संग्रहालय ‘टायटॅनिकच्या नायिके’चं

यंदाच्या आमच्या अमेरिकेच्या ट्रीपला कोलोरॅडोची राजधानी डेन्व्हर इथे जाण्याचा योग आला.
Museum of Heroine of Titanic
Museum of Heroine of Titanicsakal
Updated on

- ऊर्मिला कोचरेकर, saptrang@esakal.com

यंदाच्या आमच्या अमेरिकेच्या ट्रीपला कोलोरॅडोची राजधानी डेन्व्हर इथे जाण्याचा योग आला. अमेरिकेत कुठेही फिरायला गेलात तरी प्रेक्षणीय स्थळं, बागा, म्युझियम, कलादालनं पाहण्याची अत्यंत सुंदर सोय असते. तसंच डेन्व्हरमध्येही असा एक एकत्रित पास होता की ज्यामध्ये पाचसहा ठिकाणं बघण्याची सुविधा होती.

त्यात एक उत्कृष्ट आर्ट गॅलरी, दोन भव्य म्युझियम, एक भलं मोठ्ठं बोटॅनिकल गार्डन (वनस्पतिशास्त्रीय उद्यान), एक ॲक्वेरियम, एक भव्य कलादालन, एक लहान मुलं आणि मोठ्यांसाठी असं शास्त्रीय माहिती देणारं म्युझियम आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे एक होम टूर समाविष्ट होती. ही ज्या घराची टूर होती, ते घर होतं मार्गारेट तथा मॉली ब्राउन या स्त्रीचं ! या म्युझियमचं नावच मुळी मॉली ब्राउन हाउस म्युझियम ! हे घर आहे अमेरिकन परोपकारी, कार्यकर्त्या आणि समाजवादी मार्गारेट ब्राउन यांचे घर. डेन्व्हर, कोलोरॅडो, युनायटेड स्टेट्समधील एक महत्त्वाचे ठिकाणच.

हे मॉली ब्राउनचं घर, मुळात १८८९ मध्ये डेन्व्हरच्या फॅशनेबल कॅपिटल हिल परिसरात विल्यम लँग यांनी डिझाइन केलं आणि बांधलं. मार्गारेट आणि त्यांचे पती जे. जे. ब्राउन यांनी सोन्याच्या खाणकामात भरपूर पैसे कमावल्यानंतर १८९४ मध्ये ते घर खरेदी केले. पुढे १९३२ मध्ये मार्गारेट तथा मॉली ब्राउन यांचा मृत्यू होईपर्यंत ते घर मार्गारेट यांच्या ताब्यात होतं. हे घर खूप जुन्या काळातील असूनही इतक्या सुरेख पद्धतीने जतन करून ठेवलं आहे, की पर्यटकांना ही जुनी वास्तू अगदी प्रेमात पाडते.

या वास्तूचे वैशिष्ट्य म्हणजे सुबक बांधकाम, आतील त्या काळातील उत्तम फर्निचर, स्वयंपाकघर, जेवणघर, झोपण्याची खोली, मुलांच्या खोल्या, महत्त्वाच्या बैठकीसाठीची खोली, अगदी सेवक वर्गाच्या सुद्धा खोल्या... सारं काही नेटक्या आणि विचारपूर्वक रीतीने सजवलेलं असं हे घर आजही अनेक पर्यटक येऊन पाहून जातात.

या वास्तूत गेल्यापासून साहजिकच मार्गारेट तथा मॉली ब्राउन यांच्याबद्दल कुतूहल वाटू लागलं आणि मग या मॉली ब्राउन कोण होत्या या संबंधीची माहिती जाणून घेण्याची उत्कंठा वाटू लागली. ही स्त्री स्वतः महाकाय टायटॅनिक बोटीच्या अपघातातून वाचली आणि तिनं स्वतः सोबत अनेकांना वाचवले. या वाचलेल्यांच्या सेवेसाठी तिला ‘टायटॅनिकची नायिका’ म्हणूनही ओळखले जातं.

