राजवंश भारती : पुष्पभूती राजवंश

Latest Marathi Article : इ. स. ६०५ ते ६४७ हा हर्षाचा राज्यकाळ आहे. या काळात तो उत्तर भारतातील एक श्रेष्ठ सम्राट होता. दुर्दैवाने हर्षाला कोणी उत्तराधिकारी नव्हता. त्यामुळे त्याच्या निधनानंतर पुष्पभूती वंशच खुंटला.
Hugh N. Tseng's Traditional Oil Painting & Clay 'Seal' of Harsha from Nalanda.
Hugh N. Tseng's Traditional Oil Painting & Clay 'Seal' of Harsha from Nalanda.esakal
Updated on

लेखक : ॲड. सुशील अत्रे

एक प्रजाहितदक्ष राजा, उत्तम प्रशासक, शूर योद्धा, प्रेमळ बंधू, सर्व धर्म, कला व विद्या यांचा आश्रयदाता अशा विविध गुणांनी संपन्न असलेला दिग्विजयी सम्राट, भारताने विक्रमादित्यानंतर हर्षवर्धनाच्या रूपाने पाहिला. इ. स. ६०५ ते ६४७ हा हर्षाचा राज्यकाळ आहे. या काळात तो उत्तर भारतातील एक श्रेष्ठ सम्राट होता. दुर्दैवाने हर्षाला कोणी उत्तराधिकारी नव्हता. त्यामुळे त्याच्या निधनानंतर पुष्पभूती वंशच खुंटला. (saptarang latest article on Pushpabhuti Dynasty)

गुप्त साम्राज्याच्या पतनानंतर भारतात ठिकठिकाणी नव्या राजवटी उदयाला आल्या. काळाच्या ओघात त्यातल्या काही अगदी नगण्य ठरल्या; तर काही नावारूपाला आल्या. उत्तर गुप्त, मौखरी हे राजवंश स्थापन झाले, त्याच सुमारास ‘स्थानेश्वर’ या ठिकाणी एक नवा राजवंश रुजला. पुष्पभूती अथवा पुष्यभूती या नावाच्या सामंताने आपली स्थानिक राजवट सुरू केली.

त्याच्या नावावरून या वंशाला पुष्पभूती किंवा पुष्यभूती वंश म्हणतात. स्थानेश्वर म्हणजे आजच्या हरियानामधील ‘ठाणेसर’. या वंशाला कीर्ती मिळवून देणारा सुप्रसिद्ध सम्राट म्हणजे ‘हर्षवर्धन’!पुष्पभूती वंशाची माहिती मिळण्याचे मुख्य स्रोत म्हणजे बाणभट्टाचे ‘हर्षचरित’, चिनी प्रवासी ह्यू एन. त्सेंगचे इतिवृत्त आणि बांसखेरा, सोनपत, मधुबन या ठिकाणी सापडलेले हर्षाचे ताम्रपट आणि नालंदा येथील मातीचे ‘सील’- मुद्रा.

बांसखेराच्या ताम्रपटात संस्थापक पुष्पभूतीचा उल्लेख तर नाही; पण महाराज नरवर्धन, राज्यवर्धन, आदित्यवर्धन आणि हर्षाचा पिता प्रभाकरवर्धन अशी वंशावळ दिलेली आहे. पुष्पभूतीचा उल्लेख बाणाच्या हर्षचरित्रात दंतकथेच्या स्वरूपात आलेला आहे. साधारणत: इ. स. ५०० च्या आसपास ही राजवट स्थापन झाली असावी.

पुष्पभूती वंशाचे पहिले काही राजे फारसे नाव घेण्याजोगे नव्हते. प्रभाकरवर्धन हा मात्र कीर्तिवंत ठरला. त्याच्यामुळे पुष्पभूती वंशाला ‘वर्धन’ वंश असेही नाव मिळाले. राज्यवर्धन, हर्षवर्धन आणि राज्यश्री ही त्याची अपत्ये भारताच्या इतिहासात ठळकपणे नोंदली गेली आहेत. राज्यश्रीचा विवाह मौखरी राजा ग्रहवर्मनाशी झाला. (latest marathi news)

Hugh N. Tseng's Traditional Oil Painting & Clay 'Seal' of Harsha from Nalanda.
कात्यायनीचा अनोळखी कायापालट...

प्रभाकरवर्धन इ. स. ५०५-६ च्या सुमारास खूप आजारी झाला. त्याने मोहिमेवर असलेल्या राज्यवर्धनाला बोलावून घेतले. तो येईपर्यंत प्रभाकरवर्धनचा मृत्यू झाला. राणी यशोमतीने त्याआधीच अहेवमृत्यू पत्करला. आधीच विरक्तीकडे झुकण्याचा स्वभाव असलेला राज्यवर्धन यामुळे अगदीच उदासीन झाला.

त्याने हर्षाकडे राज्य सोपविले आणि संन्यास घेण्याची तयारी केली. हर्षाचीही खरे तर राजा होण्याची इच्छा नव्हती; पण एक अगदी अनपेक्षित घटना तेव्हाच घडली- राज्यश्रीचा पती ग्रहवर्मन याची हत्या देवगुप्ताने केली आणि तिला कैद केले. गौड राजा शशांकाची त्याला साथ होती.

या अन्यायाचा सूड घेण्यासाठी संन्यासाचा विचार बाजूला ठेवून राज्यवर्धन देवगुप्तावर चालून गेला. त्याने देवगुप्ताला मारले, राज्यश्रीची सुटका केली. पण, शशांकाने वरकरणी समेटाची बोलणी करून लबाडीने राज्यवर्धनाला मारले. राज्यश्री अरण्यात परागंदा झाली. या घटनेमुळे हर्षाचे आणि पर्यायाने भारताचेही भवितव्य बदलले!

