संग्रहालयांचा देश...

जगातील सर्वांत मोठ्या नदीनं जगातल्या सर्वांत जुन्या संस्कृतीला जन्म दिला. नाईल नदीनं दिलेली देणगी म्हणजे इजिप्त आहे.
nile river egypt piramid travel tourist Meet and Greet social media internet
nile river egypt piramid travel tourist Meet and Greet social media internetSakal
Updated on

- मालोजीराव जगदाळे jagdaleomkar5@gmail.com

जगातील सर्वांत मोठ्या नदीनं जगातल्या सर्वांत जुन्या संस्कृतीला जन्म दिला. नाईल नदीनं दिलेली देणगी म्हणजे इजिप्त आहे. तब्बल अकराशे किलोमीटरची नाईल नदी देशाला लाभल्यानं त्या सहारा वाळवंटाच्या भागात नंदनवनाची निर्मिती झाली. जगभरातून कोट्यवधी लोक फक्त पिरॅमिड बघण्यासाठी येथे येतात.

पिरॅमिड म्हणजे इजिप्त आणि इजिप्त म्हणजे पिरॅमिड असे समीकरण झाल्यानं पिरॅमिडव्यतिरिक्त अनेक महत्त्वाची ठिकाणं इजिप्तमध्ये आहेत जी झाकोळली गेली आहेत. टीव्ही, इंटरनेट, वृत्तपत्रे अशा अनेक माहितीच्या स्रोतांमधून पिरॅमिडबद्दलची माहिती अनेकांपर्यंत पोहोचली गेली आहे. त्यामुळं इजिप्त भटकंतीचं नियोजन कसं करावं आणि पिरॅमिड पलिकडचं इजिप्त मांडण्याचा हा प्रयत्न आहे.

एके काळी इजिप्शियन काउन्सलेटच्या दारात व्हिसासाठी ताटकळत थांबून राहावं लागत असे, माझ्या अनेक मित्रांना तर बऱ्याचदा मुंबईला हेलपाटे मारावे लागले होते. अरब स्प्रिंगमुळे देशात सत्तापालट झाल्याने स्थिती आणखीनच बिकट झाली व काही काळ इथलं पर्यटन बंद झालं.

बिघडलेली राजकीय परिस्थिती आणि कोरोनाची महासाथ यांच्या अवघड काळानंतर पुन्हा पर्यटनाची दारे खुली झाली, ती मात्र भारतीयांसाठी ई- व्हिसाची आनंदवार्ता घेऊन. इजिप्तचा व्हिसा घरात बसून अगदी कमीत कमी कागदपत्रं पाठवून चार ते पाच दिवसांत मिळवता येतो. इजिप्तच्या ई व्हिसा पोर्टलवरून अथवा या देशाच्या अधिकृत ऑनलाइन विजा एजंटकडून हा विजा मिळवता येतो.

इजिप्तमध्ये पोहोचल्यावर एअरपोर्टला इमिग्रेशनसाठी अडचण येऊ नये म्हणून स्थानिक ट्रॅव्हल एजंट कडून ‘मिट अँड ग्रीट’ ही सेवा घ्यावी. या सेवेमध्ये स्थानिक टूर कंपनीचा प्रतिनिधी इमिग्रेशन होण्याआधीच आपल्याला भेटतो व आपल्या तर्फे गॅरेंटर लेटर वगैरे सोपस्कार पूर्ण करून इमिग्रेशन आणि पासपोर्ट स्टॅम्पिंगसाठी मदत करतो.

‘मिट अँड ग्रीट’विषयी सखोल लिहिण्याचे कारण म्हणजे अनेक पर्यटकांना विमानतळावर उतरल्यावर इमिग्रेशन होण्यास अडचण निर्माण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. सध्या येथे असणारे लष्करी शासन यासाठी थोडे बहुत कारणीभूत आहे. असे कटू प्रसंग भटकंतीच्या सुरुवातीलाच टाळता यावेत म्हणून हा लेखप्रपंच.

इथलं स्थानिक चलन इजिप्शियन पाउंड असं आहे. भारतात ‘करन्सी एक्सचेंज’मध्ये हे मिळणं अवघड असल्यानं भारतातून जाताना अमेरिकन डॉलर्स न्यावेत व तिथं ते बदलून घ्यावेत. एक वर्षांपूर्वी जवळपास चार भारतीय रुपयांना एक इजिप्शियन पाउंड असा दर होता परंतु गेल्या वर्षात भारतीय रुपयाच्या तुलनेत या चलनाची मोठी पडझड झाल्याने पावणेतीन रुपयांना एक पाउंड असा आता हिशोब आहे.

