राजवंश भारती : मौखरी राजवंश

Marathi Article : मौखरींची माहिती आपल्याला मिळते ती प्रामुख्याने असीरगडचा ताम्रलेख, 'हरहा' चा शिलालेख, बराबर (बिहार) येथील नागार्जुनी गुहेतील तीन कोरीव लेख, अनेक नाणी यांच्या माध्यमातून.
Mudra of Sharvavarman at Asirgarh & possibly coins of Yasovarman.
Mudra of Sharvavarman at Asirgarh & possibly coins of Yasovarman.esakal
Updated on

लेखक : ॲड. सुशील अत्रे

गुप्त वंशाच्या पतनानंतर भारतातील राजकीय परिस्थिती अशी झाली होती की, गुप्तांच्या अंकित राजांनी आणि सामंतांनी जागोजागी आपला अधिकार सांगायला सुरुवात केली होती. त्यामुळे गुप्तोत्तर काळातील राजवंश एकानंतर एक अशा क्रमाने सत्तेवर येण्यापेक्षा ठिकठिकाणी एकाच वेळी - समांतर असे सत्तेवर आले. याच प्रकारे उत्तर गुप्तांच्या जोडीने, साधारण त्याच काळात "मौखरी" वंश राजकीय पटलावर आला. (Nashik saptarang latest article on Moukhari Dynasty)

मौखरींची माहिती आपल्याला मिळते ती प्रामुख्याने असीरगडचा ताम्रलेख, 'हरहा' चा शिलालेख, बराबर (बिहार) येथील नागार्जुनी गुहेतील तीन कोरीव लेख, अनेक नाणी यांच्या माध्यमातून. शिवाय बाणभट्टाच्या 'हर्षचरित्रात’ पण मौखरींचा उल्लेख आहे. रामायणातील केकय आणि महाभारतातील मद्र देश (अश्वपती राज्य) या नावे जो प्रांत ओळखला जातो, तो भारताचा वायव्य प्रांत हे मौखरींचे मूळ ठिकाण असावे.

ते प्राचीन काळापासून भारतात होते, पण तो 'राजवंश' म्हणून ६ व्या शतकात उदयाला आला. या वंशाला कान्यकुब्ज वंश म्हणूनही ओळखले जाते. तीच त्यांची राजधानी होती. तेच नगर पुढे 'कन्नोज' या नावे प्रसिद्ध झाले. इतिहासात मौखरींच्या तीन शाखा आहेत - कान्यकुब्ज (कन्नोज) शाखा, करेन्ती शाखा आणि बराबर शाखा.

यातली कन्नोज शाखा ही खरी प्रसिद्ध अन् शक्तिशाली होती. या वंशातील राजांना 'वर्मन' अथवा 'वर्मा' हे अभिधान आहे. 'हरिवर्मन' या गुप्तांच्या सामंताने मौखरी राज्य इ.स. ५१० च्या सुमारास स्थापन केले. आदित्यवर्मन आणि ईश्वरवर्मन हे पुढील दोन राजे. इथपर्यंत मौखरी राज्य तसे नगण्य होते.

पण चौथा शासक ईशानवर्मन अत्यंत महत्त्वाकांक्षी होता. त्याने गौडवंशीय राजांशी युद्ध करून मौखरी राज्य विस्तारले. त्याने हूणांनाही पराजित केले असे दिसते. तसा उल्लेख हरहा च्या शिलालेखात आहे. तथापि, उत्तर गुप्त वंशाचा कुमारगुप्त याने एका लढाईत ईशानवर्मनाचा पराभव केला, पण तो सतत मौखरींच्या दबावाखाली राहिला.

नंतर ईशानवर्मनाचा मुलगा शर्ववर्मनाने या पराभवाचाही वचपा काढला आणि गुप्तांना धूळ चारली. ईशानवर्मन आणि शर्ववर्मन यांच्या काळात, म्हणजे इ‌.स. ५५४ ते ५८६ या दरम्यान मौखरींचा सर्वत्र दबदबा होता. नंतर अवंतिवर्मनाने पुष्यभूती राजघराण्याशी (सम्राट हर्षवर्धनाचे घराणे) मैत्रीचे संबंध जोडले. (latest marathi news)

Mudra of Sharvavarman at Asirgarh & possibly coins of Yasovarman.
अत्र तत्र सर्वत्र... प्लास्टिक!

हर्षचरित्रात त्याच्याविषयी गौरवोद्गार काढताना बाणाने म्हटले आहे की 'त्याच्या काळात मौखरवंश हा सर्व राजांमध्ये शीर्षस्थानी होता..' (धरणीधराणां मूर्ध्निस्थितो) या वेळी उत्तर गुप्त महासेनाने तर अवंतिवर्मनाचे मांडलिकत्व स्वीकारले होते. त्याच्या नंतरचा राजा ग्रहवर्मन हा या शाखेतील अखेरचा ठरला. याच्याविषयी ठळक घटना अशी की, त्याचा विवाह हर्षवर्धनाची सख्खी बहीण 'राज्यश्री' हिच्याशी झाला होता.