विद्वानांच्या मते मॉली ब्राउन तथा पूर्वाश्रमीच्या मार्गारेट टॉबिन या १८ जुलै १८६७ साली मिसीसीपी नदीजवळील मिसुरी राज्यातील हानीबल नावाच्या गावी जन्मल्या. त्यांचं हे घर एक छोटसं तीन खोल्यांचं लहानसं घर होतं. त्यांचे आई-वडील हे आयरिश कॅथलिक स्थलांतरित होते. वडिलांचे नाव होतं जॉन टॉबिन आणि आईचं नाव होतं जोआना टॉबिन तर त्यांची भावंडे होती डॅनियल, मायकल, विल्यम आणि हेलन. लहानपणी त्यांना घरी मॅगी म्हणत असत आणि मॅगीच्या आई-वडील या दोघांचाही हा द्वितीय विवाह होता. घरची परिस्थिती काही फार श्रीमंतीची नव्हती, वडील जवळच्याच हानीबल गॅस वर्क्स नावाच्या कारखान्यात मजूर म्हणून काम करीत असत. लहानपणी छोटी मॅगी जवळच असलेल्या तिच्या मावशीच्या ग्रामर स्कूलमध्ये शिकायला जात असे.

वयाच्या १८ व्या वर्षी मार्गारेट आणि तिचा भाऊ डॅनियल हे दोघे, त्यांच्या सावत्र बहिणीबरोबर म्हणजे मेरी ऍन कॉलीन्स आणि तिच्या नवरा जॉन लँड्रीगन यांच्याबरोबर लेडविल या कोलोरॅडो मधील गावात वास्तव्यास आले. मार्गारेट आणि त्यांचा भाऊ डॅनियल हे एका छोट्याशा दोन खोल्यांच्या लाकडी घरात राहत असत आणि मार्गारेट तेव्हा कार्पेट आणि पडदे शिवण्याच्या दुकानात कामाला जात असत तर डॅनियल खाणकाम मजुरी करत असे. पुढे लेडविल मधील वास्तव्यात मार्गारेट यांना जेम्स जोसेफ ब्राउन भेटले, ज्यांना जे. जे. असं संबोधले जात असे; दोघांचे एकमेकांवर प्रेम जडले आणि मग लवकरच त्यांनी १८८६ मध्ये लग्नही केले.

१८९३ मध्ये जेव्हा जे. जे. यांच्या खाण अभियांत्रिकी ज्ञान आणि प्रयत्नांमुळे लिटल जॉनी माइन येथे मोठ्या प्रमाणात धातू शोधण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. तेव्हा ब्राउन कुटुंबाला भली मोठी संपत्ती मिळाली. त्यांच्या मालकाने, म्हणजे आयबेक्स मायनिंग कंपनीने त्यांना १२ हजार ५०० शेअर्स बहाल केले. तसेच कंपनी बोर्डवर एक मानाची व अधिकाराची जागा दिली. लेडविलमध्ये, तेव्हा मार्गारेटने खाण कामगारांच्या कुटुंबांना मदत करण्यासाठी सूप किचनमध्येही काम केले.

१८९४ मध्ये, जे. जे. यांनी डेन्व्हरमध्ये ३० हजार अमेरिकन डॉलर्सना भला मोठा व्हिक्टोरियन वाडा विकत घेतला, जो आता मॉली ब्राउन हाउस म्हणून ओळखला जातो. १८९७ मध्ये, त्यांनी बेअर क्रीकजवळ साउथवेस्ट डेन्व्हरमध्ये अव्होका लॉज नावाचे एक उन्हाळी घरही बांधलं, ज्यामुळे या कुटुंबाला अधिक सामाजिक संधी मिळाल्या. मार्गारेट डेन्व्हर येथे वुमन्स क्लबची सनदी सदस्य बनल्या. आता त्यांचे ध्येय हे सतत शिक्षण आणि परोपकार करून महिलांच्या जीवनात सुधारणा करणे हे बनले होते.

मार्गारेट ब्राउन आता कलेतही मग्न झाल्या आणि फ्रेंच, जर्मन, इटालियन आणि रशियन भाषेतही अस्खलित झाल्या. मार्गारेट ब्राउन यांनी फ्रेंच संस्कृतीवरील त्यांच्या या प्रेमाला चालना देण्यासाठी अलायन्स फ्रँकाइसची डेन्व्हर मध्ये एक शाखाही स्थापन केली. मार्गारेट ब्राउन या महिलांच्या अधिकारांबद्दलही अत्यंत जागरूक होत्या. त्या काळात त्यांनी महिलांच्या मतदानाच्या अधिकारासाठी मोर्चेबांधणी केली होती.

परंतु, जे. जे. ना मात्र या सामाजिक जीवनात फारसा रस नव्हता आणि त्यामुळे हे जोडपे आता विचारांनी वेगळे होऊ लागले. १९०९ मध्ये, लग्नानंतर बरोबर २३ वर्षांनी मार्गारेट आणि जे. जे. यांनी खासगीरीत्या विभक्त होण्याच्या करारावर स्वाक्षरी केली खरी, पण जरी ते वेगळे राहत असले तरी धार्मिक कारणांसाठी ते कायदेशीररीत्या विभक्त झाले नाहीत. मार्गारेटना प्रवास आणि सामाजिक तथा राजकीय कार्य चालू ठेवण्यासाठी ७०० अमेरिकन डॉलर्स मासिक भत्ता मिळत असे. (आताच्या काळात २४ हजार अमेरिकन डॉलर्स समतुल्य.)

