आधार, विश्वास अन् शब्द लाखमोलाचा!

गावातल्या बायकांना जसा कामाचा उरक असतो तेवढा मला नव्हता. भाकरी आणि कालवण केलं की त्यांचं जेवण पूर्ण होतं.
Village Work
Village WorkSakal
Updated on

गावातल्या बायकांना जसा कामाचा उरक असतो तेवढा मला नव्हता. भाकरी आणि कालवण केलं की त्यांचं जेवण पूर्ण होतं. इथे आमचं सगळंच साग्र-संगीत... दिवस घरच्या कामांमध्येच जायचा. त्यामुळे शेताकडे अजूनही नीट लक्ष देता येत नव्हतं आणि नक्की कुठून सुरुवात करायची, हेही कळत नव्हतं...

आम्ही गावात राहत होतो, त्यामुळे सगळी कामं आपली आपल्याला करावी लागत होती. हाताखाली कोणीच नव्हतं. सकाळी उठणं, मग स्वयंपाक, झाडू, भांडी, जेवण, परत भांडी... मग शेतावर जाणं. पुन्हा स्वयंपाक. पुन्हा भांडी अन् थकून झोपणं...

हे सगळं ठीक होतं; पण कपडे... मला ते धुणं शक्यच नव्हतं. म्हणजे गरज पडेल तसे धुवावे लागतच होते; पण जीव जात होता हे खरं. मग आम्ही कपडे पुण्याला घेऊन यायचो. धुऊन परत घेऊन जायचो; पण हे प्रॅक्टिकल नव्हतं... वॉशिंग मशीन घ्यायची ठरलं. चूक केली की मी ती ऑनलाईन मागवली. यायला एक महिना लागला. बरं आली तर ‘डेड’ मशीन आली... परत धावपळ.

तिकडे छोट्या गावी रिपेअर करणारा यायलासुद्धा काही आठवडे जातात. शेवटी दोन महिन्यांनी सगळी धावपळ, भांडाभांड, वाट बघणं, कपड्यांची पुणे-महाबळेश्वर वरात असं सगळं करून जेव्हा मशीन सुरू झाली तेव्हा आई शप्पथ सांगते, आनंद म्हणजे काय, ते कळलं. त्या रात्री आम्ही जोरदार पार्टी केली... कारण काय होतं? तर घरी वॉशिंग मशीन आली होती...

पण लवकरच एक गोष्ट आम्हाला जाणवली की, मदत गरजेची होती. गावातल्या बायकांना जसा कामाचा उरक असतो तेवढा मला नव्हता. भाकरी आणि कालवण केलं की त्यांचं जेवण पूर्ण होतं. इथे आमचं सगळंच साग्र-संगीत... दिवस घरच्या कामांमध्येच जायचा. त्यामुळे शेताकडे अजूनही नीट लक्ष देता येत नव्हतं आणि नक्की कुठून सुरुवात करायची, हेही कळत नव्हतं.

गावामध्ये कोणाशी ओळखीही नव्हत्या... पण इथे आमच्या मदतीला धावून आला, आमचा जीवन काका महाबळेश्वरकर आणि राजू दादा भोसले. आम्ही हाक मारावी आणि त्यांनी प्रेमाने पुढाकार घेऊन आम्हाला सगळी मदत करावी... जीवन काका आणि राजू दादांची ओळख नाही असं महाबळेश्वरमध्ये कोणीच नव्हतं.

घरच्या विजेच्या अर्जापासून ते आम्ही जमिनीवर पूजा केली तेव्हा खांद्यावर वाहून जेवण आणण्यापर्यंत ते होतेच! त्यांचा प्रचंड आधार होता... आहे. जीवन काकाच आम्हाला पहिल्यांदा संतोष आप्पांकडे घेऊन गेला... संतोष आप्पा म्हणजे चिखलीमध्ये झालेली आमची पहिली मैत्री. त्यांना पहिल्यांदा भेटले तेव्हा क्षणभर घाबरायला झालं. कारणही तसंच होतं.

उंचपुरे, धिप्पाड... नजर पण भेदक. गावचं पाणी प्यायलेले आणि सगळंच पुरेपूर ओळखून असणारे असे. मी मनात म्हटलं की, यांच्याकडे जेवायला तर आलो; पण नक्की काय गप्पा मारणार? आणि दुसऱ्या सेकंदाला माझे सगळे गैरसमज दूर झाले... वरून राकट दिसणारा हा माणूस आतून अगदी निरागस होता. त्यांच्या बोलण्यात-हसण्यात ते दिसत होतं.

१५ मिनिटं भेटायला गेलेलो, आम्हाला तीन तास कसे गेले कळलंसुद्धा नाही. स्वप्नील त्यांच्याशी बोलायला लागला... झाडं-फुलं-शेतीबद्दल बोलणं सुरू झालं आणि संतोष आप्पांच्या डोळ्यात आश्चर्य दिसायला लागलं... शहरात वाढलेला हा माणूस आणि याला शेतीमधलं एवढं कळतंय? कसं?

