अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवानंतर जगभरात राष्ट्रवादी नेत्यांची पडझड होईल, असे भाकित केले गेले होते. सध्या ब्राझीलमध्ये अध्यक्षीय निवडणुकीने वारे तापले आहे.
अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवानंतर जगभरात राष्ट्रवादी नेत्यांची पडझड होईल, असे भाकित केले गेले होते. सध्या ब्राझीलमध्ये अध्यक्षीय निवडणुकीने वारे तापले आहे. विद्यमान अध्यक्ष जैर बोल्सोनारो यांच्यासमोर माजी अध्यक्ष आणि प्रतिस्पर्धी लुईस लुला द सिल्व्हा यांनी पहिल्या फेरीत जवळपास ४८ टक्के मते मिळवून कडवे आव्हान उभे केले आहे. दुसऱ्या फेरीसाठी ३० ऑक्टोबरला मतदान होईल. त्यानंतर चित्र अधिक स्पष्ट होईल. त्यामुळेच ही निवडणूक उत्कंठावर्धक बनली आहे.
ब्राझीलच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून दुसरी फेरी ३० ऑक्टोबर रोजी होणार आहे. पहिल्या फेरीत एकाही उमेदवाराला ५० टक्के मते मिळाली नसल्यामुळे आता दुसऱ्या फेरीकडे अभ्यासकांचे लक्ष लागून राहिले आहे. कोव्हिड-१९च्या ऐन संक्रमणात ब्राझीलमध्ये हाहाकार उडाला होता. त्याची हाताळणी नीट न झाल्यामुळे, तसेच एकूण अर्थव्यवस्थेची परिस्थिती पाहता विद्यमान अध्यक्ष जैर बोल्सोनारो यांची यंदाच्या निवडणुकीत गच्छंती होणार असे बोलले जात असतानाच, पहिल्या फेरीत त्यांनी ४३ टक्के मते घेऊन त्यांच्या विरोधकाला घाम फोडला आहे. रंजक होत चाललेल्या या निवडणुकीच्या निकालावर ब्राझील तसेच दक्षिण अमेरिकेचे पुढचे राजकारण अवलंबून आहे. त्यामुळे या प्रक्रियेचा माग ठेवणे आवश्यक ठरते.
पहिल्या फेरीत सुमारे ९९ टक्के झालेल्या मतदानात ब्राझीलचे माजी अध्यक्ष लुईस लुला द सिल्व्हा यांना जवळपास ४८ टक्के मते मिळाली आहेत. लुला २००३ ते २०१० या कालावधीत ब्राझीलच्या अध्यक्षपदी राहिले असून ते पूर्णपणे डाव्या विचारांचे प्रतिनिधित्व करतात. त्यांची टक्कर विद्यमान अध्यक्ष जैर बोल्सोनारो यांच्याशी आहे. बोल्सोनारो हे कट्टर राष्ट्रवादी विचाराचे प्रणेते असून, त्यांचे आचार आणि विचार थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखेच आहेत. त्यांना ‘ट्रॉपिकल ट्रम्प’ असे संबोधले जाते. २०१८ मध्ये अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर कुठल्याही एका क्षेत्रात ठोस कामगिरी न करता, विशेष कुठलीच गोष्ट तडीस न लावता ते नुसतेच विविध विषय हाताळताना दिसले आहेत. कोव्हिड-१९च्या ऐन भरात त्यांनी योग्य ती पावले न उचलल्यामुळे ब्राझीलचे सुमारे सात लाख नागरिक आपल्या जीवास मुकले. त्या संपूर्ण संक्रमणाच्या काळात त्यांनी स्वतः गांभीर्य न घेतल्यामुळे ते कोरोनाबाधित झाले होते. इतके होऊनही, कोरोनाबाधित असताना ते खुशाल पत्रकारांना उघडपणे सामोरे गेल्याने त्यातून पुढे अनेक जण संक्रमित झाले होते. मुळात, कोरोनासारखा काही प्रकारच अस्तित्वात नसून, हे सगळे थोतांड आहे, असे बोल्सोनारो सांगत राहिले.
