का गुदमरतेय मुंबई?

मरीन ड्राईव्ह, नरिमन पॉईंट, वरळी सी फेसवर दिसणाऱ्या उंचच उंच इमारती मुंबई शहराची ओळख.
Mumbai is most polluted city in world after Lahore Mumbai is blessed with naturally purifying air
Mumbai is most polluted city in world after Lahore Mumbai is blessed with naturally purifying airSakal
Updated on

मरीन ड्राईव्ह, नरिमन पॉईंट, वरळी सी फेसवर दिसणाऱ्या उंचच उंच इमारती मुंबई शहराची ओळख. त्या इमारती गेल्या महिन्यापासून स्पष्ट दिसणे अवघड झाले आहे. कारण बिघडलेली हवेची गुणवत्ता... असे काय झाले की मुंबईची हवा इतकी प्रदूषित झाली? का गुदमरतेय मुंबई?

- डॉ. प्राक्तन वडनेरकर

मागील वर्षीदेखील हिवाळ्यातील नोव्हेंबर महिन्यात हवेची गुणवत्ता ही गंभीर प्रकारची होती आणि एवढेच नाही तर जवळपास ६६ दिवस ती तशीच होती. अभिमान वाटू नये अशी गोष्ट म्हणजे या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी ते फेब्रुवारी २०२३ दरम्यान, मुंबई हे जगातील लाहोरनंतरचे सर्वात वायू प्रदूषित असलेले शहर होते.

मग साधा प्रश्न तुमच्या-माझ्यासारख्यांना पडतो, मुंबईमध्ये एवढे वायुप्रदूषण का? पहिल्यांदा हे लक्षात घ्यायला हवं की मुंबईची हवेची गुणवत्ता शक्यतो मध्यम प्रकारची असते. त्याचा अर्थ मुंबईमध्ये कमी वायुप्रदूषण होते, असा कोणी काढू नये.

मुंबईला नैसर्गिकरीत्या हवा शुद्ध करण्याचे वरदान आहे. मुंबईच्या तिन्ही बाजूने अरबी समुद्र आहे, जो दिल्ली किंवा लाहोरसारख्या शहरांजवळ नाही. मुंबईत आठवड्याचे काही दिवस हवा ही जमिनीवरून समुद्रावर आणि समुद्रावरून जमिनीकडे वाहते.

त्यामुळे शहरात होणारे वायुप्रदूषण वाहून नेले जाते किंवा समुद्रावरून येणाऱ्या नवीन हवेने बदलले जाते. म्हणजेच शहरात वाहनांमुळे, उद्योगधंद्यांमुळे किंवा अनेक इतर गोष्टींमुळे होणारे प्रदूषण हे एकतर पांगते किंवा वाहून नेले जाते. या नैसर्गिक देणगीमुळे मुंबई गंभीर वायुप्रदूषणापासून वाचते.

हवेचे अदलाबदल होण्याचे वरदान असलेली सायकल चार-पाच दिवसांत पूर्ण होत असे, पण ते आता आठ-नऊ दिवसांतही होत नाही. या सर्व गोष्टींचा थोडाफार संबंध समुद्रातील पाण्याच्या तापमानाशीदेखील आहे. त्याचबरोबर ला नीना- एल निनोसारखे जगातील हवामान घटकदेखील याला कारणीभूत असतात, पण हे झाले नैसर्गिक घटकांचे; पण मुंबईत होणाऱ्या प्रदूषणाचे काय?

जे मोजले जात नाही ते मॅनेज करणे शक्य नसते. हे लक्षात घेऊनच भारतामध्ये एअर क्वालिटी इंडेक्स २०१४ मध्ये सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डाने नॅशनल एअर मॉनिटरिंग प्रोग्राम (NAMP)च्या अंतर्गत निश्चित केला.

राजधानी दिल्ली, आर्थिक राजधानी मुंबई, पुणे, कोलकाता आणि अहमदाबादसारख्या शहरांत सतत हवेची गुणवत्ता मोजणारी यंत्र बसवण्यात आली. त्यांचे रिअल टाईम निरीक्षण हे भारतीय हवामान संस्था आणि इतर अनेक संबंधित संस्था करत असतात.