आम्ही महाबळेश्वरमध्ये राहायला लागल्यापासून किंवा जमीन विकत घेण्याच्या प्रक्रियेमध्येसुद्धा कोणाचाच आमच्यावर विश्वास बसत नव्हता की आम्ही इथे हॉटेल बांधण्यासाठी नाही; तर काही तरी वेगळी स्वप्नं घेऊन आलो आहोत. त्यामुळे सुरुवातीला सगळेच पाठीमागे हसत होते.

बघू किती दिवस टिकतंय, हा पण सूर होताच... पण संतोष आप्पांच्या डोळ्यात पहिल्यांदा आम्ही तो विश्वास पाहिला. इतक्या गप्पा झाल्यावर त्यांची खात्री पटली की हे ‘शेठ लोक’ नाहीत तर आपल्यासारखीच माणसं आहेत... ‘काहीही मदत लागली तर हक्काने सांगा... आम्ही आहोत’, हा शब्द त्यांनी दिला, जो ते आजही पाळत आहेत.

रोज दुपारी स्वप्नील आणि मी घरातली सगळी कामं आटोपली की शेतावर जाऊन बसायचो... काहीही न बोलता फक्त बघत बसायचो. जमिनीचं नक्की काय झालंय अजूनही कळत नव्हतं; कारण जवळ जवळ कमरेच्या उंचीइतकं गवत वाढलं होतं. बरं त्यात घुसावं तर आमचे शेजारी आम्हाला तेही करू देत नव्हते...

दोन कारणं होती- जमीन कुठे खचली आहे, कुठे भेगा आहेत, किती खोल आहेत याचा अंदाज नव्हता आणि आपल्याकडे विषारी सापांच्या जितक्या जाती आहेत त्या सगळ्यांचा मुक्त संचार आमच्या शेतावर होता... असणारच! कित्येक वर्षें ती जमीन नुसतीच पडून होती. ते काही स्वतःहून आम्हाला चावायला येणार नव्हते; पण तरीही बाकीच्यांना काळजी वाटणं स्वाभाविक होतं.

कामाला सुरुवात करायला जमीन डोळ्यांना दिसणं फार गरजेचं होतं. आम्ही म्हटलं, ‘चला, मग गवत आपणच कापायला घेऊ.’ विळे विकत घेऊन आम्ही सुरुवात केली आणि दोन तासांतच कळलं की, हे आपल्या ताकदीच्या पलीकडे आहे. कंबरडं मोडणं म्हणजे काय असतं, हे मला पहिल्यांदा कळलं...

‘त्या’ दोन तासांनंतर मी दोन दिवस हलू शकले नाही... मग शोध सुरू झाला, कामाला कोण येऊ शकेल याचा... आम्ही म्हटलं, गावामध्ये आहोत तर माणसं नक्कीच मिळतील; पण तो आमचा गैरसमज होता. गावामध्ये रिकामं बसलेला एकही माणूस नव्हता. तरुण माणसं तर औषधालाही नव्हती... सरतेशेवटी गावामधले ७० वर्षांचे बाबू राजपुरे आमच्याकडे कामाला यायला तयार झाले.

ते आणि त्यांच्याबरोबर त्यांचा मित्र गणपत चव्हाण, साधारण त्यांच्याच वयाचा. आम्ही विचार केला की, ही दोन वयोवृद्ध माणसं किती काम करू शकणार आहेत? पण आम्ही त्यांना काम करताना पाहिलं आणि तोंडात बोटं घातली. शहरातली १५ तरुण पोरं एकत्र केली तरी यांची ताकद जास्त असेल. अख्खं आयुष्य शेतावर आणि कष्टाच्या कामात गेलेलं होतं.

वय वाढलं तरी हाडं मजबूत होती... आमच्यापेक्षा तरुण खरं तर ते होते. तीन-चार दिवस त्यांनी न थांबता काम केलं; पण पाव एकरसुद्धा साफ झालं नव्हतं... कारण एक तर जमीन अजून ओली होती आणि त्यामुळे गवतही अजून छान टवटवीत होतं. ते उपटायला दुप्पट मेहनत करावी लागत होती...

रोजची त्यांची मजुरी आणि राहिलेलं काम याचा विचार केला तर ४०-५० हजार आम्ही नुसतं गवत कापून घेण्यातच खर्च केले असते. शेवटी त्यांनीच आम्हाला सांगितलं, ‘आता दोन महिने थांबा. उन्हाळा वाढला की साफ करायला सोप्पं जाईल...’ त्यांचं ऐकण्याशिवाय आणि पुन्हा एकदा वाट बघण्याशिवाय पर्यायच नव्हता...

निसर्गसंपन्न महाबळेश्वरमध्ये घर साकारण्याच्या स्वप्नाच्या दिशेने आमची नव्याने वाटचाल सुरू झाली होती. आमच्या शेतावर घर नव्हतं. आधी नशिबानेच वाट लावली होती आणि आता तेच साथ देत होतं. पाहता क्षणीच एका घराच्या प्रेमात आम्ही पडलो आणि मुंबईहून तडक महाबळेश्वरला शिफ्ट झालो. सोबतीला नवी आव्हानं होतीच; पण गावकऱ्यांचा आधार, विश्वास अन् दिलेला शब्द लाखमोलाचा ठरला!

neilandmomo@gmail.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.