मार्गारेट यांनी डेन्व्हरच्या कॅथेड्रल ऑफ द इमॅक्युलेट या संस्थेच्या स्थापनेसाठीही निधी उभारणीत मदत केली. ही संस्था १९११ मध्ये पूर्ण झाली. तसेच, निराधार मुलांना मदत करण्यासाठी आणि युनायटेड स्टेट्सच्या पहिल्या बाल न्यायालयांपैकी एक न्यायालय स्थापन करण्यासाठी मार्गारेट यांनी न्यायाधीश बेन लिंडसे यांच्यासोबत काम केले.

१९१४ मध्ये म्हणजे स्त्रियांना मत देण्याचा अधिकार मिळण्याच्या सहा वर्षे आधी मार्गारेट ब्राउन या कोलोरॅडोच्या सिनेट सदस्य होत्या आणि त्यांनी अमेरिकन कमिटी फॉर डिव्हा स्टेटेड फ्रान्स या संस्थेच्या संचालिका म्हणून पहिल्या महायुद्धाआधी काम केले. तसेच १९१४ मध्ये खाणकामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी, विशेषत: लुडलो खाण अपघातामध्ये जे खाण कामगार आणि त्यांचे कुटुंबीय भरडले गेले, त्यांच्या मदतीसाठी त्यांनी विशेष प्रयत्न आणि काम केले. तसेच त्यांनी ऱ्होड आयलंड येथील न्यूपोर्ट या शहरात स्त्री हक्क जागृतीसाठी इंटरनॅशनल विमेन्स कॉन्फरन्सही आयोजित केली होती.

पाच सप्टेंबर १९२२ रोजी जे. जे. ब्राउन यांच्या निधनानंतर मार्गारेट ब्राउन यांनी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, की मी जरी जगभरातल्या अनेक राजघराण्यातील आणि महान लोकांना भेटले असले, तरीही जे जे ब्राउन एवढ्या उत्कृष्ट, महान आणि राजेशाही व्यक्ती मी दुसरी कोणीही पाहिली नाही. जे. जे. ब्राउन यांच्या पश्चात त्यांची प्रचंड स्थावर मालमत्ता, खाणी आणि शेअर्स हे सर्व त्यांच्या वारसांना मिळाले खरे, परंतु त्याच्यात काही कायदेशीर भानगडीही उत्पन्न झाल्या होत्या.

जे. जे. यांनी त्यांच्या मृत्यूच्या आधीच बरीचशी रक्कम स्वतःच्या मुलांना देऊन टाकली होती. परंतु त्यांच्या मुलांना मार्गारेट यांना किती रक्कम मिळाली आहे याचा अंदाज नव्हता आणि या मुलांना आई धर्मादाय कामासाठी पैसे खर्च करते ही गोष्ट फारशी आवडत नव्हती. मार्गारेट ब्राउन आणि त्यांची मुलं यांच्यात जवळपास सहा वर्ष या मालमत्ता वाटपावरून कोर्टकज्जे सुरू होते.

१९१२ मध्ये मार्गारेट ब्राउन यांनी पहिले काही महिने पॅरिसमध्ये त्यांच्या मुलीबरोबर घालवले, परंतु या वास्तव्यात असतानाच त्यांना डेन्व्हर येथून त्यांचे सर्वांत मोठा नातू लॉरेन्स पावर ब्राउन हा आजारी आहे असा निरोप आला. त्याबरोबर त्यांनी मिळेल ती पहिली बोट पकडून न्यूयॉर्कला जाण्याचा निर्णय घेतला. ही बोट होती आर एम एस टायटॅनिक.

प्रथम त्यांची मुलगी हेलन ही सुद्धा त्यांच्याबरोबर टायटॅनिकमधून जाणार होती परंतु आयत्या वेळेस तिच्या मैत्रिणींनी लंडनला जाण्याचा बेत ठरवल्यामुळे तिचीही टायटॅनिक वारी रद्द झाली. त्यामुळे एकट्याच मिसेस ब्राउन या टायटॅनिकमध्ये प्रथम वर्गाच्या प्रवासी म्हणून १० एप्रिल रोजी संध्याकाळी बोटीत चढल्या आणि दहा एप्रिलला रात्री ही बोट न्यूयॉर्कला जाण्यासाठी फ्रान्सहून निघाली.

