व्हिएतनाममधील माझे मित्र चीन सीमेपर्यंत सोबत आले, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत मी त्यांची रजा घेतली. ‘Friendship Pass’ हे व्हिएतनाम आणि चीन यांच्यामधल्या सीमेचं नाव आहे.
- नितीन सोनवणे nonviolenceplanet@gmail.com
व्हिएतनाममधील माझे मित्र चीन सीमेपर्यंत सोबत आले, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत मी त्यांची रजा घेतली. ‘Friendship Pass’ हे व्हिएतनाम आणि चीन यांच्यामधल्या सीमेचं नाव आहे. हा सीमाभाग जंगलामध्ये आहे व ते एक राष्ट्रीय उद्यान आहे. सहसा इथून विदेशी लोक जात नाहीत. माझ्यासोबत काही व्हिएतनामी आणि चिनी लोक होते. मी एकटा सायकलवरून पुढं जात होतो, त्यामुळं मी एक आकर्षण होतो. प्रत्येक देश हा आपला मोठेपणा दाखवण्यासाठी इमिग्रेशन कार्यालय मोठमोठी बनवत असतो. चीन आणि व्हिएतनाम या दोन्ही देशांच्या इमिग्रेशन कार्यालयाच्या इमारती भव्य आणि सुंदर होत्या. आधी मी व्हिएतनाम इमिग्रेशन सहज पार केलं, त्यांनी काहीही प्रश्न विचारले नाहीत. जेव्हा मी चीनमध्ये आलो, तिथं मोठा प्रसंग घडला. मी एकतर भारतीय, त्यातही २५ वय. त्यांना शंका आली, मी एक गुप्तहेर असल्याची. त्यांनी मला एका बाजूस घेतलं आणि एका इंग्रजी बोलणाऱ्या अधिकाऱ्याला बोलावलं. त्यांनी माझी झडती घेण्यास सुरुवात केली. प्रथम माझं सर्व सामान बॅगेतून टेबलवर ओतलं आणि एकेका वस्तूची तपासणी सुरू केली. त्यात त्यांना काही नाही सापडलं. आता त्यांनी माझी रोजनिशी वाचायला सुरुवात केली. त्यानंतर माझा फोन आणि त्यातील व्हॉट्सअप आणि फेसबुक संदेश, हे पाहून मला त्यांचा राग आला; पण काय बोलावं हे समजेना.
कम्युनिस्ट देशामध्ये असे नियम असतील, असा मनामध्ये विचार करत एका बाजूस थांबलो. तसंच, माझ्या फोनमध्ये सर्व सामाजिक आणि मित्रांचे संदेश होते, त्यामुळे मला काही भीती नव्हती. जर त्यामध्ये चीनविरोधी काही असतं, तर त्यांनी माझी रवानगी जेलमध्ये केली असती.
माझी पूर्ण झडती केल्यानंतर त्यांनी मला चीनमध्ये प्रवेश दिला आणि मी या जगातील सर्वांत जास्त लोकसंख्या, पिवळ्या नदीच्या सुपीक खोऱ्यात जगातील पहिल्या संस्कृतींपैकी एक म्हणून उदयास आलेल्या आणि जगातील सर्वांत मोठी आर्थिक शक्ती, जी १९ व्या शतकापर्यंत होती आणि आता परत त्याच मार्गावर असलेल्या महाकाय देशामध्ये प्रवेश केला.
गुआंग्शी या स्वायत्त प्रांतात मी प्रवेश केला. चीनमध्ये २३ प्रांत आहेत. चीनच्या वांशिक अल्पसंख्याकांमध्ये गुआंग्शीमध्ये सर्वाधिक लोकसंख्या आहे. विशेषतः झुआंग लोक, जे लोकसंख्येच्या ३२ टक्के आहेत. हा प्रदेश डोंगराळ आहे व खूप सुंदर गुंफा येथे पाहायला मिळतात. चक्रफूल जे आपण बिर्याणी आणि मसाल्यात वापरतो, याचं जगातील ८५ टक्के उत्पन्न हे गुआंग्शी इथे घेतलं जातं. चीनमध्ये प्रवेश करताच एक सुंदर इमारत होती, त्यासमोर खूप लोक फोटो काढत होते. मीपण फोटो काढण्यासाठी गेलो व लोकांना विचारू लागलो की, माझा एक फोटो काढा; पण खूप सारे लोक घाबरून मझ्यापासून दूर जाऊ लागले. मीपण प्रयत्न करत राहिलो व शेवटी एका महिलेने माझा फोटो काढला. मी गोंधळात पडलो, हे माझ्याशी असं का वागत आहेत? चिनी लोकांना भारतीय लोक आवडत नसावेत का? नंतर मला समजलं की, हे लोक इंग्रजी बोलायला घाबरत होते, म्हणून दूर गेले. बाहेर पाहतो तर एकही दुकान नाही की जिथं मला काही डॉलर युआनमध्ये बदलता येतील; आणि आता भूकही लागली होती.
