‘मला सांगितलं त्यांनी, की मावशी सीरियस आहे. पुण्याला जायचं आहे. गाडी निघाली. इथं आलो आणि समोर पाटी, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र. फसवून आणलं. बायको, भाऊ, आई-बाप. एका शब्दानं चर्चा नाही केली... मी ह्याचा सूड घेणार आहे. इथून डिसचार्ज मिळू दे... बघतो एकेकाला. डोकं आउट होतंय माझं, त्यांचे विचार आले की.’
माझ्या समोरचा हा रुग्णमित्र तावातावानं बोलत होता. सोबत होता त्याचा समुपदेशक, माझा सहकारी दत्ता श्रीखंडे. स्थळ, पुण्याचं मुक्तांगण.
‘पण त्या वेळी मी सरेंडर झालो डॉक्टर... शक्तीच नव्हती विरोध करायची...’ तो म्हणाला. हा प्रसंग घडत होता तो त्याचा मुक्तांगणमधला अठरावा दिवस होता.
‘ह्या अठरा दिवसांमध्ये तुझ्या दिनक्रमामध्ये कोणते चांगले बदल घडले आहेत ते आधी पाहू या आणि त्यानंतर मनाची ही जी तगमग होते आहे तिच्याकडे येऊ या आपण? चालेल?’ मी नम्र जिव्हाळ्यानं विचारलं.
तो सांगायला लागला. नियमित उठणं, झोपणं, योग-व्यायामाची सत्रं, वेळेवर चौरस खाणं, लायब्ररी, उपचार सभा, समुपदेशकांसोबत नियमित सत्रं ह्याबद्दल बोलू लागला... गप्पा सुरू झाल्या. मुख्य म्हणजे आम्ही त्याच्या मद्यपानाबद्दल एक शब्दही बोलत नव्हतो. माझ्यासमोरच्या फाइलमध्ये तो सारा इतिहास होताच. वाढणारं व्यसन, त्यामुळं होणारा त्रास ह्यांचा लेखाजोखा तिथं लिहिलेला होता.
‘ह्या मित्राचा साडेचार वर्षाचा छोटा मुलगा आहे. कालच तो फोनवर बोलला ह्याच्याशी.’ दत्ता म्हणाला. आमचे समुपदेशक नियमितपणानं कुटुंबाशी संवाद साधतात. रुग्णाबरोबरही कुटुंबीयांचा दूरसंवाद असतो. ‘‘काय म्हणाला तुला मुलगा?’ मी विचारलं. ‘परत आल्यावर कधी ते ‘घाण पाणी’ प्यायचं नाही असं म्हणाला.’
रुग्णमित्राच्या सुरामध्ये आता आक्रमकता नव्हती. ह्या भावनिक संधीचा उपयोग करत मी त्याला म्हणालो, ‘‘तुझ्या इच्छेविरुद्ध त्यांनी तुला इथं आणून टाकलं हे त्यांचं सपशेल चुकलं हे मी मान्य करतो. त्यांचा सूड घेण्याची तुझी भावना तितकीच स्वाभाविक आहे असं म्हणतो. पण ह्या छोटूनं तुला त्याची जी इच्छा निरागसपणानं सांगितली आहे. त्याचं काय ? ती पूर्ण करणं किती महत्त्वाचं वाटतंय तुला?’’ ‘‘डॉक्टर, सर... मला नाही जायचं परत व्यसनाकडं. पण ह्यांना मी सोडणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ.’ तो म्हणाला.
‘तर मग तू ‘घाण पाणी’ प्यायचं सोडलं आहेस हे तुझ्या मुलाला पुराव्यासह कसं कळणार ? तू घरच्यांशी भांडायला लागलास की ते त्यांची बाजू तुला सांगणार. तुमचं भांडण होणार. पुन्हा पहिल्यासारखं. त्यातून तुझी दारूबद्दलची तीव्र इच्छा पुन्हा जागृत झाली तर तुझी स्लिप (slip) होणार. मग कुटुंबीय तुलाच दोष देणार...’’ मी शांतपणे बोलत होतो. रुग्णमित्र विचारात पडला होता.
‘सूड म्हणजे काय?... त्यांना पश्चात्ताप होणं. त्यांच्या वागण्याचं त्यांना वाईट वाटायला हवं. हेच करण्याचा अजून एक मार्ग मी तुला सांगतो. अजिबात बदलू नकोस ती सूडभावना. पण आपण नावीन्यपूर्ण सूड उगवू.’’ मी म्हणालो.
‘कसा?’ त्यानं विचारलं.
‘व्यसनाची तीव्र इच्छा होऊ नये म्हणून आपण तुझ्या छोट्याचा चेहरा आणि त्याचे शब्द वापरू. इकडच्या वास्तव्यात मिळालेल्या सगळ्या चांगल्या गोष्टी, आरोग्याच्या नेटक्या सवयी, आतमध्ये रुजवू. व्यसनमुक्तीच्या पायावर पुन्हा आपला व्यवसाय उभा करू... प्रगती होत जाईल. काही काळ लोटेल. पत्नी म्हणेल, ‘‘अहो... तुम्हाला त्या वेळी मुक्तांगणमध्ये इच्छेविरुद्ध नेऊन टाकलं ती चूकच झाली आमची.’’ तिच्या चेहऱ्यावर संपूर्ण पश्चात्ताप असेल आणि तू म्हणशील...’’ मी थांबलो. अन् त्याच्या तोंडातून अचानक शब्द आले, ‘‘जाऊ दे ग... जे होतं ते भल्यासाठी.’
