सोशल मीडियावर प्रेमाचे नाटक करून, ऑनलाईन सेक्सचे प्रलोभन दाखवून सेक्सटिंग केले जाते. स्क्रीनशॉट्स काढून पैसे उकळणे, अश्लील चित्रफिती किंवा नग्न फोटो देण्यास भाग पाडणे असले प्रकार वाढू लागले आहेत. अशाच स्वरूपाच्या ‘सेक्सटॉर्शन’मुळे अलीकडे माटुंग्यात रेल्वे कर्मचाऱ्याने धावत्या लोकलसमोर उडी घेऊन आत्महत्या केली.
त्यामुळे अनोळखी नंबरवरून येणाऱ्या व्हिडीओ कॉलपासून सावध राहा. कुठलाही अनोळखी व्हिडीओ कॉल उचलू नका, उचललाच समजा तरी बोट मोबाईलच्या कॅमेऱ्यावर ठेवा, म्हणजे तुमचा चेहरा रेकॉर्ड होणार नाही.
माटुंगा रेल्वेस्थानकातील घटना. एका रेल्वे कर्मचाऱ्याने धावत्या लोकलसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येमागील कारणांचा शोध जेव्हा घेतला गेला तेव्हा ‘सेक्सटॉर्शन’मुळे सदर व्यक्तीने इतके टोकाचे पाऊल उचलल्याचं समजलं.
सेक्सटॉर्शनच्या घटना भारतभर विविध ठिकाणी आता घडू लागल्या आहेत. त्यामुळे सेक्सटॉर्शन म्हणजे काय, जाळं कशा पद्धतीने टाकले जाते, सेक्सटॉर्शनचे प्रकार कोणते आणि यापासून स्वतःला वाचवण्यासाठी काय केलं पाहिजे, याचा विचार करणं आवश्यक आहे. कारण तरुणाईपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेक जण सेक्सटॉर्शनचे बळी ठरत आहेत.
सेक्सटॉर्शन म्हणजे काय?
एखाद्या व्यक्तीला लैंगिक कन्टेन्टवरून धमकावणे, पैसे मागणे, ब्लॅक मेल करणे, अश्लील कृत्य करण्यास भाग पाडणे, या सगळ्या प्रकाराला सेक्सटॉर्शन म्हटलं जातं. यात प्रेमाचं नाटक करून, ऑनलाईन सेक्सचे प्रलोभन दाखवून आणि इतरही अनेक प्रकारे सेक्सटॉर्शन केले जाते. सेक्सटॉर्शनचे विविध प्रकार असतात.
पिक्चर मॉर्फिंग, मोबाईल/कॅमेरा हॅकिंग, फेक प्रोफाईल सेक्सटॉर्शन, ड्रोन सर्व्हेलन्स, जॉब/कास्टिंग फ्रॉड्स, लोन ॲप्स फ्रॉड्स, फेक कॉल्स, अनेकदा एखाद्या अनोळखी नंबरवरून कॉल येतो. फोन उचलला की समोर एखादी स्त्री किंवा पुरुष नग्न अवस्थेत असतात. ज्याला कॉल आलेला असतो, त्याने घाबरून तो कॉल बंद केला तरी हे सगळं होईतो काही सेकंदाचा कालावधी जातो आणि तेवढ्या वेळेचा व्हिडीओ काढला जातो. त्या काही सेकंदांच्या व्हिडीओमध्ये ती व्यक्ती आणि समोर नग्न व्यक्ती दिसत असतात. व्हिडीओ नातेवाईक, सहकारी यांच्यात व्हायरल करण्याची धमकी देऊन सेक्सटॉर्शन केले जाते.
