‘गावई’ कांदबरीतील एका पथनाट्यात कलाकारांनी सादर केलेल्या या काही ओळी... जगाचा पोशिंदा किंवा बळिराजा म्हणून ज्याची ओळख आहे.
शेतकरी शेतकरी शेतकरी शेतकरी
पोशिंदा जगाचा
म्हणतच कुरवाळला
आभाळाकडं बघत
तो पेरतच राहिला
भेगाळती जमीन
मातीही वाहिली
कधी फुटलेला कोंब जिवापाड जपला
बाजारात नेल्यावर दलालानेच लुटला...
‘गावई’ कांदबरीतील एका पथनाट्यात कलाकारांनी सादर केलेल्या या काही ओळी... जगाचा पोशिंदा किंवा बळिराजा म्हणून ज्याची ओळख आहे, अशा शेतकऱ्याला आपलं हक्काचं आणि भावनांशी जोडलेलं गाव सोडावं लागतं आणि शहराच्या बकाल वस्तीत येऊन राहावं लागत... गावातील मान-सन्मानाचं जिणं जगणारा हा बळिराजा शहरात भररस्त्यावर नागवला जातोय... पदोपदी अपमानित होतोय... देशातील शेतकऱ्यांच्या जगण्याचं हे वास्तवच संवेदनशील विषयांची मांडणी करणाऱ्या बबन मिंडे यांनी या कादंबरीच्या माध्यमातून मांडलं आहे.
‘गावई’ या नावातच मोठा अर्थ दडलेला आहे. एखाद्या गावातील हाडामांसाची माणसं आपलं घर अन् गाव सोडून गेल्यावर गावाचं जे भयाण चित्र तयार होतं, त्याला ‘गावई’ म्हणतात. देशातील सर्वच भागांतील गावखेड्यांवर जागतिकीकरणाच्या बदलाचा झालेला हा मोठा परिणाम या कादंबरीत आहे, त्याची ही कथा आहे. एक शेतकरी आणि त्याचं कुटुंब शेती परवडत नाही म्हणून गावातून शहरात येतं आणि मिळेल ते काम करून जगतंय, हे कथानक एवढ्यापुरतं मर्यादित नाही... त्यात अनेकांच्या भावनांचा कोंडमारा दडलेला आहे. शेतकऱ्याचं जिणं जगलेल्यांच्या वेदना एका-एका शब्दांतून ओरडून ओरडून या कादंबरीत जणू मांडल्या आहेत. कोठेही अतिरंजित नसणारी, पूर्णपणे वास्तवाशी बांधिलकी असणारी ही कादंबरी म्हणजे हजारो-लाखो शेतकऱ्यांच्या वास्तवाचं यथार्थ दर्शन घडवते.
पिंगळी या गावातील नथू या काबाडकष्ट करणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्याची ही कथा आहे. त्याला गावात आणि नात्यागोत्यांत मोठा मान-सन्मान आहे. त्यामुळे त्याची प्रत्येक कृती ही आपला सन्मान टिकून राहावा, यासाठीच आहे. त्याच्याभोवती फिरणारी ही कथा आहे. तशीच ती त्याची आई भुजी हिचीपण आहे. कारण, शेतकऱ्याच्या व्यथा फक्त एका पिढीपुरत्या मर्यादित नाहीत. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जणू वारसाहक्काने त्या येत आहेत. आपल्या पतीच्या वाट्याला आलेलं आपल्या मुलाच्याही नशिबात येईल, या भीतीने भुजी ही आपल्या लेकावर सावलीसारखी लक्ष ठेवून असते, त्यासाठीची तिची तगमग दिसून येते.
कादंबरीच्या सुरुवातीला भुजीची लढाई दाखविली आहे, ती शेतातील शेरणी नावाची वनस्पती काढून टाकण्यासाठीची. कारण, त्या वनस्पतीच्या मुळात असलेलं पाणी पिऊन तिच्या पतीने आपली जीवनयात्रा संपविली होती, तीही फक्त दहा रुपयांच्या एका नोटेसाठी. तीच वेळ आपल्या पोटच्या पोरावर येऊ नये, यासाठी तिची धडपड असते. पण, नवऱ्याच्या वाट्याला आलेले भोग आपल्या मुलाच्याही नशिबात येत असलेले पाहून तिची तगमग सुरू असते. त्यामुळे नथू याची संघर्षयात्रा सुरू असतानाच भुजीच्या आठवणीत त्याच्या वडिलांचीही कथा पुढे-पुढे सरकत असते. त्यातूनच मनाला भिडतं की शेतकऱ्याच्या नशिबातील संघर्ष आणि त्याची फरफट ही जणू वारसाहक्कानेच आली आहे.
