एक उपेक्षित बलिदान...

लंडनमधल्या इंपिरियल इन्स्टिट्यूटच्या ‘नॅशनल इंडियन असोसिएशन’ची मीटिंग होती
मीटिंग
मीटिंग sakal
Updated on

एक जुलै १९०९. सकाळचे पावणेअकरा - अकराची वेळ. लंडनमधल्या इंपिरियल इन्स्टिट्यूटच्या ‘नॅशनल इंडियन असोसिएशन’ची मीटिंग होती. सभागृहाचे नाव जहांगीर हॉल. भरपूर भारतीय विद्यार्थी त्या कार्यक्रमाला हजर होते. त्यावेळच्या पद्धतीनुसार कार्यक्रमाचे मुख्य अतिथीही तिथे सपत्नीक आलेले होते. कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. मुख्य अतिथींच्या पत्नी क्लोकरूममध्ये ठेवलेलं त्यांचं साहित्य आणायला गेल्या. मुख्य अतिथी आणि त्यांचे एक पारशी डॉक्टर मित्र, जे शांघायला रहात असत, ते जिने उतरत होते. तितक्यात तीन गोळ्यांचे आवाज झाले. एक गोळी मुख्य अतिथींच्या उजव्या डोळ्यात घुसली होती. त्या पारशी डॉक्टर मित्राने मध्ये येऊन मुख्य अतिथींना वाचवायचा प्रयत्न केला. दुसरी गोळी त्या डॉक्टरच्या छातीतून आरपार झाली. तिसरी गोळी मुख्य अतिथींच्या डाव्या डोळ्याखालून मेंदूत शिरली होती. मुख्य अतिथी जिन्यावर जागीच कोसळले. एकूणच हलकल्लोळ उडाला. बाजूला ते पारशी डॉक्टरही रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. गडबड ऐकून मुख्य अतिथींची पत्नी तिथं आली. जिन्यावर पडलेल्या पतीपाशी जाऊन त्याला उठवायचा प्रयत्न करू लागली.

या गडबडीतच कोणीतरी पोलिसांना बोलावलं. पोलिस कॉन्स्टेबल निकोल्स तिथं काही मिनिटांतच पोहोचला. सर लेस्ली चार्ल्स प्रोबीन आणि मेजर जनरल डिकसनही तिथं पोहोचले. पंचविशीचा तो भारतीय तरुण अजूनही हातात रिव्हॉल्व्हर घेऊन उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर त्याने केलेल्या कृत्याचा जराही पश्चात्ताप झालेला दिसत नव्हता. निकोल्सने त्याच्या हातून रिव्हॉल्व्हर काढून घेतलं. त्या तरुणाची झडती घेतली. त्यात त्या तरुणाकडे अजून एक लोडेड रिव्हॉल्व्हर आणि दोन सुरे मिळाले. त्या तरुणाला जेरबंद करून वॉल्टन स्ट्रीटच्या पोलिस स्टेशनात नेण्यात आलं. इथं त्या पारशी डॉक्टरला जवळच्या सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं; पण तिथं पोहोचताच त्याला मृत घोषित करण्यात आलं.

पोलिस चौकशीत कळलं की, हा तरुण लंडनच्या इंपिरियल इन्स्टिट्यूटमध्ये इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला शिकतोय. घरचा भरपूर श्रीमंत. याचा मोठा भाऊ लंडनमधूनच बॅरिस्टर झालेला होता. लहान भाऊही बॅरिस्टरीसाठी लंडनच्या ग्रेज इनमध्ये आलेला होता. त्याचे वडील पंजाबमधले अतिशय सुप्रसिद्ध सर्जन होते आणि हे सगळं कमी की काय म्हणून - त्या तरुणाकडून मारला गेलेला त्या कार्यक्रमाचा मुख्य अतिथी आणि त्या तरुणाचे वडील यांच्यात मैत्रीचे संबंध होते!

