- नंदेश उमप, nandeshu@yahoo.com
सातआठ वर्षांचा होतो तेव्हा बाबांसोबत सहकलाकार म्हणून काम करू लागलो. अर्थात बाबा केवढे मोठे कलावंत आहेत हे तेव्हा कळायचे नाही. वय आणि समज वाढू लागली तसतसे त्यांचे महत्त्व कळायला लागले. विठ्ठल उमप म्हणजे लोकसंगीतावर प्रखर निष्ठा असणारा कलावंत ही त्यांची ओळख मनावर उमटली... १५ जुलै हा शाहीर विठ्ठल उमप यांचा जन्मदिन. त्यानिमित्ताने या महान लोककलाकाराचा वारसा चालवणारे त्यांचे सुपुत्र गायक अभिनेता नंदेश उमप यांनी जागवलेल्या त्यांच्या आठवणी...
सातआठ वर्षांचा होतो तेव्हा बाबांनी मला बोट धरून रंगमंचावर नेले तेव्हापासून त्यांचा सहकलाकार म्हणून किती तरी वर्षे काम करण्याची संधी मिळाली. लोकसंगीत बाबांच्या नसानसांत भिनले होते. अर्थात बाबा केवढे मोठे कलावंत आहेत हे तेव्हा कळायचे नाही.
वय आणि समज वाढू लागली तसतसे त्यांचे महत्त्व कळायला लागले. विठ्ठल उमप म्हणजे लोकसंगीतावर प्रखर निष्ठा असणारा कलावंत ही त्यांची ओळख मनावर उमटली. वयाच्या साधारण आठव्या-नवव्या वर्षी मी त्यांच्यासोबत पहिल्यांदा अभिनय केला. तेव्हा बालकृष्णाची भूमिका केली होती आणि बाबा पेंद्या करत होते. तेव्हा मला त्यांनी अभिनयाचे धडे दिले. तोवर गाणे गात होतो. त्यासाठी मार्गदर्शन मिळत होते.
तेराव्या वर्षी त्यांनी मला पोतराज करायला शिकवला. तालाची जाण होतीच; पण गाताना कुठे थांबावे... कसे गावे हे सारे त्यांनी मला पोतराज करताना शिकवले. ‘आपना उत्सव’मध्ये मी पहिल्यांदा पोतराज सादर केला होता. बाबांना एखादी गोष्ट आवडली म्हणजे ते मनभरून कौतुक करत पाठीवर हात फिरवत गोंजारत असत.
मान्यवरांकडून दाद
आकाशवाणी आणि दूरदर्शनवर बाबांचे अनेक कार्यक्रम झाले. तिथे मी नेहमी त्यांच्यासोबत असे. लोक बाबांचे इतके कौतुक करीत, की मलाही आनंद होत असे. अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्या मातोश्री तिथे रेकॉर्डिस्ट होत्या. त्यांचे आणि बाबांचे मोठे सख्ख्य होते. त्या रेकॉर्डिंग झाल्यावर तोंडभरून कौतुक करत असत.
विठ्ठलभक्त अभंग गायनात जसा तल्लीन होऊन जातो, तसे बाबा लोकसंगीतातील कोणतेही सादरीकरण करताना त्यात समरस होऊन जात. त्यामुळेच त्यांचे गाणे, त्यांचा अभिनय, त्यांचे नृत्य हे सारे रसिकांना थेट भिडत असे. बाबांना त्या काळातील सगळ्या मोठमोठ्या लोकांनी मनापासून दाद दिली.
पु. ल. देशपांडे, विजय तेंडुलकर, भक्ती बर्वे-इनामदार या मंडळींनी बाबांच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले. आपण साकारता तशी द्रौपदी आजवर कोणी साकारली नाही, तुमची द्रौपदी पाहिली तर माधुरीही लाजेल, असे एक मोठा कलावंत बाबांना म्हणाला होता. बाबांनी ‘जांभूळ आख्यान’ केले तेव्हा पु. ल. देशपांडे यांनी हे नाटक म्हणजे लोककलेचा श्वास आहे असे म्हटले होते. १९९१ मध्ये प्रथम ‘जांभूळ आख्यान’ रंगभूमीवर आले. त्यातील एकेका जागेला रसिक अशी काही दात देत असत, की हरखून जाऊन ती दाद पाहत राहावी.
‘जांभूळ आख्यान’चे पुनर्जीवन
बाबांना अत्यंत प्रिय असलेल्या गोष्टींपैकी ‘जांभूळ आख्यान’ ही एक गोष्ट होती. त्यांना उर्दू भाषा अत्यंत प्रिय होती. कोळी भाषेवर त्यांचे प्रेम होते. ते केवळ शाहीर नव्हते, ते शायर होते... गजलकार होते... अव्वल कव्वाल होते... गीतकार... नाटककार... अभिनेते... संगीतकार होते. ‘जांभूळ आख्याना’वरील प्रेमापोटी बाबांनी २००५ मध्ये घरची गाडी विकून, दागिने गहाण ठेवून ते नाटक पुन्हा उभे केले.