पहिल्या देशामध्ये हे मला सहज करता आलं आणि सोबत मोबाईलला सीमकार्डही नाही इथं. मी जवळचं एक शहर पिंगाझियान इथं जाण्याचं ठरवलं. सायकल चालवत निघालो. साधारण २५ किलोमीटर दूर आणि भूकही जोरात लागलेली. वाटेत मला खूप मोठी फर्निचरची कोठारं दिसली, जी की जगभरात आपला माल पाठवत असतील. लोकांची सुंदर घरंही दिसू लागली. प्रत्येक घराच्या दरवाजाला लाल रंगाची तोरणं होती व त्यात चिनी भाषेत काहीतरी लिहिलेलं. त्या शहरात एका चिनी युवकाची भेट झाली, तो थोडं इंग्रजी बोलू शकत होता. त्यानं मला सीमकार्ड घेऊन दिलं. मी इंटरनेट सुरू केलं आणि माझं फेसबुक, गुगल मॅप आणि ई-मेलही सेवा बंद होती. चीनमध्ये इंटरनेटवर खूप सारे निर्बंध आहेत. सोबत टीव्हीवरही शासनाचं नियंत्रण असतं. माझी यात्रा ही गुगल मॅपवर अवलंबून होती आणि त्यामुळे नवीन पर्याय शोधत होतो. मला एक चीन मॅप मिळाला; पण त्यामध्ये इंग्रजीमध्ये काही नव्हतं, पूर्ण चिनी भाषा, ती वापरणं खूपच अवघड होतं. आपल्या आजूबाजूस काय आहे, हे गुगलवर समजतं; पण आता ते शक्य नव्हतं.
सायंकाळी पाच वाजता मी आणि माझा चिनी मित्र एका बुद्धिस्ट मंदिरात पोहोचलो. एक आजोबा एका पेपरवर काहीतरी लिहीत बसले होते. माझ्या मित्राने त्यांना विचारलं की, ‘‘माझा मित्र इथं राहू शकतो का?’’ त्यांनी आम्हाला एका महिलेकडे पाठवलं, ती साधारण ६० वयाची होती आणि दुसऱ्या शहरातील दोन नातवांसोबत ती इथं राहत होती. जेव्हा तिला माझ्याबद्दल समजलं, तेव्हा तिने मला राहण्यासाठी परवानगी दिली. तिचं नाव हे डांग कुआँग चुन. ती कामामध्ये सतत गुंतलेली असे. चिनी लोक हे प्रचंड मेहनती, ते मी जागोजागी पहिलं. पुढे किर्गिस्तान या देशातपण काही चिनी कामगार मला भेटले, जे की डोंगरामधून रोड बनवत होते, ते एक कठीण असं काम होतं. डांगला मी माझी आई म्हणू लागलो. तिने मला खूप प्रेम दिलं आणि आपुलकीने मला खूप सहकार्य केलं. माझ्या राशीन या गावात यमाईचं मंदिर आहे, ती आमच्या गावातील सर्व लोकांची आई आहे. नंतर जिने मला जन्म दिला ती आई आणि माझी आत्या, जी आमच्यासोबत असे, जिने मला पदरात घेतलं, कारण तिला मुलं नव्हती. माझ्या जीवनात खूप साऱ्या माउली आहेत आणि त्या पूर्ण जगभर, त्यामुळे हे विश्व खऱ्या अर्थाने माझं घर बनलं आहे. डांगने एका पानावर माझ्याबद्दल आणि या यात्रेसंदर्भात चिनी भाषेत माहिती लिहिली, जी मी लोकांना दाखवत असे; आणि सोबत तिने मला तिच्या भावाचा फोन देऊन पुढील शहरात राहण्याची व्यवस्था केली. तिसऱ्या दिवशी या माझ्या आईला नमन करून मी पुढील प्रवास सुरू केला.