गरिबी, विषमता, गुन्हेगारी
जी गोष्ट ब्राझीलच्या सार्वजनिक आरोग्याची, तीच अर्थव्यवस्थेची. ब्राझीलची अर्थव्यवस्था ही दक्षिण अमेरिकेतील देशांमधील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. भरपूर प्रमाणात उपलब्ध असणारी खनिजे, कॉफी आणि साखरेचा मोठा निर्यातदार म्हणून या देशाचा लौकिक आहे. इतके असूनही ब्राझीलमध्ये लक्षणीय प्रमाणात गरिबी, आर्थिक विषमता आणि गुन्हेगारी आहे. त्यातच त्यांच्या कार्यकाळात अमेझॉनच्या जंगलात बेसुमार वृक्षतोड करण्यात आली आहे. त्यावर ठोस धोरण न राबविल्यामुळे बोल्सोनारो यांच्याविरोधात उघड नाराजी व्यक्त होत आहे. एखादा राजकीय पुढारी इतकी वाईट परिस्थिती असताना जनतेला छातीठोकपणे सामोरे जाण्याआधी अनेकदा विचार करेल. मात्र, संपूर्ण ब्राझीलभर आपल्या समर्थकांचे जाळे विणण्यात बोल्सोनारो यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे, आपणच राष्ट्राचे तारणहार असून डाव्यांच्या कुटील डावातून ब्राझीलला आपणच वाचवू शकतो, असा माहोल बोल्सोनारो यांनी तयार केला आहे. विरोधक लुला यांच्यावर एकेकाळी मोठी लाच घेतल्याचा आरोप सिद्ध होऊन त्यांनी तुरुंगवासही भोगला आहे. हा मुद्दा आपल्या प्रचारात खुबीने वापरत बोल्सोनारो कडवी लढत देत आहेत.
लोकशाही संस्थांना नख
बोल्सोनारोंच्या कार्यकाळात अनेक लोकशाही संस्थांच्या स्वतंत्र कार्यपद्धतीला त्यांनी नख लावताना, ब्राझीलने दोन दशके भोगलेल्या लष्करी राजवटीची आठवण काढत ‘किती ते चांगले दिवस’ असे उसासे अनेकदा सोडले आहेत. पहिल्या फेरीत लुला यांच्या तुलनेत मागे पडल्यामुळे बोल्सोनारो यांनी थेट निवडणूक प्रक्रियेवरच शंका घेत, मतदान यंत्रे आणि संपूर्ण निवडणूक यंत्रणेच्या प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहे. तसेच, दगाफटका होतो आहे असे दिसताच आपण पराभव मान्य करणार नाही असे जाहीर केले. २०२० च्या जानेवारी महिन्यात अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हेच करत आपल्या समर्थकांना चेतावले होते. त्यातील काही माथेफिरू समर्थकांनी मग थेट अमेरिकेच्या संसदेत गोंधळ घातल्याचे साऱ्या जगाने पाहिले होते. अगदी तशीच समांतर भूमिका बोल्सोनारो आणि त्यांचे देशभर पसरलेले राष्ट्रवादी समर्थक घेऊ शकतात, इतके ब्राझीलमधील वातावरण तापले आहे. ट्रम्प, इस्राईलचे माजी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी ब्राझीलमध्ये राहत असलेल्या आपापल्या देशांतील नागरिकांना बोल्सोनारो यांच्या बाजूने साद घालायला सुरुवात केली आहे. सांप्रत काळातील अमेरिकेच्या समाजव्यवस्थेत ‘आपले’ आणि ‘बाहेरचे’ असा थेट भेद करणारे, डोनाल्ड ट्रम्प यांचे एकेकाळचे खासमखास स्थिव्ह बॅनन वरचेवर बोल्सोनारो यांना ‘मार्गदर्शन’ करतात, अशी तेथील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. त्यामुळे, बोल्सोनारो यांनी लुला यांचे आव्हान पेलत त्यांचा पराभव केल्यास, कोलंबिया, पेरू, बोलिव्हिया, अर्जेंटिना, चिली या देशांतील डाव्या सरकारांना धडकी भरेल. त्यातील चिली, अर्जेंटिना आणि बोलिव्हिया हे तीन राष्ट्रे त्यांच्याकडील मुबलक लिथियम साठ्याकरिता ‘लिथियम ट्रँगल’ म्हणून ओळखली जातात.