पहिल्यांदा आपण एअर क्वालिटी इंडेक्स थोडक्यात समजून घेऊ. यामध्ये मुख्यतः आठ प्रदूषकांचे निरीक्षण केले जाते. ज्यामध्ये २.५ आणि १० मायक्रोमीटरपेक्षा लहान डोळ्यांना दिसू न शकणारे धूलिकण, कार्बन, नायट्रोजन, सल्फर डाय ऑक्साईड, ओझोन आणि तापमान, आद्रता यांचा समावेश असतो.

या सगळ्या प्रदूषकांचा अभ्यास करून एक मार्गदर्शक एअर क्वालिटी इंडेक्स तयार केला जातो. या इंडेक्सची विभागणी (०-५०) चांगले, (५०-१००) समाधानकारक, (१०१-२००) मध्यम, (२०१-३००) खराब, (३०१-४००) गंभीर आणि (४००-५००) घातक या सहा प्रकारांत करण्यात येते. यांचे सतत निरीक्षण नोंदवल्यामुळे, कशामुळे हे प्रदूषण गंभीर स्वरूपाचे होत आहे, हे लक्षात येते.

मागच्या ऑक्टोबर महिन्याचेच उदाहरण घेऊ या. १८ ऑक्टोबर आणि १३ ऑक्टोबरला एअर क्वालिटी इंडेक्स म्हणजेच वायुप्रदूषण हे २७३ आणि २१२ म्हणजे चिंताजनक स्वरूपाचे होते. ऑक्टोबर महिन्यातील १८ तारखेचा अभ्यास करता लक्षात आले की, पीएम २.५ आणि १० हे प्रदूषक त्या दिवशी खूपच जास्त होते. म्हणजेच, बांधकाम उद्योग आणि वाहने यातून मुख्यतः येणारे धूलिकण यांचे कॉन्सन्ट्रेशन हे त्या दिवशी खूपच जास्त होते.

बांधकामसुद्धा या प्रदूषणास कारणीभूत आहे, यात कोणत्याच मुंबईकराला नवल वाटणार नाही. ब्लूमबर्ग वृत्तपत्रानुसार मुंबईमध्ये जगातील एकावेळी सर्वात जास्त क्रेन्स वापरल्या जात असून, हे मुंबईमध्ये बांधकाम उद्योगाला आलेल्या भरतीचे लक्षण आहे.

जागोजागी उभ्या राहणाऱ्या टोलेजंग इमारती हे त्याचे प्रतीक आहे. २०२३ च्या एका मुंबई महानगरपालिकेवर केल्या गेलेल्या अभ्यासानुसार मुंबईमध्ये सध्या थोड्या-थोडक्या नाही तर तब्बल ११ हजार १२५ बांधकामांच्या साईट्स चालू आहेत.

त्याचबरोबर त्यासाठी लागणारे काँक्रीट प्रकल्प हे तर आपण मोजलेच नाहीत. अनेक वर्षांपासून चालू असलेली मेट्रोची बांधकामे, कोस्टल रोडसारखे प्रोजेक्ट्स आपण सर्व मुंबईकर जाणतो. रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी, उघड्यावर माती वाहून नेणारे मोठ-मोठाले ट्रक, डंपर, चिखलाने आणि धुळीने माखलेले रस्ते हे काही मुंबईकर आजच अनुभवत नाहीत.

हे धूलिकण २.५ आणि १० मायक्रोमीटर्स इतके सूक्ष्म असतात. तुमच्या-आमच्या डोक्यावरील केस हा जवळपास ८० मायक्रोमीटर्स इतक्या आकाराचा असतो. यावरून तुमच्या लक्षात आले असेल की हे धूलिकण डोळ्यांना दिसणे शक्यच नाही.

