीर सुटला.

आपण सगळेच या वाटेवर खूप पुढे आलो आहोत. आता फक्त मागे जायला पाहिजे. कधी कधी पुढे जाण्यापेक्षा चार पावलं मागे आलो तर जास्त प्रगती होते... स्वप्नीलला त्याने केलेला अभ्यास प्रत्यक्षात उतरवायचा होता; पण त्यासाठी आमचं नशीब आणि निसर्ग एवढा मोठा प्लॅन करेल, असं वाटलं नव्हतं. जणू काही तो म्हणत होता, अभ्यास केलास ना? आता परीक्षा दे...

महाबळेश्वरमध्ये बाहेरून येऊन जमीन विकत घेणाऱ्या लोकांना ‘शेठ लोक’ म्हणायची पद्धत आहे. म्हणजे कोण? जे येतात, जमिनी विकत घेतात, फार्म हाऊस बांधतात आणि दोन महिन्यांतून एकदा कधी तरी पार्टी करायला येतात... त्यांच्याकडे बघण्याची, त्यांच्याशी वागण्याची, त्यांना ज्या प्रकारे मदत केली जाते, त्याची पद्धतसुद्धा पूर्णपणे वेगळी असते. त्यात चूक काहीच नाहीये. परक्या माणसाला लगेच कसं आणि कोण आपलं म्हणेल? त्यासाठी कष्ट घ्यायलाच लागतात... आम्हाला तिकडून सुरुवात करायची होती.

जमीन विकत घेतली तेव्हा आम्ही आमच्या एजंटपासून ते पार वरच्या लेव्हलच्या ऑफिसरपर्यंत सगळ्यांना सांगत होतो, की आम्हाला इकडे शिकवायचं आहे. जमिनीवर वेगवेगळे प्रयोग करायचे आहेत... तोंडावर नाही; पण पाठीमागे सगळेच हसत होते. बरोबर आहे. कोण विश्वास ठेवेल? मी एक यशस्वी अभिनेत्री... स्वप्नील उच्चशिक्षित, मुंबईमध्ये वाढलेला... म्हणे गावात येऊन राहायचं आहे.

शेती करायची आहे. शिकवायचं आहे... पटण्यासारखं नव्हतंच! आणि म्हणून पहिल्यांदा जमीन व्यवस्थित करण्याच्या आधी सगळ्यांबरोबरचे संबंध नीट होणं गरजेचं होतं. आम्ही खरंच त्यांच्यापैकीच आहोत हे त्यांना जाणवणं महत्त्वाचं होतं. बाकी बिरुद मागे टाकून माणूस म्हणून ओळख मिळवण्याची गरज होती...

आमच्या शेतावर घराची नोंद होती... पण घर नव्हतं. म्हणजे पूर्णपणे पडलेलं. धुळीने माखलेलं असं एक खोपटं होतं. तिथे राहणं शक्य नव्हतं. मुळात पाणीच नव्हतं तर राहायचं कसं? घराचा शोध सुरू झाला... महाबळेश्वरमध्ये काही घरं बघितली; पण एक तर रोज इतका प्रवास करणं शक्य नव्हतं आणि आम्हाला काहीही कामं सुरू करायची असतील, तर आमच्या शेताजवळ राहणं गरजेचं होतं.

आधी नशिबानेच वाट लावली होती आणि आता तेच साथ देत होतं... आमच्या गावाच्या शेजारील गावात एका शेतकऱ्याने त्याच्या शेतात नुकतंच एक घर बांधलं होतं. तो भाडेकरूच्या शोधात होता. चालत ४० मिनिटांत आणि गाडीने १५ मिनिटांत शेतावर हजर होता येणार होतं. आम्ही बघायला गेलो.

अगदी छोटंसं दोन खोल्या असलेलं; पण आजूबाजूला नजर टाकावी तिकडे फक्त जंगल आणि शेती असलेलं घर आमची वाट बघत होतं... आम्ही पाहता क्षणी घराच्या प्रेमात पडलो आणि ३ डिसेंबर २०२१, आमच्या लग्नाच्या वाढदिवशी एका गाडीत मावणारा आमचा संसार घेऊन महाबळेश्वरला शिफ्ट झालो...

घरामध्ये फक्त ओटा होता. बेडरूम म्हणजे पाऊल टाकलं की संपायची. एक छोटुसं कपाट. कपाट नाहीच, ड्रेसिंग टेबल. डबल बेड होता; पण त्यावर एकच माणूस झोपू शकेल असा... बरोबर आणलेलं सामान ठेवायचं कुठे? आम्ही आमच्या घरमालकाला कपाटासंबंधी विचारलं. तो म्हणाला, हे एवढं मोठं पुरणार नाही तुम्हाला? त्याच्या डोळ्यात आश्चर्य होतं. कदाचित त्या कपाटात त्याचा अख्खा संसार मावत असेल...

मुंबई सोडून महाबळेश्वरला निसर्गाच्या सान्निध्यात राहून जगण्याचा एक नवा पर्याय आम्ही स्वीकारला होता. त्यासाठी स्वतःचं शेत हवं म्हणून आम्ही मालुसर गावातील जागा निवडली आणि नव्या स्वप्नांच्या दिशेने झेप घेतली... पण मुसळधार पाऊस आला आणि ज्या कारणांसाठी आम्ही जमीन विकत घेतली होती, ती सगळी बरोबर घेऊन गेला, तरीही आम्ही हार मानली नाही...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.