जगभरात मागणी वाढत चाललेल्या विद्युत नियंत्रित गाड्यांच्या बॅटरीसाठी लिथियम हा सर्वात आवश्यक घटक आहे. त्याची बेसुमार वाढलेली मागणी, ते प्रक्रिया करून जमिनी बाहेर काढताना होणारे पर्यावरणाचे नुकसान, पाश्चात्य देशांनी नोंदवलेली लिथियमची राक्षसी मागणी, प्रक्रियेच्या खर्चाच्या तुलनेत त्यास मिळणारा कवडीमोल भाव इत्यादी कारणांमुळे आधीच या तीन देशांत रान पेटले आहे. तेथील राष्ट्राभिमानी पक्ष आपापला खुंटा बळकट करत असताना आता तेलाच्या ज्वालाग्राही संघटना असणाऱ्या ‘ओपेक’सारखीच लिथियमच्या संघटनेची मागणी अधेमधे डोके वर काढत आहे. यामुळे, दक्षिण अमेरिकेतील देशांमधील आधीच कमी असलेला समन्वय आणखी ताणला जातो आहे.
खनिजे, नैसर्गिक उत्पादने यांचे मोहोळ असलेल्या या खंडातील दर्जेदार गोष्टी चरण्यासाठी आपले हक्काचे कुरण ठरले पाहिजेत यासाठी पाश्चात्य देशांमध्ये स्पर्धा सुरू आहे. ब्राझील यांमधील एक वजनदार देश. म्हणून त्याच्या अध्यक्षीय निवडणुकीत उजव्या बोल्सोनारो यांचा पराभव व्हावा म्हणून डाव्या, समाजवादी पक्षांनी ‘लोकशाहीची हत्या’ या मथळ्याखाली गळा काढल्यानंतर काही हाती लागत नाहीये असे पाहून, मानत नसले तरी देव पाण्यात ठेवले आहेत!
लुला यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या काळात, २००३ ते २०१० या कालावधीमध्ये समाजोपयोगी धोरणे राबवल्याची पुण्याई हेच त्यांचे भक्कम पाठबळ आहे. असे असली तरी त्यांच्याच कार्यकाळात बोकाळलेल्या भ्रष्टाचाराची गडद झालर एखाद्या डागासारखी असल्याने, त्यातून निर्माण झालेली भ्रष्टाचारी ही प्रतिमा त्यांची पाठ सोडत नाही. त्यांच्या वाटचालीत त्यामुळे अडथळे निर्माण होत आहेत. पर्यावरण, व्यापार, मानवाधिकार अशा अनेक आघाड्यांवरच्या प्रश्नांमुळे ही निवडणूक आणि तिचा निकाल म्हणूनच निर्णायक आणि दिशादर्शक असाच ठरणार आहे. दोन्ही बाजू तितक्याच प्रमाणात तगड्या असताना आणि ब्राझीलचे दक्षिण अमेरिकेतील, एकूण जागतिक व्यापारातील स्थान आणि महत्त्व पाहता, राजकीय विश्लेषक आणि इतर राष्ट्रप्रमुखांची धागधुग वाढली आहे. भारतासाठी ‘ब्रिक्स’मधील ब्राझीलचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. लोकशाहीतील सगळ्या उजव्या विचारसरणीच्या नेत्यांपैकी डोनाल्ड ट्रम्प त्या सर्वांचे मेरुमणी समजले जात होते. २०२० मध्ये जो बायडेन यांनी ट्रम्प यांचा पराभव केल्यानंतर डाव्या विचासरणीच्या लोकांनी कोण आनंद साजरा केला होता.
व्लादिमीर पुतीन, बशर अल-असद, रेसेप तय्येप एर्दोगान, मोहम्मद बिन सलमान, नरेंद्र मोदी, शी जिनपिंग, व्हिक्टर ऑर्बन या राष्ट्रवादी नेत्यांच्या पडझडीची सुरुवात होणार असल्याचे त्यांच्याकडून भाकीत वर्तविले गेले. काही अंशी शी जिनपिंग वगळता, यातील एकाही नेत्याच्या राजकीय मार्गक्रमणात विशेष अडथळे आलेले नाहीत. या राष्ट्रवादी नेत्यांच्या यादीत बोल्सोनारो यांचादेखील समावेश आहे. अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव झाला असला तरी त्यांना सुमारे ४३ टक्के मते मिळाली होती. त्यामुळे, तेथील ट्रम्पवाद संपला असेदेखील छातीठोकपणे म्हणता येणार नाही. अगदी अशीच वेळ बोल्सोनारो आणि बोल्सेनारोवादावर आली आहे. ही निवडणूक त्यांच्यासाठी म्हणूनच परीक्षा ठरणार आहे. ते पुन्हा निवडून येतात की पडझडीचे भाकीत खरे ठरवतात, हेच आता बघावे लागेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.