उत्तर-दक्षिणेचा संगम : पट्टडकल्लू

तो काळच फार वैभवशाली म्हणावा लागेल. दख्खनच्या पठारावर काही राजसत्ता उदयास आल्या. अलीकडे तो काळ ‘पूर्व मध्ययुगीन कालखंड’ म्हणून ओळखला जातो.
pattadakal
pattadakalsakal
Updated on

- केतन पुरी, ketan.author@gmail.com

तो काळच फार वैभवशाली म्हणावा लागेल. दख्खनच्या पठारावर काही राजसत्ता उदयास आल्या. अलीकडे तो काळ ‘पूर्व मध्ययुगीन कालखंड’ म्हणून ओळखला जातो. इसवी सनाच्या सहाव्या शतकापासून ते बाराव्या शतकापर्यंतचा समावेश पूर्व मध्यकाळात अभ्यासकांच्या मार्फत करण्यात आला आहे.

या काळात उत्तर कर्नाटकामध्ये ‘चालुक्यांचा’ उदय झाला. त्यांची राजधानी ‘वातापी’ ऊर्फ ‘बदामी’मुळं इतिहासात त्यांना ‘बदामी चालुक्य’ या नावानं संबोधलं गेलं. या चालुक्यांनी उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम अशा चारही दिशांना आपले विजयी अश्व उधळले. फार मोठा मुलुख काबीज केला.

कीर्तिवर्मन, मंगलेश, पुलकेशी प्रथम आणि द्वितीय, विनयादित्य हे चालुक्यांच्या वंशावळीमधील काही प्रभावी सम्राट. या राजांनी राज्यविस्तार करण्यासोबतच कला, स्थापत्य, धार्मिक संकल्पना, सांस्कृतिक परिस्थिती आणि सामाजिक रचनेमध्ये आमूलाग्र बदल केला, ज्याचा प्रभाव पुढं सहाशे-सातशे वर्षे टिकून राहिला. त्यांची अद्‍भुत निर्मिती असलेलं ऐहोळे गाव, राजधानी बदामी यांविषयी आपण आधीच्या काही लेखांमधून माहिती घेतलेली आहेच. पण पुरातत्त्वीय साधनांच्या आधारे इतर काही ठिकाणं आणि त्यांचं महत्त्व आपण पाहणार आहोत.

हंपी-बदामी पाहण्यासाठी गेलेल्या पर्यटकानं ‘पट्टडकल’ गावाचं नाव ऐकले नसेल तर नवलच म्हणायला हवे. बदामीपासून अवघ्या २० किमी अंतरावर असणाऱ्या या छोट्याशा टुमदार गावाला फार संपन्न वारसा लाभला आहे. जागतिक वारसास्थळ म्हणून इथल्या ऐतिहासिक वास्तूंना नामांकन मिळालं आहे.

या गावाच्या बाजूनं ‘मलप्रभा’ नदी वाहते. चालुक्यांच्या उदयअस्ताची साक्षीदार असलेल्या नदीच्या किनाऱ्यावर अनेक महत्त्वाच्या धार्मिक स्थळांची निर्मिती केल्यामुळे या नदीला आगळेवेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. खरंतर, या गावाचं नाव अनेक स्थानिक लोक ‘पट्टडकल्लू’ अशाप्रकारे उच्चारतात. कर्नाटक सरकारनेसुद्धा याच नावाची पाटी गावाच्या बाहेर लावली आहे.

चालुक्य राजांचा पट्टाभिषेक करण्यात येणारे ठिकाण म्हणून पट्टडकल, असं नाव पडल्याचे अनेक अभ्यासक नोंदवून ठेवतात. मलप्रभा नदीनं इथं उत्तरेकडं वळण घेतलं असल्यामुळं या ठिकाणाला चालुक्य राजांनी धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व बहाल केलं.

या मलप्रभेच्या किनाऱ्यावर चालुक्यांनी अतिभव्य स्वरूपातील काही मंदिरे उभारली. त्यामध्ये गलगनाथ मंदिर, पापनाथ मंदिर, विरुपाक्ष मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, काशी विश्वेश्वर मंदिर, संगमेश्वर मंदिर, काड सिद्धनाथ मंदिर, जांबुलिंगेश्वर मंदिर, चंद्रशेखर मंदिर यांचा प्रामुख्याने समावेश होतो. उत्तर भारतात प्रामुख्याने आढळणारी मंदिर स्थापत्य शैली, नागर शैली आणि दक्षिणेत आढळून येणाऱ्या द्राविड शैलीचा सुरेख संगम आपल्याला या ठिकाणी झाल्याचं पाहावयास मिळतं.

या सर्व मंदिरांमध्ये विरुपाक्ष मंदिरात आजही पूजाअर्चा करण्यात येते. विरुपाक्ष आणि मल्लिकार्जुन ही दोन मंदिरं अगदी एकमेकांना चिकटून बांधण्यात आली आहेत. ही मंदिरं विक्रमादित्य दुसरा याची पत्नी लोकमहादेवी आणि त्रेलोक्यमहादेवी यांनी निर्माण केली असल्यामुळे ही मंदिरं अनुक्रमे ‘लोकेश्वर’ आणि ‘त्रैलोकेश्वर’ याही नावानं प्रसिद्ध आहेत.

विरुपाक्ष मंदिराच्या बाहेर भलामोठा नंदीमंडप आहे. मंडपाच्या आत एकाच दगडात घडवलेला भव्य नंदी आहे. या मंदिराला एक मुख मंडप, दोन अर्ध मंडप, भलामोठा मुख्य मंडप, अंतराळ आणि गर्भगृह आहे. हे मंदिर ‘सांधार’ प्रकारातील आहे. म्हणजे, ज्या मंदिराच्या गर्भगृहाला प्रदक्षिणा मारण्यासाठी प्रदक्षिणा पथाची रचना मंदिरांच्या आतमध्येच करण्यात आलेली असते. ज्या मंदिराच्या आतमध्ये अशी रचना नसते, ती मंदिरे ‘निरंधार’ प्रकारात मोडतात.