त्यामुळे मी तर म्हणेन इजिप्तला जाण्याचा सर्वोत्तम काळ हाच समजावा. तसं वातावरण बघता ऑक्टोबर ते एप्रिल या काळात प्रवास करणं उत्तम. परदेशी पर्यटक कमीत कमी पंधरा दिवस ते दीड महिना इतका मोठा काळ इजिप्तच्या भटकंतीसाठी देतात.

परंतु भारतातून जाणाऱ्या बहुतांश टूर या केवळ सात दिवसांच्या असतात. त्यामुळं भारतीय पर्यटक कैरो, गिझा, लुक्सॉर करून परतीचा मार्ग धरतात. खरं तर इजिप्तला जायचं तर आवर्जून कितीही गडबडीत असलात, तरी कमीत कमी दहा ते पंधरा दिवस नियोजन करून यायला हवं.

दहा दिवसांच्या भटकंतीमध्ये सर्वांत उत्तरेकडील शहर अलेक्झांड्रियापासून सुरुवात करून मग दक्षिणेकडं कैरो, गिझा, लुक्सॉर, अस्वान, अबू सिंबेल असं नियोजन करता येईल. जास्तीचा वेळ असल्यास सिवा ओएसिस, हुरघाडा, शार्म अल शेख, व्हाइट डेझर्ट ही भारतीय पर्यटकांकडून सर्रास वगळली जाणारी ठिकाणे बघता येतील.

इथं आवर्जून एक गोष्ट सांगाविशी वाटते, की आपण जर सोलो पद्धतीनं किंवा मित्रपरिवार यांच्यासोबत भटकंतीचं नियोजन करत असाल आणि सर्व स्थळांना भेटी देणार असाल, तर किमान कैरो, गिझा आणि लुक्सॉर या ठिकाणी तरी एखादा गाइड सोबत न्यावा.

कोणत्याही ठिकाणाबाबत सांगताना मी नकारात्मक गोष्टी शक्यतो टाळतो परंतु वरील तीन ठिकाणी पर्यटकांसोबत बरेच स्कॅम झाल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. तसेच काही पर्यटकांना पोलिस आणि लष्कराच्या ठिकठिकाणी असलेल्या चेक पॉइंटवर चौकशीला सामोरे जावे लागत आहे.

या घटना तशा तुरळक आहेत परंतु स्थानिक गाइड सोबत असेल, तर तो या सर्वांची काळजी घेईल. वरील तीन ठिकाणं वगळता इतर ठिकाणी निर्धोकपणे तुम्हाला फिरता येईल.

एमिरेट, कतार एअरवेज, विझ एअर या कंपन्यांच्या फ्लाइटची कनेक्टिव्हिटी इजिप्तसाठी चांगली आहे. कैरोव्यतिरिक्त अलेक्झांड्रिया आणि लुक्सॉर या शहरांमध्ये सुद्धा आंतरराष्ट्रीय विमानं उतरतात. त्यामुळं जर अलेक्झांड्रियाची फ्लाइट मिळाली तर तिथं उतरून दोन दिवस तिथं भटकंती करावी.

जगातलं सर्वांत मोठं प्राचीन ग्रंथालय असलेलं ठिकाण अशी ख्याती असणारं हे शहर, सम्राट अलेक्झांडर याचं नाव या शहराला दिलं गेलंय. लायब्ररीच्या पुनर्भरणीसाठी मोठा प्रकल्प हाती घेण्यात आला होता, जगभरातल्या अनेक देशांनी हातभार लावून येथील भव्य लायब्ररी पुन्हा उभी केली.

आवर्जून भेट द्यावी अशी ही वास्तू आहे, पाच हजार लोक एकाच वेळी वाचन करण्यासाठी बसू शकतील अशी भव्य रचना केली आहे. रोमन शहर असल्यानं, अनेक प्राचीन रोमन वास्तू येथे बघायला मिळतात. जगप्रसिद्ध रोझेटा स्टोन इथंच सापडला होता. ज्याच्यामुळं इजिप्तोलॉजी जन्माला आली आणि फेरोंचा इतिहास उलगडला. इथली संग्रहालयं, राजवाडे किल्लेसुद्धा आवर्जून पाहण्याजोगे आहेत.

