मनातलं गावं हाय का?

आजुनबी वढ्याच्या पाण्याला खळखळाट तेवढाच हाय... आता घरोघरी नळ झाल्यामुळं तिथं कापडं धुवायला कोण जात न्हाय, नळामुळं दारात पाणी आलं आन पाण्यामुळं डास, न्हायतर माश्या सोडल्या तर मच्छर कुणी बघितलं नव्हतं.
Villages
VillagesSakal
Updated on

आजुनबी वढ्याच्या पाण्याला खळखळाट तेवढाच हाय... आता घरोघरी नळ झाल्यामुळं तिथं कापडं धुवायला कोण जात न्हाय, नळामुळं दारात पाणी आलं आन पाण्यामुळं डास, न्हायतर माश्या सोडल्या तर मच्छर कुणी बघितलं नव्हतं. वढ्याच्या कडंचा माती आन दगडाचा पार गेला, तिथं सिमेंटचा पार आला पण चार म्हातारी सावलीला आज बी बसल्याली दिसत्यात.

बाजाराच्या गावाला गेलं की कुणीतरी च्या प्याला नेत., दोन रुपयाचा च्या आता धा रुपयाला झाला एव्हडंच...आजबी शाळेतनं येणाऱ्या पोरास्नी गाडीचं आप्रूप वाटतं, तवा बैलगाडी आन सायकलचं वाटायचं आता मोटारसायकल आन मोटारगाडीचं वाटतं एव्हडच. माणसांनी भुई काढून फर्शी टाकली त्याज्यावर धान्याची पोती आजुनबी गर्दी करून हायत. चूल जाऊन गॅस आला तरी गॅसवर बी बाजरीची भाकरीच हाय. हायब्रीड खाऊन आजारपण वाढलं, दवाखानं जवळ आलं आन चांगलं खाणं मात्र राह्यल.

महिन्यातनं आसणार मटाण, आता गावाकडबी दर आयतवारला शिजतंय. दिवाळी शिवार सुदा फराळ बनतो त्यामुळं आजीच्या हातच्या कळीच्या लाडवाची चव ह्या तयार पिटाला न्हाय तरीबी पाच पकवान घरात असल्यामुळ काळजी न्हाय. रानातली फिष्ट कामाची हुती, आता बिनकामाची सुदा व्हाया लागल्या... माणसं, दाराला आंगण कमी आन कंपाउंड जास्त करायला लागल्यात. कारण चोराचं भ्या कमी झालं आन माणसाच भ्या वाढलंय. आठवड्यातन दोनदा टीव्ही बघणारी आता सारखं रिमोट डिवचत बसत्यात, त्यावर लागल्याला मालिकेगत झालंय समदं. ''कायच खरं न्हाय पण बघायला बरं वाटतंय''. फोनवर समदी चवकशी हुया लागली आता पाव्हण्याच्या गावाला जाऊन तब्येत पाणी बघायची गरज न्हाय. पाव्हण्याला सुदा किती दिस राहणार इचारतो. जुनी घर पाडून नवे बंगल बांधायचं फॅड आलंय, मजल्यावर मजल चढवून दिखाऊपण वरचढ झालंय.

पोराला द्याचा हुंडा पोरीला मिळायला लागलाय, गर्व पोराचा न्हाय पोरीचा वाटतो तेवढं मातुर बेस्ट झालंय. झऱ्याच पाणी बंद झालं, हिरीच पाणी नळाला आलं... चार दुकानं झाली गावात, आडीनडीला साकार मगायची सोय राह्यली न्हाय...पैरा गेला, बंदा रुपया आला. रानातली काम करायला बैल जाऊन टॅक्टर आला, शेणखत जाऊन युरिया आला. बेनी सगळी हायब्रीड आली, जमिनीच्या आत खोल नांगर गेला, पोत तर सुधारला न्हाय पण पोट सुदा भरना.

सगळ्या पिढीचं आपल्यागत न्हाय ह्येच म्हणणं हाय, पण प्रत्येक पिढीला दिसत त्ये पुढच्या पिढीत जुनंच हाय, पिढी दर पिढी बदल ह्यो ठरल्याला हाय कुठल्या बदलाच्या वाऱ्यात आपुन तग धरतो, जे आपल जगणं तेच मरण हाय...

शेरातल्या खोलीत गावाचं ऐसपैस जागा असल्यालं घर आठवतं, पव्हायला गेल्याली विहीर आठवती. आता गावचं घर भावांन वाटून घेतल, विहिरीच्या बाजूला मारल्याला बोरिंगनं विहिरीचं पाणी वाटून घेतलं, कोरडी पडली रानं,मनं.. कुणास ठाऊक असं का घडलं. शेती अन् माणूस आधुनिक झाला, नातं मातुर जुनं पडलं..! शेरातल्या गर्दीत मनातलं गावं आजुनबी जित्त हाय, मोक्कार पैस कमवून सुदा मातीपाशी चित्त हाय. तिथन दिसणारं गाव आता खरंच तसच राहिलंय का. शेरात गमावलेल्या माणसान, गाव पुना पायलय का.?

(सदराचे लेखक ‘गावाकडच्या गोष्टी’ या ‘यू ट्यूब’ वरील वेबमालिकेचे लेखक - दिग्दर्शक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.