'चिमणी-पाखरांच्या' आधाराने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली

अश्विनी देशपांडे
अश्विनी देशपांडेesakal
Updated on

नाशिक : जगण्याच्या लढाईत आपल्या अनुभवाचा समाजाला फायदा व्हावा, नव्या पिढीला घडविण्यासाठी योगदान देता यावे, यासाठी अनेकजण प्रयत्नशील असतात. समाजाच्या वाटचालीत स्वतःची ओळख उभी करतानाच संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी सरसावल्या, त्या नाशिकच्या पारिजातनगर येथील चिमणी-पाखरं सांभाळणाऱ्या अश्विनीताई देशपांडे..!

उच्चशिक्षित कुटुंबातील सून म्हणून जबाबदारी सांभाळतानाच संस्कारक्षम पिढीसाठी योगदान देणाऱ्या अश्विनीताई देशपांडे यांचे माहेर धुळे शहरातील, तर सासर जामनेर (जि. जळगाव) येथील. सध्याचे वास्तव्य नाशिकच्या पारिजातनगरमध्ये... अश्विनीताई यांचे शिक्षण पदवी, संगीतविशारद... वडील पुरुषोत्तम घड्याळजी अमळनेर येथील प्रताप मिलमध्ये कामगार... कुटुंबाचे वास्तव्य धुळ्यात. पत्नी विजया तसेच दोन मुले, एक मुलगी असा परिवार...

संकट आणि आव्हानांची दिशा ओळखली...

प्रताप मिलमध्ये मिल कामगार म्हणून काम करत असताना मुलांच्या शिक्षणाकडे त्यांनी विशेष लक्ष पुरवत कुटुंब धुळ्यातच ठेवले. भविष्यात येणाऱ्या संकट आणि आव्हानांची दिशा ओळखून मुलांना उच्चशिक्षित करण्यावर भर देत संस्कार घडवले. पदवीनंतर संगीतविशारद पदवी मिळवल्यानंतर अश्विनीताई यांचा विवाह जामनेर येथील योगेश देशपांडे यांच्याशी २००० मध्ये झाला.

सकारात्मक विचारांचा वारसा

घड्याळजी परिवाराप्रमाणेच नेहमीच सकारात्मक विचारांचा वारसा जपणाऱ्या उच्चशिक्षित कुटुंबात अश्विनीताई यांच्या कलागुणांना नेहमीच प्रोत्साहन मिळत गेले. पती नाशिक येथे कंपनीत नोकरीस असल्याने विवाहानंतर त्यांनी थेट नाशिक गाठले. नेहमीच सकारात्मक विचारांची पाठराखण करत सासरी अश्विनीताई यांनी घेतलेल्या शिक्षणाचा विचार करून पाठबळ मिळत गेले. नाशिकमध्ये तुटपुंज्या पगारावर एका नामांकित संस्थेत संगीत शिक्षिका म्हणून त्यांनी दोन वर्षे काम केले.

भविष्यात या संस्थेत फारसा वाव मिळणार नाही...

मात्र भविष्यातील करिअरला या संस्थेत फारसा वाव मिळणार नाही, याची जाणीव ओळखून त्यांनी नाशिकमध्ये माँटेसरीचा कोर्स केला. या माध्यमातून पुन्हा त्यांनी शाळा जॉइन केली. याच काळात मुलगा अथर्वच्या आगमनाने नोकरी सोडावी लागली.

पाळणाघराकडे वळल्या...
मुलाला मोठे करत असतानाच स्वतःमध्ये असलेली ऊर्जा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. ही जाणीव ओळखून त्यांनी मुलाकडे लक्ष देतानाच पाळणाघर सुरू करण्याबाबतचा विचार पती योगेश यांना बोलून दाखवला. पत्नीला प्रोत्साहन देत योगेश यांनी नाशिकच्या पारिजातनगरमध्ये २००२ मध्ये पाळणाघर सुरू केले. प्रारंभी एका मुलीचा सांभाळ करत संयम राखत या क्षेत्रात करिअर करायचेच, असा निर्धार करत त्यांनी सहा महिने वाट बघितली. यातूनच त्यांना पाळणाघराला पुढे नेण्यासाठी यशाचा राजमार्ग गवसला.

संस्कारक्षम पिढी घडवतांना...

पाळणाघरानिमित्त संस्कारक्षम पिढी घडवतानाच कुटुंबात खचून जाण्याचे प्रसंग आले. याच काळात पती योगेश यांच्या कंपनीत अडचणी आल्याने ते दोन वर्षे कुटुंबाला दुःखाच्या खाईत लोटणारे होते. मात्र अश्विनीताई यांनी सुरू केलेल्या पाळणाघरामुळे कुटुंबाला मिळालेला मोठा आधार नक्कीच मोलाचा असल्याचे सांगताना त्यांचे डोळे पाणावले.

निर्माण केलं स्वत:चे अस्तित्व
‘चिमणी-पाखरं’ या नावाने सुरू केलेल्या पाळणाघराच्या निमित्ताने संपूर्ण नाशिक शहरात त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. महिलांनी स्वतः पाळणाघरे वैयक्तिक किंवा समूहाने सुरू केली, तर नक्कीच स्वतःची अशी ओळख उभी करण्याबरोबरच समाजासाठी योगदान देण्याची मोठी संधी यानिमित्ताने मिळू शकते.

अश्विनी देशपांडे
पतीच्या आजारात जमापुंजी संपली, संसाराची `बॅटरी` गुल

या गोष्टी पाळणाघर सुरू करण्यासाठी आवश्यक...

पाळणाघर सुरू करण्यासाठी कोणतेही भांडवल लागत नाही. किंबहुना जिद्द, संयम, चिकाटी तसेच गोड बोलण्याची वृत्ती याच गोष्टी पाळणाघर सुरू करण्यासाठी आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. पाळणाघर चालवत असतानाच ‘सकाळ’च्या तनिष्का सदस्या म्हणून मिळालेली ओळखही समाजात होतेय, हेही त्या सांगायला विसरल्या नाहीत. ज्या महिलांना पाळणाघरे सुरू करायची असतील, त्यांना मी मोफत सहकार्य करेल. महिलांनी नक्कीच संपर्क साधावा, असेही आवाहन त्यांनी केले आहे.

अश्विनी देशपांडे
जखमी प्राणी-पक्ष्यांची सेवा करणारं दांपत्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.