पावसापूर्वीच्या ओढ्याच्या व बांधबंधिस्तीच्या कामांपासून सुरू असलेला नथूचा संघर्ष पुढे पावसाने दिलेल्या ओढीमुळे तीव्र होत जातो. त्यानंतर पदोपदी येणाऱ्या संकटांचा सामना करताना तो थकतोय. त्यात त्याची पत्नी, मुलं, आई या सर्वांचीच फरफट सुरू होते. हे फक्त एकट्या नथूबाबतच घडत नाही, तर गावातल्या जवळपास प्रत्येकावरच ती वेळ येते. नथूचा संघर्ष मांडताना लेखकाने गावात आणि गावातील माणसांमध्ये झालेले अगदी बारीकसारीक बदल मांडले आहेत. अगदी गावातील काकडा आरतीच्या महापूजेचा खर्चही काही हजारांत गेल्याने सर्वसामान्यांची गावाच्या बरोबरीने होणारी फरपट आहे. तसंच, गावातील विधवा व महिलांचे प्रश्न काळजाला छेडणारे आहेत. पगाराला एक दिवस उशीर झाला तर नोकरदार तडफडतो, तर वर्षानुवर्षं शेतमालाला भाव न मिळल्याने शेतकऱ्याचं जिणं कसं असेल, याचा फरक एकाच वाक्यात मोठा अर्थ सांगून जातो.
आपल्या सख्ख्या बहिणीला नोकरदार नवरा मिळाला; पण आपल्या वाट्याला भोग आले, असं म्हणणारी दुसरी बहीण दाखवली. त्यातून नात्यातील माणसांपेक्षा पैशांची किंमत दिसत आहे. तरीही मुक्या प्राण्यावरही रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त लळा लावणारा नथूही आहे. जेव्हा गोठ्यातील बैलाला कर्जासाठी विकायची त्याच्यावर वेळ येते, त्या वेळी स्वतःला अपराधी समजणारा आणि बैलाच्या डोळ्यांतही पाहू न शकणारा नथू खऱ्या अर्थाने असह्य बळिराजा ठरतो. सावकार जेव्हा दावणीला बांधलेली दुभती म्हैस घेऊन जातो, त्यावेळीच तो मनातून संपतो. सावकाराला घाबरायचं नाही, असं सांगणारा जिवलग मित्र जेव्हा मरणाला जवळ करतो, त्या वेळी खचलेला नथू जणू काही कर्जाच्या डोंगराखाली पाताळात गेलेला बळिराजा असतो.
असे ग्रामीण जीवनाचे अनेक पदर लेखक उलगडून दाखवतो. त्यामध्ये गावचं राजकारण, भावकीतील वाद, बहीण-भावाचं नातं, आरक्षण, सरकारी योजना, शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतकरी संघटनांमधील वाद, अशा विविध अंगांना लेखकाने स्पर्श केला आहे. यातील प्रत्येक पात्राची स्वतंत्र अशी कथा आहे. तसंच, गावातून पोट भरण्यासाठी किंवा फक्त जगण्यासाठीच आलेल्यांच्या नशिबात शहरात आल्यानंतर काय काय वाट्याला येतं, हेही मांडलेलं आहे. तशीच शहरातील बकाल झोपड्यांमधील दुःखंही पुढे येतात.
अस्सल ग्रामीण संस्कृती या कादंबरीतून दिसते. या कादंबरीतील पात्रांची भाषा ही अस्सल मावळी बोलीची आहे. कादंबरीच्या नावापासूनच ही भाषा आहे. बोलीभाषेतील अनेक शब्द जे आज काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत, ते या कादंबरीच्या पानोपानी आहेत. नवीन पिढीसाठी जवळपास चार पाने या शब्दांचा अर्थ सांगण्यासाठी खर्च केली आहेत. पण, त्यामुळे एक मोठा दस्तऐवजच तयार झाला आहे. या मावळी बोलीतून मिंडे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा आणि त्यांची दुःखं तीव्रतेने मांडली आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणाऱ्या अनेक कादंबऱ्या आहेत. त्यातील उजवी ठरणारीच मांडणी ‘गावई’त आहे.
पुस्तकाचं नाव : गावई
लेखक : बबन मिंडे
प्रकाशक : राजहंस प्रकाशन (०२० - २४४७३४५९)
पृष्ठं : ४५२
मूल्य : ६०० रुपये
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.