प्राचीन काळापासून भारत आणि चीनचे चांगले संबंध होते. त्याचं मुख्य कारण हे बुद्धिजम व सोबत वस्तूंची देवाण-घेवाण. पेपर बनवणं, छपाई, बंदुकीची दारू आणि कंपास हे खूप मोठं योगदान चीनचं दुनियेसाठी आहे. भारतीय जीवनाचा अविभाज्य घटक म्हणजे चहा, हासुद्धा चीन या देशाची देणणी. आपल्याकडे चहामध्ये दूध असतं; पण चीनमध्ये गरम पाण्यात चहाची पत्ती टाकतात. हेच लोक पितात. मी त्यांच्यासाठी पाहुणा असल्यामुळे मला ते तो चहा पाजत असत. गरम पाण्याची चहासाठीची किटली मी ठिकठिकाणी पहिली. सोबत ते मला सिगारेट देत असत, जो त्यांच्या संस्कृतीचा भाग आहे. ते नाकारलं तर त्यांना अनादर वाटत असे. मी सिगारेट पीत नाही हे त्यांना आश्चर्य वाटत असे, कारण बहुतेक लोक इथं धूम्रपान करतात. मी हात जोडून धन्यवाद देऊन त्यास नकार दिल्यामुळे तेही एका वेगळ्या भावानं मला पाहत असत. चीनमधील लोक मला विचारत, ‘‘तुझं लग्न झालं आहे का?’’ मी सांगे, ‘‘झालं असतं तर मी इथे नसतो.’’ मग आम्ही सोबत हसत असू. मी अनुभवलं की, येथील ग्रामीण लोकांचा जगाशी खूप कमी संबंध आहे, जो काही थोडा आहे, तो टीव्हीमुळे, जे चीन सरकार दाखवेल. एकदा एक १६-१७ वर्षांचा मुलगा मला वाटेत भेटला. माझ्याशी हस्तांदोलन केल्यावर तो मोठ्यानं बोलला, ‘‘तू पहिला विदेशी माणूस आहेस, जो त्याच्याशी भेटत आहे.’’ तो एवढा उत्साहित झाला की, त्याच्या चेहऱ्यावरचे भाव आणि आवाज मी कधी विसरू शकणार नाही. मीही त्याच्या आनंदात सहभागी झालो. त्या रात्री मी त्या मुलाच्या घराजवळील एका हॉटेलमध्ये, जे मला विनामूल्य देण्यात आलं, तिथं राहिलो. रात्री तो मुलगा आणि त्याची आई भेटीला आले व सोबत जेवणही मला दिलं.
जेव्हा लोक महात्मा गांधींचा फोटो माझ्या सायकलवर पाहत, तेव्हा ते ‘गांजी’ असं बोलत. तसं ते खूप कमी लोकांना माहीत आहेत. नवयुवक हे आता गांधीजींना समजण्याचा प्रयत्न करतात. ५० पेक्षा जास्त गांधीजींची पुस्तकं ही चीनमध्ये प्रकाशित झाली आहेत. गांधीजी कधी चीनमध्ये नाही गेले; पण त्यांचा चीनशी खूप मोठा संबंध आहे. दक्षिण आफ्रिकेतील ट्रान्सवाल या ब्रिटिश कॉलनीत १९०६ ला एशियाटिक नोंदणी कायदा हा भारतीय आणि चिनी यांच्यासाठी लागू केला. त्या वेळेस ६० हजार भारतीय आणि साधारण अकराशे चिनी लोक इथे खाण आणि शेतकामगार म्हणून ब्रिटिशांनी आणले होते व सोबत काही व्यापारीही होते. या काळ्या कायद्यानुसार आशियाई लोकांना आधार कार्डसारखं ओळखपत्र बनवणं बंधनकारक होतं आणि घराबाहेर असताना ते सोबत बाळगणं आवश्यक होतं. सोबत तीन पौंडांचा वार्षिक कर आणि ख्रिस्ती लग्नाव्यतिरिक्त इतर धर्मीय लग्नं ही बेकायदा होणार होती. याविरोधात महात्मा गांधींनी असहकार आंदोलन पुकारलं होतं आणि त्यास सुरुवातीचं नाव ‘PASSIVE RESISTANCE’ नंतर गांधीजींनी बदलून ‘सत्याग्रह’ हे नाव ठेवलं. सत्याग्रहाची सुरुवात इथं प्रथम झाली आणि सोबतीला चिनी लोकही होते, ज्यांनी गांधीजींसोबत लढा दिला. महात्मा गांधी आणि चिनी लोक जेव्हा एका तुरुंगात होते, तेव्हा त्यांनी ब्रिटिशांना विनंती केली की, माझ्या चिनी सहकाऱ्यांसाठी चिनी जेवण द्यावं, तसंच ते ‘INDIAN OPINION’ मधून चिनी लोकांबद्दलसुद्धा लिहीत आणि त्यांचं शौर्य पाहून खूप प्रभावी होते. या आंदोलनाला १९१४ मध्ये यश आलं, चिनी लोकांनी गांधीजींचे आभार मानले.
चीनमध्ये मी एक महिना राहिलो व या एक महिन्याच्या कालावधीत खूप साऱ्या घटना घडल्या, त्या एका लेखात लिहिणं शक्य नाही. पुढील लेखात मी या देशाबद्दल लिहीन. तुम्हाला चीनबद्दल काय वाचायला आवडेल, ते मला ई-मेलने कळवा, म्हणजे मी तसं लिहीन.
(सदराचे लेखक जगभर भ्रमंती करणारे व महात्मा गांधी यांच्या विचारांचे प्रसारक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.