ते हवेत खूप काळ तरंगत राहून मग कालांतराने जमिनीवर जमा होतात. यापासून होणारे रक्तदाब, घसा सुजणे आणि इतर श्वसन रोग हे तर आहेतच, पण एका अभ्यासानुसार पीएम २.५ धूलिकणांचे प्रमाण जर हवेत १० मायक्रोग्रॅमने वाढले तर तुमचे एकूण आयुष्य काही वर्षांनी कमी होते.

आता हे तुम्ही समजून घ्या, हे मुंबईत वाढलेले धूलिकण तुमचे आयुष्य किती कमी करणार आहे. ते इतके भयानक आहेत की रक्तात मिसळून गर्भाशयातील बाळावरही परिणाम करू शकतात. म्हणजेच ज्याने अजून जन्मदेखील घेतला नाही, अशी आपली पुढची पिढी तुमच्या माझ्या प्रदूषणाचे परिणाम भोगणार आहेत.

अनेकदा हित-संबंधांमुळे प्रदूषण नियंत्रणामध्ये बांधकाम उद्योगाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जाते. अनेक प्रगत देशांत अशा बांधकाम प्रकल्पांबाबत कडक नियम आहेत आणि अमलात आणण्यासाठी अनुपालन (compliance) ऑफिसरची नेमणूक महापालिका करते. बांधकाम प्रकल्पांमधून निर्माण होणारे धूलिकण हे डिमॉल्युशन, सँडिंग, ग्राइंडिंग, वेल्डिंग,

वाहनांची वाहतूक, वीट बांधकाम, काँक्रीट तोडणे किंवा ड्रिल करणे, खडी काम किंवा हवेमुळे माती-वाळू उडणे यांसारख्या अनेक गोष्टींमुळे होते. त्यासाठी हे धूलिकण योग्य प्रकारे शोषून घेण्याची आणि साचवून ठेवण्याची व्यवथा करणे,

पाण्याची फवारणी करून धूळ कमीत कमी कशी होईल ही या ऑफिसरची जबाबदारी असते. त्यासाठी अशा प्रकल्पावर काम करणाऱ्यांना एन्व्हॉर्नमेंटल प्लॅन तयार करून तेथील कामगारांना प्रकल्प प्रदूषणमुक्त ठेवणे आणि वाहतूक व्यवस्थापनाचे ट्रेनिंग देणे आवश्यक असते. असे नियम आपल्या इथेही असतील, पण त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही.

नुकताच मुंबई क्लीन एअर प्रोजेक्ट महानगरपालिकेने वायुप्रदूषण कमी करण्यासाठी सुरू केला आहे. त्या अंतर्गत ६५० किलोमीटरचे रस्ते आणि पादचारी मार्ग रोज धुतले जाणार आहेत. त्यासाठी प्रक्रिया केलेल्या पाण्याचे १२१ टँकर वापरले जाणार आहेत.

प्रदूषण नियमांचे पालन न करणाऱ्या आणि योग्य प्रकारे बंधकामाचे साहित्य वाहून न नेणाऱ्या ट्रक आणि बांधकाम व्यावसायिकांना २० हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.

त्याचबरोबर बांधकाम साईट्सवर पुढील १५ दिवसांत स्प्रिंकलर सिस्टिम लावण्याची सक्ती करण्यात येणार आहे. जागोजागी प्रदूषण शोषून घेणाऱ्या अँटी स्मॉग गन्सदेखील महापालिका लावणार आहे. देर आये दुरुस्त आये, पण ते पुरेसे नाही.

२०२२ च्या अभ्यासानुसार आज मुंबईमध्ये जवळपास ४२ लाखांवर वाहने आहेत. महाराष्ट्रातील एकूण चरा कोटी वाहनांपैकी १० टक्के वाहने एकट्या मुंबईत आहेत. आता तुम्हीच सांगा, का नाही होणार शहरात वाहतूक कोंडी? त्यातून होणारे वायू आणि ध्वनिप्रदूषण हे वेगळंच.

