आपली वेस ओलांडून दूरच्या प्रदेशात जाऊन मिलिंद बोकील मानवी संस्कृतीची वेगवेगळी रूपं न्याहाळतात. प्रवास- पर्यटनाच्या रुळलेल्या मार्गानं न जाता स्वतःची अशी पायवाट निर्माण करतात आणि वाचकालाही त्या मार्गानं केवळ फिरवून आणतात, असे नव्हे, तर अंतर्मुखही व्हायला लावतात. ‘क्षितिजापारच्या संस्कृती’ हे पुस्तक वाचताना याचा ठळक प्रत्यय येतो.
प्रत्येक प्रवासच खरं तर चाकोरीबाहेरचा अनुभव देत असतो. तशा अनुभवात बोकील वाचकाला सहभागी करून घेतातच; पण त्या पलीकडचंही काही देऊ पाहतात. या पुस्तकातील आठ लेख वेगवेगळ्या निमित्तानं झालेल्या प्रवासावर आधारित आहेत. कधी पर्यटन हा हेतू ठेवून, कधी सामाजिक चळवळीतील सहभागासाठी; तर कधी व्यावसायिक कर्तव्याचा भाग म्हणून बोकील जगाच्या वेगवेगळ्या भागात फिरले.
हे भाग अर्थातच मळलेल्या वाटेवरचे नाहीत, हे लक्षात येतं. त्या त्या परिसराचं सौंदर्य शब्दांच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करतानाच तिथल्या समाज-संस्कृतींची झलक ते दाखवून देतात. ते करीत असताना विविध विद्याशाखांचा त्यांचा अभ्यास जाणवतो. स्वाभाविक मानवी कुतूहलाला या अभ्यासाची जोड असल्यानं हे वर्णन प्रत्ययकारी झालं आहे.
ऑस्ट्रेलियातील आदिम जमाती आणि गोऱ्यांनी त्यांचे केलेले शोषण हा विषय आपल्याला ऐकून- वाचून माहीत असतो; पण बोकील जेव्हा या आदिवासींच्या गावापर्यंत पोचतात, तिथल्या लोकांशी बोलतात, त्यांच्या वेदना, सुख-दुःख जाणून घेण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्या प्रश्नाचं नेमकं स्वरूप जाणून घ्यायला मदत होते. त्यांचं हे लेखन भावनांचे तरंग निर्माण करतं; पण त्यात वाहून जात नाही.
वस्तुनिष्ठ दृष्टी हे लेखकाचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळेच शोषणकर्ते गोरे आणि मूलनिवासी यांच्या संघर्षाचे चित्रण करताना आदिवासींचे गेलेले हक्क पुन्हा मिळवून देण्यासाठी झालेल्या बदलांचीही आस्थेने ते नोंद घेतात. प्रश्नाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करतात. खरे तर प्रत्येक लेखाचं हे वैशिष्ट्य आहे. परिसराचं नेमकं स्थान कळण्यासाठी पदोपदी ते भूगोलाचा आधार घेतात; तर त्या त्या समाजाचे अंतरंग जाणून घेण्यासाठी इतिहासात खोल शिरतात.
ब्रह्मदेशातील (सध्याचा म्यानमार) यंगूनमधला सर्वांत मोठा पॅगोडा सोन्याने मढवलेला आहे. तो पाहतानाचा अनुभव शब्दांकित करतानाच बोकील शेकडो वर्षे मागे जात इतिहासाचा धांडोळा घेतात. ‘कोणत्याही देशाची संस्कृती कळायचा एक मार्ग म्हणजे तिथली उपासनेची ठिकाणे पाहायची’, असे त्यांनी लेखात म्हटले आहे. या संपूर्ण पुस्तकात तशा आकलनाचा एक वस्तूपाठच पाहायला मिळतो. चीनच्या युनान प्रांतातल्या ‘शांग्री-ला’ गावाकडे जाताना लेखकाला ‘लॉस्ट होरायझन’ या जेम्स हिल्टन यांच्या कादंबरीची आठवण होते.
त्या संदर्भामुळे ‘शांग्री-ला’ मठाविषयीची आपल्या मनातली उत्कंठाही ताणली जाते. युनानचा उत्तर- पश्चिम भाग तिबेटला लागून असल्याने येथे तिबेटींची वस्ती आहे. या दौऱ्याची कथा सांगताना तिथल्या लोकजीवनाचे बारीकसारीक तपशीलही बोकिलांच्या नजरेतून सुटत नाहीत. त्याचबरोबर बौद्ध धर्माची वैशिष्ट्यं, त्यातील प्रवाह, चिनी राज्यव्यवस्था या सगळ्यांची नेमकी माहिती ते देतात; त्यामुळे एका वेगळ्या दुनियेतील ‘सहप्रवासा’चा अनुभव वाचकाला मिळतो.
कॉकेशसच्या कुशीतील आर्मेनियात, कंबोडियातील ‘अंगकोर वाट’च्या परिसरात, मानवी इतिहासातील मोठ्या घटनांचा साक्षीदार असलेल्या तुर्कस्तानात, माया संस्कृतीचे अवशेष वागवणाऱ्या मेक्सिकोत आणि अगदी अफगाणिस्तानच्या ग्रामीण आणि दुर्गम भागापर्यंत हा ‘सहप्रवास’ घडतो.
खरे तर या अगदी भिन्न प्रकृतीच्या संस्कृती. त्यांच्यातले भौगोलिक अंतरही मोठे; परंतु बोकिलांचे हे त्या त्या वेळचे लेख वाचताना त्यात एक समान सूत्र जाणवल्याशिवाय राहात नाही. ते जाणवतं याचं कारण जगाकडे पाहण्याचा लेखकाचा स्वतःचा विशिष्ट दृष्टिकोन आहे. त्यांनी पाहिलेले समाज आणि संस्कृती त्यांच्या वेगळेपणानं उठून दिसत असल्या तरी त्यांच्यातील मानवतेचा अंतःप्रवाह बोकिलांना सतत खुणावत असतो.
स्थल- समाज- संस्कृती दर्शन घडवितानाच या सगळ्याचा आपल्या जीवनाशी सांधा कुठे जुळतो याकडंही ते पुन्हापुन्हा निर्देश करतात. क्षितिजापार जातानाही त्यांनी सांभाळलेलं हे ‘क्षितिज’ लोभस आहे.
पुस्तकाचं नाव : क्षितिजापारच्या संस्कृती
लेखक : मिलिंद बोकील
प्रकाशक : समकालीन प्रकाशन
(०२० - २४४७०८९६ )
पृष्ठं : २५४. मूल्य : ३०० रुपये.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.