विचार करून पहा - वय वर्ष पंचवीस - लंडनमध्ये राहून इंजिनिअरिंगचं शिक्षण - पैशांची काहीच ददात नाही - वडिलांचे ब्रिटिश सरकारशी नीट संबंध - इंजिनिअरिंगनंतर भारतात किंवा लंडनमध्ये राहून खोऱ्याने पैसे ओढता आले असते, तरीही हा माणूस हे कृत्य करायला का धजावला असेल? कारण एकच - मातृभूमीवरचं प्रेम. पण कशावरून त्याने हे मातृभूमीच्या प्रेमासाठी केलं? तेही सांगतो. पोलिस झडतीत हत्यारांसोबत ह्या तरुणाकडे एक कागद मिळाला, जे एक लिहून आणलेलं डिक्लेरेशन होतं. जे पुढे कोर्टात वाचून दाखवलं गेलं. त्यात म्हटलं होतं की, ‘‘...जर जर्मनांनी इंग्लंडवर हल्ला केला आणि समजा, लंडनमध्ये जर्मन सैन्य दिसू लागलं - त्या सैन्यावर जर समजा कोणी इंग्रज माणसाने हल्ला केला आणि एकादोघा जर्मनांना ठार मारलं, तर त्याला तुम्ही देशप्रेमी म्हणाल. हेच कृत्य मी माझ्या मातृभूमीसाठी केलेलं आहे...’’

कोर्टाला काही दया यायचा संबंध नव्हताच. फाशीची शिक्षा सुनावली गेली. इथं पंजाबात या तरुणाच्या वडिलांनी ‘जाहीरनामा’ काढला आणि सांगितलं की, ‘या मुलाचे आमच्याशी काही संबंध नाहीत.

आम्ही या कृत्याचा निषेध करतो!’ - आणि हेही कमी म्हणून की काय, हा जाहीरनामाही त्या फाशीच्या शिक्षेवेळी कोर्टात वाचून दाखवण्यात आला!

१७ ऑगस्ट १९०९ ची सकाळ. लंडनच्या पेंटॉनव्हिले तुरुंगात त्या कैद्याला चहा आणि ब्रेडची न्याहारी देण्यात आली. ती झाल्यावर सकाळी नऊ वाजता फाशी झाली. कैद्याच्या वागण्यात, बोलण्यात कोणतीही भीती नव्हती. अविचल धैर्याने त्याने फाशी स्वीकारली. प्रेत वगैरे पाठवायचा प्रश्नच नव्हता, कारण कुटुंबीयांनी ‘जाहीरनामा’ काढलेला होताच. तिथंच पेंटॉनव्हिले तुरुंगाच्या परिसरात लहानपणी चांदीच्या झारीने दूध प्यालेल्या या तरुणाचं प्रेत बेवारशासारखं पुरलं गेलं. अंत्यसंस्कार वगैरे लांबच.

कोण होता हा तरुण? तो तरुण म्हणजे मदनलाल धिंग्रा. कार्यक्रमाचा मुख्य अतिथी कर्झन वायली (याचा लॉर्ड कर्झनशी संबंध नाही!). तो पारशी डॉक्टर डॉ. कावसजी लाल्काका. कर्झन वायलीला रिचमंड स्मशानभूमीत पुरण्यात आलं. लंडनच्या सेंट पॉल्स इथं त्याच्या नावाचा एक स्मृतिफलकही आहे. डॉ. कावसजींची कबर ब्रुकवूड स्मशानभूमीत आहे. आणि मदनलाल धिंग्रा? १९७४ मध्ये पेंटॉनव्हिले तुरुंगात उधमसिंगांचे अवशेष शोधताना अचानक मदनलाल धिंग्रांचे अवशेष मिळाले, ते भारतात त्यांच्या परिवाराकडे पाठवण्यात आले; पण त्यांनी ते स्वीकारण्यास तेव्हाही नकार दिला. आज महाराष्ट्रातल्या अकोल्यातल्या एका चौकाला मदनलाल धिंग्रांचं नाव देऊन तिथं धिंग्रांचे काही अवशेष ठेवलेले आहेत!

छोट्या शिकारी करणारा...

डोमकावळा : भलीमोठी चोच असलेला व उग्र दिसणारा हा पक्षी. जंगलालगत असलेली मनुष्यवस्ती, खाटीकखान्याचा परिसर, मासळी बाजार या ठिकाणी हा डोमकावळा साधारणपणे पाहायला मिळतो. डिसेंबर ते एप्रिल या महिन्यांमध्ये हा डोमकावळा घरटी बांधतो. चोचीत सरडा पकडून घेऊन चाललेल्या या डोमकावळ्याचे किरण पूनाचा यांनी टिपलेले हे छायाचित्र. (संकलन : अनुज खरे)

( सदराचे लेखक लंडनस्थित असून इतिहासाचे अभ्यासक व अर्थविषयक घडामोडींचे जाणकार आहेत. )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.