सोनेरी स्वप्नं : पुण्य वाहून नेणारा शेतकरी!

‘दहाला नाय परवडत बाबा. पंधराला तरी ने की,’ ती असं म्हणताच मी आवाज वाढवत म्हणालो, ‘आवं नाय नाय. दहाला देत असाल तर द्या नायतर राहुद्या.’
farmer
farmersakal
Updated on
Summary

‘दहाला नाय परवडत बाबा. पंधराला तरी ने की,’ ती असं म्हणताच मी आवाज वाढवत म्हणालो, ‘आवं नाय नाय. दहाला देत असाल तर द्या नायतर राहुद्या.’

‘वीसला कुठं पालकची गड्डी असती का आज्जी? हडपसरच्या मंडईत तर दहाला मिळती,’ मी असं म्हणालो आणि हायवेच्या बाजूला बसलेल्या साठ वर्षाच्या त्या म्हतारीच्या सुरकुतल्या चेहऱ्यावरही नाराजी पसरली.

‘दहाला नाय परवडत बाबा. पंधराला तरी ने की,’ ती असं म्हणताच मी आवाज वाढवत म्हणालो, ‘आवं नाय नाय. दहाला देत असाल तर द्या नायतर राहुद्या.’ मिचमिच्या डोळ्यांनी तिनं माझा तोरा न्याहाळला. हातचं गिऱ्हाईक सुटायला नको, असा विचार करत तिनं ‘बरं बाबा, ने दहाला,’ असं म्हणत पालकची गड्डी माझ्यासमोर धरली. मी दहाचा ठोकळा तिच्या हाती दिला. वरून खालून न्याहाळत तिनं तो ठोकळा पोत्याखाली ठेवला आणि पुढच्या गिऱ्हाईकाकडं नजर लावून बसली.

तिच्यासमोर अजून तीस-चाळीस गड्ड्या होत्या. कधी संपणार आणि कधी घरी जाणार, असा काहीतरी विचार तिच्या डोक्यात असावा. त्याकडं दुर्लक्ष करत मी घराकडं निघालो. रात्री मस्त थंडी पडलेली. गॅलरीत बसून गरमागरम पालकभजी खाल्ली. मन तृप्त झालं. घर पूर्ण बंद करून ब्लँकेट घेऊन झोपी गेलो. सकाळी फरशी बर्फासारखी थंड पडलेली. त्यामुळं घरामध्येही चप्पल घालूनच फिरत होतो. सकाळचे साडेसहा वाजले असावेत.

धुक्यामुळे खिडकीच्या काचाही गोठल्यासारख्या दिसत होत्या. ब्रश केलं तर थंड पाण्यानं गुळण्याही करायला नको वाटत होतं. कोमट पाण्यानं गुळण्या केल्या आणि गरमागरम चहा घेऊन गॅलरीत आलो. कानटोपी, स्वेटर, सॉक्स घातलेला. तरीही हुडहुडत होतो. तशात रस्त्यावर नजर गेली. डोक्यावर टोपली घेतलेली, साठ वर्षाची म्हातारी थकल्या पावलानं हायवेच्या दिशेनं निघाली होती. तिच्या टोपल्यात पालक होती आणि ती दुसरी तिसरी कुणी नाही, तर कालचीच म्हातारी होती. पटकन पोराच्या हातात दहा रुपये दिले आणि त्याला म्हणलं काही न बोलता त्या आज्जीला फक्त देऊन ये. पोरानं होकार दिला आणि तो पळत खाली गेला. आज्जीसमोर थांबत त्यानं आज्जीच्या हातात दहा रुपये दिले आणि पुन्हा माघारी पळत आला. आज्जी भांबावल्यासारखी त्याच्याकडं पाहत होती. क्षणात तिच्या चेहऱ्यावर स्मित तरळलं. तिनं ती नोट कपाळाला लावली आणि हसत हसत हायवेच्या दिशेनं निघाली.

असं करून मी कसलंच पुण्य केलं नव्हतं, फक्त स्वत:ला पापापासून वाचवलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.