१५ एप्रिल १९१२ रोजी पहाटे दोन वाजून वीस मिनिटांनी ही महाकाय बोट चक्क बुडाली, या भयानक दुर्घटनेला निमित्त झालं ते ही बोट आदल्या रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी हिमनगावर आपटण्याचं. बोटीवरच्या जवळपास दोन हजार दोनशे चोवीस लोकांपैकी पंधराशे लोक बुडून नाहीसे झाले. उरलेल्या लोकांना लाइफ बोट वर चढवण्याच्या जिकिरीच्या कामात मार्गारेट ब्राउन यांनी मोठा पुढाकार घेऊन मदत केली.

सहा नंबरच्या जीवरक्षक होडी (लाइफ बोट) मध्ये त्या स्वतः चढल्या आणि बुडालेल्या टायटॅनिकमधील इतर प्रवाशांना या जीवरक्षक होडीमध्ये चढायला त्यांनी खूप मदत केली. या जीवरक्षक होडीवर हिचन्स (Hichens) नावाचा कॅप्टन होता, तो बोटीवर जास्त प्रवासी झाले म्हणून घाबरून गेला होता. परंतु मार्गारेट ब्राउन यांनी त्याला सगळ्यांना घ्यायला तर लावलंच आणि वर त्याला दम दिला की तू यांना घेतलं नाहीस तर मी तुलाच बोटीवरून फेकून देईन.

अशा रीतीनं या बोट दुर्घटनेतून त्या स्वतः तर वाचल्याच आणि मोठ्या खंबीरपणानं इतर अनेक सहप्रवाशांचे त्यांनी प्राण वाचवले. त्यांनी स्वतः आणि इतर वाचलेल्या सर्वप्रथम वर्गाचे प्रवासी यांची संघटना बांधली. या संघटनेने जे द्वितीय आणि तृतीय वर्गाचे वाचलेले प्रवासी होते त्यांना आर्थिक साहाय्य मिळण्यासाठी आणि मानसिक धक्क्यातून सावरण्यासाठी समुपदेशन अशी खूप मदत केली.

मार्गारेट यांच्या टायटॅनिक सर्व्हायव्हर म्हणून झालेल्या प्रसिद्धीची त्यांना त्यांच्या सामाजिक आणि धर्मादाय कामात पुढे खूप मदत झाली त्यांनी आयुष्यभर स्त्रिया आणि कामगारांच्या हक्कासाठी आणि शिक्षणासाठी खूप काम केले. तसेच टायटॅनिकवरील पुरुषांनी दाखवलेल्या शौर्य आणि साहसाचे ऐतिहासिक जतन आणि स्मारक करण्यासाठी सतत प्रयत्न केले. १९२० साली मार्गारेट यांनी स्वतःची वैयक्तिक आवड जोपासण्यासाठी म्हणून रंगमंचावरही लक्ष केंद्रित केले होते.

२० व्या शतकाच्या शेवटी, भारत हे जागतिक पर्यटकांसाठी एक लोकप्रिय ठिकाण होते. मॉली ब्राउन यांच्या जगभरातील प्रवासादरम्यान, त्यांनी भारतालाही भेट दिली होती. ब्रिटिश साम्राज्याचा अथवा वसाहतीचा एक भाग म्हणून, त्या काळच्या भारतात बऱ्यापैकी विस्तृत रेल्वे प्रवास, प्रासादिक हॉटेल्स अशा व्यवस्था होत्या. पंचतारांकित हॉटेलमध्ये उत्तम मांसाहारी जेवण आणि डाळिंब तसेच विदेशी पदार्थ अशी जेवणाची ऑफर होती.

पाहुण्यांना हत्तीची सवारी, अफूची शेती, वैभवशाली मंदिरे आणि चहाचे मळे देखील पाहायला मिळाले. जगाच्या दौऱ्यावरून परतल्यानंतर मॉली ब्राउन यांनी भारतातील जीवनाबद्दल डेन्व्हरमधील एका वृत्तपत्रासाठी मोठा लेख लिहिला. त्यात त्यांनी असे लिहिले, की भारतातील मंदिरांमुळे त्या मंत्रमुग्ध झाल्या होत्या परंतु भारतातील जातिव्यवस्थेमुळे त्या व्यथित झाल्या. ज्या व्यवस्थेने पुरुष आणि स्त्रियांना बहिष्कृत स्थितीत टाकले, त्यामुळे मार्गारेट अस्वस्थ झाल्या, कारण त्यांनी स्वतः आपला बराच वेळ सर्वांना समान हक्कांसाठी लढण्यासाठी समर्पित केला होता.