भले इलेक्ट्रिक वाहने घेण्याचे प्रमाण वाढले असेल, पण ४६ हजार इलेक्ट्रिक वाहने हे प्रमाण चार कोटी वाहनांसमोर फार छोटे ठरते. २०२२ मध्ये महापालिकेने जवळपास सहा हजार ३८५ मेट्रिक टन प्रतिदिवस कचरा गोळा केला,

जो २०२१ च्या तुलनेत १५ टक्क्यांनी जास्त होता. पण हा कचरा गोळा करण्याचे प्रमाण फक्त शहरातील इमारतींमध्ये आहे. झोपडपट्टीमध्ये आजदेखील हा कचरा अनेकदा जाळला जातो, जो एकूणच वायुप्रदूषण वाढण्यास कारणीभूत ठरतो.

लोकसंख्या आणि तिची घनता यांचा विचार करता भारतीय शहरांची तुलना चीनमधील शहरांशी करणे जास्त संयुक्तिक आहे. जे वायुप्रदूषण मुंबई आज अनुभवत आहे, ते आपला शेजारी असलेल्या चीनमधील शांघाय, शेनझेन आणि गुआंगझाओसारखी शहरे मागील काही दशके अनुभवत आहेत.

त्यावर उपाय म्हणून तेथील सरकारने २०१३ मध्ये प्रदूषण ॲक्शन प्लॅन तयार केला. त्या अंतर्गत सरकारने अतिशय युद्ध स्तरावर जवळपास ३५ कोटी झाडे ३५ राज्यांमध्ये ग्रेट ग्रीन वॉल प्रोजेक्ट अंतर्गत लावली. त्यामुळे २०१३ ते २०१७ एवढ्या कमी काळात धूलिकण (पीएम २.५) प्रदूषणात बीजिंगसारख्या मोठ्या शहरात ३५% टक्क्यांनी घट आली.

पूर्वी या शहरात धूलिकणांचे (पीएम २.५) प्रमाण जवळपास ९० मायक्रोग्रॅम प्रतिघन इतके होते, जे या योजनेनंतर कमी होऊन ६० मायक्रोग्रॅम प्रतिघन झाले. नोव्हेंबरमध्ये मुंबईत धूलिकणांचे (पीएम २.५) प्रमाण हे जवळपास ८५ मायक्रोग्रॅम प्रतिघन नोंदवले गेले, जे जवळपास शांघाय इतकेच होते.

झाडे ही धूलिकणांचे (पीएम २.५, १०) प्रदूषण प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे रोखण्यासाठी खूप महत्त्वाची ठरू शकतात. शहरातील झाडे, त्यांच्या फांद्या आणि पाने हवेतील धूलिकणांना अडथळा निर्माण करतात.

याच वर्षी अमेरिकेत केल्या गेलेल्या अभ्यासात असे लक्षात आले आहे की, शहरी झाडे जवळपास ४.७ ते ६४.५ टन प्रतिवर्ष इतके धूलिकण (पीएम २.५) हवेतून काढू शकतात. मोठ्या पानांची आणि ज्या झाडांची पाने चिकट असतात, ती झाडे हे काम जास्त प्रभावी पद्धतीने करू शकतात. एकप्रकारे ही झाडे नैसर्गिक फिल्टर म्हणूनच काम करतात. मुंबईने २०१६-२०२१ या काळात २०२६ हेक्टर एवढ्या आकाराचे शहरी वृक्षाच्छादन गमावले आहे. आज मुंबईच्या फक्त ४.४ टक्के भागावर झाडे उरली आहेत.

मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी धूलिकण प्रदूषणात जवळपास ४५% वाढ झाली आहे. ही वाटचाल हेल्थ इमर्जन्सीकडे घेऊन जाणारी आहे. आपल्याला कोविड काळातील सर्जिकल मास्क आता पुन्हा बाहेर काढावा लागणार आणि तो रोगजंतूसाठी नाही तर तुम्ही-आम्ही निर्माण केलेल्या हवा प्रदूषणासाठी. किती वेळ या वायुप्रदूषणापासून वाचण्यासाठी तुम्ही-आम्ही मास्क घेणार किंवा घराची दारे-खिडक्या बंद ठेवणार? त्यासाठी आजच एकत्रित येऊ आणि उशीर होण्याआधी या वायुप्रदूषणाला हरवू या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.