शोकसंतप्त हर्षाने भावाच्या हत्येचा प्रतिशोध घेण्याची प्रतिज्ञा केली आणि तो शशांकावर चालून गेला. या युद्धात कामरूप नरेश भास्करवर्मन त्याचा सहकारी होता. हर्षाने शशांकाचा पूर्ण पाडाव केला. तो कसाबसा निसटला आणि जिवानिशी वाचला; पण राज्य गेले. त्याच्या सिंहासनावर हर्षाने भास्करवर्मनला बसविले.

इकडे राज्यश्रीचा शोध घेऊन हर्षाने मौखरी राज्य तिला सुपूर्द केले; पण ग्रहवर्मनाचा कोणी वंशज शिल्लक नसल्याने मंत्र्यांच्या विनंतीवरून हर्षाने स्वत: राज्यकारभार हाती घेतला. आधी त्याने राज्यश्रीचा प्रतिपालक म्हणून कारभार केला; पण नंतर मौखरी राज्य आपल्या राज्यात विलीन करून संपूर्ण राज्याची राजधानीच स्थानेश्वरहून कन्नौजला हलवली.

तसे पाहिले तर हर्ष शूर असला, तरी स्वभावाने आक्रमक नव्हता. त्याच्या शशांकावरील स्वारीशिवाय अन्य कोणतीही मोठी स्वारी नोंदलेली आढळत नाही. तसा चालुक्य राजा दुसरा पुलकेशी हा हर्षाचा मोठा प्रतिस्पर्धी होता. पण, इतिहास सांगतो, की हर्षाला पुलकेशीने पराजित केले. ती ‘नर्मदेची लढाई’ म्हणून ओळखली जाते.

पुलकेशीने हर्षाचे राज्य ताब्यात घेतले नाही; पण त्याला दक्षिणेपासून कायम दूर ठेवले. त्या काळी भारताचे उत्तरापथ आणि दक्षिणापथ असे दोन भाग समजले जात. त्यापैकी हर्ष हा उत्तरापथाचा अधिपती (‘सकल उत्तरापथेश्वर’), तर पुलकेशी ‘दक्षिणापथाचा स्वामी’ असल्याचे चालुक्य नोंदीच सांगतात.

Hugh N. Tseng's Traditional Oil Painting & Clay 'Seal' of Harsha from Nalanda.
सुजाण नागरिक घडवणारं शिक्षण

हर्षाचे स्वामित्व गुजरातच्या ‘वालभी’ राजांनीही मान्य केले होते. सम्राटपदी बसल्यावर कालांतराने हर्षाने ‘शीलादित्य’ ही उपाधी घेतली होती. एक नावीन्यपूर्ण गोष्ट म्हणजे, बांसखेरा ताम्रपटावर हर्षाची चक्क स्वाक्षरी आहे. ‘स्वहस्तो मम महाराजाधिराज श्री हर्षस्य’ अशी ती लांबलचक स्वाक्षरी आहे!

बाणाने हर्षचरितात शशांकावरील स्वारीचे अलंकारिक वर्णन केलेले आहे. हर्षाच्या आयुष्यातील काही घटना आपल्याला ह्यू एन. त्सेंग अर्थात् युवान श्वांगच्या ‘सी- यू- की’ या ग्रंथात आढळतात. अर्थात, त्सेंग स्वत: बौद्धमतवादी असल्याने त्याने हर्षाचे चित्रण बौद्ध दृष्टिकोनातून केले आहे.

दुसरीकडे बाण मात्र हर्षाला कट्टर शैवपंथीय म्हणतो. हर्ष विद्या व कलेचा मोठा आश्रयदाता होता. बाणभट्ट त्याच्या पदरी होताच; पण ह्यू एन. त्सेंगची कीर्ती ऐकून हर्षाने त्याला मोठा मान देऊन आपल्या दरबारी बोलावले होते‌. हर्ष आपल्या कारकीर्दीत दर पाच वर्षांनी ‘धर्मपरिषदे’चे आयोजन करीत असे.

त्या वेळी तो आपली सर्व संपत्ती दान करून टाकत असे. अशाच एका धर्मपरिषदेला ह्यू एन. त्सेंगही हजर होता. हर्षाने स्वत: तीन संस्कृत नाटके लिहिली आहेत. त्यातील ‘नागानंद’ हे नाटक व ‘जीमूतवाहन’ हा त्या नाटकाचा नायक प्रसिद्ध आहे. इ. स. ६०५ ते ६४७ हा हर्षाचा राज्यकाळ आहे.

या काळात तो उत्तर भारतातील एक श्रेष्ठ सम्राट होता. दुर्दैवाने हर्षाला कोणी उत्तराधिकारी नव्हता. त्यामुळे त्याच्या निधनानंतर पुष्पभूती वंशच खुंटला. हर्षाचा मंत्री अर्जुन (वा अरुणाश्व‌?) याने कन्नौजचे सिंहासन काबीज केले; पण तो काही दिवसांतच तिबेटी सैन्याच्या आक्रमणात मारला गेला.

पुष्पभूती साम्राज्याची शकले झाली. एक प्रजाहितदक्ष राजा, उत्तम प्रशासक, शूर योद्धा, प्रेमळ बंधू, सर्व धर्म, कला व विद्या यांचा आश्रयदाता अशा विविध गुणांनी संपन्न असलेला दिग्विजयी सम्राट भारताने विक्रमादित्यानंतर हर्षवर्धनाच्या रूपाने पाहिला. 

Hugh N. Tseng's Traditional Oil Painting & Clay 'Seal' of Harsha from Nalanda.
अजिंठ्याचं सुवर्णयुग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.