आपण अनेक प्रकारची ॲप्स डाऊनलोड करतो आणि ती वापरता यावी यासाठी त्यांना सगळ्या परवानग्या देतो. यात अनेकदा हॅकर्स फोनमधले फोटो वापरून, मॉर्फ करून ब्लॅकमेल करू शकतात, तसेच सोशल मीडियावर प्रेमाचे नाटक करून, ऑनलाईन सेक्सचे प्रलोभन दाखवून सेक्सटिंग केले जाते. त्याचे स्क्रीनशॉट्स काढून पैसे उकळणे, धमकावणे ते अश्लील चित्रफिती किंवा नग्न फोटो देण्यास भाग पाडणे असले प्रकार होऊ शकतात.
माटुंग्यात जी घटना घडली, त्यातील व्यक्ती ऑनलाईन सेक्सच्या रॅकेटमध्ये अडकला होता आणि ब्लॅकमेलिंग सुरू झाल्यानंतर घाबरून, बदनामीच्या भीतीने त्याने आत्महत्या केली असावी.
अशा आत्महत्येच्या घटना दोन तरुणांच्या बाबतीतही पुण्यात घडल्या होत्या. ऑनलाईन प्रेमातून त्यांना सेक्सटॉर्शनला सामोरं जावं लागलं आणि त्यातून त्यांनी आत्महत्या केल्या. हे प्रकार कुणाही सोबत घडू शकतात, हे लक्षात घेतलं पाहिजे.
काळजी काय व कशी घ्यावी?
कुठलाही अनोळखी व्हिडीओ कॉल उचलू नका, उचललाच समजा तरी बोट मोबाईलच्या कॅमेऱ्यावर ठेवा, म्हणजे तुमचा चेहरा रेकॉर्ड होणार नाही.
अनोळखी लिंकवर कधीही क्लिक करायचं नाही, अनोळखी मेलवरून आलेली कुठलीही फाईल डाऊनलोड करायची नाही. कारण फोन हॅक होऊ शकतात.
समोर जी नग्न बाई असते, ती बऱ्याच वेळा लाईव्ह चॅटमध्ये नसते, तुम्हाला एक वेगळी क्लिप दाखवली जात असते, हे लक्षात ठेवा.
समजा पैशांची मागणी झाली तर नंबर ब्लॉक करा. या टोळ्या साधारण एका व्यक्तीला जास्तीतजास्त पाच नंबर्सवरून कॉल करतात. जर तुम्ही कॉल ब्लॉक करत राहिलात तर आपोआप तुम्हाला फोन येणं बंद होईल.
न घाबरता सायबर पोलिसांमध्ये तक्रार दाखल करा.
अनोळखी व्यक्तीबरोबर ऑनलाईन जगात मैत्री करताना काळजी घ्या. शक्यतो अशी मैत्री टाळाच. समोरचे प्रोफाईल म्हणजे ती व्यक्ती खरी आहे की नाही आपल्याला समजू शकत नाही. त्या व्यक्तीने सांगितलेली त्याची वैयक्तिक माहितीही खरी असेलच असं नाही. त्यामुळे कुणावरही ऑनलाईन जगात अंधविश्वास ठेवायचा नाही.
आपले फोटो, व्हिडीओ विश्वासार्ह व्यक्तींखेरीज इतर कुणाहीबरोबर शेअर करू नका.
अनोळखी व्यक्ती नको इतक्या सलगीने ऑनलाईन जगात वागत असेल तर तो धोका समजा.
सोशल मीडियाची प्रायव्हसी सेटिंग्स नीट तपासा. फोटो मॉर्फिंग करणे अतिशय सोपे आहे, त्यामुळे आपल्या फोटोंना फक्त मित्रयादीपुरतेच मर्यादित ठेवा.
मोबाईल कॅमेऱ्याला समोर आणि मागे असे दोन कॅमेरे असतात. फोन किंवा लॅपटॉपचा कॅमेरा वापरात नसेल तर त्याला मास्किंग टेप लावून ठेवा. फोनमध्ये चुकून आलेल्या मालवेअरमुळे हॅकरसमोर तुमचे ई-मेल अकाउंट, कॅमेरा, फोटो गॅलरी, कॉन्टॅक्टस या सगळ्या गोष्टी खुल्या होतात आणि त्याचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो.