कैरोमध्ये शक्य असल्यास हेलिओपोलिस वॉर मेमोरियलला आवर्जून भेट द्यावी, पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात आपल्या मराठा लाइट इन्फंट्रीमधील अनेक सैनिक इथल्या युद्धांमध्ये धारातीर्थी पडले होते. त्यांची स्मारकं या वॉर मेमोरियलमध्ये आहेत. तब्बल पाच वर्ष रखडलेलं जगातील सर्वांत मोठं आर्किओलॉजिकल संग्रहालय म्हणजे ग्रँड इजिप्शियन म्युझियम हे पर्यटकांसाठी अंशतः खुलं झालंय.

साधारणतः या वर्षीच्या डिसेंबर किंवा पुढील वर्षीच्या सुरुवातीला याचं उद्‍घाटन होईल. तब्बल नऊ लाख स्क्वेअर फूट जागेवर हे संग्रहालय असून इजिप्तच्या सर्व शहरांमध्ये असलेल्या वस्तू इथं आणून प्रदर्शनात ठेवल्या जाणार आहेत.

ज्यांची संख्या पाच हजारांपेक्षा जास्त आहे, यामुळं एकाच छताखाली संपूर्ण इजिप्तचा इतिहास उलगडणार आहे. कैरो पाहून झाल्यावर दक्षिणेकडं तुम्हाला दोन मार्गांनी प्रवास करता येतो एक तर लुक्सॉरला जाऊन तेथील वास्तू बघून पुढे आस्वानला जाता येईल किंवा अनेक परदेशी पर्यटक जो लोकप्रिय पर्याय निवडतात, तो म्हणजे कैरोतून थेट नाइट ट्रेनने आस्वानला जाणं.

दोन दिवस आस्वान व परिसर बघून नाईल रिव्हर क्रुझने लुक्सॉरपर्यंत येणं. आस्वान ते लुक्सॉर अशी दोन दिवसांची रिव्हर क्रुझ हा अविस्मरणीय अनुभव ठरू शकतो. ही क्रुझ ठिकठिकाणी प्राचीन वास्तू, नुबियन गावे यांना भेट देत पुढे प्रवास करते. स्थानिक इजिप्शियन संस्कृती, त्यांचे लोकजीवन, राहणीमान समजून घेण्यास यामुळे मदत होते.

लुक्सॉर पाहून झाल्यावर प्राचीन इजिप्तचा प्रवास इथे थांबवून इथल्या जगप्रसिद्ध अशा बीच टाउनचा आस्वाद आपल्याला घेता येतो. लुक्सॉरपासून जवळच पूर्वेला हुरघाडा हे रिसोर्ट टाऊन आहे. अतिशय नितळ समुद्र आणि लाल समुद्राचे सुंदर समुद्रकिनारे बघण्यासाठी लाखो पर्यटक इथं येतात. बोटीने समोरच्या बाजूला गेल्यास शार्म अल शेख हे आणखी एक अप्रतिम जलसृष्टी आणि स्कुबा डायविंगसाठी प्रसिद्ध असे ठिकाण आहे.

कैरोमधून सुवेझ कॅनॉलची सफर सुद्धा करता येते. पोर्ट सैद या येथे वसलेल्या शहराला सुद्धा यावेळी भेट देता येईल. तसेच काही आगळेवेगळे अनुभव सुद्धा इजिप्तमध्ये घेता येतील. हा संपूर्ण सहारा वाळवंटाचा प्रदेश असल्यानं काही नैसर्गिक आश्चर्य इथं आहेत.

त्यातील एक म्हणजे व्हाइट डेझर्ट. इथल्या पांढऱ्या ठिसूळ खडकांची अगदी पावडरसदृश पांढरी शुभ्र माती वाळवंटावर पसरल्यानं वाळवंट बर्फाच्छादित झाल्याचा भास इथं होतो. या वाळवंटातील कॅम्पिंग प्रसिद्ध आहे. पुरातत्त्व शास्त्रामध्ये जर स्वारस्य असेल, तर संपूर्ण इजिप्तमध्ये नव्यानं उत्खनन होत असलेल्या अनेक साइट्स आहेत.

जिथे तुम्हाला अभ्यास दौऱ्यामार्फत भेट देता येते. इजिप्तचे महान संशोधक डॉ. जाही हवास यांच्यासोबत सक्कारा, मेम्फिस, दहशूर इथले नवीन संशोधन पाहण्याची संधी मिळते. पिरॅमिड व्यतिरिक्त इजिप्तमध्ये पाहण्यासाठी तितक्याच महत्त्वाच्या अनेक वास्तू आहेत. ज्या अजिबात चुकवू नयेत. इजिप्तची भटकंती करताना आवर्जून अतिरिक्त दिवसांची तजवीज करावी आणि ही ठिकाणे पाहावीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.