शिक्षक मतदारसंघाची निवडणूक राज्यासह उत्तर महाराष्ट्रात होऊ घातली आहे. शिक्षक आमदार म्हटल्यावर शिक्षकांच्या संदर्भातील विषयांचा प्रामुख्याने विचार पुढे येतो. सध्या शिक्षण क्षेत्रासमोरची आव्हाने मोठी आहेत. पुढच्या काळात ती अधिक वाढणार आहेत.
त्यामुळे राजकीयदृष्ट्या परिपक्व आमदाराची पाठवणूक नाशिकमधून व्हायला हवी. शिक्षक हा समाजातील अतिशय जबाबदार घटक यंदा विचारपूर्वक कृती करेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यास निश्चित वाव आहे. (saptarang latest article on teachers constituency)
शिक्षक मतदारसंघातील निवडणूक अन्य निवडणुकींच्या तुलनेत वेगळी आणि वैचारिक पातळीवर व्हावी, असा एक प्रघात पूर्वीच्या काळी होता. अलीकडे अन्य निवडणुकांची हवा याही निवडणुकीला लागली. यंदा ही निवडणूक चुरशीची आणि खासकरून प्रतिष्ठेची ठरणार आहे.
सत्ताधारी पक्षांमधील नेतृत्व या निवडणुकीत वर्चस्व राखण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार, हे सर्वश्रुत आहे. विद्यमान आमदार किशोर दराडे यांना यंदा महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे यांचे मोठे आव्हान असेल. या दोघांमध्ये मुख्य लढत रंगणार असली, तरी काही अपक्ष उमेदवारही या निवडणुकीत छाप पाडणार आहेत.
नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघात पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. विद्यमान आमदार किशोर दराडे हे उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. पण, यंदाच्या निवडणुकीत ते महायुती अर्थात शिवसेना प्रणित उमेदवार असतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांची जवळीक अलीकडच्या काळात वाढली आहे.
त्यामुळे त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी काँग्रेसचे संदीप गुळवे हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे वळले. नाशिकच्या जागेसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे गुळवे यांच्या नावावर एकमत झाले. त्यामुळे समझोत्याने गुळवे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात अधिकृत प्रवेश केला.
या प्रवेशामुळे महाआघाडीचे मनसुबे स्पष्ट झालेले आहेत. आता महायुती कशा रीतीने महाआघाडीचा सामना करेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. धुळे शहरातील अॅड. महेंद्र भावसार, शिरपूर येथील निशांत रंधे हेही निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. (latest marathi news)
आपल्या उमेदवारीने ते कशा रीतीने शिक्षकांची मने जिंकू शकतात, हे पाहणेही महत्त्वाचे ठरेल. अहमदनगरचे भाऊसाहेब कचरे हे ‘टीडीएफ’च्या एका गटाचे उमेदवार आहेत; तर जुन्या पेन्शनसाठी लढा देणारे मालेगावचे आर. डी. निकम मैदानात असतील, त्यांचा प्रभाव कसा राहील, याकडेही राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून आहे.
विशेष म्हणजे शिक्षकांच्या ‘टीडीएफ’ या प्रमुख संघटनेतही दोन गट पडले आहेत. त्यापैकी एका गटाने गुळवे यांना पाठिंबा दर्शविला. संपूर्ण विभागात ६५ हजार मतदार संख्या असलेल्या या निवडणुकीत त्यामुळे मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. शिक्षकांची नोंदणी कोण, किती करतो? यावरही या निवडणुकीची बरीचशी गणितं अवलंबून असतात.
याशिवाय, शिक्षक मंडळींचा सततचा संपर्क कोणाचा आहे, शिक्षकांच्या मनातील आंदोलने आता काय सुरू आहेत, कोणत्या प्रश्नांना हात घातल्यास शिक्षकांची मने जिंकता येऊ शकतात, हे सगळे आडाखे उमेदवारांना बांधावे लागतात. त्याबरोबरच अवैध मार्गांच्या होणाऱ्या वापराकडे शिक्षक मंडळी कोणत्या पद्धतीने पाहतात, हेही यंदा महत्त्वाचे ठरणार आहे.
लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल दोन दिवसांत समोर येतील. त्या निकालांचा निश्चितपणे परिणाम या निवडणुकीवर होईल, अशी शक्यता शिक्षकांच्या गोटातून व्यक्त होत आहे. जिल्ह्यांच्या अस्मिता या निवडणुकीत बऱ्यापैकी जपल्या जातात. मोठ्या नेत्यांची वक्तव्ये कशा पद्धतीने येतात, त्यावरही शिक्षक मतदारसंघात हवा काही प्रमाणात पालटत राहते.
अपक्ष उमेदवारांची ताकद या निवडणुकीत खासकरून समजून येते. निवडणूक आता जाहीर झालेली असली, तरी इच्छुक उमेदवार किमान दोन-अडीच वर्षे आधीपासून निवडणुकीच्या तयारीला लागतात. यंदा निवडून येणारा उमेदवार शिक्षकांना हक्काचा माणूस वाटावा, ही अपेक्षा या निवडणुकीच्या निमित्ताने नक्कीच करता येऊ शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.