काही अपवाद सोडता, दख्खनमध्ये साधारण नवव्या-दहाव्या शतकानंतर सांधार प्रकाराची रचना करण्याची पद्धत कालबाह्य झाल्याचं आढळून येतं. विरुपाक्ष मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे, मंडपाच्या खांबावर कोरण्यात आलेले महाभारत, रामायण, पंचतंत्र तसेच कालिदासाच्या कुमारसंभवातील काही प्रसंग.

रामायणातील मारिच वध, रावण-हनुमान भेट, जटायू-रावण युद्ध हे प्रसंग सहजपणे लक्षात येतात. कृष्णाचा जन्म, त्याने दाखवलेल्या बाललीला, अनेक राक्षसांचा केलेला वध ते कंसासोबत केलेले मुष्टियुद्ध असे प्रसंग या मंडपाच्या खांबावर कोरलेले आहेत. हे प्रसंग हरिवंश पुराण, भागवत पुराण यांच्यामध्ये असलेल्या वर्णनांवर आधारित आहेत.

अंतराळामध्ये दोन देवकोष्ट आहेत. त्यातील उजवीकडे गणेशची प्रतिमा आहे तर डाव्या देवकोष्टकामध्ये महिषासुरमर्दिनीची प्रतिमा आहे. माझ्या पाहण्यात आजवर एवढी सुंदर महिषासुरमर्दिनीची मूर्ती पाहण्यात आली नाही. निव्वळ अप्रतिम आणि चालुक्यांची श्रीमंती दाखवणारे हे काम आहे. जे त्यांच्या आधी आणि त्यांच्या नंतरही कुणाला जमले नाही.

मंदिराच्या बाह्यांगावर शिवाचा नटराज, भैरव, लकुलीश असे प्रसिद्ध अवतार तर विष्णूचे नरसिंह, वराह, वामन, गजेंद्रमोक्ष हे अवतार तसेच लक्ष्मी, सरस्वती, महिषासुरमर्दिनी अशा विविध देविदेवता कोरल्या आहेत. मल्लिकार्जुन मंदिराची स्थापत्यरचना अगदी विरुपाक्ष मंदिरासारखी आहे. या दोन्ही मंदिरांचा निर्मिती काळही सारखाच आहे.

जेव्हा चालुक्यांनी पल्लवनगरी कांचीपुरम शहरावर आक्रमण करून विजय मिळवला, त्यानंतर या मंदिरांची निर्मिती करण्यात आली. अभ्यासकांच्या मते, या मंदिरांवर कांचीच्या कैलासनाथ मंदिराचा प्रभाव आहे. कैलासनाथ मंदिर, कांची आणि विरुपाक्ष मंदिर, पट्टडकल या मंदिरांचा प्रचंड मोठा प्रभाव वेरुळच्या लेणी क्र. १६, कैलास मंदिरावर आहे.

पापनाथ मंदिर सोडले, तर इतर कोणतेही मंदिर विरुपाक्ष किंवा मल्लिकार्जुन इतके भव्य नाही. पापनाथ मंदिर विरुपाक्षपासून काही अंतरावर दक्षिणेकडे आहे. मंदिराच्या मुखमंडपावर असलेले गजव्याल शिल्प, मंदिराच्या बाह्यांगवर असलेले रामायण आणि महाभारत वैशिष्ट्यपूर्ण आहे. विशेषतः रामायणात रामजन्म होण्याआधीचे काही प्रसंग इथे अतिशय सुंदरपणे कोरलेले आहेत.

येथील संगमेश्वर मंदिर चालुक्यांच्या राजवटीचा अस्त आणि राष्ट्रकुटांचे या प्रदेशावर वाढणारे वर्चस्व दर्शविते. अर्धवट कोरलेल्या मूर्ती, त्यांची भिंतीवर काढून ठेवण्यात आलेली आरेखने, मंदिराची उभारणी करताना घाईघाईत केलेले काम आपल्याला सहजपणे चालुक्यांच्या कारकीर्दीच्या अस्ताची जाणीव करून देतात.

या मंदिर समूहापासून काही अंतरावर, पश्चिमेस नारायण मंदिर आहे. हे जैन मंदिर आहे. काही अभ्यासकांच्या मते, या मंदिराची निर्मिती राष्ट्रकुटांच्या दानामुळे झाली तर काहींच्या मते, हे मंदिर कल्याणीच्या चालुक्यांनी बांधले असावे. याही मंदिराचे स्थापत्य पट्टडकल येथील इतर मंदिरांशी मिळतेजुळते आहे.

पट्टडकल चालुक्यांचा सुवर्णकाळ दर्शवणारे ठिकाण आहे. या ठिकाणचे महत्त्व ओळखून बदामी चालुक्यांच्या नंतर राष्ट्रकूट आणि कल्याणी चालुक्यांनीही आपले अस्तित्व इथे दाखवून दिले आहे. उत्तर आणि दख्खनच्या कला, स्थापत्याचा परिपूर्ण संगम म्हणून आजही पट्टडकल अनेक देशी-विदेशी अभ्यासकांना खुणावत आहे.

(लेखक पुरातत्त्व विषयाचे अभ्यासक असून लोकसंस्कृती तसंच प्राचीन - मध्ययुगीन भारतीय इतिहास हे देखील त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.