मगधाचा राजा देवगुप्त याने ग्रहवर्मनाची हत्या करून राज्यश्रीला बंदिवासात टाकले होते. हर्षाचा मोठा भाऊ राज्यवर्धनाने तिची सुटका केली. नंतर राज्यश्रीने स्वत:च राज्यकारभार हाती घेतला, पण मौखरी म्हणून नव्हे, तर माहेरच्या पुष्यभूती वर्धनांच्या मदतीने. तिने मौखरी राज्य वर्धन राज्यात विलीनच केले.

अशा प्रकारे मौखरी वंश इ.स. ६०५ च्या आसपास संपुष्टात आला. ग्रहवर्मनाला एक भाऊ असावा, ज्याच्या नावाचा उल्लेख नालंदा येथील एका मुद्रालेखात आहे, पण ते अक्षर 'सुव' अथवा 'सुच' असे अर्धवट तुटके आहे. त्यामुळे त्याचे नाव काय हे आज सांगता येत नाही. तो बहुदा ग्रहवर्मनाच्या आधीच वारला असावा.

एकीकडे करेन्ती आणि बराबर येथील शाखांचे राजे मात्र नंतरही बराच काळ सत्तेवर होते; करेन्ती शाखेचे राजे तर ११ व्या शतकापर्यंत होते. पण त्यांचे अधिकारक्षेत्र अगदी मर्यादित व दुय्यम दर्जाचे होते. त्यामुळे 'राजवंश' म्हणून ते फारसे दखलपात्र नाहीत. (latest marathi news)

Mudra of Sharvavarman at Asirgarh & possibly coins of Yasovarman.
टोलेजंग इमारतींमुळे उष्णतेचा दाह

यशोवर्मन : वरील वर्मनांच्या यादीमधे शोभेल, असा आणखी एक वर्मन इतिहासात होऊन गेला... त्याने हर्षाच्या मृत्यूनंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढली - थेट इ.स. ७००/२५ च्या आसपास! त्या काळी कन्नौजला 'यशोवर्मन' हा एक पराक्रमी राजा होऊन गेला. एखाद्या धूमकेतू प्रमाणे हा यशोवर्मन काही काळ चमकून गेला.

'वाक्पतीराज' या पंडिताच्या "गौडवाहो" या प्राकृत ग्रंथात या यशोवर्मनाची माहिती मिळते. हा वाक्पती यशोवर्मनाच्या पदरी भाट होता. त्याने आपल्या धन्याची प्रशस्ती करणारे हे महाकाव्य लिहिले आहे. गौडवाहो याचा शब्दश: अर्थ आहे, 'गौड राजाचा वध'. यशोवर्मनाने वंग देशाच्या शक्तिशाली गौड राजावर कशी स्वारी केली आणि किती जणांवर विजय मिळवला याची अतिरंजित कहाणी गौडवाहो मधे आहे.

पण या काव्यात यशोवर्मनाचा राज्यकाळ, त्याच्या शत्रूंची नावे इत्यादि तपशील कुठेच नाही. हा कोण, कुठला ; याचा काही निश्चित अंदाज बांधता येत नाही. पण तो काश्मीरच्या ललितादित्य मुक्तापीडाचा समकालीन होता. काळ बराच नंतरचा असला, तरी ॲलेक्झॅंडर कनिंगहॅम चे मत आहे की तो मौखरी वंशातीलच असावा.

हेच मत डॉ. श्री.द. कुळकर्णींचे आहे. इथे एका संभाव्य गोंधळाचा उल्लेख केला पाहिजे. स्वा.सावरकरांच्या 'सहा सोनेरी पाने' मध्ये "हूणान्तक यशोधर्मा" याचा उल्लेख आहे. तो आधी होऊन गेलेला माळव्याचा राजा आणि 'औलीकर' घराण्यातील आहे. तसेच, आणखी एक यशोवर्मन पुढे, इ.स. ९२५ मधे होऊन गेला. तो चंदेल वंशाचा होता.

तिघेही वेगवेगळ्या काळातील होते. 'मौखरी' हे नाव कशावरून किंवा कोणावरून दिले गेले याचा उलगडा मात्र झालेला नाही. पाणिनीच्या अष्टाध्यायी मध्ये 'मोखरिया' नामे एका व्यक्तीचा उल्लेख आहे. कदाचित तो या वंशाचा मूळपुरुष असावा. अर्थात्.. हा केवळ एक अंदाज !

Mudra of Sharvavarman at Asirgarh & possibly coins of Yasovarman.
सुदृढ मत्स्यपालनाला मित्रजैविकांची मात्रा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.