आणि आम्ही तिघंही ह्या शब्दांनंतरची शांतता अनुभवत राहिलो.
‘मित्रा, ही भावना कोणती असेल?... विचार कर.’
‘क्षमेची’’ जमिनीकडं पाहत, चाचरत तो म्हणाला.
‘सुडाचं समाधान क्षमेमध्येच असतं. संतापाची ऊर्जा जर प्रगतीसाठी वापरली, विकासाच्या ध्येयामध्ये टाकली तर तिचं रूपच पालटून जातं.’’ मी म्हणालो.
आता तो लक्षपूर्वक ऐकत होता. त्या दिवशी सकाळच्या मी घेतलेल्या प्रश्नोत्तरांच्या गटसत्रामध्ये विवेक आणि अविवेकाच्या व्याख्या कशा असतात ह्यावर चर्चा झाली होती.
स्वहिताचा विसर पडणं आणि परहिताला विस्कटून टाकणं म्हणजे अविवेकानं वागणं. व्यसनामध्ये काय होतं तर क्षणिक सुखाच्या अनुभवाला म्हणजे तात्पुरत्या सुखाला मन ‘कायमचा आनंद’ मानू लागतं. त्यामुळं हा अनुभव वारंवार घ्यायलाच हवा अशी भूमिका बनते. त्याशिवाय ‘परमनंट’ कसा होणार तो अनुभव.
कालांतरानं हा ‘एकच आनंद’ आणि त्याच्याभोवती फिरणारं जीवन अशी परिस्थिती बनते. जी ‘केमिकल’ व्यसनं असतात, म्हणजेच सेवन करायच्या पदार्थांची, त्यामधल्या रसायनांची मनाला गुलाम करायची क्षमता आणि व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वातील कमतरता ह्यांची गाठ बांधली जाते. अविवेकाचा जन्म होतो.
स्वतःच्या अविवेकालाच ‘विवेकी’ म्हणायचं तर वास्तव नाकारायला हवं (Denial). स्वतःच्या बाजुनं जाणारे पुरावे निर्माण करायला हवेत (Rationalization) आणि सारा दोष दुसऱ्यांवर टाकायला हवा (Projection). ह्या आहेत बचावाच्या मतलबी पद्धती. सकाळच्या सत्रातील मुद्द्यांची आम्ही आमच्या रुग्णमित्राबरोबर उजळणी केली.
मी विचार करत होतो, की संभाषणाच्या प्रारंभीच जर मी त्याच्या सूडबुद्धीला आव्हान दिलं असतं तर त्याला त्या मतलबी बचावपद्धती वापरायला एक कारणच मिळालं असत. तसे झाले नाही त्यामुळे त्याला नेहमीच्या तलवारी म्यानाबाहेर काढण्याची संधी मिळाली नाही.
“नातेवाइकांनी तुला मुक्तांगणमध्ये सोडलं तेव्हा तू लागलीच बंड पुकारलं नाहीस. मनामध्ये संताप असतानाही तू इथं राहिलास; त्यामुळं तुला आरोग्याचे फायदे झाले, व्यसनमुक्तीच्या प्रयत्नांना दिशा मिळाली, दत्तासारखा समुपदेशक मिळाला... म्हणजे काही लाभ झाले.” मी म्हणालो.
“होय... दत्तासरांशी बोलून, त्यांच्या स्वतःच्या व्यसनमुक्तीचे अनुभव ऐकून माझा नक्कीच फायदा झालाय. इकडचा स्टाफही मला मदत करतोय. डॉक्टर लोक चांगले आहेत...” तो म्हणाला. “आणि तू सुद्धा चांगला आहेस. तुझं इथं अशा पद्धतीनं राहणं हा तुझ्यातला सद्भाव आहे. तुझा संताप आणि ती सुडाची भावना हा तुझ्यातला त्रासदायक भाग आहे.” “पण म्हणजे मी मुळात चांगला माणूस आहे की वाईट?” त्यानं विचारले.
“मानसशास्त्र उत्तर देईल की तू ‘माणूस’ आहेच हेच सत्य. तुझ्यात सद्भाव आणि दुष्टभाव आहेत. विवेक आणि अविवेक आहेत. त्यांच्यामध्ये पारख करायला शिक. जसे रत्नपारखी असतात तसा विचारपारखी बन. Learn to Discriminate. पण आपलं तत्त्वज्ञान आणि धर्म आपल्याला सांगतो, की तू मुळात फक्त चांगलाच नाहीस तर तुझ्यात ईश्वरी अंश आहे. तूच विशाल असं दैवीपण आहेस.
आपली परंपरा असा कौल देते की Divinity म्हणजे देवत्वाचा आविष्कारच आहे विश्वातील प्रत्येक आकार. बौद्ध विचारसुद्धा हेच सांगतो, की आत्मज्ञान मिळवण्याची पात्रता प्रत्येकाकडं असते. मग तो अंगुलीमालसारखा दरोडेखोर का असेना. आपल्या हिंदू परंपरेतही वाल्या ते वाल्मिकी हा प्रवास आहेच. त्यातही खास असे, की गुन्हेगारी इतिहास असलेली व्यक्ती असामान्य प्रतिभेची उद्गाती ठरली. म्हणूनच ज्ञानेश्वर सांगतात, की अविवेकाची काजळी नष्ट करण्यासाठी विवेकाचे दीप लावू या आणि सूडसंतापाची वाटसुद्धा गोड करू या...'
(लेखक हे विख्यात मनोविकारतज्ज्ञ, विचारवंत, नाटककार, संगीतकार, कवी, चित्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.