जागतिक महायुद्धाच्या आधी आणि नंतरही मार्गारेट यांनी फ्रान्स तर्फे रेड क्रॉस या संघटनेसाठी आणि पुढे अमेरिकन कमिटी फॉर डिव्हा स्टेटेड फ्रान्स ह्या संघटनेतर्फेसुद्धा जखमी फ्रेंच आणि अमेरिकन सैनिकांना मदत तसेच सरहद्दीवरील उद्ध्वस्त झालेल्या भागाची पुनर्बांधणी करण्याकरिता अथक काम केले.

त्यांनी पुढाकार घेऊन स्त्रियांना ॲम्बुलन्स ड्रायव्हर्स, नर्सेस तसेच अन्न वाटप अशा कामात बरोबर घेऊन फ्रान्समधील युद्धातील जायबंदी सैनिकांना फार मोठी मदत केली. या त्यांच्या कामाबद्दल फ्रान्स सरकारने त्यांना १९३२ मध्ये फ्रेंच लीजन ऑफ ऑनर हा सर्वोच्च मानाचा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला.

२६ ऑक्टोबर १९३२ रोजी वयाच्या ६५ व्या वर्षी न्यूयॉर्क शहरातील बार्बिझॉन हॉटेलमध्ये मार्गारेट ब्राउन झोपेतच मरण पावल्या. शवचिकित्सेमध्ये त्यांना ब्रेन ट्यूमर होता असे आढळून आले. त्यांचे दफन त्यांच्या पतीच्या दफनस्थळाच्या शेजारीच करण्यात आले. दफनविधीला जवळचे नातेवाईक व मित्रपरिवार उपस्थित होते. या वेळेला कोणतीही स्तुतिसुमने मात्र उधळली गेली नाहीत. मार्गारेट ब्राउन यांच्या चरित्र लेखकांनी मात्र त्यांचा मरणोत्तर उल्लेख मॉली ब्राऊन आणि अनसिंकेबल मिसेस ब्राउन असा केला आहे.

१९७१ पासून त्यांचं कोलोरॅडोचे घर हे मॉली ब्राउन म्युझियम म्हणून पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. इथली ही म्युझियमची होम टूर ही फक्त त्यांच्या टायटॅनिकमधून त्या वाचल्या एवढीच कहाणी सांगत नाही तर महिलांच्या हक्क आणि मताधिकारासाठी त्या कशाप्रकारे झटल्या हे देखील कथन करते. १९८५ मध्ये मार्गारेट ब्राउन यांना कोलोरॅडोच्या विमेन्स हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करण्यात आले आहे तसेच पॅरिसच्या डिस्नेलँड थीम पार्कमध्ये १९ व्या शतकातील रिव्हर बोट हे मोठे आकर्षण असून ही रिव्हर बोट ''मॉली ब्राउन रिव्हर बोट'' अशी त्यांच्या नावावर आहे.

मॉली ब्राउनबद्दल विचार करताना असं जाणवतं, की त्यांच्या जीवनाचा कुठचा तरी एकच एक असा विशिष्ट पैलू नाही की जो मला त्यांच्या जीवनाच्या इतर पैलूंपेक्षा अधिक आकर्षक वाटला. त्यांचं टायटॅनिक आपत्तीतून धाडसीपणे वाचणं तसेच इतर सहप्रवाशांना वाचवणं, त्यांनी केलेला सामाजिक कारणांसाठीचा अथक संघर्ष, खाणमजूर आणि त्यांच्या कुटुंबाप्रतीची तळमळ, किंवा जगभर एकटीनेच केलेले प्रवास आणि त्या प्रवासात भारतासह अनेक लोकांवर आणि ठिकाणांवर लिहिलेली भाष्ये किंवा जागतिक प्रवासातील त्यांनी जमवलेल्या आकर्षक दर्जेदार विदेशी वस्तूंचे उच्च अभिरुचीपूर्ण संग्रह आणि त्या अभिरुचीपूर्ण संग्रहातून कलापूर्ण रीतीने सजवलेला त्यांचा डेन्व्हरमधील राहता वाडा... जो आता म्युझियम म्हणून लोकांना खुला केला आहे. एक ना दोन पण अनेक कौतुक करण्यासारख्या घडामोडी त्यांच्या अवघ्या पासष्ट वर्षांच्या आयुष्यात त्यांनी साध्य केल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.