नाटकासाठी जीवन पणाला लावण्याच्या अनेकांच्या गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा बाबांची ही गोष्ट का सांगितली जात नाही, याची मला अनेकदा खंत वाटते. ‘जांभूळ आख्यान’चे दुसऱ्या वेळी बाबांनी तब्बल ५०० प्रयोग केले. त्यात मी त्यांना साथ दिली होती. साथीदार आणि सूत्रधार या दोन्ही भूमिका बाप-बेटे करतात, असा योग तेव्हा जुळून आला.
मृत्यूपूर्वी साधारण एक महिना मुंबईच्या रवींद्र नाट्यमंदिरात त्यांनी ‘जांभूळ आख्यान’चा शेवटचा प्रयोग केला. तेव्हा त्यांची वयाची ८० पार झाली होती. हे नाटक अखंड चालू राहावे अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे २०१० मध्ये ते गेल्यावर २०१२ मध्ये अजित भगत, सुरेश चिखले, अच्युत ठाकूर या सगळ्यांच्या मदतीने आणि आशीर्वादाने मी ‘जांभूळ आख्यान’ पुन्हा करायला घेतले. आता लवकरच त्याचा २०० वा प्रयोग होईल. ‘जांभूळ आख्यान’ प्रयोग परदेशात करण्याची त्यांची खूप इच्छा होती. ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही आता प्रयत्न करीत आहोत.
विदेशातही दाद
आजही देशविदेशात जेव्हा मी लोकसंगीताचे कार्यक्रम करतो, तेव्हा आवर्जून बाबांची गाणी सादर करतो. रसिक प्रेक्षक आवर्जून भेटून दाद देतात. हातात हात घेऊन आम्ही उमपांच्या गाण्याचे फॅन आहोत असे सांगतात.
भरकार्यक्रमात त्यांची गाणी गाण्याची फर्माईश केली जाते. फू बाई फू, ये दादा आवर ये, माझी मैना गावाकडे राहिली ही गाणी आजही तितकी ताजी आहेत.
प्रत्येक कार्यक्रमात त्या गाण्यांसाठी फर्माईश होत असते. माझी मैना गावाकडे राहिली हे शाहीर अमर शेख यांचे गाणे बाबा चाळीस वर्षे गात होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा तो इतिहास... तो काळ या गाण्यातून रसिकांसमोर उभा करत होते.
कायमची खंत
बाबा लंडनच्या एका महोत्सवात १९८३ मध्ये सहभागी झाले होते. जगभरातील २५ राष्ट्रांचे प्रतिनिधी त्या महोत्सवात होते. भारतीय लोकसंगीताचे सादरीकरण करून त्या महोत्सवात बाबांनी भारताला पहिला क्रमांक मिळून दिला होता. देशविदेशात रसिकांच्या गळ्यातील ताईत झालेला हा कलावंत पद्मश्री पुरस्कारापासून मात्र वंचित राहिला, ही आमच्या मनात कायमची खंत आहे.
बाबांनासुद्धा त्याबद्दल खंत वाटत असे. कारण त्यांच्या गाण्यांवर प्रेम करणारे जाणकार त्यांना अनेकदा, तुम्हाला पद्मश्री मिळायला हवा असे म्हणत असत. आम्ही त्यासाठी प्रयत्नही केले; पण का कुणास ठाऊक तो पुरस्कार बाबांना मिळालाच नाही.
चळवळींना योगदान
उमाळा, माझी वाणी भीमाचरणी, रंगशाहिरीचे ही त्यांची पुस्तके आणि लोकशाहीर उमप यांचे पोवाडे हे त्यांच्या पोवाड्यांचे संपादित पुस्तक ही त्यांची साहित्यसंपदा लोकप्रिय ठरली. बाबांनी अनेक वर्षे सामाजिक चळवळीलाही योगदान दिले. नागालँडमध्ये जाऊन मराठा बटालियनसाठी त्यांनी शौर्यगीते गायली. त्यांनी हिंदीमध्ये पोवाडे लिहिले.
महाराष्ट्र शासनाच्या दारुबंदी आणि एचआयव्ही जनजागृतीसारख्या मोहिमांत आणि किती तरी चळवळींसाठी बाबांनी गाणी लिहिली आणि गायली. वयाची ८० पार करूनसुद्धा बाबा हरहुन्नरी कलावंत होते. त्यांचा वारसा पुढे चालवत असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो.
(शब्दांकन : वैभव चाळके)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.