फोन दुरुस्तीला देण्याआधी नेहमी त्यातला सगळा डेटा लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर काढून सेव्ह केला पाहिजे. फोटो फोनमध्ये असताना कधीही फोन दुरुस्तीला देऊ नका. तुमचे फोटो डाऊनलोड होण्याची आणि चुकीच्या पद्धतीने वापरले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सेकंड हॅन्ड फोन खरेदी करत असाल तर त्यात आधीच एखादे मालवेअर टाकलेले असू शकते. ज्यामुळे तुमची गोपनीय माहिती सहज उपलब्ध होऊ शकते.
सार्वजनिक ठिकाणी बाथरूममध्ये जाताना, ट्रायल रूम वापरताना नीट तपासून घ्या. कुठे छुपे कॅमेरे नाहीत ना याचा अंदाज घ्या.
सेक्सटिंग करणं, स्वतःचे नग्न किंवा अर्ध नग्न फोटो शेअर करणं टाळलं पाहिजे.
अनावश्यक ॲप्स डाऊनलोड करू नका. सध्या भारतात ऑनलाईन लोन फ्रॉड्स मोठ्या प्रमाणात घडतात, त्यामुळे आपण कुठले ॲप डाऊनलोड करतोय ते बघा, त्यांना शक्यतो गॅलरीची परवानगी देऊ नका.
कायदा काय सांगतो?
सेक्सटॉर्शनमध्ये तक्रार दाखल न होण्यामागे अनेकदा नसत्या पोलिसी लफड्यात अडकू आणि आपली बदनामी होईल ही भीती असते. अशावेळी कायदा काय सांगतो, हेही समजून घेतले पाहिजे.
दोन प्रौढांमधील संमतीने झालेला सेक्स चॅट हा कायद्याने गुन्हा नाही; पण त्याचे व्हिडीओ किंवा ते मेसेज जर शेअर केले गेले तर लैंगिक छळासाठी भारतीय दंड संहिता १८६० (आयपीसी) च्या कलम ३५४ अ आणि माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० च्या कलम ६७ (अश्लील सामुग्री ऑनलाईन प्रसारित करणे) अन्वये गुन्हा दाखल होऊ शकतो.
त्या मेसेज आणि व्हिडीओचा गैरवापर करून धमकावले किंवा खंडणी मागितली गेली किंवा अब्रुनुकसानीची धमकी दिली तर हासुद्धा दखलपात्र गुन्हा आहे. त्यामुळे तक्रार दाखल करणाऱ्या व्यक्तीने अजिबात घाबरण्याचे कारण नाही. कायदा त्याच्याच बाजूने आहे. Cybercrime.gov.in या पोर्टलवरही तक्रार नोंदवता येऊ शकते किंवा जवळच्या सायबर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवता येऊ शकते.
सेक्सटॉर्शनमध्ये माणसं त्यांच्याच चुकांमुळे अनेकदा अडकतात. लैंगिक गरजांच्या पुरतीचा मोह, प्रेम आणि आकर्षण, चुकीच्या व्यक्तींवर ठेवलेला विश्वास, व्हेरीफाईड नसलेली ॲप्स डाऊनलोड करणे, कुणालाही स्वतःचे फोटो पाठवणे, त्या फोटोंचा दुरुपयोग होऊ शकतो याचा जराही विचार न करणे अशी अनेक कारणे असतात, ज्यामुळे माणसे यात अडकत जातात.
याचसाठी मुळात डिजिटल माध्यम शिक्षण आवश्यक आहे. सायबर गुन्हे कसे घडतात, आपण त्यात कसे अडकू शकतो हे माहिती असलं पाहिजे, म्हणजे निदान काही प्रमाणात तरी धोके आपण कमी करू शकतो.
(लेखिका ‘सायबर मैत्र’च्या संस्थापक आहेत.)
muktaachaitanya@gmail.com
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.